“कल्याण, ठेव हो बांधून तें सारं. संध्या व मीं दोघांनीं बसून तीं स्वप्नं तयार केलीं. ते आशेचे मनोरे बांधले. संध्या म्हणायची, “भाईजी, मला दुसरं कोण आहे ? आपणच सारं करून ठेवायला हवं.” किती हळुवार हृदयानं, हळुवार बोटांनीं व भावनांनीं ती तीं आंगडींटोपडीं शिवीत बसे. तीं दुपटीं शिवीत बसे. आणि या चिमण्या मीं केल्या, मीं शिवल्या. आतां “हंस रे माझ्या मुला” गाणं मी कोणाला म्हणूं ? कोणाला पाळण्यांत घालूं ? कोणाला नांव ठेवूं ? कल्याण, मी दुर्दैवी आहे. मी जिथं जाईन तिथं का असंच व्हायचं ? माझ्या निराशाच का मी सर्वत्र वाटणार, पेरणार ? मी अभागी कशाला इथं आलों, कशाला राहिलों ? माझ्या हाताला यश नाहीं हें मला माहीत होतं. त्या करंटया हातांनीं मी चिमण्या करीत बसलों, संध्येचं बाळ त्या हातांनीं आंदळणार होतों. परंतु देवानं आधींच दोरी तोडली. बाळाच्या आयुष्याची दोरी. अरेरे ! असा कसा हा देव ? संध्येच्या ट्रंकेच्या कोप-यांत तो देव आहे. खरोखरच का ट्रंकेंत एखादा बागुरडा, एखादं झुरळ असावं त्याप्रमाणं कोंप-यांत पडण्याच्या लायकीचा हा देव आहे ? आमच्या सा-या आशांचा तो असा खेळखंडोबा कां करतो ? संध्येचीं स्वप्नं का पापी होतीं ? मातृत्वाचा तो परम पवित्र आनंद, तें सात्त्वि समाधान, त्यांत काय वाईट होतं ? परंतु देवानं त्यांतहि विष कालवलं. अरेरे ! कशी श्रध्दा राखायची, कांहीं समजत नाहीं. सारं जीवन अशा वेळीं अर्थहीन, सारहीन वाटतं. एक कठोर निर्माती विश्वाचा जणूं खेळ करून राहिली आहे ! त्या वैश्विक प्रेरणेला ना भावना, ना कांहीं. तो विश्वाचा कायदा केवळ यांत्रिक आहे. कुणाची पर्वा न करतां तो चालला आहे. नवोढेचा पति मारून तिला तो विधवा करीत आहे; नवमातेचं मूल नेऊन तिला तो रडवीत आहे; लहान मुलांचे आईबाप मारून त्यांना तो पोरकं करीत आहे; मित्रांपासून मित्रांची ताटातूट करीत आहे. कठोर सृष्टीचं कठोर शासन. सारं एकंदरींत फोल आहे. एका क्षणांत सारं नाहींसं होतं. आम्हीं मनोरथ बांधावे, मनोरे रचावे; आणि एकदम कोणी हुकूमशहा येतो व विकट हास्य करीत हें सारं जमीनदोस्त करतो. कल्याण, काय बघत बसलास तें ? ठेव बांधून. आटप.”
भाईजींचे शब्द ऐकून कल्याणचे अश्रु थांबले. तो अधिकच दु:खगंभीर झाला. त्यानें तें गांठोडे बांधलें. ट्रंकेंत आणखी कपडे भरण्यांत आले. भाईजींनीं ट्रंक उचलली व ती घेऊन ते चालले. जणूं ती आशांची, मनोरथांची, सुखस्वप्नांची तिरडीच ते घेऊन जात होते ! अत्यन्त दु:खानें ते जात होते. परंतु वाटेंत त्यांच्या मनांत शेंकडों विचारांची गर्दी उसळली होती. श्रध्दा पुन्हां येऊं पाहात होती. वसिष्ठाचीं शंभर मुलें मारली गेलीं तरी त्याची मांगल्यावरची श्रध्दा अचल राहिली. किती तरी लोक, स्त्रीपुरुष, अनंत आपत्ति आल्या, तरी ईश्वरावर श्रध्दा ठेवतात. आणि संध्येचें एक नुकतेंच मूल जातांच मीं का त्या ईश्वराला झुरळ बनवावें, बागुरडा बनवावें ? ईश्वराचे त्यांतहि हेतु असतील. कल्याण, संध्या यांना त्यानें मोकळें केलें असेल ! डोक्यावर चळवळ आहे. कल्याण वगैरे सारे कदाचित् स्थानबध्द होतील. आणि संध्या मग कुठें जाईल, कुठें राहील ? त्या मुलाचें संगोपन कसें होणार ? आजच खाण्याची पंचाईत आहे. उद्यां आणखीच वाढेल. असे विचार भाईजींच्या मनांत आले. परंतु त्यांना ते आवडले नाहींत. ते त्यांनीं झडझडून दूर केले. मला ति-हाइताला हे विचार ठीक आहेत. परंतु आईबाप कितीहि दरिद्री असले, तरी त्यांना मूल नकोसें वाटत नाहीं. माता आपल्या प्रेमाचें पांघरूण त्याला घालते, आपल्या वात्सल्यानें त्याला नटविते. त्या लहान मुलामुळेंच तें दारिद्रयहि त्यांना सुसह्य होत असेल. दरिद्री पिता मुलाच्या तोंडावरील हास्य पाहून दारिद्रय विसरत असेल, क्षणभर स्वत:ची बाहेरची मानहानि विसरत असेल. संध्या व कल्याण यांच्या डोळयांसमोर त्या मुलाचा आनंद होता. त्यांच्या उभयतांच्या जीवनाला अधिक दृढतर रीतीनें बांधणारें तें प्रेमळ नवबंधन होतें. त्यांच्या जीवनवृक्षाला लागलेलें तें फूल होतें, तें गोड फळ होतें. त्यांच्या संयुक्त व एकजीव झालेल्या जीवनाचें तें मूर्त प्रतीक होतें. मूल म्हणजे पति-पत्नींच्या अभिन्न जीवनाची मंगल खूण, त्यांच्या समरस जीवनाची ती मनमोहन मधु-मधुर अशी मूर्ति ! दारिद्रयांतहि आनंद, प्रकाश, आशा यांचे किरण फेंकणारें तें लहान मूल म्हणजे नवीन सुरू झालेल्या संसारांतील बाल सूर्यनारायण ! भाईजींच्या मनांत परस्परविरोधी विचारांची गर्दी उडाली होती. त्या विचारतंद्रींत ते पुढेंच गेले. ज्या घरी तें सामान न्यायचें, तें घर मागेंच राहिलें !
अजून भाईजी कसे आले नाहींत म्हणून कल्याण, विश्वास, रंगा त्या नव्या घरीं वाट पाहात होते. शेवटी रंगा पाहायला गेला. तों भाईजी पुढें चालले आहेत ती ट्रंक घेऊन असें त्याला दिसलें.
“भाईजी !” रंगानें हांक मारली.
ते थांबले. रंगा धांवत आला. आपण पुढें आलों हें पाहून त्यांना त्या खिन्नतेंतहि हसूं आलें.
“द्या, मी घेतों ती ट्रंक.” रंगा म्हणाला.
“माझ्याजवळच ती असूं दे.” भाईजी म्हणाले.
दोघे आले. सामान सारें आणलें गेलें. सारे मित्र त्या नवीन घरीं त्या सामानाच्या पसा-यांत सुतक्यासारखे बसले होते. तें सामान नीट लावावें असें कोणाच्याहि मनांत येईना. परंतु वयानें वडील भाईजीच उठले व आवराआवरी करूं लागले. मग सारेच लागले सामान लावायला. सामान लावून झालें. आणि बाहेर पत्र्यांवर आंथरुणें पसरून सारे बसले. आकाशांतील तारे त्यांच्याकडे पाहात होते.
“संध्या काय करीत असेल ? रडत असेल का ? तिच्या दु:खाला भाईजी, सीमा नाहीं. कोंवळया मनाची संध्या.” कल्याण म्हणाला.
विश्वासचे वडील सांगत होते. ज्या वडिलांनीं त्याला घालविलें होतें, तेच त्याला व त्याच्या मित्रांना राहायला जागा द्यायला आज तयार झाले होते. स्वतंत्र राहा येथें येऊन असें म्हणत होते. प्रेमानें आश्वासनपर शब्द बोलून ते त्यांना धीर देत होते. मनुष्य कितीहि कठोर असला, दुष्ट असला, तरी केव्हां तरी त्याच्या हृदयांतील प्रेमाचे झरे वाहूं लागतात. त्याच्या जीवनाच्या वृक्षाला प्रेमाचे पल्लव, सहानुभूतीचीं फुलेंफळें एक दिवस आल्याशिवाय राहात नाहींत. कोणाच्या जीवनाच्या बागा लौकर बहरतात, कोणाच्या उशीरां; परंतु कोमल भावनांचा फुलोरा सर्वांच्या जीवनांत आल्याशिवाय राहणार नाहीं.
