शुक्रवार, आँगस्ट 23, 2019
   
Text Size

भारतीय संस्कृती

उपसंहार

भारतीय संस्कृती या महान विषयावर थोड्या फार गोष्टी मांडल्या आहेत. भारतीय संस्कृतीवर अपरंपार प्रेम मी करीत आलो आहे. भारतीय संस्कृतीवर ज्ञानाने लिहिण्याचा मला अधिकार नाही. परंतु प्रेमाने लिहिण्याचा मला अधिकार आहे. भारतीय संस्कृतीवर प्रेम करण्यात मी कोणासही हार जाणार नाही. या प्रेमानेच मला वेडेवाकडे लिहावयास लाविले आहे. भक्तीमुळेच मी बोललो आहे.

भारतीय संस्कृती निर्दोष व्हावी, वाढत जावी, तेजाने फुलावी, असे मला उत्कटतेने वाटते. ही संस्कृती ज्ञानमय आहे, संग्राहक आहे, कर्ममय आहे. ही संस्कृती सर्वांना जवळ घेईल, नवीन नवीन प्रयोग करील, अविरत उद्योग करील. भारतीय संस्कृती म्हणजे सर्वांगीण विकास. सर्वांचा विकास. भारतीय संस्कृतीचा आत्मा स्पृश्यास्पृश्ये मानीत नाही. हिंदु-मुसलमान जाणत नाही. प्रेमाने व विश्वासाने सर्वांना मिठी मारून, ज्ञानमय व भक्तिमय कर्माचा अखंड आधार घेऊन मांगल्यसागराकडे, ख-या मोक्षसिंधूकडे जाणारी ही संस्कृती आहे.

भारतीय संस्कृतीच्या उपासकांची महान यात्रा अनादिकालापासून सुरू आहे. व्यास-वाल्मीकी, बुध्द-महावीर, शंकराचार्य-रामानुज, ज्ञानेश्वर-तुकाराम, नानक-कबीर वगैरे मोठमोठया संतांनी ही यात्रा चालविलेली आहे. आजही महात्मा गांधी, त्यागमूर्ती जवाहरलाल, महर्षी अरविंद वगैरे महान विभूती ती भव्य यात्रा पुढे नेत आहेत. चला, आपण लहान-मोठे या यात्रेत सामील होऊ.

या रे, या रे, अवघे जन

अशी हाक हे भारतीय संस्कृतीचे सत्पुत्र सर्वांना मारीत आहेत. ही हाक ज्याच्या हृदयाला पोचेल तो धन्य होय ! 

पुढे जाण्यासाठी .......

भारतीय संस्कृती