मंगळवार, आँगस्ट 11, 2020
   
Text Size

क्रांती

''माझे वडील मामलेदार आहेत. मी खादी वापरीन तर त्यांच्या नोकरीला धोका येईल.'' ललितमोहन म्हणाला.

''तुमचा मुलगा कोणता कपडा वापरतो हे काही कलेक्टर मामलेदाराला विचारीत नाही. पुष्कळ सरकारी नोकरही आता खादी वापरतात. खादी खपवितात.'' मुकुंदराव म्हणाले.

शाळेत ही गोष्ट झाली. परंतु त्याचे परिणाम निराळेच झाले. मामलेदारसाहेबांकडून शाळाचालकांस बोलावणे आले. गणपतराव तेथे गेले. शिपायाने आत जाऊन सांगितलं की,''शाळेचे चालक आले आहेत.''

''आत घेऊन ये त्यांना.'' साहेब म्हणाले.

गणपतराव नम्रपणे आत आले व उभे राहिले.

''बसा ना हो, या असे.'' साहेबांनी सांगितले.

''आज सकाळीच का बोलावलं? काही विशेष काम?'' गणपतरावांनी प्रश्न केला.

''तसं काही विशेष काम नाही. परंतु तुमच्या संस्थेबद्दल मला आपलं फार वाटतं. संस्था वाढावी, भरभराटावी असं मनात येत असतं. '' साहेब बोलले.

''संस्थेवर सर्वांची कृपादृष्टी असेल तरच ती चालेल. कोणी अधिकारी वगैरे येणार आहेत की काय?'' गणपतरावांनी विचारले.

''सध्या तर नाही कोणी येणार. परंतु तुम्हाला दोन हिताच्या गोष्टी मी सांगणार आहे. तुमच्या शाळेत यंदा एक नवीन शिक्षक आले आहेत.''मामलेदार म्हणाले.

''हो. मोठे चांगले आहेत शिक्षक. मुलांत मुलांसारखे, थोरांत थोरांसारखे. कळकळ आहे, वाचन आहे, विद्वत्ता आहे. पुन्हा साधे. मुलांना त्यांचं वेड लागलं आहे. शाळेला चांगलीच जोड मिळाली.'' गणपतरावांनी सांगितले.

''तसे ते चांगले असतील. परंतु काही काही शिक्षक फाजील उत्साही असतात. पुस्तकातलं शिकवण्याऐवजी भलत्याच गोष्टी सांगू लागतात. अहो, काल त्यांनी आमच्या ललितच्या धोतरावरच टीका केली. म्हणे खादी का नाही नेसत? आता याचा काही संबंध आहे का? अहो, आम्ही सरकारी माणसं. सर्व बाजूंनी पाहावं लागतं. आमच्यावरही गुप्त पोलीस असतात. ललितला ते बोलले. मुलं त्याला हसली. त्याला हसली म्हणजे मलाच हसली. असले शिक्षक शाळेला धोका देतील. शाळेची ग्रँट वाढत नाही म्हणता आणि असली विषं पुन्हा जवळ बाळगता?'' मामलेदार आवाज चढवत म्हणाले.

''मला तर ते शिक्षक विषमय न वाटता अमृतमय वाटतात. त्यांचा सहवास सर्वांना स्फूर्तिप्रद वाटतो. त्यांच्या संगतीत जरा वरच्या वातावरणात गेल्यासारखं वाटतं.'' गणपतराव गंभीरपणे पण शांतपणे म्हणाले.

 

