शनिवार, सप्टेंबर 26, 2020
   
Text Size

संध्या

“आणि घरांवरून मारे भगवे झेंडे आहेत. पुरंदरे कॉलनी वगैरे सा-या तपासल्या. वाटे कीं भगवा झेंडा घरावर आहे. कांहीं निर्भयता असेल. परंतु पोलिसाचं नांव काढतांच मालक नको म्हणत. आणि विश्वास, तो रे एक म्हातारा. किती गोड बोलला. परंतु पोलीस येतील चौकशी करायला म्हणतांच म्हणाला, “तर मग नको. तसा मी भितों असं नाहीं. तुम्ही तरुणांनीं नाहीं चळवळी करायच्या, तर कोणी ? तुम्हीच खरं हिंदुस्थान. आमचं काय आतां; दस गेले पांच राहिले. तुमचं तरुणांचं कौतुक करावं. आमचं एवढंच भाग्य कीं आमच्या हयातींत तुमच्यासारखे तरुण घरंदारं सोडून चळवळी करूं लागले आहेत. देशाला आशा आहे. हें प्राचीन राष्ट्र नेहमीं का गुलाम राहील ? अहो, आम्हांलासुध्दां कांहीं करावंसं वाटतं. कांहीं नाहीं होत, तर निदान भगवा झेंडा तरी लावावा. सरकारच्या डोळयांत कांहीं तो फारसा खुपत नाहीं. शिवाय हिंदुमहासभा सरकारला लढाईत मदत करायला तयारच आहे. म्हणून भगवा झेंडा दिला लावून. घराला जरा शोभाहि येते. वारा सुटला म्हणजे किती छान दिसतो, सुरेख फडफडतो. भगवा झेंडा म्हणजे मराठयांच्या स्वराज्याचं स्मरण. भगवा झेंडा डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे. मनाचं समाधान होतं कीं, आपण थोडं तरी करतों आहोंत. घरावर भगवा का होईना, झेंडा आहे. तुम्ही करा खटपट. तुम्ही लाल झेंडयाचे असाल. लाल रंग म्हणजे धोक्याची सूचना. लाल सिग्नल दाखवला कीं गाडी थांबली. तुम्ही फार पुढं गेलेले आहांत. भगवा झेंडा सतराव्या अठराव्या शतकांतला. आम्ही अजून मागं आहोंत. तुम्ही गेलेत फार पुढं. चांगलं आहे. परंतु आम्हां म्हाता-यांना पुढं फार पाहवत नाहीं. मागंच राहणं बरं. श्रमणारांचं राज्य तुम्ही करणार ना ? झालंच पाहिजे. गरिबांची दैना आहे हो. तुमची धन्य आहे. त्या पलीकडच्या बाजूला चौकशी करून बघा. मिळेल जागा. आणि डेक्कन जिमखान्यावर नाहीं का ?” अशी त्या म्हाता-याची टकळी सुरू होती. आम्हांला हंसावं कीं रडावं समजेना.” कल्याण सांगत होता.

“आणि कल्याण, ते तर काँग्रेसचेच गृहस्थ होते ! केवढा त्यांचा वाडा ! परंतु त्यांनींसुध्दां स्वच्छ सांगितलं कीं, “तुम्हांला जागा मिळणार नाही. तुम्हां तरुणांचा नेम नाहीं. तुम्ही कांहीं अहिंसेला बांधलेले नाहीं. तुमचीं ध्येयं निराळीं, विचार निराळे. तुम्ही दुसरीकडेच पाहा. माझ्या घरावर तिरंगी झेंडा आहे. त्याची पवित्रता मला राखली पाहिजे.” काय आढयता ! एवढाल्या इस्टेटी पवित्र राहूनच केल्या असतील ! असतील मतभेद आमच्याशीं, म्हणून कां जागाहि न द्यावी ? बेटे काँग्रेसच्या नांवानं आपली भीति लपवीत असतात. काँग्रेसचा आत्मा यांना कळतो तरी का ? आपल्या देशांतील कांहीं धडपडणारे तरुण वणवण करीत आहेत, पोलीस त्यांची चौकशी करतात म्हणून भित्रे लोक त्यांना जागा देत नाहींत; अशा वेळीं स्वत:ला काँग्रेसचे म्हणवणा-या या माणसाचं तरी कर्तव्य घर देणं हें होतं. “या, राहा माझ्याकडे, आले पोलीस तर त्यांना काय तें उत्तर देईन.” असं वास्तविक त्यांनीं तरी म्हटलं पाहिजे होतं. परंतु त्यांनींहि आम्हांला घालवून दिलं. हें का सत्य ? ही का अहिंसा ? का हा दंभ, ही भीति ? भाईजी, काय ही आपल्या देशाची स्थिति ? हे मोठमोठे वाडे, का हीं कबरस्तानं ? सारे भूतबंगले आहेत. जिवंत प्रेतं जणूं या घरांतून राहतात.” विश्वास म्हणाला.

