मंगळवार, जुलै 14, 2020
   
Text Size

स्वदेशी समाज

हिंदुस्थानची जी उत्क्रांति होत आहे, जो विकास होत आहे, त्यामध्ये शेवटी हिंदूंच्या मोठेपणा जगाला दिसणार, का दुस-या एखाद्या जातीचा दिसणार, ही गोष्ट महत्त्वाची नाही. हिंदुस्थानात मानव जातीचा इतिहास एक निराळाच विशेष प्रयोग करून राहिला आहे. सर्वव्यापक व सर्व संग्राहक जी परिपूर्णता, तिला एक विशेष स्वरूप व आकार देऊन मानव जातीच्या उद्धाराचा विचार येथे चालला आहे. भारताच्या इतिहासांतील हे ध्येय आहे, हे सोनेरी सूत्र आहे. अनंत घडामोडीतील हे सार आहे. हिंदुस्थानांत परमेश्वराला हे ध्येय मूर्तीमंत करावयाचे आहे. आपापले क्षुद्र व्यक्तित्त्व विसरून. जातिविषयक दुरभिमान दूर ठेवून हिंदु असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, जर सारे त्या परिपूर्णतेच्या विशेष ध्येयसिद्धीसाठी झटतील, तर सत्य व न्याय यांच्या दृष्टीने कोणाची हानि झाली असे कदापि होणार नाही.

विशाल असा भारत निर्मिण्यासाठी आपणा सर्वांस येथे सहकार्य करावयाचे आहे व केले पाहिजे. जर कोणतीही विशिष्ट जात, विशिष्ट समाज वा विशिष्ट धर्म बंडखोरपणा करील, आपलेच प्रस्थ स्थापण्याचा प्रयत्न करील, तर राष्ट्राच्या प्रगतीत मोठाच अडथळा येईल. भारतातील मोठ्या प्रश्नांशी ज्या जातीला एकरूप होता येणार नाही, जो समाज, जो पंथ, जो धर्म एकरूप व्हावयास नाखुश असेल, त्या सर्वांना आज ना उद्या नष्ट व्हावे लागेल, गळून पडावे लागेल. जो समाज भारतातील एकांडे शिलेदाराप्रमाणे वागू लागेल, त्याला मरावे लागेल. जे निरनिराळे भाग परिपूर्णतेच्या महान ध्येयासाठी तनमनधने करून झटतील, तदर्थ स्वतःचे बलिदान करतील, स्वतःचे सारे विसरतील, ध्येयाचे महत्त्व जाणून स्वतःची क्षुद्रता ओळखतील, ते भाग क्षुद्र असले तरी मोठे होतील. ध्येयांच्या भव्य प्रासादांत त्यांना कायम स्थान मिळेल.

हिंदुस्तान ही एक विशाल रंगभूमि आहे. या रंगभूमीवर केवळ हिंदूनीच सारा खेळ करावा असे नाही. परमात्म्याला या रंगभूमीवर जो खेळ करावयाचा आहे, त्यांत हिंदूचे काही काम आहे. व म्हणून त्यांना येथे बोलावण्यांत आलेले आहे. हिंदूंनी ही गोष्ट सदैव ध्यानात धरावी. जी भूमिका आपणांस करावयाची आहे, ती जर आपणांस नीट करावयाची नसेल तर  आपणांस पडद्याआड जावे लागेल. तो महान् व्यवस्थापक रंगभूमीवरुन आपणांस दूर करील. प्राचीन संस्कृतीच्या अभिमानाने आपण जर इतरांपासून दूर राहू, पूर्वीच्या मोठेपणाच्या घमेंडीत राहून अलग बसू. आपल्या भोवती भिंती बांधून व खंदक खणून जर स्वतःचा सवता सुभा निर्माण करू, तर परमेश्वर आपले शासन केल्यावाचून राहणार नाही. तो दुःखापाठीमागून दुःख पाठवील व इतरांच्या बरोबरीस तुम्हाला आणील. ज्या मोठेपणामुळे दूर राहू पाहता, तो मोठेपमा छाटला जाऊन इतरांच्या उंची इतकीच तुमचीही उंची होईल किंवा परमेश्वरी योजनेत तुम्ही नीट बसत नाही असे समजण्यांत येऊन तुम्हांला अजिबात दूर करण्यांत येईल. ईश्वराला आमचाच काय तो फक्त विकास करावयाचा आहे अशी भ्रामक कल्पना करून अभिमानाने इतरांपासून जर आपण स्वतःस अलग करू, आपला धर्म फक्त आपल्या पुरता, आपल्या संस्था आपल्या पुरत्या, आपली मंदिरे फक्त आपल्यापुरती, अपले ज्ञान आपल्याच खोलीत झाकून ठेवण्यासाठी, असे जर वागू, तर आपणच निर्माण केलेल्या या भीषण कारागृहात आपणास केवळ मरणाची वाट पहात बसावे लागेल.

 

पुढे जाण्यासाठी .......

स्वदेशी समाज