बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

सुंदर पत्रे

रघुवंशात एके ठिकाणी सुंदर वर्णन आहे. पुष्पक विमानात बसून राम, सीता, लक्ष्मण वगैरे सारी लंकेहून अयोध्येस जात असतात. रामराया सीतेला विमानातून सारे दाखवीत असतात. येथे मी तुझ्यासाठी रडलो, येथे  हनुमान भेटला, येथे शबरी भेटली वगैरे राम सांगत होते; आणि एका आश्रमाकडे बोट करून म्हणाले, ''या आश्रमात कोणी राहात नाही आता; परंतु आदरातिथ्य करणा-या ॠषींची परंपरा या आश्रमांतील वृक्षांनी पुढे चालविली आहे. आश्रमात कोणी आले तर हे वृक्ष फुलं देतात, फळं देतात.'' मानवधर्माचा आचार करण्यात सृष्टीही जणू सहभागी.

गोविंदभटजींची तुला माहिती नाही, परंतु ते अती समाधानी. आमच्या आईला ते प्रेमाने 'आवडी' म्हणून हाक मारायचे. कधी कुठे भाजी मिळाली तर आणून द्यायचे. जुन्या लोकांतील एक प्रेमळ समाधानी वृत्ती आज दिसेनाशी झाली आहे.

तू नवीन पुस्तके घेतलीस का? लौकर घे. त्यांना कव्हरे घाल. नाही तर अक्काच्या कुमूची पुस्तके तुला होतील. तिला पत्र पाठवून विचार.

आशा, पपी, अशोक वगैरेंस, तसेच शालू, मालू, अरुण, शोभा वगैरे सर्व मुलांस सप्रेम आशीर्वाद. गोदावरीच्या मुलांसही. अरुणाच्या लहान सवंगडयांस गोड गोड चिमटे. ताई व अप्पा यांस स. प्र.

अण्णा

ता. क.

तुमच्या चित्रेकाकांचे चुलते देवाघरी गेल्याचे वाचले. पत्ते खेळताना जोराने पत्ता आपटला एवढेच निमित्त! कसे हसतखेळत मरण! आर्यन् ए. सोसायटीचे ते कित्येक वर्षे प्रमुख होते. त्यांची गीतेवर श्रध्दा. बोर्डीला १९३३ मध्ये गीताजयंतीला गीतेवर प्रवचन देण्यासाठी ते आले असताना त्यांची माझी प्रथम ओळख झाली. ते पुरोगामी विचारांचे होते. रूढींचे कट्टे शत्रू होते. ते खरे कर्मयोगी होते. एक थोर निर्भयसेवक गेला. त्यांच्या स्मृतीस प्रणाम!

साधना, ४ मार्च १९५०

 

पुढे जाण्यासाठी .......

सुंदर पत्रे