गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

संध्या

“आई, भांडीं स्वच्छ नकोत का ? बघ तरी कधीं घांसलीं आहेत तीं ? माझं तोंड त्यांत दिसत आहे.”

संध्या स्वच्छतेची भोक्ती होती. इवलीहि घाण तिला खपत नसे. स्वत:चे कपडे ती स्वत: धुवी. ती आपलें स्वत:चें भांडें घांशी. तिची एक उशी होती. त्या उशीचा अभ्रा ती स्वच्छ ठेवी. तिला कोणतेंहि काम सांगा. ती तें निर्मळ नीटनेटकें करी. केर काढील, तर इवलासासुध्दां राहूं देणार नाहीं. भाजी चिरील, तर सुंदर व्यवस्थितपणे चिरील. सारे कौशल्य त्या चिरण्यात ओतील. पालेभाजी असली, तर पानें नीट जुळून घेऊन मग चिरील.

“संध्ये, किती तुझी टापटीप !” आजी म्हणायची.

“परंतु वेळ लावील खंडीभर !” चुलती म्हणायची.

“चांगलं काम पटकन कसं करता येईल ?” संध्या उत्तर द्यायची.

“काम चांगलं करून ते पुन्हां लौकर झटपट करतां आलं पाहिजे.” आजी समजूत घालीत म्हणायची.

“फुलं वाटतं झटपट फुलतात, फळं वाटतं झटपट पिकतात ? आजी, मला आपला वेळ लागतो.” संध्या शांतपणें सांगायची.
आणि त्या दिवशीं भाजी चिरायला तिनें असाच किती तरी वेळ लावला.

“संध्ये, केव्हां ग आटपणार तुझी भाजी ?” चुलती त्रासून म्हणाली.

“संध्ये, उद्यां नव-याकडे गेलीस म्हणजे कसं होईल ? त्याला घाईनं नोकरीवर जावं लागेल. दहाला पानं वाढावीं लागतील. तूं जर तास न् तास भाजीच चिरीत बसलीस, तर कस व्हायच ? नव-याला उपाशी जायची पाळी यायची, नाहीं तर त्याची नोकरी जायची. घरच्या बायकोला प्रसन्न राखील, तर साहेबाची मर्जी खप्पा होईल !” आजी हंसून म्हणाली.

“आजी, नेहमीं उठून तुमचं आपलं एक बोलणं कीं सासरी कसं होईल ? मला नकोच सासर. नकोच लग्न. आणि केलंतच लग्न, तर नोकरीवाला नवरा मला देऊं नका. म्हणजे साहेबाची मर्जी जायची भीति राहणार नाही.”

 

पुढे जाण्यासाठी .......

संध्या