गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

संध्या

“पण मला मुळी लग्नच नाहीं करायचं. मी आपली तुझ्याजवळ राहीन. तुझ्याजवळ गाणीं शिकेन. शेतावर जाईन. फुलं वेंचीन. मोट धरीन. मला मोट आवडते. कसं धो धो पाणी येतं; नाहीं, आजी ?”

“वेडी आहेस अगदीं !”

“मघां म्हणालीस की बॅरिस्टराला हटवशील, आणि आतां म्हणतेस कीं वेडी आहेस म्हणून. आजी, खरं सांग,
मी शहाणी की वेडी ?”

“आधी अंग पूस. आणि शेवटीं केंस भिजवलेसच ना ?”

“फार नाहीं कांही भिजले. आजी, डोक्यात शिरूं दे पवित्र पाणी, चंद्रभागेचं भक्तिप्रेमाचं पाणी. आजी, मी जनाबाई होऊं ?”

“जनाबाई व्हायला पुण्य लागतं. सांगितलं होतं कीं डोकं बुडवूं नकोस म्हणून.”

“तूं तर तीनतीनदां बुडवतेस ? आम्हां मुलांना मात्र आडकाठी.”

शेवटी एकदांची संध्या व भागीरथीकाकू घरीं आलीं. संध्येचे ओले झालेले केंस पाहून आईनें तिला मारलें. संध्या रडूं लागली. आजीनें तिला जवळ घेतलें. तरीहि तिचें मुसमुसणें चालूच होते.

“आजी, कां ग आईनं मारलं ? काय मीं पाप केलं ? जरा केस ओले झाले, ही का चूक ?”

“अग, केंस ओले झाले तर पडसं होतं; आणि तसेच ओले राहिले तर मग उवा पडतात. केसांत जटाहि होतात. आईचं का तुझ्यावर प्रेम नाहीं ?”

“माझ्यावर कुणाचं प्रेम नाहीं. संध्या कुणालाच नको. बाबा माझ्याशीं कधींसुध्दा बोलत नाहींत. इतर मुलं माझ्याशीं भांडतात. आई मला मारते. मोठी काकू मलाच काम सांगते. रोज मीच आपली भाजी चिरायची.”

 

पुढे जाण्यासाठी .......

संध्या