शुक्रवार, मे 29, 2020
   
Text Size

नामदार गोखले-चरित्र

गोखल्यांचे चरित्र १८६६ पासून १९१५ पर्यंतच्या म्हणजे ४९ वर्षांच्या कालमर्यादेत पसरले होते. परंतु हा काळ महाराष्ट्राच्या व भारतवर्षाच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाचा गणावा लागतो. याच काळात महाराष्ट्राच्या राजकीय जीविताला वळण लागले. ब्रिटिशांचे हिंदुस्थानातले राज्यकर्तृत्व विजय आणि जिंकलेल्या प्रदेशाचा बंदोबस्त या दोन अवस्थांतून सुटून पुनर्घटनेच्या अवस्थेत १८६१ साली शिरले. १८५७ च्या बंडाने इंग्रजी राज्यकर्तृत्वाची मिठी किती घट्ट बसली आहे, याचा सा-या दुनियेला अनुभव आला, पण त्याचवेळी राज्यकर्त्यांनाही समजले की, हिंदी लोकमताची   विचारपूस करून आपले प्रभुत्व गाजविण्याची वेळ आली आहे. १८६१ मध्ये कौन्सिले अस्तित्त्वात आणून इंग्रजांनी पुनर्घटनेला प्रारंभ केला. यानंतर पाच वर्षांनी गोखल्यांचा जन्म होऊन हिंदी लोकमत काँग्रेसच्या रूपाने एकवटून नवीन नवीन आकांक्षा व्यक्त करू लागले. त्याच वेळी गोखले यांनी विद्यार्जन संपवून स्वार्थत्यागपूऱ्वक विद्यादान करावयास लावणा-या सार्वजनिक कार्यात आपले पाऊल टाकले. नंतर हळूहळू सुधारकाचे संपादक, सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक व सभेचे चिटणीस, प्रांतिक परिषदेचे चिटणीस, काँग्रेसचे एक प्रतिनिधी अशी निरनिराळया कार्यांच्या परंपरेने त्यांनी लोकसेवेचा मार्ग चोखाळण्यास आरंभ केला. वरच्यासारख्या बाहेरच्या स्वयंप्रेरणेने स्वीकारलेल्या कामाचा व्याप वाढत असता त्यांनी ज्या शिक्षणसंस्थेला आयुष्याच्या सुरुवातीस सर्वस्व अर्पण करण्याची दीक्षा घेतली होती, त्या संस्थेच्या कामाचाही बोजा वाढत होता. ही सर्व कामे त्यांनी एकमेकांचा विरोध होऊ न देता सारख्याच उत्साहाने, आस्थेने आणि कळकळीने चालविली. १८९७ साली त्यांची उमेदवारी संपून त्यांचे नाव होतकरू लोकनायक या नात्याने मुख्य मुख्य पुढा-यांबरोबर गोवले जाऊ लागले. मध्यंतरी वर्ष सवा वर्ष लोकापवादामुळे त्यांचे उज्ज्वल कर्तृत्व अस्तप्राय दिसत होते. परंतु ही स्थिती पालटून १८९९ नंतर त्यांची लोकसेवा डोळे दिपवून सोडण्यासारख्या प्रखरतेने चमकू लागली व मग १९१५ पर्यंत तिच्या विलक्षण तेजस्वितेमुळे कोणत्याही अपवादाला डोके वर काढता आले नाही. असे गोखल्यांच्या चरित्राचे स्थूल स्वरूप आहे. त्यांनी आपली कर्तबगारी प्रामुख्याने एकटया राजकीय विषयाला वाहिली असल्याने सकृद्दर्शनी त्यांचे चरित्र बिनगुंतागुंतीचे व एकतंत्री वाटते. पण त्यांच्या कार्याचे समग्र व यथोचित आकलन होण्यासाठी- पृथक्करण करू लागले की, त्याची बहुविधता ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या कार्याची बहुविधता ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या कार्याची बहुविधता शेवटपर्यंत कायम होती. पण प्रत्येक महापुरुषाच्या पूर्ववयातल्या कामगिरीला विशेष महत्त्व असते. त्याच्या आयुष्यक्रमाला वळण लागून ते स्थिर होईपर्यंतच्या काळातील कामगिरीचा इतिहास अधिक बोधप्रद समजला जातो. गोखल्यांच्या आयुष्यातली, या दृष्टीने पाहिल्यास, १८८७ ते १८९७ ही दहा वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यांचे राजकीय ध्येय याच वर्षांत निश्चित झाले. सदर काळात त्यांची हिंदी राजकारणाच्या भिन्न भिन्न अंगासंबंधी जी मते बनली, त्यांचाच त्यांनी १९०० पासून पुढील पंधरा वर्षांत जोराने पुरस्कार केला व त्यांतली काही सफळ करून दाखविली. ते प्रोफेसर होते, सुधारकाचे व सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे संपादक होते, काँग्रेसमधले व प्रांतिक परिषदेतले एक वक्ते होत वगैरे सामान्य गोष्टी सर्वांच्या परिचयाच्या आहेत; पण त्यांनी कोणती मते प्रतिपादन केली, त्यांमध्ये व पुढच्या मतांमध्ये अंतर पडले का सादृश्य कायम होते, इत्यादी मुद्दयांचा तपशीलवार ऊहापोह केल्याखेरीज त्यांच्या लोकसेवेचे वैशिष्टय लक्षात येणे शक्य नाही. प्रस्तुत मुद्दयांचा अभ्यास करण्याची साधने थोडी दुर्मिळ आहेत व ती मिळविण्याचा उद्योग न केल्यामुळे जो दोष स्वाभाविकपणे उत्पन्न होतो तो दोष या पुस्तकात राहून गेला आहे.