आणि आईबाप ! कितीहि कठोर ते झाले, तरी शेवटीं तेच कृपेची पाखर घालतील. सारें जग ज्या वेळीं आपणांस धिक्कारील, त्या वेळी आईबापच आपणांस जवळ करतील. आपण जगांत पदोपदीं अपमान गिळतों. अनेकांचीं बोलणीं सहन करतों. परंतु आईबापांजवळ आपला सारा स्वाभिमान आपण जणू दाखवीत असतों. सा-या जगासमोर नमूं, परंतु आईबापांजवळ ताठयानें वागूं. सा-या जगाजवळ भीक मागूं, परंतु आईबापांजवळ मागायला जाणार नाहीं.
कां बरें असें ? असें कां होतें ? एक तरी जागा स्वाभिमान दाखवायला असूं दे, असें का जिवाला वाटत असतें ? ज्यांचें प्रेम आहे त्यांच्याजवळच स्वाभिमान दाखवावा. दुनिया आपल्या स्वाभिमानाला थोडीच भीक घालणार आहे, असें का मनुष्याला वाटतें ?
वडिलांचे ते शब्द ऐकून विश्वास गहिंवरला, सद्गदित झाला.
कल्याण, विश्वास, रंगा सारे शेवटीं आपल्या खोलीवर आले. भाईजी एकटेच बसले होते. सारे मुके मुके होते. कोण काय बोलणार ?
“भाईजी, खरंच चांगलं होतं मूल.” कल्याण म्हणाला.
“श्वासोच्छ्वास सुरू व्हावा म्हणून सर्वांनीं किती खटपट केली. परंतु उपाय नव्हता.” विश्वासने सांगितलें.
“आज विश्वासचे वडील आम्हांला म्हणाले कीं नसेल पुण्यांत कुठं जागा मिळत तर इथं माझ्याकडे येऊन राहा.” रंगा म्हणाला.
“कांहीं प्रसंग असे असतात कीं ते सर्वांना मृदु बनवितात; सर्वांची माणुसकी त्या वेळीं जागी होते.” भाईजी म्हणाले.
“आपण सामान न्यायचं ना ? चला कीं.” कल्याण म्हणाला.
“चला.” विश्वास म्हणाला.
ते सारे सामान नेऊं लागले. त्या नवीन घरीं नेऊं लागले.
“इतक्या रात्रीं कशाला आणतां सामान ?” त्या मालकानें विचारलें.
“आमचं मनहि अस्वस्थ आहे. झोंप थोडीच येणार आहे. सामान वाहण्यानं भावना थोडया कमी होतील. दु:ख थोडं कमी होईल.” विश्वास म्हणाला.
इतरहि मित्र आले. भराभरा सामान चाललें. कल्याण सारें सामान भरीत होता. संध्येची ट्रंक त्यानें उघडली. तींत इतर सारे कपडे तो भरणार होता. तो ट्रंकेंत पाहूं लागला. कोंप-यांत ती देवाची मूर्ति होती. आणि एक खादीचें पातळ ! त्या वस्तु पाहून त्याला आश्चर्य वाटलें. परंतु ती देवाची मूर्ति त्याला माहीत होती. खादीचें पातळ कोठून आलें ? भाईजींनीं दिलें होतें का कधीं आणून ?
परंतु एक गाठोडें होतें त्या ट्रंकेत. कल्याणनें तें सोडलें. तों त्यांतून काय बाहेर पडलें ? चिमण्या. आशेच्या चिमण्या उडून गेल्या होत्या. चिंध्यांच्या निर्जीव चिमण्या तेथें समोर होत्या. एका चांदव्याला त्या चिमण्या शिवलेल्या होत्या, टांगलेल्या होत्या. आणि तीं सुंदर दुपटीं. आणि तीं आंगडींटोपडीं. अरेरे ! तें गांठोडें म्हणजे संध्येचें आशास्थान होतें. तिचीं सारीं स्वप्नें त्यांत सांठवून ठेवलेलीं होतीं. तिचें मंगल मातृत्व त्यांत सामावलेलें होतें. कल्याणच्या डोळयांतून पाणी घळघळूं लागलें. उद्यां संध्या घरीं आली व तिनें जर हें सारें पाहिलें, तर तिला काय वाटेल ? हीं दुपटीं, या चिमण्या, हीं आंगडींटोपडीं पाहून तिचें हृदय फाटेल. तिच्या हृदयाच्या चिंध्या होतील. त्या हृदयाच्या चिंध्या पुन्हां कोण शिवील ? तें भग्न विदीर्ण हृदय कोण शांतवील ? त्या हृदयांत पुन्हां कोण आनंद आणील, कोण तिथें पुन्हां आशेचीं पांखरें खेळवील ?