''आजकाल जगात लाठीला प्रतिष्ठा मिळाली आहे. परंतु लाठीला प्रतिष्ठा म्हणजे माणसाची अप्रतिष्ठा. माझ्या पाठीमागं किती लाठीवाले आहेत, किती बंदूकवाले आहेत; यांजवर जर माझी किंमत अवलंबून असेल तर ती किंमत माझी नसून त्या लाठयांची; त्या बंदुकांची ती किंमत आहे. माझ्याजवळ धन असेल तर मला मान. लाठी असेल तर मला मान. अभिजात रक्त असेल तर मला मान, हे सारे मान वास्तविक माझ्या माणुसकीचे नाहीत. माझी माणुसकी, माझा विशाल आत्मा, यांना स्वयंभू तेज आहे की नाही? माझ्या आत्म्याची निष्पाप शक्ती जगाच्या सार्‍या या बाह्य शक्तीसमोर उभी करणं, म्हणजे 'क्रांती'. तलवारीच्या बळावर मोठया झालेल्या अलेक्झांडरसमोर जागृत आत्मशक्तीचा एक संन्यासी निःशंकपणे उभा राहिला. अलेक्झांडरने तलवार उपसली तर तो हसला. अलेक्झांडरने त्याला मारलेही असते. म्हणून का तो अलेक्झांडरचा विजय होता? मरायचं तर आहेच. परंतु माणुसकीच्या ध्येयासाठी मरणं ते खरं मरणं. माणसाच्या आत्म्याची प्रतिष्ठा स्थापण्यासाठी मरणं तेच खरं मरणं.''

''अशी क्रांती आज हिंदुस्थानात होत आहे. साम्यवादी बंधूंनी धनाची प्रतिष्ठा, पोपटपंचीची प्रतिष्ठा, बुवाशाहीची प्रतिष्ठा, खोटा जात्याभिमान व कुलाभिमानाची प्रतिष्ठा दूर केली. परंतु सोटोबाची प्रतिष्ठा त्यांनी अद्याप निरुपाय म्हणून राखली आहे. महात्माजींनी सोटोबाजीचीही खोटी प्रतिष्ठा दूर करून तेथे आत्म्याची निष्पाप शक्ती उभी केली आहे. माणसानं लाठीनं मोठं होण्याऐवजी निर्भय व निर्मळ आत्मशक्तीनं मोठं व्हावं असं ते जगासं कृतीनं सांगत आहेत. भारतात सर्वांगपूर्ण क्रांती होत आहे.''

मुलांना एखादा प्रश्न यावा व त्याच्यावरच तास संपून जावा असे कितीदा तरी होई. मुकुंदरावांच्या घरी विद्यार्थी जायचे. त्यांना प्रश्न विचारून ज्ञान मिळवायचे. गाईला ढुशी मारणार्‍या वासराला अधिकच पान्हा मिळतो, त्याप्रमाणे अशा मुलांना अधिकच ज्ञानरस मिळे. शाळेत एक प्रकारचे चैतन्य दिसू लागले. मुलांमध्ये नवीन जीवनाच्या चर्चा होऊ लागल्या. बुध्दीला चालना मिळाली.

मुकुंदराव दयारामच्या आश्रमात जात. रविवार आला ते सोनखेडीत जायचे. बरोबर मुले असायची. तेथे बरीच खादी शिल्लक पडलेली होती, ती पाहून मुकुंदरावांना वाईट वाटे. परंतु ते एकटे काय करणार? वर्गात मुलांना नेहमी खादी घेण्यास ते सांगत असत.

त्या दिवशी ललितमोहन नवे विलायती धोतर नेसून आला होता. मुकुंदरावांनी ते पाहिले. त्यांना ती गोष्ट सहन झाली नाही. ते म्हणाले,

''ललितमोहन, मी इतकं सांगतो तरी तू आज नवीन विलायती धोतर घेतलंसच. तू स्वतःची बुध्दी वीक असं नाही म्हणत. तू माझा गुलाम नको होऊ. परंतु, त्या सोनखेडीला जाऊन बघशील तर तुझा भ्रम नष्ट होईल. तेथे बायामाणसं सूत घेऊन येतात; आणा-दोन आणे मिळतात, त्या वेळेस त्यांना केवढा आधार वाटतो ! या देशात चार कोट लोक बेकार आहेत. कोणता देणार त्यांना धंदा? उद्या, स्वराज्यात तरी कोणता देणार? इंग्लंडचा माल खपायला सारी दुनिया आहे, तरी तेथे लाखो बेकार आहेत. आपणास स्वराज्यातही खादीशिवाय तरणोपाय नाही. बेकारीवर उपाय नाही. स्वराज्य दूर राहो. वाटलं तर त्या वेळेस गिरण्या काढा. परंतु आज या उपाशी बंधूंना जगवलं पाहिजे. त्यांना घास दिला पाहिजे. ललितमोहन, नको करू असं पाप पुन्हा.''

