बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

स्वदेशी समाज

आणि आता आणखी एक धर्म आला आहे. या धर्मानेही आपल्या बरोबर भिन्न चालिरीती, भिन्न विचार, भिन्न ध्येये, भिन्न शिक्षणक्रम वगैरे आणले आहे. अशा रीतीने हिंदुधर्म, बुद्धधर्म, इस्लामी धर्म व ख्रिस्तधर्म हे जगातील चार मोठे धर्म ह्या भारतवर्षांत एकत्र आले आहेत. परमथोर व परम मंगल असे सर्व-धर्मैक्य घडवून आणण्यासाठी हिंदुस्थान ही परमेश्वराने प्रयोगशाळा योजिली आहे. सर्वधर्मसमन्वयाची प्रयोगशाळा होणा-या भारताच्या भाग्याचे वर्णन मी किती करू ?

आपणाला एक गोष्ट विसरुन चालणार नाही. ती गोष्ट म्हणजे बुद्ध काळात आपला अनेक देशांशी संबंध आला. त्यावेळेस समाजाची घडी विस्कळित होत होती. त्या अव्यवस्थेंतूनही जरी भारतवर्षाने एकता निर्मिली, तरी तेव्हापासून एकप्रकारचा अतिसावधानपणा आपल्या अंगी आला आहे. आपण भित्रे बनलो आहोत. दुसरा मला खाईल अशी भीति व धास्ती हिंदु समाजाला सतत वाटत असते. अशी भीति प्रगतिपथांतील फार मोठी धोंड असते. असला भित्रा समाज फार हालचाल करित नाही. त्याच्यावर एक प्रकारची प्रेतकळा येते. सभोवती खंदक खणून त्या खंदकात हिंदु समाज राहू लागल्या पासून हिंदुस्थानाने स्वतःचे स्थान गमावले. एकेकाळी धर्म, शास्त्र, विद्या, कला, या बाबतीत भारत अग्रेसर होता. परन्तु जगाला गुरुस्थानी असणारा भारत त्या महनीय स्थाना पासून खाली पडला. या अधःपतनाचे मुख्य कारण म्हणजे हृदयांतील भीती. जीवनांत भीति ठाणे देऊन बसली की प्रगति संपली. भित्र्याला प्रबळा समोर शतवार मरणे एवढेच काय ते उरते.

आपल्या ह्या अति सावधपणामुळे आपली जलसागरावरील व ज्ञानसागरावरील पर्यटणे थांबली. वास्तविक आपला धर्म खरा विस्वधर्म होता. आपला संबंध सा-या जगाशी असावयाचा. परन्तु ते सारे जाऊन आपण कूपमंडूक बनलो. बायका ज्याप्रमाणे जुन्याला चिकटून बसतात, काटसर करुन असेल तेवढ्यांतच रुटुखुटू संसार चालवितात, तीच सवय आपणांस लागली. साहस करावे, पौरुष प्रकट करावे, प्रयोग करावे, असे आपल्या मनात येताच नाही. जिज्ञासा म्हणून वृत्तिच उरली नाही. केवळ भेकड व बावळट होऊन आपण बसलो आहोत. आपली संपत्ति पूर्वी व्यापाराने वाढत असे ती आज वाढत नाही. संपत्ति घरात येऊन बसली. ज्ञान घरात बसले. ना व्यापारी धनाची वाढ, ना ज्ञानधनाची वाढ. आपण अंतर्बाह्य भिकारी झालो आहोत. याचे कारण भीति. जीवनाला जास्त कुरवाळित बसल्याने जीवन नाहीसे होते.

प्रत्येक राष्ट्र मानवजातीचा भाग आहे. मानव जातीच्या कल्याणासाठी आपण काय केले याचा प्रत्येक राष्ट्राला हिशेब द्यावा लागेल. या जगाच्या कल्याणांत, मानवीसमाजाच्या प्रगतींत जो जेवढी भर घालील, ज्या किंमतीची घालील, त्या मानाने त्याला जगांत स्थान मिळेल. ज्या राष्ट्राची निर्माणशक्ति संपली, नवीननवीन विचार प्रसवण्याचे सामर्थ्य संपले, ते राष्ट्र मरणपंथास लागले असे समजावे. अर्धांकवाताने एखादा अवयव लुळा पडतो, त्याप्रमाणे मानवजातीचा तो राष्ट्रावयव लुळा झाला असे समजावे. कसे तरी जगण्यात पुरुषार्थ नाही, प्रौढी नाही. झ-याला जिवंत रहावयाचे असेल तर सारखे नवीन पाणी स्वतःच्या हृदयांतून त्याने जगाला दिले पाहिजे. वृक्षाला जिवंत रहावयाचे असेल तर नवनवीन पाने फुले फळे त्याला येत राहिली पाहिजेत. ज्या झ-याचे हृदय उडत नाही, ज्यांतून पाणी बाहेर पडत नाही, तो झरा सुकला, संपला. वसंत येतांच ज्या झाडाला नव पल्लव फुटत नाही त्याचा अवतार संपला. त्याला तोडून चुलीत घालणे एवढेच बाकी राहिले. जे राष्ट्र नवीन प्रयोग करित नाही, नवीन समचमत्कार दाखवित नाही, त्या राष्ट्राला मरण्याचेच फक्त उरले. कोण कु-हाड घेऊन येतो व कधी येतो एवढेच पहावयाचे. “सनातनो नित्यनूतनः” ज्याला चिरंजीव व्हावयाचे असेल त्याने नित्यनूतन राहिले पाहिजे.

 

पुढे जाण्यासाठी .......

स्वदेशी समाज