मंगळवार, जुलै 14, 2020
   
Text Size

स्वदेशी समाज

असा हा विशाल अभिनव भारत उभारण्याची महान् जबाबदारी आज आपणांवर येऊन पडली आहे. ही जबाबदारी आज पाडण्यासाठी आपले प्रत्येकाचे हे पहिले कर्तव्य आहे की इंग्रजांची व आपली जी गाठ पडली, तिचा खरा अर्थ समजून घेणे. आम्ही अलग राहू, सहकार्य करणार नाही, उदासीन राहू, हातांत हात घालणार नाही, कुणाशी देवाण घेवाण करणार नाही, असे जर आपण ठरवू, तर असल्या अभद्र लक्षणांनी आपण आपला भारत अधिकच दुबळा व दरिद्री करू. अतःपर कोप-यांत बसून चालणार नाही.

भारतवर्षांत अर्वाचीन काळी ज्या मोठमोठ्या विभूति झाल्या, त्या सर्वांचे प्रयत्न पूर्व व पश्चिम यांना जवळ आणण्यासाठी होते. त्यांचे हे जीवनकार्य होते. अगदी ठळक म्हणून राजा राम मोहनराय यांचे उदाहरण घ्या. १९ व्या शतकाच्या आरंभी ह्या देशांत राममोहन राय ही एकच महान् विभूति ह्या दिव्य व उच्च भूमिकेवर उभी होती. मानवजातीच्या विशाल पायावर भारताचे व जगाचे ऐक्य व्हावे ही गोष्ट १०० वर्षापूर्वी एकट्या राममोहन रायांनाच दिसत होती. त्यांच्या त्या दिव्य दृष्टीला कोणतीही अंधश्रद्धा, परंपरागत रूढी वा आचार यांची बाधा झाली नाही. विशाल हृदय व अपूर्व बुद्धि या दोन्हीच्या साहाय्याने पूर्वेला न सोडता त्यांनी पश्चिमेलाहि मिठी मारली. नव बंगालला त्यांनीच जन्म दिला.

आपले कार्यक्षेत्र व ज्ञानक्षेत्र वाढावा म्हणून राममोहन राय झटले. त्यांना कष्ट पडले, त्याचे छळ झाले. परन्तु त्यांनी आनंदाने सारे सहन केले. पूर्वेपासून तो थेट पश्चिमेपर्यंत आपले कार्यक्षेत्र व विचारक्षेत्र वाढावे, सत्यसंशोधनाचे मानवाचे जे प्राचीन व अनादि हक्क आहेत, ते आपल्या बंधूंस मिळावे, ह्या सर्व पृथ्वीचे आपण वारसदार आहोत, ही गोष्ट आपल्या बंधूंना पटावी, म्हणून राम मोहन झटले व झगडले. “बुद्ध, खिस्त व महंमद यांनी आमच्यासाठी देह दिले,” ही महान वाणी प्रथम ऋषि राममोहन यांनीच उच्चारिली. महान् विभूतींनी तपश्चर्येने जे मिळविले ते सर्व मानवजातीसाठी आहे. ह्या पृथ्वीवर ज्ञानाच्या मार्गातील अडचणी दूर करण्यासाठी, मृत व दुष्ट रुढी नष्ट करण्यासाठी, जे महात्मे लढले, ते एका विशिष्ठ राष्ट्राचे वा जातीचे नसून सर्व विश्वाच्या मालकीचे आहेत. भारतीय ऋषि जगाचे आहेत व जगातील सारे महर्षी भारताचेहि आहेत. ह्या सर्व विभूतींना मानवजातीस वर चढविले आहे.

जुन्या भिंती मजूबूत करा, पडलेले कोट पुन्हा बांधा, असे राममोहनराय यांनी सांगितले नाही. दिक्कालातीत व्हा असे त्यांनी सांगितले. जगाच्या विशाल अंगणात, काळाच्या महान् रंगणात या, असे त्यांनी हिंदी जनतेस सांगितले. पूर्व व पश्चिम यांना जोडण्यासाठी आपण महान् सेतु बांधू असे या, असे ते हिंदीजनतेस म्हणाले. राममोहन अशा विशाल दृष्टीचे होते, म्हणून आजहि स्फूर्तीरुपाने ते आपणांत वावरत आहेत. काही तरी नवीन निर्माण करा असा त्यांचा संदेश आजहि स्फूर्ति देत आहे. राममोहन यांनी काळाचा हेतु ओळखला. उगीच आंधळेपणाने, जात्याभिमानाची क्षुद्र व संकुचित दृष्टी ठेवून काळाच्या हेतूविरुद्ध, ईश्वरी इच्छेविरुद्ध त्यांनी बंड पुकारले नाही.

हे महनीय ध्येय प्राचीन काळापासून आपल्या देशासमोर ठेवले गेले आहे. या ध्येयकमलाची एकेक पाकळी उघडत आहे. ह्या ध्येयराजाची पताका फडकवणारे राममोहनराय हे महान् वीर होते. त्यांना माघार माहित नव्हती. ध्येयराजाचा भव्य ध्वज हाती घेऊन ते निर्भयपणे पुढे गेले.

 

पुढे जाण्यासाठी .......

स्वदेशी समाज