 

3. मुकुंदराव

रामदास इंग्रजी सातवीत होता. शांता सहावीत होती. दोघे पूर्वीप्रमाणेच साधेपणे राहत. रामदास अंगावर खादी घाली. शांताही खादी वापरी. त्यांनी आपापल्या वर्गात खादीचे वेड वाढविले. शांता मोठी धीट होती. मुलांना ती प्रश्न करून भंडावून सोडायची.

''मला एवढी साडी जड होत नाही. तुम्हाला पायजमे का जड व्हावेत? खादी न घ्याल तर दयारामाचा आश्रम कसा चालेल? गरिबांना घास कसा मिळेल?'' ती विचारी.

परंतु एक नवीन घटना झाली. त्या शाळेतून दरवर्षी काही जुने शिक्षक जात आणि काही नवीन येत. यंदाही एक नवीन शिक्षक आले होते. तेजस्वी होती ती मूर्ती. कर्तव्यकठोर असूनही कारुण्यमयी होती. त्या मूर्तीने मुलांना वेड लावले. त्यांचा तास केव्हा येतो, मुले वाट बघत. ते गौरवर्णाचे होते. त्यांना गौरवर्णावर पुन्हा शुभ्र खादी. आधीच सोन्याचे, त्यात जडावाचे. वयाने जरा ते पोक्त दिसत.

वर्गात शेकडो प्रश्नांची ते चर्चा करीत. आजकालच्या सर्व प्रश्नांची मुलांना परिचय करून देणे म्हणजेच शिक्षण, असे ते म्हणत. मुलेही त्यांना निःशंकपणे शंका विचारीत.

एके दिवशी शांतेने प्रश्न केला, ''अहिंसेनं का क्रांती होईल?''

ते म्हणाले, ''क्रांतीचा व हिंसा-अहिंसेचा काय संबंध? क्रांती म्हणजे काय? क्रांती म्हणजे बदल. परंतु नुसता बदल नव्हे. परके राज्य जाऊन तेथे आपले राज्य झालं, एवढयानं क्रांती होत नाही. क्रांती म्हणजे मूल्यपरिवर्तन. आजकाल जगात भलत्याच गोष्टींना महत्त्व चढलं आहे. वास्तविक ज्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे, त्यांना कोणीच देत नाही. मुख्य महत्त्व माणुसकीलाच आहे. परंतु आज माणुसकीला समाजात मूल्य नाही. आपण आज बांडगुळाची पूजा करीत आहोत. ज्यांच्या श्रमांवर सारी दुनिया जगते, तो आज मरत आहे. त्याला ना मान, ना स्थान. व्यापार्‍याला मान आहे. सावकाराला मान आहे. कारखानदाराला मान आहे, परंतु त्याच्या हाती द्रव्य देणार्‍या किसानास-कामगारास-मान नाही. घरात रात्रंदिवस काबाडकष्ट करणार्‍या स्त्रीला मान नाही. कोणत्याही सभेत, कोणत्याही दिवाणखान्यात शेणगोळे लोडाशी बसतात आणि श्रमाने धनधान्य निर्माण करणारे दूर बसतात. हे बदललं पाहिजे. श्रम न करणार्‍याला तुच्छ मानलं पाहिजे. श्रम करणार्‍याला उच्च मानलं पाहिजे. याला मूल्यपरिवर्तन म्हणतात. अन्यायाला सिंहासनावरून ओढून तेथे न्यायाची प्रतिष्ठापना करणं म्हणजे, 'क्रांती.'

''प्रतिष्ठा पैशाची नाही, पोपटपंचीची नाही, धोक्या विद्येची नाही. प्रतिष्ठा कुळाची नको, प्रतिष्ठा बाह्य बळाची नको. मी म्हणे चंद्रवंशातला, सूर्यवंशातला. मी म्हणे आर्य. मी म्हणे कपिंगोत्रोत्पन्न. बाकीचे का मातीतून जन्मले आणि तू सोन्याचा जन्मलास? तुझी स्वतःची काय किंमत ते सांग. कोणाचा कोण, ते नको सांगू. तुझ्या नसांतून कोणाचंही रक्त वाहात असलं तरी त्याचा रंग लालच असणार. तुझ्या रक्ताचा रंग तुझ्या कृतीतून प्रकट होऊ दे. तुझी किंमत तुझ्या कृतीवरून ठरू दे. याला म्हणतात, 'क्रांती'.

