गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

क्रांती

मायेच्या दृष्टीतून अंगार वर्षत होता. सती पार्वतीसारखी जणू कोपायमान झाली होती. तिच्याही भावना भकडल्या. तिचाही ज्वालामुखी जागृत झाला व गर्जू लागला-

''माकड, माकड कोणाला रे म्हणतोस माकड? ते का माकड आहेत? त्यांचा आत्मा महान आहे. सारा भारतवर्ष त्यांना आपला वाटतो. सर्व प्रांतातील गुण घ्यावेत असं त्यांना वाटतं. ते तुमच्या वंगभूमीत, तुमच्या संस्थांतून राहिले. तुमच्या गुणांचे कौतकु करते झाले. महापूर आला तर स्वयंसेवक झाले. पूजादिवसांत वंगीय स्वयंसेवकसंघ घरी गेले, पण हे काम करीत राहिले. अरे, ही दगडधोंडयाची भूमी म्हणून हिणवू नकोस. दगडांतून देवमूर्ती निघतात. अरे, तेथील मजुरांनी अंगातील कपडे महापुराच्या वेळेला बंगालमध्ये पाठवले. त्या मजुरांच्या पायांची धूळ लाव. पवित्र हो. महाराष्ट्र ही त्यागभूमी आहे, पवित्र भूमी आहे. तेथील अणुरेणू मला पवित्र वाटतो. रामरायाचे पाय या भूमीला लागले. महाराष्ट्रात का महान विभूती झाल्या नाहीत? ते शांतीचे व ज्ञानाचे सिंह न्यायमूर्ती रानडे, ते स्वाभिमानाची ज्योत पेटवणारे विष्णुशास्त्री, ते सरकारशी व दृष्ट रूढींशी झगडणारे धैर्यमूर्ती आगरकर, स्वराज्याचा मंत्र देणारे भारतभूषण अमर लोकमान्य, महात्माजींचे राजकीय गुरू थोर गोपाळ कृष्ण गोखले ! किती थोर विभूती सांगू? इकडे हुतात्मे झाले नाहीत? फाशी कोणी गेले नाहीत? हातात गीता घेऊन फाशी जाणारे चाफेर का इकडे थोडे झाले ! मोटारखाली चिरडून घेणारे बाबू गेनू नाही का झाले? इकडे काय नाही? केवढा ल्या शिक्षणसंस्था, इतर संस्था ! स्त्री-शिक्षणाला वाहून घेणारे, तीन मुली घेऊन १९०० मध्ये एका झोपडीत आश्रम काढणारे व आज हिंदुस्थानात अद्वितीय असे महिला विद्यापीठ स्थापणारे ते ऋषितुल्य महर्षी अण्णासाहेब कर्वे आणि ते सूर्यासारखे तेजस्वी इतिहासाचार्य राजवाडे, एक ओळही इंग्रजी लिहिणार नाही अशी त्यांची प्रतिज्ञा, ज्योतिषशास्त्राचा हजार पानांचा इतिहास लिहिणारे शंकर बाळकृष्ण दीक्षित; त्यांना न्यायमूर्ती रानडे सांगत होते, ''इंग्रजीत लिहा हा इतिहास. विश्वविख्यात व्हाल.' परंतु ते म्हणाले, 'जगाला ज्ञान हवं असेल तर माझी भाषा जग शिकेल.' केवढा स्वभाषेचा अभिमान ! स्वभाषेचा अभिमान असूनही महाराष्ट्रीय बंधूंनी इतर भाषांकडे तुच्छतेने न पाहता आदरानं सारं घेतलं. त्यांनी तुमचे ग्रंथकार मराठीत आणले, तुम्ही काय करीत आहात? मराठीतील ज्ञानकोशाचे ते प्रस्तावनाखंड; ते शब्दकोश, चरित्रकोश, व्यायामकोश. मराठीतील त्या 'उषःकाल' 'मी'ल 'पण लक्षात कोण घेतो?' 'रागिणी', 'अजिंक्यतारा', 'विंध्याचल', 'दौलत', 'दोन ध्रुव या सुंदर कादंबर्‍या ! आणलं आहे त्यातील काही बंगालीत? मराठीतले खाडिलकर, कोल्हटकर, केळकर, गडकरी, अत्रे हे महान नाटककार, त्यांची चव दिलीत का बंगालला? तुम्ही आपल्या अहंकारात राहा. महाराष्ट्र निरंहकार आहे. तो स्वतःची दवंडी पिटीत नाही व दुसर्‍याचं गुणग्राहकतेनं घेतो. महाराष्ट्रात ध्येयनिष्ठा आहे. अपार त्याग आहे. कोणाची मदत नाही, पै-पैसा मिळत नाही, तरीही ध्येयाला मिठी मारून ठायी-ठायी कामं करीत राहणारे शेकडो महाराष्ट्रीय तरुण आहेत. स्वाभिमान सोडते तर त्यांना पैसे मिळते. परंतु आत्मा न विकता उपाशी, तापाशी, व अनवाणी हे हिंडतात, फिरतात, कामं करतात. प्रद्योत, कोणाला कसला अभिमान नको. परमेश्वर सर्वत्र आपले तेज ठेवीत असतो. वंगभूमीही मोठी, महाराष्ट्रही मोठा. गुजरातही थोर, मद्रासही पूज्य. महाराष्ट्रीय हृदय मी बंगालला देईन; महाराष्ट्रीय आत्म्याची ओळख करून देईन. मराठीतील सुंदर स्त्रीगीतं, ओव्या, कहाण्या बंगालीत उतरीन, ही का वंगभूमीची सेवा नव्हे? ही व्यापक सेवा आहे. मातांची माता जी भारतमाता, तिची ही सेवा आहे. भारतमातेच्या सर्व लेकरांची परस्परांत, ओळख करून देणं ही खरी मातृसेवा. हिंदमातेचा माझ्या शिरावर वरदहस्त आहे. तिचा या मुलीला मंगल आशीर्वाद आहे. प्रद्योत, अहंकार सोड, भ्रम सोड. पवित्र हो. वंगभूमीची खरी सेवा करायची असेल तर निर्मळ व निर्मम हो. तोच खरा मातृभक्त की जो इतर मातांचीही पूजा करतो. वंगमातेचा खरा उपासक महाराष्ट्रमातेचाही पूजक होईल. प्रद्योत, मी वंगभूमीची सेवा करीत आहे. तू मात्र तिला कलंक लावीत आहेस. एका भगिनीची विटंबना मांडून तू का मातृसेवा करीत आहेस?''

