गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

संध्या

“संध्ये, उद्यां सासरीं नको का सारं करायला यायला ? भाजी नीट चिरतां आली पाहिजे. सारं शिकायला हवं, बाळ. नुसतं. पुस्तकं वाचून नाहीं हो संसार करतां येत ?”

“म्हणून वाटतं मला शाळेंतून काढलंत ?”

“अग, आतां आणखी किती शिकायचं ? बी.ए.व्हायचं आहे वाटतं ? नोकरी का करायची आहे ? उद्यां लग्न करायला हवं. तरी का शाळेंत ठेवायची ?”

“माझं नकाच लग्न करूं. मी का सर्वांना नकोशी झालें ?”

“संध्ये, तूं वेडी आहेस. मुलींचीं लग्न व्हायचींच.”

“मग जिथं भाजी चिरावी लागणार नाहीं, तिथं द्या मला.”

“भाजी सा-यांनाच लागते.”

“गरिबांकडे कुठं असते रोज उठून भाजी ?”

“तुला का गरीब  नवरा हवा ?”

“हो.”

“कांहीं तरी बोलतेस.”

“थोबाडींत द्या एक. तुम्हीं तिला लाडावून ठेवली आहे. फाजिलपणं बोलायला सांगा. ऊठ. तीं पाणी पिण्याची भांडी आण घांसून आणि सोप्याचा केर काढ. ऊठ.” तिकडून आई रागानें बोलली.

बिचारी संध्या उठली. तिने भांडी घांसलीं. नीट लख्ख नाहीं निघालीं, म्हणून पुन्हां चिंच लावून तिने तीं घांसलीं. भांडी आरशासारखीं हवींत असें तिला वाटे.

“झालीं कीं नाहीं घांसून ? भांडीं घांस म्हटलं, तिथंच घांशीत बसली. दुसरीं कामं आहेत कीं नाहींत ? उद्यां सासरीं तुझं कसं बाई व्हायचं ?”


 

पुढे जाण्यासाठी .......

संध्या