सोमवार, सप्टेंबर 20, 2021
   
Text Size

क्रांती

''रोज येतो. परंतु आपण खिडक्या लावून झोपतो. सुगंधी फुलांच्या वासाचं गोड ओझं घेऊन ओथंबलेला वारा आपल्या दाराशी तिष्ठत उभा असतो.'' ते म्हणाले.

मोटार जात होती आणि पुढे दाट धुके, रस्ता दिसेना. किती दाट धुके ! असे कोणी पाहिले नसेल.

''मिने, गाडी थांबव. धुक्याचा जणू पाऊस पडत आहे.'' पिता म्हणाला.

''धुक्यातून मला दिसतं आहे. खरंच दिसतं आहे.'' ती म्हणाली.

''मिने, थट्टा नको. गाडी खळग्यात जाईल. झाडावर आपटेल.'' ते म्हणाले.

''देवाची इच्छा असेल तसे होईल. तो बघा आकाशात एकच तारा दिसत आहे. बाकी काही दिसत नाही. तो बघा बाबा. दिसला? हे काय? दिसत नाहीसा झाला. हां, पुन्हा दिसला. तो, तो बघा. आता ठळक दिसू लागला. खरं ना?'' मीना आस्ते गाडी चालवीत म्हणाली.

मिनीने शेवटी गाडी थांबवली. ती खाली उतरली. धुक्याने तिचे तोंड ओले झाले. केस ओले झाले. आपल्या पदराने ती पुशीत होती. परंतु बाहेरच उभी होती. ती एदम धावू लागली, पळत सुटली.

''मिने, मिने मला टाकून कोठे पळतेस?'' पित्याने हाक मारली.

''मी काही कोठे जात नाही, बाबा.'' ती दुरून उत्तरली.

''फिर मागं. धुकं वाईट हो. ते बाधतं.'' पिता सांगत होता.

''तो बघा ठळक तारा, पुन्हा दिसू लागला. मारू उडी आकाशात? आणू तो तारा?'' असे म्हणत मिनी धावत होती. उडया मारत होती. धुक्याच्या सागरातून ती माशाप्रमाणे नाचत होती.

परंतु धावत पळत जाणार्‍या मिनीच्या पायाला काही लागले. मिनी एकदम अडखळून पडली. काय होते वाटेत? रस्ता तर चांगला होता. त्या रस्त्याच्या मध्यभागी काय असणार? मोठा दगड असणे तर शक्य नाही. का एखादा ओंडका पडला होता? का झाड मोडून पडले होते? का अजगर थंडगार होऊन लाकडाप्रमाणे पडला होता? काय होते? तार्‍याला पकडू पाहणार्‍या मिनीच्या मार्गात कोणती आली धोंड? कोणती आली अडचण?

मिनी पडली. तिच्या हातांना काही तरी लागले. का हात खरचटले? खडी बोचली? तिच्या हातांना निराळीच वस्तू लागली. निराळाच स्पर्श झाला. ते पाय होते. माणसाचे पाय होते. त्या पायांवर ती पडली. परंतु ते पाय थंडगार होते, मिनीचे गरम हात लागूनही ते गरम झाले नाहीत. मिनी बावरून उभी राहिली. प्रथम ती घाबरली; परंतु ती धीट झाली. धुक्यातून तिला दिसत होते. एक मनुष्य रस्त्यावर पडला होता. थंडगार होऊन पडला होता. त्या धुक्यातही त्याच्या अंगावरची संन्याशाची वस्त्रे झळकत होती. भोगमय जगात वैराग्याची ज्वाला धडधडत होती.

 

पुढे जाण्यासाठी .......

क्रांती