   

''भाऊसाहेबांचे प्राण पेटवलेस. पाप्या, आता शांत करायला चल.'' कोणी काकुळतीने बोलला.

''चला, माझ्या खांद्यावर खादी आहेच. खादीचे रामनाम मजजवळ आहे. त्या बंगल्यातील ज्वाळा मला लागणार नाहीत. '' तो म्हणाला.

त्या दिवाणखान्यात दयाराम आला.

''भाऊ, हा बघ कोण आला आहे?'' शांतीने सांगितले. रामदासाने डोळे उघडले. तो एकदम उठला व त्याने दयारामला मिठी मारली. परंतु पुन्हा एकदम तो दूर झाला.

''दयाराम, फाड हे माझे कपडे व तुझ्या खांद्यावरील लाखो जीवांना शांती देणारी खादी माझ्या खांद्यावर घाल. मी जळत आहे.'' रामदास रडत म्हणाला. दयारामने त्याला खादीचे धोतर दिले, खादीचा सदरा दिला. रामदासाने खादी परिधान केली. तो शांत झाला. त्याचा काळवंडलेला मुखचंद्र हसला. ढग गेले. आग गेली. आनंद आला. प्रभू रामचंद्रांनी नुसते वानरांकडे पाहिले आणि वानरांच्या वेदना बंद झाल्या. बाणांचे व्रण भरून आले. त्याप्रमाणे खादीचा स्पर्श होताच रामदास पुलकित झाला. त्याच्या अंगावर जणू मूठभर मांस आले. तोंडावरची प्रेतकळा जाऊन गोड तेजकळा तेथे फुलली.

''तुम्ही सर्व येऊन जा. आम्हाला बसू दे.'' रामदास म्हणाला.

''भाऊ, मीसुध्दा जाऊ?'' शांतीने विचारले.

''तू थांब.'' रामदासाने सांगितले.

सारी मंडळी जीव खाली पडून गेली. पुन्हा उरलेले पाहुणे पलीकडे फोनो वाजवू लागले. पुन्हा कपबश्यांचे आवाज खुळखुळू लागले. लहान पाखरांना उंच हवेत फार वेळ उडवत नाही. तेथे पंख स्थिर ठेवून राहता येत नाही. लहान जीवांचे तसेच असते. सामान्य माणसे क्षणभर उंच वातावरणात जातात. जेथे वासनाविकारांची विरलता आहे, अशी स्वच्छ हवा, निर्लोभ, निर्मत्सर हवा त्यांना फार वेळ सहन होत नाही तेथे ते गुदमरू लागतात. ते झपाटयाने पुन्हा खाली येऊन नाचू-बागडू लागतात. चिखलात बुडया मारू लागतात.

परंतु दयाराम, रामदास व शांता ! ती तीन माणके होती. भारतमातेचे ते तीन भावी आधार होते.

''दयाराम, नेमका आज तू कसा आलास?'' रामदासने विचारले.

''अर्जुनासाठी गोपाळकृष्णाने गीता सांगितली, भाऊसाठी गीत म्हटले दयारामने.'' शांता म्हणाली.

''रामदास, तू संपत्तीचा मालक होत आहेस. परंतु ही संपत्ती दरिद्री नारायणाची, ही गोष्ट विसरू नकोस.'' दयाराम म्हणाला.

''नाही, विसरणार नाही.''रामदासने सांगितले.

''दयाराम, तुला खायला आणू?'' शांतीने विचारले.

''आण, मला भूक लागली आहे. '' दयाराम म्हणाला. त्याने फराळ केला. त्या भावंडांचा निरोप घेऊन तो निघून गेला.

''शांते, आपण दोघांनी गरिबांची सेवा करायचं ठरवू. माझं आज दत्तकविधान झालं. बाबांनी मला आज देऊन टाकलं, कोणाला दिलं? गोविंदरावांना? या इस्टेटीला? नाही. आज माझे देशदेवाला त्यांनी दान दिलं आणि शांते तुझंही दान होऊ दे. गरिबांचे संसार सुखी व सुंदर करण्यासाठी आपण आपली जीवने अर्पायची. ठरलं ना?'' रामदासाने विचारले.
''ठरलं, परंतु आपण कचरलो तर, घसरलो तर?'' तिने विचारले.

