गुरुवार, एप्रिल 22, 2021
   
Text Size

इस्लामी संस्कृति

त्यांचें मन अर्वाचीन होतें. ते बुध्दिप्रधान होते, प्रगतिशील होते. नवीन कल्पना घेणारें व्यापक मन होतें. संकुचितपणा त्यांना माहित नव्हता. मानवी जीवन म्हणजे उत्तरोत्तर विकासार्थ अमर धडपड ! इन्किलाब झिन्दाबाद. ते नेहमीं म्हणत, 'सतत प्रयत्नांशिवाय मनुष्य जगूं शकणार नाहीं. प्रयत्न माझें काम, फळ प्रभु हातीं.' कुराणांत एके ठिकाणीं सांगतात, 'तुम्ही स्वत:ची बदलण्याचीं धडपड सुरु करा. मग प्रभु धांवेल.'

मुहंमदांनीं ज्या विश्वाची कल्पना दिली, तींत गोंधळ नाहीं. त्या विश्वांत व्यवस्था आहे. विश्वातीत व विश्वव्यापी चैतन्य या विश्वाचें नियमन करीत आहे. मुहंमद एकदां म्हणाले, 'प्रत्येक वस्तु कालानुरुप आहे. काल एक वस्तु अनुरुप असेल ती उद्यां असेल असें नाहीं. ईश्वर शेवटीं योग्य तेंच करील.' असें जरी ते म्हणत तरी त्यांनीं मनुष्य-प्रयत्नाला वाव ठेवला आहे. आपण प्रयत्न करावे. देवाला जे प्रयत्न फुलवायचे, फळवायचे असतील ते फुलवील, फळवील. मानवाला इच्छास्वातंत्र्य, कर्मस्वातंत्र्य, प्रयत्नस्वातंत्र्य आहे. पैगंबरांची सहानुभूति सर्व भूतमात्रांसाठीं. त्यांनीं सर्व प्राणिमात्रांसाठीं प्रभूची करुणा भाकिली. एका मानवाला वांचविणें म्हणजे सर्व मानव जातीला वांचविणें आहे असें ते म्हणत. समाजाचें एकीकरण करणारे ते होते. ते जोडणारे होते. अति उच्च, उदात्त असें तें मन होतें. तरीहि कौटुंबिक जीवनाचें पावित्र्य विसरत नसत. मानवाची सेवा म्हणजेच ईश्वरभक्तीचें परमोच्च कर्म असें त्यांना वाटे. निराळी भक्ती व पूजा आणखी कोठली ? सेवा हीच भक्ति. आपापलीं कर्तव्यें सोडा, असें कधींहि त्यांनीं सांगितलें नाहीं. त्यांची शिकवण सर्वसामान्य मनुष्याला झेपणारी आहे. त्यांचा मर्यादा-धर्म आहे. आपापलीं नियत कर्तव्यें करण्यांतच पुण्य आहे, धर्म आहे. पैगंबर सांगायचे, 'मुलाबाळांची उपेक्षा नका करूं. ती प्रभूची ठेव आहे. प्रेमानें व हळुवारपणानें मुलांचें संगोपन करा. मुलांनींहि आईबापांस मान द्यावा, प्रेम द्यावें. तुमच्या कर्तव्याच्या वर्तुळांत तुमचे कुटुंबीच फक्त नसावेत, आप्तेष्ट, सगेसोयरे, मित्र व ज्यांचें तोंड खालीं झालें आहे असे अनाथ, त्यांचाहि समावेश तुमच्या कर्तव्याच्या वर्तुळांत आहे हें विसरुं नका.'

असे हे मुहंमद होते. त्यांच्याहून अधिक विशुध्द, अधिक प्रतिभाशाली विभूति झाल्या असतील. परंतु जें ईश्वरी कार्य घेऊन मुहंमद आले, त्या कार्याची जितक्या एकरुपतेनें व जितक्या धैर्यशौर्यानें व उदात्ततेनें त्यांनीं पूर्णता केली, तसें क्वचितच् कोणी केले असेल. ईश्वरी संदेश मला द्यावयाचा आहे, ही अखंड जाणीव ठेवून तदर्थ असें सर्व जीवन क्वचित् कोणी दिलें असेल. एका महान् सत्याला त्यांनीं जीवनांत स्थान दिलें होतें. त्या सत्यांतून सर्व प्रेरणा घेत होते. तो त्यांचा आनंद. तें सत्य म्हणजे ईश्वर एक आहे. हें सत्य त्यांच्याइतकें तीव्रतेनें कोणीहि दिलें नाहीं. त्यांचा अनंत उत्साह या सत्यार्थ होता, क्षुद्र गोष्टीसाठीं नव्हता. असे महापुरुष हे जगाचे, मानवजातीचें मोठें मीठ असतात. मानवजीवन ते सडूं देत नाहींत. स्वच्छ राखतात. मधूनमधून असें दैवी मीठे येत असतें.

आणि त्यांचा अवतार संपला ! पैगंबर मेले तेव्हा उमर म्हणाला, 'कसे मेले ! अशक्य !' अबुबकर म्हणाले, 'मित्रांनो, ज्यांनीं मुहंमदांची पूजा केली, त्यांनी लक्षात घ्यावें कीं मुहंमद मरण पावले. परंतु ज्यांनी ईश्वराची पूजा केली त्यांचा ईश्वर सदैव आहे, तो कधीं मरत नाही !'

मुहंमद गेले, परंतु तो एक परमेश्वर सदैव आहे. मुहंमद विसरलेत तरी देव विसरुं नका. आणि देवाची स्मृति देणारा, त्याला तरी कोण कसा विसरेल ? खरें ना ?

 

पुढे जाण्यासाठी .......

इस्लामी संस्कृति