सोमवार, सप्टेंबर 20, 2021
   
Text Size

इस्लामी संस्कृति

मानव समाजाच्या अभ्यासाची चार रूपें

या जगांत महान् विभूति जन्माला येतात, लोकोत्तर पुरुष जन्माला येतात. जगाच्या गाडयाला ते प्रचंड चालना देतात. एखादा बुध्द, एखादा ख्रिस्त, एखादा मुहंमद येतो व कधींहि न संपणारी गति व प्रेरणा जगाला देतो. या ज्या महान् व्यक्ति असतात. त्यांनाहि सारेंच स्वतःच्या इच्छेप्रमाणे करतां येतें असें नाही. तेहि कांहीं अंशीं परिस्थितिशरण असतात. स्वतःच्या इच्छांना त्यांनाहि मुरड घालावी लागते. त्यांच्या मूळच्या कल्पना समाजांत शिरतांना बदलत असतात. त्या जशाच्या तशा रहात नाहींत. बुध्द धर्मांतील, ख्रिस्ती धर्मांतील किंवा इस्लामी धर्मांतील कल्पना मूळ धर्मस्थापकांच्या मनात जशा असतील तशाच राहिल्या. असें नाहीं. त्या लोकोत्तर विभूतींचा प्रचंड परिणाम झाला यांत संशय नाहीं. परंतु समाजव्यापक असे जे इतर प्रवाह, त्यांच्याशीं या लोकोत्तर विभूतींच्या विचारप्रवाहासहि समरस व्हावें लागलें. तेव्हांच त्यांचे विचार पुढें जाऊं शकले. एरव्हीं ते पुढें सरकते ना. कधीं मूळच्या कल्पना अधिक विकसित व प्रगल्भ होत, कधीं या विकृतहि होत; परंतु असें होणें अपरिहार्यच असतें. संस्कृतीच्या विशिष्ट पायरीवर असणा-या लोकांच्या सर्वसामान्य गरजांना अनुरूप असेंच स्वरूप या नव विचारांसहि घेणें प्राप्त होतें. म्हणून इतिहास हा नेहमीं बनत असतो, वाढत असतो. इतिहास म्हणजे एक अखंड गतीचा प्रवाह आहे. भौगोलिक व आर्थिक परिस्थितीमुळें नवनवीन कल्पना येतात आर्थिक जीवनाचें तर फारच महत्त्व असतें. समाजाच्या आर्थिक स्थितीमध्यें संस्कृतीची, त्या त्या समाजांतील गुणादुर्गुणांचीं मुळें असतात. संस्कृतीचा व कलांचा अभ्यास करतांना आर्थिक रचनेचा अभ्यास अत्यावश्यक असतो. नवीन नवीन कळांत नवीन नवीन द्यष्टी येते. पूर्वीच्या कल्पनांना निराळे अर्थ मिळतात, त्यांना नवीन रंग चढतात. जुन्या संस्थांत नवीन अर्थ दिसतो. त्यांचें नीट परीक्षणनिरीक्षण होऊं लागतें. म्हणून कोणत्याही व्यत्तिचे व्यक्तिमत्त्व, विभूतींचे विभूतिमत्त्व पाहतांना तिच्या सभोंवतीची परिस्थिति पाहणें आवश्यक असतें. परिस्थितीच्या प्रभावळींतच त्या त्या व्यत्तिचे सम्य दर्शन आपण घेऊं शकतों. कोणी म्हणतात, परिस्थिति माणसाला बनवते. कोणी म्हणतात महापुरुष परिस्थितीला कलाटणी देतात. सत्या दोहोंच्यामध्यें आहे. परिस्थिति माणसाला बनविते व माणूसहि परिस्थितीला रंगरूप देत असतो. व्यक्ति व समाज एकमेकांवर परिणाम करीत असतात. समाजच नव्हे तर बाह्य भौगोलिक स्थितिहि व्यक्तिवर परिणाम करत असते.  इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे अनंत इच्छाशक्तिंचे अन्योन्य परिणाम इतिहास म्हणजे मानवी मन व बाह्य परिस्थिति यांचे अन्योयन्य परिणाम होऊन सतत बनत जाणारा महान् प्रवाह. इतिहासाकडे पाहण्याची ही अत्यन्त शास्त्रीय द्दष्टी आहे.

समाज पाय-यापाय-यांनीं वाढत आहे. सृष्टि एकदम कधीं उडी मारीत नाहीं. मार्क्सवादी म्हणतात कीं कधीं कधीं एकदम उडया मारण्यांत येत असतात. परंतु या ज्या उडया वाटतात, या ज्या बाह्यतः क्रांति किंवा उत्पात वाटतात, त्याहि उत्क्रान्तींतीलच एक प्रकारच्या पाय-या असें दुसरे म्हणतात. सर्वत्र सर्जन व विनाशन सदैव चाललें आहे. हरघडी मोडतोड, अंतर्बाह्य चालली आहे. प्रत्येक क्षणाला जन्ममरण आहे. कांहीं तरी जातें, कांहीं नवीन येतें. क्रांति म्हणजे उत्क्रांन्तींचे जरा विशाल व भव्य स्वरूप !

सामान्यतः व्यक्तिच्या जीवनांत जे नियम तेच समाजाच्याहि. आपण पदोपदीं कांटेकोर विचार करून थोडेच वागत असतों. प्रत्येक क्षणीं साधकबाधक विचार करीत कोण बसतो? पुष्कळ वेळां विचार आपल्यावर लादला जातो. आपण खांतो, पितों, झोपतों त्या वेळेस का मोठी विचारक्रिया चालू असते? परंतू जेव्हां एखादा प्रश्न उद्भवतो, तेव्हांच आपली बुध्दि जागते. आपला दैनंदिन सामान्य व्यवहार म्हणजे आपल्या ठरीव संवयींचा, आपल्या लहरींचा, वासनाविकासांचा परिणाम असतो. बुध्दि दरक्षणीं येत नाहीं. बुध्दि-देवता ही मागून येते. संवयींना बुध्दीनें सुसंस्कृतपणा आला असेल. परंतु तेथें बुध्दि असतेच असें नाही. बुध्दि नेहमी मागें राहते, आणि संवय, आपले रागद्वेष आपल्या आवडीनावडी यांनाच अग्रस्थान असतें.

 

पुढे जाण्यासाठी .......

इस्लामी संस्कृति