''एका भगिनीची अब्रू तू धुळीत मिळवू पाहात आहेस, हा मात्र वंगीय तरुणतरुणींचा अपमान आहे, परस्त्रीला वाटेल ते बोलणं हा खरा त्यांचा अपमान आहे. त्यांना कळलं तर तुझे तुकडे करतील. बंगाली तरुणी तुला फाडून खातील. प्रद्योत, किती अमंगळ बोललास ! आणि माझ्या सौभाग्यावर घाला घालून काय मिळविलंस? माझ्या डोळयांतून अखंड अश्रुधारा चालाव्यात यातच का तुझा आनंद? कशाला श्रीरामकृष्ण, अरविंद, विवेकानंद, रवींद्र यांची पवित्र नावं उच्चारतोस?''

''प्रद्योत, प्रद्योत, तुझे शब्द मी सहन केले. कारण लहानपणापासून मी तुला भाऊ मानला आहे. तुला माहीत नाही, परंतु मला तुझी आठवण येऊन नेहमी रडू येत असतं. मला तुझ्यावर फार रागावता येत नाही. तू माझा भाऊ का नाही होत? मला भाऊ नाही. प्रद्योत, मला भाऊ नाही. हो, माझा भाऊ हो; माझी इच्छा पूर्ण कर. महाराष्ट्रात भाऊबीजेचा केवढा सोहळा असतो म्हणतात. तू माझा भाऊ होऊन येत जा.''

