बुधवार, एप्रिल 21, 2021
   
Text Size

कला म्हणजे काय?

प्रकरण दुसरें

[कलेपायीं जो इतका अनर्थ होतो त्याची भरपाई थोडी तरी कलेकडून होते का ? कला काय मोबदला देते ? कला म्हणजे काय ? सारा मतामतांचा गलबला व गोंधळ. सौंदर्यनिर्मात्री ती कला- हें खरें का ? सौंदर्यवाचक रशियन शब्द-सौंदर्यशास्त्रांतील बेबंदशाही ]

नाटक, तमाशा, सर्कस, सिनेमा, जलसा, नाच, प्रदर्शन, चित्रें, छापखाने-कांहींही असो-यांतील प्रत्येक गोष्टीसाठी हजारोंहजार लोकांना रात्रंदिवस मनांत इच्छा नसतांना अपमानास्पद व अपायकारक अशीं कामें करावीं लागतात. कलावंतांना ज्या ज्या पदार्थांची जरुर लागते, ते सारे पदार्थ तेच तयार करते, तर ठीक होतें. परंतु त्यांना मजुरांची मदत लागते. कला निर्माण करण्यासाठींच फक्त नव्हे तर कलावानांना जें मिजासी व विलासी ऐषआरामी जीवन चालवावयाचें असतें, तें जीवन चालावें म्हणूनहि त्यांना मजुरांची जरुर लागत असते, कांहीतरी करुन कलावान हें ऐषआरामी जीवन प्राप्त करुन घेत असतो. कधीं धनिकांचा त्यांना आश्रय मिळतो; कधीं सरकार त्यांना मदत देते (ज्याप्रमाणें रशियन सरकार संग्रहालयें, नाटकगृहें वगैरेंना लाखों रुपये देत असतें.) परंतु हा पैसा कोठून आलेला असतो ? ज्या पैशांतून सरकार कलेला उत्तेजन देतें, ते पैसे कोठून येतात ? कराचा शेवटचा हप्ता भरण्यासाठी ज्याला गाय विकावी लागली, बैल विकावे लागले, कलादर्शनानें जी सुंदर सुखसंवेदना होते तिचा जन्मांत ज्याला अनुभव नाहीं, अशा गरीब शेतक-यांकडून तो पैसा सरकारच्या तिजोरींत जमलेला असतो. व्याज देतां येत नाही म्हणून जो आपली मुलेंबाळें उपाशीं ठेवतो, कर्जाची थोडी फार फेड व्हावी म्हणून जो पोटाला पोटभर गोळा देत नाहीं, बायकोच्या अब्रुरक्षणापुरतेंहि वस्त्र घेत नाहीं-अशा शेतक-यानें दिलेला पैसा त्या धनिकाच्या पेटींत जमा होत असतो !

प्राचीनकाळांतील ग्रीक किंवा रोमन कलावानाला, किंवा एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत रशियन कलावानासहि (कारण त्या वेळेपर्यंत रशियांत गुलाम होते व गुलाम ठेवणे रास्त मानलें जाई ) स्वत:च्या कलेसाठी व स्वत:साठीं गरीब लोकांना खुशाल वेठीला धरुन काम करण्यासाठी लावता येत असे. त्यांच्या मनाला त्यात कांही वाटत नसे. परंतु आजचा काळ बदलला आहे. समान हक्काची अंधुक अशी कां होईना पण कल्पना आज सर्वत्र माणसांत उत्पन्न झाली आहे. अशा काळांत मजुरांना त्यांच्या इच्छेविरुध्द कलेसाठी काम करावयास लावणे अशक्य आहे. अशा लोकांना कामाला लावण्यापूर्वी कला ही खरोखरच कल्याणमयी व हितमयी आहे का ? या प्रश्नाचा आधी निकाल लावावा लागेल. जिच्यासाठी अपंरपार केलेला त्याग शोभून दिसेल, जिच्यासाठी जीवने मातींत मिळणें क्षम्य होईल अशा योग्यतेची ही कला खरोखर आहे का ? याचे उत्तर द्यावे लागेल.

नाहीतर शेवटी असें व्हावयाचें की ज्या कलेसाठी अगणित माणसांचे अनंत श्रम घ्यावयाचे, त्यांची थोर जीवनें, त्यांची नीति हया सर्वांचे हवन करावयाचें, हा भीषण संहार करावयाचा-ती कला मंगलमयी असण्याऐवजी अमंगलाचीच जननी असावयाची, जीवनोपयोगी न ठरतां, जीवननाशिनीच निघावयाची, शिवाभवानीच्या ऐवजीं कराल कालीच दिसून यावयाची !

ज्या समाजांत कलानिर्मिति होत असते व जो समाज त्या कलेला आश्रय व उत्तेजना देत असतो त्या समाजानें कलेचें नांव घेऊन जें जें उभें राहतें, तें खरोखर कला आहे कीं नाहीं हें नीट पाहिलें पाहिजे. आजची सारी कला चांगलीच आहे व तिच्यासाठीं जो श्रम करण्यांत येतो, जो कांही त्याग करावा लागतो-त्यांत अयोग्य असे कांही नाहीं-हें ठरविलें पाहिजे. समाजानें या गोष्टीचा नीट विचार करुन निर्णय दिला पाहिजे. त्याचप्रमाणें ज्याला हृदय आहे व ज्याला बुध्दि आहे अशा प्रत्येक कलावानानेंहि हया गोष्टीचा विचार केला पाहिजे.  आपण जें कांहीं निर्माण करीत आहोंत त्याला खरोखर अर्थ आहे अशी त्याच्या हृदयांत अचल श्रध्दा असली पाहिजे, निश्चित खात्री असली पाहिजे. ज्या कांही मूठभर वरच्या वर्गाच्या लोकांत आपण वावरतों, त्या लोकांनीं केवळ उदोउदो केला म्हणून आपण चांगलें करीत आहोंत असें त्यानें समजूं नये. या मृगजळांत त्यानें नसावें; तर स्वत:च्या सुखविलासी व आरामशीर जीवनासाठी ज्या दीनदरिद्री कष्टाळू लोकांच्या निढळाच्या घामानें मिळविलेल्या पैशांतून आपणाला पैसे मिळतात, त्या लोकांना मी कांहीतरी भरपूर मोबदला हया कलानिर्मितीनें देत आहें अशी श्रध्दा व खात्री  कलावानाला असणें सर्वात अगत्याचें आहे. आणि एवढयाचसाठीं आजच्या आपल्या काळांत  वर दिलेल्या प्रश्नांची उत्तरें विशेषच महत्वाचीं आहेत.

 

पुढे जाण्यासाठी .......

कला म्हणजे काय?