सोमवार, सप्टेंबर 20, 2021
   
Text Size

भारतीय संस्कृती

अद्वैताचे अधिष्ठान

भारतीय संस्कृतीत सर्वत्र अद्वैताचा आवाज घुमून राहिला आहे. भारतीय संस्कृतीला अद्वैताचा मंगल वास येत आहे. हिंदुस्थानच्या उत्तरेस ज्याप्रमाणे उत्तुंग गौरीशंकर शिखर उभे आहे, त्याचप्रमाणे येथील संस्कृतीच्या पाठीशीही उत्तुंग व भव्य असे अद्वैतदर्शन आहे. कैलासावर बसून ज्ञानमय भगवान शंकर अद्वैताचा डमरू अनादी कालापासून वाजवीत आहेत. शिवाजवळ शक्ती असणार. सत्याजवळ सामर्थ्य असणार. प्रेमाजवळ पराक्रम असणार. अद्वैत म्हणजे शिवत्व. अद्वैत म्हणजे निर्भयता. या संसारात अद्वैताचा संदेशच सुखसागर निर्मू शकेल.

भारतीय ऋषींनी ही महान वस्तू ओळखली. अद्वैताचा मंत्र त्यांनी जगाला दिला. या मंत्राइतका पवित्र मंत्र दुसरा कोणताही नाही. जगात दुजाभाव असणे म्हणजे दु:ख असणे व समभाव म्हणजे सुख असणे. सुखासाठी धडपडणा-या मानवाने अद्वैताची कास धरल्याशिवाय तरणोपाय नाही.

ऋषी कळकळीने सांगत आहेत, की ज्याच्या ज्याच्याबद्दल तुला दुजाभाव वाटत असेल, त्याच्या त्याच्याजवळ जाऊन त्याला प्रेमाने मिठी मार.

“सहनाववतु। सह नौ भुनक्तु। सहवीर्यं करवावहै।
तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै।
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:।।”


या थोर मंत्राचा खोल अर्थ काय? हा मंत्र आपण एके ठिकाणीच म्हणावयाचा नाही. हा मंत्र सर्वत्र उच्चारावयाचा आहे व तदनुरूप वागायचे आहे. केवळ गुरु-शिष्यापुरता हा मंत्र नाही. ब्राह्मणांना ब्राह्मणेतरांबद्दल व ब्राह्मणेतरांना ब्राह्मणांबद्दल दुजाभाव वाटत आहे का? येऊ देत ते एके ठिकाणी व म्हणू देत हा मंत्र. स्पृश्य व अस्पृश्य परस्परांपासून दूर आहेत का? येऊ देत त्यांना जवळजवळ व उच्चारू देत हा मंत्र. हिंदु-मुसलमान परस्परांस पाण्यात पाहात आहेत का? येऊ देत ते जवळ. हातात हात घेऊन उच्चारू देत हा मंत्र. गुजरातेतील व महाराष्ट्रातील लोक एकमेकांचा द्वेष करीत आहेत का? येऊ देत त्यांना जवळ व उच्चारू देत हा मंत्र.

ज्यांना एकमेकांबद्दल दुजाभाव वाटत नाही, त्यांच्यासाठी हा मंत्र नाही. दुजाभाव दूर करण्यासाठी हा मंत्र आहे. जगात सर्वत्र दिसून येणा-या दुजाभावाचा अंधार दूर करण्यासाठी म्हणून ऋषीने हा महान दीप दिला आहे. हा दीप हातात घेऊन आपण पाहू या. आपले व्यवहार करू या. आनंद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही.

अद्वैत म्हणजे माझ्यासारखाच दुसरा आहे ही भावना. समर्थांनी सारे अद्वैत तत्त्वज्ञान माझ्या मते एका ओवीत सांगून ठेवले आहे. अद्वैताचे प्रत्यक्ष व्यावहारिक स्वरूप त्यांनी त्यात शिकविले आहे.

 

पुढे जाण्यासाठी .......

भारतीय संस्कृती