गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

संध्या

“नोकरीवाला नको, तर कोण हवा ? एखाद्या राजाची राणी होणार आहेस वाटतं ?”

“न व्हायला काय झालं ?”

“कोणत्या ग राजाची ?”

“शेतांत काम करणा-या राजाची.”

“कामं करणारे ते का राजे ?”

“होय हो, आजी. ते मागं कोण बरं आले होते आपल्याकडे, ते बाबांजवळ नव्हते का म्हणत पुढंमागं शेतक-यांचंच राज्य होईल, काम करणा-यांचं राज्य होईल, गरिबांचं राज्य होईल म्हणून ! आणि त्यांच्याजवळून मीं ते गाणं टिपून घेतलं आहे त्यांत नाहीं का

“भविष्य राज्य तुमारा मानो
ऐ मजदूरों और किसानो”

आजी, त्यांचंच हो पुढं राज्य होईल.”

“काबाडकष्ट करणा-या गरीब राजाची तूं राणी होणार एकूण ?”

“साहेबाच्या गुलामाची होण्यापेक्षां गरिबाची होणंच चांगलं.”

“संध्ये, तूं वेडी आहेस; वाटेल ते बोलतेस; मुलीनीं स्वत:च्या लग्नाच्या गोष्टी बोलूं नयेत.”

“माझ्या लग्नाचं मीं नये बोलूं ? आजी, मी वेडी कीं तूं वेडी ? आजी, तुझी संध्या आतां लहान का आहे ? मला सार समजतं; मी वेडी नाहीं.”

“बरं, राहिलं. मी वेडी हो. मी आतां म्हातारी झालें; साठी बुध्दि नाठी. मीच वेडी हो.” असें आजी खिन्नपणें म्हणाली.

आजीचा खिन्न स्वर ऐकून संध्येला वाईट वाटलें. तिने आजीकडे पाहिलें. आणि नंतर आजीच्या गळयाला तिने मिठी मारली. आजीनें तिला प्रेमाने जवळ घेतलें.

 

पुढे जाण्यासाठी .......

संध्या