''सद्हेतूला परमेश्वर मरू देत नाही.'' रामदास डोळे मिटून म्हणाला.


 

''रामदास, काय होतंय बाळ?'' गोविंदरावांनी विचारले.

''माझ्या सार्‍या अंगाची आग-आग होत आहे.'' तो रडत म्हणाला.

''डॉक्टर, काय असेल हो?'' रामरावांनी विचारले.

''मी वांतीचं औषध देतो. पोटात काही गेलं असेल तर कळून येईल.'' डॉक्टर धीर देत म्हणाले.

रामदासची आई त्याच्याजवळ बसली. बाकी मंडळी जरा दूर गेली. कोणी म्हणू लागले, 'दृष्ट पडली.' कोणी म्हणाले, 'जागरण झाले असेल.' नाना तर्क चालले होते. परंतु एकाने सांगितले की, 'खाली कोणी गाणे म्हणत होता. ते ऐकून भाऊसाहेब खिन्न झाले व आत येऊन रडू लागले.'

''हाकलून लावा त्या भिकार्‍याला. या रस्त्यावर येऊ देऊ नका. गांधींच्या लोकांना काही काळवेळही नाही. समारंभाच्या वेळीही सुतक्यासारखे येतात व रडकी गाणी गाऊन लोकांना रडवतात.'' एक देशी साहेब म्हणाला.

त्या गाणे म्हणणार्‍या मुलास हाकलून लावण्यासाठी भुतावळ धावली. परंतु दरवाजात शांता होती.

''नका रे त्याला हाकलू. कसं गोड म्हणतो आहे गाणं !'' ती म्हणाली.

''तुला गाणं गोड लागतं आहे. पण तिकडे भावाचा जातो आहे प्राण.'' एकजण गरजला.

''भाऊचा हा मित्र आहे. हा भिकारी नाही. हा त्या सोनखेडीच्या आश्रमातील दयाराम. भाऊजवळच त्याला न्याल तर भाऊला बरं वाटेल. भावाचे जाणारे प्राण परत येतील.'' शांता शांतपणे म्हणाली.

परंतु त्या पोरीचे कोण ऐकतो? दयाराम निघून गेला. शांता वर गेली. भावाच्याभोवती गर्दी होती. डॉक्टरांचे औषध आले. भाऊने ते फेकून दिले. सारे लोक सचिंत झाले. पाहुणेमंडळी हळूहळू जाऊ लागली. कारण गाणेबजावणे आता बंद करावे लागले. फोनोच्या प्लेटी बंद झाल्या.

''रामदास, काय होतंय तुला ते सांग.'' गोविंदराव म्हणाले.

''आग नाही का की होत?'' नव्या आईने विचारले.

''किती काळवंडला चेहरा ! दृष्ट पडली.'' सख्खी आई म्हणाली.

''आई, त्या गाणं म्हणणार्‍याला येथे आणाल तरच भाऊच्या अंगाची आग थांबेल.''शांताने सुचविले.

''त्यामुळे तर आग पेटली.'' लोक म्हणाले.

''तोच विझवील.'' शांता म्हणाली.

''बोलवा त्या भिकार्‍याला.'' गोविंदरावांनी सांगितले.

पूर्वी जे नोकर-चोकर त्याला हाकलण्यासाठी धावले होते, तेच आता त्याला शोधून आणण्यासाठी धावले.

''मी कशाला येऊ?'' दयाराम म्हणाला.

''अरे, चल बाबा.'' नोकर म्हणाले.

''त्या बंगल्यात माझ्याही अंगाची आग होईल. श्रीमंतांचे बंगले म्हणजे हजारो दरिद्री नारायणांच्या जळणार्‍या चिता. ते भिंतीवर तांबडे, निळष, हिरवे रंग म्हणजे त्या ज्वाला. कशाला मी येऊ? ''दयाराम पुन्हा म्हणाला.

   

पुढे जाण्यासाठी .......