शुक्रवार, आँगस्ट 23, 2019
   
Text Size

तरवारीचें व फांसाचें थैमान

भाग दुसरा
तरवारीचें व फांसाचें थैमान !

प्रकरण १ लें
स्वतः व ईश्वर यांत जगांची वाटणी करणारा अलेक्झांडर

- १ -

इकडे प्लेटो आदर्शभूत राज्याचीं स्वप्नें खेळवीत असतां, तिकडे ग्रीक शहरें क्षुद्र व निरर्थक युध्दांनीं व क्षुद्र वैरांनीं स्वत:चा नाश करून घेत होतीं ! अथेन्स विरुध्द कॉरिन्थ, कॉरिन्थ विरुध्द थीब्स, थीब्स विरुध्द स्पार्टा व स्पार्टा विरुध्द अथेन्स असा हा चक्रव्यूह होता.  परस्पर-द्वेष व परस्पर-संशय यांचें हें असें कधीं न संपणारें रहाटगाडगें, द्वेष-मत्सरांचें हें चक्र जणूं गंमतीनें फिरत होतें.  विषारी, मारक असा हा खेळ खराच ; पण त्यांतच त्यांना जणूं रस वाटत होता,  गोडी वाटत होती ! बारीकसारीक गोष्टींसाठींहि ते एकदम युध्द पुकारीत.  युध्द ही एक नित्याची, मामुली बाब बनली.  उत्तमोत्तम माणसें रणांगणावर मरत होतीं.  सारी ग्रीक संस्कृति विनाश पावणार असें दिसत होतें.  सार्‍या ग्रीक संस्कृतीवर गडप होण्याची वेळ आली होती.

अथेन्समधील आयसॉक्रे़टीससारख्या कांही मुत्सद्दयांनीं हा धोका ओळखला व आपल्या राष्ट्राचे प्राण वांचावे म्हणून ग्रीसचें एक संयुक्त संस्थान बनवावें असें त्यांनीं सुचविलें.  तो विचार उत्कृष्ट होता ; परंतु तो प्रत्यक्षांत यावा, ती योजना अमलांत यावी यासाठीं ज्याची योजना करण्यांत आली तो माणूस योग्य नव्हता.  चुकीच्या माणसाची निवड झाली.  मॅसिडोनियाचा राजा फिलिप्स याच्यावर हें संयुक्त संस्थान बनविण्याचें काम सोंपविण्यांत आलें.  मॅसिडोनिया म्हणजे ग्रीस देशाचा उत्तर भाग.  हा जरा रानटी होता, इतर भागांइतका सुसंस्कृत नव्हता.  सर्व ग्रीकांचें एक संयुक्त राष्ट्र बनविण्यासाठीं आयसॉक्रे़टीसनें दिलेलें आमंत्रण त्यानें स्वीकारलें.  फिलिप्सनें मॅसिडोनियन लोकांची एक सेना उभारलेली होतीच ; ती बरोबर घेऊन युध्दानें त्रस्त झालेल्या व कंटाळून गेलेल्या या द्वीपकल्पावर तो तुटून पडला व त्यानें सारीं स्वतंत्र ग्रीक शहरें जिंकून त्यांचें एक संयुक्त राष्ट्र बनविलें.  अशा रीतीनें ग्रीक गुलामांचें हें संयुक्त राष्ट्र जन्माला आलें.

- २ -

राजा फिलिप हा अलेक्झांडरचा बाप.  फिलिप सुशिक्षित पण जंगली मनुष्य होता.  तो ग्रीक लोकांच्या ज्ञान-विज्ञानांचे कौतुक करी.  त्यानें त्यांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला, त्यांची संपत्ति लुटण्याला तो अधीर झाला.  तो सायरसच्या नमुन्याचा योध्दा होता.  तो युध्द पुकारावयाला भिणारा नव्हता.  तो स्वत: सैन्याबरोबर असे.  त्याची महत्त्वाकांक्षा अमर्याद होती.  त्याला सारें जग खेळवावयाला हवें होतें.  इराणवर हल्ला करण्यासाठीं त्यानें आधीं ग्रीस हातांत घेतला.  तो ग्रीसमधून पर्शियावर उडी मारणार होता.  साम्राज्यें निर्मिण्याची अपूर्व बुध्दिमत्ता असणार्‍यांमध्यें फिलिप हा 'साम्राज्यांचा संस्थापक' या नात्यानें अद्वितीय होता.  त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेर सर्वत्र त्याचा शब्द म्हणजे कायदा होता.  एपिरसच्या राजाची मुलगी ऑलिम्पियस ही त्याची पत्नी.  तिच्याच पोटीं अलेक्झांडर जन्मला.  ती धर्मवेडी होती.  ती आपल्या नवर्‍याचा फार तिरस्कार करी व त्याचें जीवन करतां येईल तितकें दु:खी करणें हा आपला धर्म मानी.  तो चिडावा, संतापावा, म्हणून ती म्हणे, ''अलेक्झांडर माझ्या पोटचा असला तरी तुमचा नाहीं ! रात्रीं एक देव सर्परूपानें येऊन मला भोगून गेला.  हा पुत्र देवोद्भव आहे.'' या दंतकथेवर फिलिपचा विश्वास होता कीं नाहीं कोण जाणें ; परंतु अलेक्झांडरचा मात्र मरेपर्यंत संपूर्ण नसला तरी अर्धवट विश्वास होता.  अलेक्झांडर अनेकदां आग्रहानें सांगे, ''मी दैवी आहें—देवापासून जन्मलों आहे.''

 

पुढे जाण्यासाठी .......