''तू त्यांना तुरुंगात घातलं आहेस. तू माझा भाऊ हो. मी ते सारं विसरेन. भ्रातृप्रेमात सारं पाप धुऊन निघेल. त्यांच्या दवाखान्यात मी सेविका होईन व ते सुटून येईपर्यंत त्यांच स्मरण करीत अब्रूनं राहीन. माझ्या पोटात बाळ वाढत आहे. त्याच्याकडे बघून दिवस काढीन. एक दिवस ते येतील. कदाचित लवकरच येतील. प्रद्योत, नाही तुला दया येत? नाही तुला बहिणीची करुणा येत? तुला बहीण नाही, मला भाऊ नाही, आपण बहिण-भाऊ होऊ. ये प्रद्योत, ये माझ्याजवळ व मला 'ताई' म्हणून हाक मार. 'माझी बहीण माया' असं म्हणं.' ते पाहा, ते पाहा तुझे डोळे निराश झाले. तमोगुण जाऊन तो सत्त्वगुण तेथे झळकू लागला. ते पाहा ओले ओले तुझे डोळे. नको पुसू. गळू देत धारा, विकारांची घाण धुऊन निघेल. दृष्टी पवित्र बंधुप्रेमानं भरून येईल. प्रद्योत, या आरामखुर्चीत पड व भरपूर रड. प्रद्योतचा पुनर्जन्म होईल. जीवनात क्रांती होईल. भर्ता होऊ पाहणारा भ्राता होईल. पहिला प्रद्योत मरो, नवीन जन्माला येवो.''

 

धनगावच्या त्या टेकडीवर एक तरुण सायंकाळ संपून रात्र येऊ लागली तरी बसला होता. एकदम बंगाली गाणे तो गाऊ लागला, ''येतो, तुला मी भेटायला येतो. कोण तुला माझ्या जवळून हिरावून नेईल बघतो.'' अशा अर्थाचे ते गाणे होते. गाण्याच्या भरात आपल्याजवळ कोणी दुसरे येऊन उभे आहे याचे त्याला भानच नव्हते. गाणे संपल्यावर त्याने जवळ कोणी आहे असे पाहिले.

''घाबरू नका; मी बंगालमधलाच आहे. किती तरी दिवसांनी बंगाली गाणी ऐकायला मिळालं. इकडे कोठे आलात तुम्ही?'' त्या गृहस्थाने त्या तरुणास विचारले.

''मी एक स्वैरसंचार करणारा मुसाफिर आहे. माझ्या एका मित्राला येथे अटक झाली आहे. तो मित्र महाराष्ट्रीयन आहे. त्याची पत्नी बंगालमधील आहे. तिला धीर देण्यासाठी मी आलो आहे.'' तो तरुण म्हणाला.

''चांगलं केलंत.''

''मी आता जातो. ती एकटी खोलीत रडत बसली असेल.'' असे म्हणून तो तरुण उठला व टेकडीवरून पळतच खाली उतरला.

माया खोलीत एकटी होती. आनंदमूर्ती नुकतेच येऊन गेले होते. मुकुंदराव कामगारांच्या सभेला गेले होते. शांतेची मुलगी क्रांती जरा आजारी होती. नाही तर ती आली असती. आरामखुर्चीत माया डोळे मिटून पडली होती. कोणी तरी हळूच दार उघडून आत आले. ती व्यक्ती मायेच्या आरामखुर्चीच्या पाठीमागे उभी राहिली. माया निजली आहे की काय हे त्याने वाकून पाहिले. त्याचा कढत श्वासोच्छ्वास मायेला लागून ती एकदम दचकून डोळे उघडून पाहू लागली. तो कोण तेथे उभा?

''प्रद्योत, चोरासारखा येऊन काय करणार होतास?''

''मी चोर नाही. चोर हा महाराष्ट्रीय भामटा. माझं चोरलेलं रत्न. मी पुन्हा पकडणार होतो. माये, तू माझी आहेस. हे तुझे ओठ माझे आहेत. हा माझा अमृताचा पेला त्यानं पळविला.'' प्रद्योत पुढे सरकणार होता.

''खबरदार जवळ येशील तर ! प्रद्योत, लाज नाही वाटत परांगनेला स्पर्श करायला?'' ती क्रोधाने थरथरत म्हणाली.

