सोमवार, जानेवारी 25, 2021
   
Text Size

श्याम

शंकर म्हणाला, 'श्यामच्या आईच्या आठवणी रात्री प्रार्थनेच्या वेळी एकेक याप्रमाणे सांगण्यात आल्या. आता या आठवणीही प्रार्थनेच्या वेळेसच सांगाव्या. प्रार्थना संपली की प्रवचन सुरु.'

श्याम म्हणाला, 'तुमची सर्वांची मने दुखविणे माझ्या जिवावर येते. स्वत:चे जीवन आठवीत बसण्यापेक्षा आता देवाला आठवण्याची वेळ आली आहे. परंतु जीवनातील ब-यावाईट प्रसंगांतून शेवटी सत्यच प्रकट होत असते. सत्यदेवच हळूहळू प्रतीत होत असतो. ज्यात तुमचा आनंद, त्यात माझा आनंद सांगत जाईन. सांगण्यासारख्या आठवणी सांगत जाईन.'

राम म्हणाला, 'संकोच करु नको. तुझे मन भावनामय व संस्कारक्षम असल्यामुळे शेकडो प्रसंगांचे ठसे कायमचे उठलेले असतील, आम्ही किती तरी गोष्टी विसरतो. परंतु तुझ्या सारे ध्यानात असते. एखादा शब्द, एखादी वस्तू, एखादा लहानसाच प्रसंग. तुझ्यावर त्याचा किती तरी परिणाम होत असतो. म्हणजे तू वायुभारमापक यंत्रच आहेस. सारे सारे सांग.'

श्याम :- काय सांगावयाचे ते मी फारसे ठरवीत बसणार नाही. मला लहानपणापासूनचे जे जे आठवेल ते ते सांगेन. ते सारे तुम्हाला आवडेलच असे नाही. एखादे दिवशी मी सांगण्याच्या भरात आलो तर वेळेचेही भान मला राहणार नाही. माझी कादंबरी सुरुच राहील.

राम :- ज्या वेळेस तू इतका रंगशील, त्या वेळेस आम्हांला तरी काळाचे स्मरण कशाला राहील ? आमचीही झोपबीप उडून जाईल. आम्ही भावनांच्या खळखळाटाबरोबर वाहात जाऊ.

श्याम :- नेहमीच असे होईल, अशातला प्रकार नाही. एखाद्या दिवशीचे बोलणे नीरस वाटेल, तर एखाद्या दिवशी सागर उचंबळेल.

गोविंदा :- आम्ही सर्व गोष्टीस तयार आहोत. जे परत येईल ते नीरस असो वा रसमय असो. आम्हांला तुझ्या तोंडातून जे येईल ते रसाळच वाटेल.

नामदेव
:- तुझ्या शाळेतील गमती सांग. मास्तरांजवळ तुम्ही सारे कसे वागत जसा, मधल्या सुट्टीत काय करीत असा, ते सारे सांग. ते ऐकण्यात मजा असते.

राम
:- श्यामने शाळेत मास्तरांना मुळीच त्रास दिला नसेल.

श्याम
:- मी शाळेत गरीब गाय नव्हतो. खूप खोडया केल्या आहेत. सांगेन, त्याही गमती तुम्हांला सांगेन. सायंकाळची प्रार्थना होताच मी एकदम सांगत जाईन. प्रस्तावना नको. काही नको. परंतु एक गोष्ट तुम्ही विसरु नका. माझ्या आईच्या आठवणी तुम्हांला जितक्या आवडल्या तितक्या ह्या आवडणार नाहीत. कारण फार खोल बुडया मारीन तर गाळच भरपूर असावयाचा. मला ते धैर्य होणार नाही. आईच्या स्मृती म्हणजे पावित्र्याची खाण होती. तशी आता असेलच असे नाही. माझ्या आठवणीत माझ्या चो-यामो-या येतील, माझी पलायने येतील. हिंदु-मुसलमानांचे प्रश्न येतील. सारे येईल. ती ती आठवण सांगताना मी   माझ्या मनातील शेकडो विचार नकळत बोलून जाईन. हे विचार कितिकांना सहन होतील, कितिकांना मानवतील ते देव जाणे.

 

पुढे जाण्यासाठी .......

श्याम