गोखल्यांचा उदय झाला तेव्हाच महाराष्ट्रात टिळकांचा उदय झाला. परंतु दुर्दैवामुळे या दोघांमध्ये तीव्र मताविरोध उत्पन्न होऊन तो शेवटपर्यंत अखंड टिकला. या कारणामुळे एकाच्या चरित्राचा विचार करताना दुस-याच्या चरित्राचा विचार केल्याखेरीज गत्यंतर राहत नाही. त्यांपैकी टिळक हे अत्यंत लोकप्रिय, अर्थात त्यांच्या बाजूने कसलीही गोष्ट पुढे आली तरी तिचा लोकांत चटकन् आदर होतो. गोखल्यांना लोकप्रियता कधीच लाभली नाही. याचा परिणाम त्यांच्याविषयी लोकांत आढळणा-या अनेक अवास्तव दुष्ट ग्रहांमध्ये दिसून येतो. गोखल्यांविषयी बारीकसारीक गैरसमज तर पुष्कळच आहेत, पण अर्वाचीन हिंदी राजकारणातले कित्येक प्रसिध्द प्रसंग असे आहेत की, त्यांची पाहणी करताना हटकून बुध्दिभेद होतो. १८९५ मधील पुण्याची काँग्रेसची बैठक व सार्वजनिक सभेतून झालेली रानडे पक्षाची हकालपट्टी, १८९७ सालातली गोखल्यांची माफी, १९०७ सालातली सुरतेची काँग्रेस आणि १९१५ साली गोखले मृत्यूशय्येवर असताना माजलेला काँग्रेसच्या समेटाचा वाद, ही बुध्दिभेद करणा-या प्रसंगांची उदाहरणे आहेत. यातली एक बाजू लोकांना थोडी फार माहीत आहे, व तीच प्रिय असल्याने सामान्यत: दुसरी बाजू पाहण्याचा यत्न कोणी करीत नाही. गोखल्यांचे चरित्र लिहिणाराला ही दुसरी बाजू पाहणे अत्यंत आवश्यक आहे. रा. साने यांनी दोन्ही बाजू पाहून निर्णय देण्याचा यत्न केला आहे. परंतु एका बाजूच्या मताचा त्यांच्या मनावर अतिशय पगडा बसला आहे, म्हणून म्हणा अगर दुसरी बाजू पाहण्याची सगळी साधने त्यांना प्राप्त झाली नाहीत म्हणून म्हणा, त्यांनी नमूद केलेल्या निर्णयात  पक्षपाताचा भाग बराच आढळतो. असे पक्षपाताचे मासले येथे थोडया विस्ताराने दाखल केल्यास अप्रस्तुत होणार नाही.

 

पुढे जाण्यासाठी .......

नामदार गोखले-चरित्र