“मग आतां काय करायचं, विश्वास ? रागावून काय होणार ? काँग्रेस ही जनतेची संस्था आहे. कांहीं गणंग व दांभिक असणारच तिच्यांत. परंतु माझ्या काँग्रेसवर नको हो रागवूं. पुन्हां जा पाहायला.” भाईजी म्हणाले.

“आतां उद्यां जाऊं पाहायला. आणि तुमचा मंत्र आतां नको. “ते पोलीस वगैरे येतील” असं आपणच आधीं सांगायचं नाहीं. तशानं कांहीं घर मिळणार नाहीं. या भितुरडया पुण्यांत मिळणार नाहीं. जें पुणं राजकारणाचं केंद्र मानतात, जिथं नेहमीं सभा चालतात, जिथं नाना वर्तमानपत्रं, जिथं शेंकडों मेळे, जिथं हजारों विद्यार्थी, जिथं लोकमान्यांसारखे अद्वितीय पुढारी झाले, त्या पुण्यांतील लोकांच्या मनांत आजच्या काळांत एवढी भीति, काळे डगलेवाल्यांचं इतकं भय ? मग आम्ही खेडयांतील लोकांना कुठल्या तोंडानं हंसावं ? ते पोलिसांना भितात म्हणून त्यांना कां नांवं ठेवावीं ? रद्दी पुणं. भिकारडं, भितुरडं पुणं. पुण्याचा वरून सारा देखावा. शेणाचीं रंगीत फळं. वरून सुंदर रंग. आंत शेण, वाळलेलं शेण. पुणं म्हणे भरभराटत आहे. महाराष्ट्राचं पॅरिस होत आहे. केवढाले बंगले म्हणे उठत आहेत. परंतु सारीं विश्राममंदिरं, पेन्शनरी घरं, मरणधामं; चीड आली आज, भाईजी. पुण्याची नाडी कळली आज.” विश्वास रागानें बोलत होता.

 

“कल्याण, आपण जाऊं या दुसरीकडे. त्या म्हाता-याला कशाला त्रास ? रागावून काय होणार ? आपण त्यांची कींव करूं या. आपला देश किती मागं आहे त्याची यावरून कल्पना येईल; यापेक्षां किसान कामगारहि जरा धीट असतात. असं कसं हें पुणं ? आणि ही म्हणे महाराष्ट्राच्या राजकारणाची राजधानी !” भाईजी म्हणाले.