''तू परांगना नाहीस. तू माझी आहेस. लहानपणापासून मी माझा शिक्का तुझ्यावर मारला आहे. तू रागानं पाहिलंस म्हणून मी जळणार नाही. पाषाणी, माझ्या सर्व आशांचं भस्म करावयास तुला काही वाटलं नाही? आणखी रागानं पाहा. प्रद्योत भाजला जाणार नाही. पाहा, या प्रद्योतकडे नीट पाहा. या प्रद्योतच्या जीवनाचं कसं मातेरं केलंस ते पाहा. माझे डोळे खोल गेले. माझे गाल बसले. मी भुतासारखा झालो. चांडाळणी, तुझं हे काम. तू माझं जीवन आज निस्सार केलं आहेस. प्रद्योत एक वेळ फेक बाजूला. दुसरे तरुण का बंगालमध्ये नव्हते? बंगाल का सारा ओस? बंगाल का निर्वीर्य झाला आहे? दगडधोंडयाच्या देशातील एका महाराष्ट्रीय माकडाला माळ घातलीस. लाज नाही वाटत तुला? वंगभूमीचा तू अपमान केला आहेस. वंगीय तरुण-तरुणींचाही तू अपमान केला आहेस. एक बंगालकन्या महाराष्ट्रीय माकडाल मिठया मारीत आहे हे आम्हाला बघवत नाही. प्राणांवर उदार होणारे बंगाली तरुण त्या तरुणांतील मी एक आहे. तुला महाराष्ट्रीय भुताशी विलासचेष्टा मी करू देणार नाही. तू पाप केलंस स्वजनद्रोहाचं पाप केलंस. तुझ्या हातून हे पाप पुढं होऊ नये म्हणून मी डाव रचला. त्याला अडकवलं. आता ते माकड पडेल बंदिशाळेत. माया, परत बंगालमध्ये चल; तू माझी हो. सुंदर सुंदर बंगाल, पावन पुण्यमय पराक्रमी बंगाल! रामकृष्ण-विवेकानंदांचा बंगाल; बंकीम व रवींद्र यांचा बंगाल; चल त्या विश्वभूषण वंगभूमीकडे परत चल. या प्रद्योतला शांत कर. मला मातृभूमीची सेवा करायला शिकव. या महाराष्ट्रात काय आहे? माती नि दगड. ना काव्य ना शास्त्र; ना कला ना सौंदर्य, ना पराक्रम ना त्याग; ना स्वाभिमान ना ज्ञान. वंगभूमीतील माणिकमोती सोडून मातीला मानलेस. वेडी, चल हे पाप पुरे. हा प्रद्योत तुला अतःपर हे पाप करू देणार नाही.'' प्रद्योत थांबला.

 

तिघे मित्र जेवायला बसले. प्रद्योत मायेचे लग्न झाल्यापासून कसा बेपत्ता झाला आहे, 'तुला मी मरेपर्यंत त्रास देईन' वगैरे मायेला कसे म्हणे- सार्‍या गोष्टी जेवताना दोघा मित्रांनी आनंदमोहनास सांगितल्या.

''वाचवावं पोरीच्या नवर्‍याला वाचवता आलं तर.'' पत्नी म्हणाली.

''तू नको सांगायला. तुझी बुध्दी चुलीजवळ ठेव. बाहेरून आलो तर हॅट ठेवावी, हातातील काठी ठेवून द्यावी, ही कामं तू आपली करत जा. पुरुषांना अक्कल शिकवू नये विचारल्याशिवाय.'' साहेब रागाने बोलले.

तिघे मित्र बाहेर आले. साहेब धूर सोडीत बसले. मित्रद्वयाने पान घेतले.

''हे पाहा, मी त्या धनगावला जातो.  तुम्हाला मी तार करीन. नाही तर पत्र लिहीन. मी बोलावलं म्हणजे तुम्ही यायचं. घाबरू नका. मजेदार दिसते केस.'' आनंदमोहन म्हणाले.

''माझा जावईही वाचवा व यांचा प्रद्योतही वाचवा.'' रमेशबाबू म्हणाले.

''बरं, बरं. बघतो मी सारं. तुम्ही येथेच झोपता का?'' त्यांनी विचारले.

''आम्ही आता जातो. आम्हाला गाडी आहे. घरीही काळजीत आहेत सारी.'' रमेशबाबू म्हणाले.

''तेही खरंच. मग तुमची निघण्याची वेळ झाली. चिंता नका करू. तुमच्या प्रद्योतला माझी बहीण देऊन टाकू. ती आज येथे नाही. या मित्राची मुलगी नाही तर या मित्राची बहीण. माझी सर्वांत धाकटी बहीण मोठी सुरेख आहे बरं, ते पुढे पाहू.''

