बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

सुंदर पत्रे

मला ते लहानपणचे दिवस आठवतात. देवळाभोवती शेकडो दुकाने बसत. मेवामिठाईंची, खेळण्याची, भांड्याकुंड्यांची. रामनवमीला रात्री बैलगाडीवरून चिंध्यांच्या केलेल्या प्रचंड हत्तीची मिरवणूक निघे. हत्तीवर कोणी तरी मुलगा बसलेला असे. रामाची लहान मूर्ती गावभर हिंडवण्यात येई. घराघरातून आरती येई, नारळ येई. आजकाल तो आनंद, तो उत्साह नाही. चौघडा नाही, छबिना नाही, हत्ती नाही, यात्रा नाही. पुन्हा तो आनंद कधी येईल? सारी तुरुण मुले मुंबईला गेलेली. गावात आहे तर कोण ? म्हातारी माणसे व लहान मुले यांच्याशिवाय कोण आहे? पुन्हा खेडी कशी गजबजतील? तेथेच छोटे उद्योग नेऊ तर हे होईल. शेतीच्या धंद्याभेवती दुसरे शत-धंदे उभारू तर तरुण तेथेच राहतील, उत्पादन वाढेल, उत्साह वाढेल, पुन्हा संस्कृतीला कळा चढेल.

रामनवमीला घरोघऱ पन्हे करतील, कोकंबाचे किंवा कै-याचे. माझ्या लहानपणी विठुभटजींकडे कोकंबाची फळे आणून त्यांचे पन्हे करीत. किती रूचकर लागते ते!

तुम्ही समुद्रात पोहायला जाता का? आता उन्हाळा आहे. पाण्यात डुंबायची मजा. अरुणालाही लाटांशी खेळू दे पाण्यात; नारायणाचे भाऊ व श्रीरंग काय म्हणतात? रुळले का छात्रालयीन जीवनाला? छात्रालयात राहण्याने आवडीनावडी कमी होतात, सामाजिक भावना येते. वृत्तीचे कंगोरे कमी होतात. आमची आजी सांगायची कोणाची तरी गोष्ट की, त्या मुलाला रोज चमचाभर तरी श्रीखंड लागायचेच. अशा नाना सवयी लाडाने घरी लागतात. श्रीरंगचा भाऊ जरा हळवा आहे. नारायणाचे भाऊही दूर राहिलेले नाहीत. परंतु आता ते हसूखेळू लागले असतील. त्यांना माझे सप्रेम आशीर्वाद. आनंदासही सांग. चि. अरुणा आता म्हणे हाताने दूध पिते. प्रत्येक घोट घेताना “हा शेवटचा” असे म्हणते. होय ना? तिला दूध आवडू लागले, चांगले झाले.

मांजरी व्यायली आहे घरात. परवा उंदीर मारून आणून तिने पिलांसमोर ठेवला. पिलांवर तिचे किती प्रेम! पिले दूध पिताना तिला सतावतात. जरा गुरगुरते, परतु पिले पुन्हा येतात. कधी मांजरी आपल्या पिलांना मारते असेही ऐकले आहे. काल बसलो होतो, - पिलू आले खुर्चीजवळ. मी खुर्ची जरा वाकवून बसलो होतो. पुन्हा खुर्ची नीट करून बसलो तर पिलाचे शेपूट सापडले. ते तेथे खेळत होते. पिलू ओरडू लागले तशी मांजरी एकदम आली धावून. परंतु पिलू सुखरुप पाहून त्याला चाटू लागली. तिची माया पाहून मला उचंबळून आले.

गावातील विहिरीचे पाणी आटू लागले. इतका पाऊस पडतो तरी पाण्याचे हाल. आपल्या गावात तळे नाही. कोठे तरी तळे करायला हवे, म्हणजे त्याचे झरे विहिरींना फुटतील असे वाटते.

आपल्या विहिरीला पाणी भरपूर आहे. जोशांच्या विहिरीला आहे. गावातील दोन-तीन विहिरींना पाणी आहे. तेथे सारा गाव जमतो. या पाण्यापायी किती वेळ जातो. प्रत्येक वाडीत भरपूर पाण्याची एकेक तरी विहीर हवी. परंतु वस्तीही काही काही चमत्कारिक वसलेली. सारी पुर्नरचना करायला हवी, पुनर्वसती करायला हवी. परंतु लोकांचीही त्यासाठी तयारी हवी. खरे ना? पुरे आता पत्र. सर्वांना प्रणाम व आशीर्वाद.

अण्णा
ता.क.
तुझी जन्मतारीख मार्च १४ व आइन्स्टाइन यांचीही तीन जन्मतिथी. आता लक्षात आले तुझे गणित व सायन्स बरे का ते. नव्या वर्षांची पुस्तके घेतलीस का?

साधना, २५ मार्च १९५०   

 

पुढे जाण्यासाठी .......

सुंदर पत्रे