इतक्यांत त्या म्हाता-याची पत्नी आली. ती गोड बोलून सांगूं लागली. तिला वाईट वाटत होतें. तिनें नव-याची समजूत घालण्याचाहि प्रयत्न केला, परंतु तिला यश आलें नाहीं. ती विश्वासला म्हणाली, “हें पाहा विश्वास, तुम्ही उद्यांच जा असं नाहीं. चार दिशीं गेलेत, तरी चालेल. चांगली जागा मिळेपर्यंत राहा हो. परंतु कुठं तरी दुसरीकडे जागा बघा. त्यांचा स्वभाव हा असा. वयहि झालं. कशाला त्यांना त्रास देतां ? इथं पुन्हां दुसरं कोणी नाहीं कीं पोलीसबिलीस आले तर त्यांना जरा कोणी दरडावील; खरं ना ? मला वाटलं कीं चांगला आधार व शेजार आला मुलांचा. घर भरलेलं दिसेल. जा-ये सुरू राहील. आम्ही घरांत दोघं. सारं सुनं सुनं वाटतं. तुम्हांला भाजीसुध्दां दुपारची ठेवून दिली आहे; मुद्दाम थोडी जास्त केली होती. म्हटलं, होईल मुलांना; हातांनीं करतात. तिची बरी आहे ना प्रकृति ? जरा संभाळा हो. वाईट झालं. तुम्ही सारे दु:खांत मी समजतें; परंतु काय करायचं ? चार दिशीं गेलेत तरी चालेल हो.”

असें म्हणून ती म्हातारी गेली. विश्वास तिला नाहीं म्हणूं शकला नाहीं. म्हाता-याचा त्याला राग आला. परंतु या म्हाता-याच्या पत्नीचें बोलणें कसें सरळ ! तिनें भाजीहि त्यांच्यासाठीं ठेवून दिली होती ! तिला हीं मुलें जावीं असें वाटत नव्हतें. परंतु नवरा म्हातारा. उगीच मनाला लावून घ्यायचा म्हणूनहि तिला काळजी.

विश्वास व कल्याण दुपारीं पुन्हां फिरतीस जायला निघाले. परंतु भाईजी म्हणाले, “कल्याण, जें घर पाहाल, तिथं आधीं सांगून ठेवा कीं, “कदाचित् आमची चौकशी करण्याला पोलीस येतील. तुम्हांला तसा त्रास नाहीं. परंतु लगेच उठवा बि-हाड म्हणाल; द्यायची असेल जागा तर द्या,” असं हडसूनखडसून मग ठरवा घर. नाहीं तर रोज सामान न्यायचं, नीट लावायचं आणि पुन्हां उचलायचं, असं किती दिवस करणार ?”

“दादा, वैनीकडे तुला नाहीं का जायचं ?” रंगानें विचारलें.

“आतां आधीं घर जातों पाहायला, चारपांच वाजल्यानंतर संध्येकडे जाईन. हरणी व बाळची आई जाणारच आहेत. भाईजी, भात निराळा करून ठेवा. तूपभात व लोणचं घेऊन जाईन. तुम्ही जरा विश्रांति घ्या. आमच्यासाठीं तुम्हांला ही दगदग.” कल्याण काकुळतीनें म्हणाला.

“कल्याण, पुन्हां असें बोलणार असशील तर मी आजच निघून जातों. माझ्यामुळं तुम्हांला आभार का वाटतात ? कितीदां सांगायचं कीं माझे व तुमचे संबंध केवळ औपचारिक नाहींत.” भाईजींना वाईट वाटून ते बोलले.

“भाईजी, आभार नाहीं हो वाटत. परंतु तुम्ही किती काम करतां, आम्हांला कांहींच का वाटणार नाहीं ? जातों हं आम्ही.” असें म्हणून कल्याण व विश्वास गेले. रंगाहि निघून गेला. भाईजी तें भाषांतर पुरें करीत बसले. त्यांना आतां येथून जावें असें वाटूं लागलें. आपला आणखी यांच्यावर भार कशाला ? त्यांच्याहि जवळचे पैसे संपत आले होते. पुढें या सर्वांचं कसें होईल, कोठें राहतील, काय खातील, भाडें कोठून देतील ? किती तरी विचार त्यांच्या मनांत आले. आपण जावें कोठें तरी, रोज भिक्षा मागावी व मिळेल तें या तरुणांना पाठवावें, असें त्यांच्या मनांत आलें. तें भाषांतर तसेंच ठेवून ते या खोलींत येरझारा करीत राहिले.