दोघे मित्र गेले. साहेब थोडे पोचवायला जाऊन परत आले. बराच वेळ ते तो पत्रव्यवहार न्याहाळीत होते. शेवटी ते उठले. ''मला आताच्या आता जायचं आहे, समजलीस का? माझी तयारी करून दे. ऐकलंस का गं? निजली की काय? हिला सतरांदा बजावलं आहे की, मी निजल्याशिवाय निजत जाऊ नको म्हणून.'' असे ते रागाने मोठयाने बोलू लागले. पत्नी डोळे चोळीत जरा घाबरत बाहेर आली.

''निजली होतीस ना? तडाखे हवेत तुला त्या दिवसासारखे? तयारी कर माझी. मोठी गमतीची केस आहे. मी आताच निघतो. बघतेस काय अशी? छडीहवी आहे वाटतं? जांभया देत आहे; आळशी कुठली,'' ते बडबडत होते.

पत्नीने सारी तयारी करून दिली. आनंदमोहन निघाले.

''परत कधी येणार?'' तिने भीत भीत विचारले.

''आमचा नेम नसतो कशाचा म्हणून शंभरदा सांगितलं आहे. अगदी मठ्ठ आहेस. नुसती मठ्ठ. फटके हवेत.'' ते म्हणाले.

बिचारी पत्नी, ती काही बोलली नाही. होता होईतो ती कधी विचारीत नसे. उणाअधिक शब्द बोलत नसे. परंतु एखादे वेळेस चुकून तोंड उघडले जाई व शिव्या खाव्या लागत.

आनंदमोहन निघून गेले.

   

''भयंकर आरोप आहेत. ब्रिटिश राज्य उलथून टाकण्याचा कट; बाँब, पिस्तुलं जमविण्याचा कट. मी तरी काय करू? एखाद्या मुलीचं सौभाग्य वाचवण्याचं पुण्य लाभत असेल तर ते का मी गमावीन?'' साहेब म्हणाले.

''परंतु तो तरुण तसा नव्हता.'' रमेशबाबू म्हणाले.

''काय नेम सांगावा?'' साहेब उत्तरले.

''तो खादीचा भक्त आहे. चरख्यावर सूत काततो. त्याच्या घराशेजारीच सुंदर आश्रम आहे. त्या आश्रमाला त्याचीच मदत असते. असा तरुण हिंसेकडे कसा वळेल?'' रमेशबाबूंनी विचारले.

''अहो, शंका येऊ नये म्हणून हे खादीचं सोंग करावयाचं. हे पाहा, भरपूर पुरावा आहे माझ्याजवळ. बंगालमधील दहशतवाद्यांकडून त्यांना गेलेली पत्रं माझ्याजवळ आहेत. तुम्हाला दाखविली तर तुम्हीसुध्दा निःशंक व्हाल.'' अधिकारी म्हणाले.

''परंतु त्याचे उत्तर इकडे कोणाला आलेलं आहे का? पत्रं इंग्रजीत आहेत की बंगालीत?'' अक्षयबाबूंनी शंका काढली.

''अक्षयबाबू, तुम्ही माझे लहानपणीचे मित्र. सारं तुमच्यासमोर मांडतो.'' असे म्हणून आनंदमोहनांनी पुराव्याची ती पत्रे त्यांच्यासमोर ठेवली.

''माझ्याकडेच आहे हे काम. मलाच सर्व पुरावा पुरवायचा आहे. अद्याप पूर्ण तपास झाला नाही.'' ते म्हणाले.

दोघे मित्र ती पत्रं पाहू लागले. बंगालमधून गेलेली, बंगालकडे आलेली पत्रं त्यांनी सूक्ष्म रीतीनं पाहिली. त्यांतील हस्ताक्षर वगैरे पाहिलं. अक्षयकुमार एकदम उठून बाहेर गेले.

''आहेत ना पत्रं !'' आनंदमोहनांनी विचारले.

''परंतु येणार्‍या व जाणार्‍या पत्रांतील हस्ताक्षर एक दिसतं. तुम्ही नीट पाहा. काही तरी गोंधळ आहे.'' रमेशबाबू म्हणाले.

''अक्षयकुमार, कोठे आहात? अक्षयबाबू !'' त्यांनी हाक मारली. अक्षयबाबू आत आले. त्यांचा चेहरा गंभीर होता.

''तुम्हांला काय वाटतं?'' रमेशबाबूंनी विचारले.

''सांगा, मत सांगायला काय झालं? मला मदत होईल.'' साहेब म्हणाले.