तिस-या प्रहरीं कल्याण व विश्वास घरीं आले. दोनतीन तास ते हिंडहिंड हिंडले. अनेक घरें त्यांनीं ठोठावलीं. परंतु यश आलें नाहीं. कंटाळून ते घरीं आले, अंथरुणावर पडले.

“विश्वास, मिळाली का जागा ?” भाईजींनीं विचारलें.

“या पुण्यांत जागा मिळणं शक्य नाहीं.” कल्याण म्हणाला.

“नमस्कार असो या पुण्याला !” विश्वास संतापानें म्हणाला.

“नाहीं का मिळत घर ?”

“नाहीं मिळत. तुमच्या सल्ल्याप्रमाणं वागूं तर कुठंहि घर मिळणार नाहीं. अनेक घरांतून गेलों. भाडं वगैरे सारं ठरे. परंतु “पोलीस वगैरे येतील हो एखादे” असं आम्ही म्हणतांच “तर मग नको” असं म्हणत. काय करायचं ?” विश्वास म्हणाला.

 

विश्वास त्याच्याबरोबर गेला. दोघांचें कांहीं तरी बोलणें सुरू झालें. हळूहळू आवाज मोठा होत गेला. विश्वास रागानें बोलत होता. आतां कल्याणहि उठून तेथे गेला. सर्वांचें चांगलेंच भांडण जुंपलें.

“अहो, आज इथं आलों नाहीं तों का पुन्हां जायला सांगतां ? हा काय चावटपणा ? एक महिना तरी आम्ही इथंच राहणार. इथून आम्ही जाणार नाहीं. काय करायचं असेल तें करा. नोटिस द्या आधीं. जा म्हणून तुम्हांला सांगवतं तरी कसं ?” विश्वास म्हणाला.

“अहो, मी पेन्शनर माणूस. माझीं मुलं तिकडे मुंबईला नोकरीचाकरीला आहेत. इथं फक्त ती नि मी. दोघं म्हातारीं माणसं. ते मघां पोलीस आले व विचारू लागले. सांगितलं त्यांना कीं आलं आहे खरं बि-हाड. ते तीनदां तीनदां दाराशीं येतात. आजपर्यंत या घरांत कधीं पोलीस आला नाहीं. आम्हांला या गोष्टींची संवयच नाहीं. शिवाय जगांत लढाई सुरू झालेली. आपलं सरकार लढाईंत पडलेलं. आणि त्यांतून आम्ही पेन्शनर. अहो, एकदम पेन्शहि हे बंद करायचे हो. कांहीं न्याय का राहिला आहे या राज्यांत ? तुम्हांला आम्हीं जागा दिली, हाच भयंकर गुन्हा असं म्हणायचे. म्हणून म्हणतों कीं तुम्ही आपले जा. पुण्याला वाटेल तितक्या तुम्हांला जागा मिळतील. किती तरी नवीन जागा पर्वतीच्या बाजूला झाल्या आहेत. कृपा करा.” तो म्हातारा पेन्शनर सांगत होता.

“अहो, पण तुम्ही सुशिक्षित आहांत नि असे काय घाबरतां ? सरकारनं असं का जाहीर केलं आहे कीं, आम्हांला कोणी घर देऊं नये ? जर कोणी बि-हाडाला जागा देईल त्याला दंड होईल, शिक्षा होईल, असं का सरकारी फर्मान निघालं आहे ? उगीच कां तुम्ही भिता ? आले पोलीस तर येतील आमच्या खोलींत. तुमचं घर का जप्त होणार आहे ?” विश्वास समजावून सांगत होता.

“तसा मी भित्रा नाहीं हो. अहो, माझे चुलते टिळकांच्या राजकारणांत होते. परंतु आतां मी म्हातारा झालों आहें. म्हणून म्हणतों, कीं उगीच नको. तुम्हां तरुणांचं तसं मला कौतुक वाटतं. मीहि आज तरुण असतों, तर तुमच्याबरोबर राहिलों असतों. परंतु वय झालं. आतां चळवळ सुरू होईल असंहि म्हणतात. धरपकडी होतील. आपल्या देशाची तयारीच नाहीं. वास्तविक अशा वेळीं देश स्वतंत्र करायची संधि असते. लोकमान्य असते, तर आज देश स्वतंत्र करते. परंतु टिळक, एकच पुरुष झाला. अहो, मी चुलत्यांबरोबर जायचा त्यांच्याकडे. काय त्या चर्चा व तीं खलबतं. मग केव्हां जातां तुम्ही ? उद्यां गेलेत तरी चालेल. परंतु जा बुवा. वाईट वाटतं मला सांगायला. परंतु आमचं वय झालं. हे पोलीस नको यायला दारांत. सर्व आयुष्यांत जें पाहिलं नाहीं, तें म्हातारपणीं नको पाहायला.”

“आम्ही कांहीं जाणार नाहीं; हा काय फाल्तूपणा ? पोलीस आणा व काढा आम्हांला बाहेर !” कल्याण म्हणाला.

“आम्हीं विश्वासानं तुम्हांला जागा दिली. परंतु तुम्ही असे असाल हें काय बरं आम्हांला माहीत ? जरा शंका आली, कीं हे रात्रीचं सामान कां आणतात ? परंतु म्हटलं दु:खांत आहेत. वेळ नसेल जात. आणीत असतील सामान. पण जेव्हां सकाळी पोलीस आले. तेव्हां प्रकाश पडला. तुम्ही आधींच सांगतेत, तर मीं जागा दिली नसती. इतके दिवस रिकामी आहे, आणखी काहीं दिवस पडती. आणि भाडयाचा लोभ थोडाच आहे मला ? चांगली पेन्शन आहे. मुलं चांगलीं रोजगारी आहेत. परंतु म्हटलं सोबत होईल. आम्ही दोन पिकलीं पानं घरांत. हांक मारायलाहि कुणी नाहीं. तुम्ही बरेच मित्र मित्र होतां. बरं झालं असतं. आमच्या हिला तर काल तुम्ही बोलत होतेत तिच्याजवळ तर किती बरं वाटलं. म्हणाली, कशीं छान आहेत मुलं. परंतु उपयोग काय ? तुम्ही हे असे उपद्व्यापी. कांही करा. जा. या पांढ-या केंसांची तुम्हांला प्रार्थना आहे.” म्हातारा गयावया करून म्हणाला.

कल्याण व विश्वास खोलींत आले. रंगाहि खूप रागावला होता. काल येथें सामान आणलें. आतां आज पुन्हां कोठें मिरवणूक काढायची ? आणि नवीन घर पाहूं तेथेंहि हेच प्रकार झाले तर ? कोठें तरी ठाण मांडून बसलेंच पाहिजे. हा काय चावटपणा ! असे त्यांचे विचार चालू होते.

   

“काय कल्याण, कसं आहे संध्येचं ? ताप वगैरे नाहीं ना ?”

“ताप नाहीं. परंतु फारच गळून गेली आहे. प्रसूतीच्या वेदना आणि त्यांहून तीव्र अशा मनोमय दु:खाच्या वेदना. उन्हानं वेल गळून जावी तशी माझी संध्या झाली आहे. कांहीं खाईना. परंतु शेवटीं दोन घांस भरवले. आणि भाईजी, सांजाशिरा वगैरे नाहीं द्यायचा. अगदीं हलकं अन्न द्यायचं असं डॉक्टर व तिथल्या त्या बाई म्हणाल्या. त्या बाई फार प्रेमळ आहेत. तुम्हांला त्या ओळखतात. चाळीसगांवला एकदां तुमचं व्याख्यान त्यांनीं ऐकलं होतं. संध्येजवळ त्या बसतात, धीर देतात. संध्या शांत होत आहे. आणि विश्वास वगैरे कुठं गेले सारे ?”

“कोणी तरी मित्र आले होते, त्यांच्याबरोबर विश्वास, बाळ वगैरे गेले. कुठं गेले तें मला माहीत नाहीं. ते गर्दीत होते.”