''आनंदमोहन, ही सर्व पत्रं माझ्या मुलाची आहेत. प्रद्योतचं हे हस्ताक्षर. बिलकुल शंका नाही. प्रद्योतचं मायेवर प्रेम होतं. त्याचा हा सूड आहे. सारा उलगडा झाला. रामदास निर्दोष आहे. अपराधी माझा मुलगा आहे.'' अक्षयकुमार अतिदुःखाने बोलले.

''बरं, आधी जेवू चला पोटभर. रिकाम्या पोटी बुध्दी नीट चालणार नाही. चला, उठा.'' ते म्हणाले.

 

''आपण कोठले?'' त्यांनी प्रश्न केला.

''पुष्कळ वर्षांनी मी आपणास भेटत आहे. आपण एका शाळेत होतो. वादविवादोत्तेजक सभेत मी बोलत असे. माझं नाव अक्षयकुमार. शाळेत ते एक विक्षिप्त व्यायामशिक्षक होते. आठवतं का?'' अक्षयकुमारांनी विचारले.

''आठवलं, सारे आठवलं. त्या व्यायामशिक्षकांस आपण रस्त्यात नमस्कार करीत नसू म्हणून ते एके दिवशी रागावले; तर सर्व मुलांनी रस्त्यात, या गल्लीतून त्या गल्लीतून पुढे येऊन 'मास्तर नमस्कार, मास्तर नमस्कार' असं सारखं करून त्यांना कसं भंडावलं? मज्जा ! आणि ते बोर्डिंग ! मुलांना तेथे चण्याच्या डाळीचंच रोज वरण मिळायचे. म्हणून ती एक दिवस व्यवस्थापक येताच घोडयासारखी खिंकाळू कशी लागली व काय प्रकार आहे म्हणून त्यानं विचारताच हरभरे खाऊन घोडे झालो असं उत्तर दिलं गेलं. गंमतच गंमत. अक्षयबाबू, किती दिवसांनी आपण भेटत आहोत ! त्या लहानपणच्या जगात जात आहोत ! नाही तर हे रोजचं माझं जिणं, यमदूताचं जिणं.'' ते म्हणाले.

''आनंदमोहन, हे माझे मित्र रमेशबाबू. आम्ही एकाच गावी राहतो. यांना एकच मुलगी व मला एकच मुलगा.'' ते म्हणाले.

''मग दोघंचं लग्न लावलंत की काय?'' ते हसून म्हणाले.

''आमची तशी होती इच्छा.'' रमेशबाबूंनी सांगितले.

''परंतु मुलांनी ऐकलं नाही, होय ना? अलीकडची मुलं फारच व्रात्य. मी माझ्या मुलांना कडक शिस्तीत ठेवलं आहे. हूं की चूं करणार नाहीत. लहानपणापासून जरब असली म्हणजे सारं नीट सुरळीत चालतं.''आनंदमोहन म्हणाले.

''एकुलती एक मुलगी. लाड पुरवीत होतो. शान्तिनिकेतनात ठेवली शिकायला.'' रमेशबाबू सांगू लागले.

''झालं मग. शांतिनिकेतनात पूर्ण स्वातंत्र्य. म्हणे सृष्टीच्या पवित्र सान्निध्यात मुले शिकतात. काही तरी मोठया लोकांची खुळं. पूर्वी का कोणी शिकले नाहीत? नवीन खूळ काढायचं व त्याला अगडबंब 'क्रान्ती' नाव द्यावयाचं, '' आनंदमोहनांचे व्याख्यान सुरू झाले.

''तेथे एक महाराष्ट्रीय तरुण होता. त्याच्यावर तिचं प्रेम बसलं. शेवटी निरुपाय म्हणून त्याच्याशी दिलं लग्न लावून.'' रमेशबाबू दुःखाने म्हणाले.

''तोच हा तरुण की काय? रामदास का त्याचं नाव?'' साहेबांनी विचारले.

''हो त्याला पकडण्यात आलं आहे. म्हणून तुमच्याकडे आलो आहे. काही करा. परंतु मुलीच सौभाग्य वाचवा. म्हातारपणी नाही नाही ते नको पाहायला.'' रमेशबाबू हात जोडून म्हणाले.

आनंदमोहन गंभीर झाले. ते स्तब्ध बसले.

''आरोप तरी काय आहे त्याच्यावर?'' अक्षयबाबूंनी प्रश्न केला.

   

पुढे जाण्यासाठी .......