“मीहि जाऊन येऊं का, भाईजी ? तुम्हांला एकटयाला सारं करावं लागतं.”

“कल्याण, असं नको हो म्हणूं. जाऊन ये.”

कल्याणहि गेला. पाऊस पडत होता. परंतु त्याला काय त्याची पर्वा ? आगींत घुसणारीं तीं माणसें. तीं का पावसांतून जायला भितील ? पाहा त्यांची कर्तव्यनिष्ठा, ध्येयाचा ध्यास. पत्नी दवाखान्यांत पडलेली. काल तो तसा प्रसंग; परंतु सारीं दु:खें गिळून, अश्रु गिळून कार्यासाठीं धांवपळ सुरूच आहे. कोप-यांत बसून मुळुमुळु रडणें नाहीं, कांहीं नाहीं. घरांत काय आहे, डाळतांदूळ आहेत कीं नाहीं, संध्येला सायंकाळीं काय करून न्यायचें, कशाचा विचार करायला वेळ नाहीं. क्रांतीचे निस्सीम उपासक, क्रान्तीच्या निदिध्यासानें रंगलेले कर्मवीर !

बारा वाजून गेले. भाईजी वाट पाहात होते. पाऊस पडतच होता. रंगाहि आला. परंतु अद्याप विश्वास वगैरेंचा पत्ता नाहीं. शेवटीं एकदांचे आले सारे. ओलेचिंब होऊन आले होते. सर्वांनीं कपडे काढले. अंगें पुसून नवीन कपडे घालून सारे जेवायला बसले.

“कल्याण, आपण इथं राहायला आलों ही गोष्ट पोलिसांना कळली.” विश्वास म्हणाला.

“तो सी. आय्. डी. इथं घिरटया घालीत होता.” रंगा म्हणाला.

“अरे, आपण प्रसिध्द व्यक्ति आहोंत. आपलं रक्षण करायला सरकार सदैव पाठीशीं असतं.” कल्याण म्हणाला.

“सरकार काय रक्षण करणार ?” भाईजी म्हणाले.

“आज हरणी नाहीं वाटतं आली ?” विश्वासनें विचारलें.

“नाहीं आली.” भाईजींनीं सांगितलें.

“संध्येकडे जायला तिला सांगितलं असतं.” तो म्हणाला.

“बाळ आपल्या आईला घेऊन तिच्याकडे जाणार आहे. तो आत्तांच घरीं गेला.” कल्याण म्हणाला.

“बाळची आई इथं येऊन गेली. जुन्याचे तांदूळ व साजुक तूप देऊन गेली.” भाईजींनीं सांगितलें.

“प्रेमळ आहे माउली.” कल्याण म्हणाला.

जेवणें झालीं. सारे दमले होते. सर्वांच्या मनालाहि शीण आलेला होता. सारे झोंपले. तों हळूच दार उघडून कोणी तरी आलें. कोण होतें ?

त्या घराचा तो मालक होता. तो वृध्द पेन्शनर होता. कां आला तो ? काय काय ? विश्वास एकदम जागा झाला. तो उठला.
“काय पाहिजे ?” त्यानें विचारलें.

“तुमच्याजवळ थोडं बोलायचं आहे. इकडे येतां का ?”

 

१८

भितुरडें पुणें

दुस-या दिवशीं सकाळीं कल्याण दवाखान्यांत जायला निघाला. संध्येला काय न्यायचें ? खायला काय द्यायचें ? कांहीं तरी नेलें तर पाहिजे. तिच्या पोटांत दोन घांस दवडले तर पाहिजेत. काय बरें न्यावें संध्येला करून ?

“भाईजी, थोडा शिरा नेला करून तर ?” त्यानें विचारलें.

“चालेल. दोन पोळया ने व शिरा ने. लिंबाचें लोणचें आहे, तें ने.” भाईजी म्हणाले.

भाईजींनीं कढत कढत पोळया करून दिल्या. त्यांना त्यांनीं बरेंच तूप लावलें. सांजाहि त्यांनीं केला. एका डब्यांत भरून घेऊन कल्याण निघाला.

“कल्याण, संध्येला धीर दे. दोन घांस तरी खा म्हणावं. भाईजींनीं सांगितलं आहे असं सांग.” भाईजी म्हणाले.

कल्याण सायकलवर बसून गेला. रंगाहि दुकानांत गेला. भाईजी एकटेच घरीं होते. त्यांनीं केर काढला. भांडीं जरा स्वच्छ धुतलीं. आणि पुस्तक घेऊन वाचीत बसले. तों बाळची आई आली.

“कुठं गेलीं सारीं ?” तिनें विचारलें.

“कोणी तरी त्यांचे मित्र आले होते. ते सारेच बाहेर गेले आणि कल्याण संध्येकडे गेला आहे.”

“वाईट झालं हो संध्येचं. गुणी पोर; ऐकून माझ्या डोळयांना पाणी आलं. परंतु देवाची सत्ता, तिथं काय चालणार ! भाईजी, हें साजुक तूप आणलं आहे व हे जुन्याचे तांदूळ आणले आहेत. ह्यांचा भात जरा हलका असतो. संध्येसाठीं या तांदुळांचा वेगळा भात करीत जा. कांहीं दिवस संध्येला अगदीं हलका आहार द्यायला हवा. जपावं लागेल. आहांतच तुम्ही. संध्याकाळीं बाळबरोबर मी जाऊन येईन तिच्याकडे.” आई म्हणाली.

“किती तुमचा लोभ या सर्वांवर !” भाईजी म्हणाले.

“बाळचे हे सारे मित्र. आणि बाळ म्हणजे माझा प्राण. तो या अशा चळवळींत पडला. कधीं काय होईल त्याचा नेम नाहीं. मी तरी काय करूं ? बाळ कधीं घरीं आला म्हणजे मला समजावून सांगत असतो. जगासाठीं हीं मुलं धडपडत आहेत. धडपडूं दे. परंतु बाळची प्रकृतीहि बरी नसते. दमा, ताप, कांहीं ना कांहीं सुरू असतं. आजारीपणाची तो कधीं पर्वा करीत नाहीं. ताप अंगांत असूनहि तो तासन् तास चर्चा करीत बसेल, आपलं म्हणणं पटवूं पाहील. ध्येयासाठीं वेडीं झालेलीं मुलं पाहिलीं, म्हणजे आम्हांला स्वत:ची लाज वाटते. आमचं सुखाचं जीवन. आम्ही घरीं नीट खातपीत असतों; आणि ही पोरं हाल काढीत आहेत. बाकी आपण तरी कोण कोणाला किती पुरे पडणार ? शेवटीं देवच सर्वांना आहे. नाहीं का भाईजी ?” आई म्हणाली.

थोडया वेळानें ती माउली गेली. भाईजींनीं शेगडी पेटविली. ते विचारांत मग्न होते. ते मघां मित्र आले ते कोण ? या सर्व लोकांचे कांहीं तरी बेत दिसतात. सरकार यांना बाहेर राहूं देईल का ? आणि माझी काँग्रेस काय करणार ? युध्दासंबंधीं तें धीरोदात्त असें ऐतिहासिक पत्रक काँग्रेसनें काढलें. परंतु पुढें काय ? प्रत्यक्ष चळवळ होईल का ?

भाईजी जणूं समाधींत होते. आणि बाहेर पाऊस आला. ते उठले. बाहेरची अंथरुणें त्यांनीं घरांत आणून ठेवलीं. घरांत कोठें कोठें गळूं लागलें. ती नवीन जागा एरवीं बरी होती. भरपूर उजेड होता. बाहेर पत्र्यांवर उभें राहिलें म्हणजे सुंदर देखावा दिसे. भाईजी घरांतील आवराआवर करीत होते; तों दवाखान्यांतून कल्याण आला. पावसांतून भिजतच आला.

   

पुढे जाण्यासाठी .......