''माझ्या मनात एक विचार आला आहे. कलकत्त्यास गुप्त पोलिसखात्यात एक बडा अधिकारी आहे. तो आमच्या शाळेत लहानपणी होता. मी बराच पुढे, तो मागे. तरीही आम्ही एकमेकांस ओळखीत असू. त्याला जाऊन भेटावं. बघावं काय होतं ते.''अक्षयबाबू म्हणाले.
''काही हरकत नाही. आजच निघू या.'' रमेशबाबू म्हणाले.
दोघे मित्र कलकत्त्यास आले. त्या बडया अधिकार्याच्या घरचा पत्ता मिळवून सायंकाळी ते त्या घरी गेले. त्यांनी घंटा वाजवली एक नोकर बाहेर आला.
''काय पाहिजे?'' त्याने विचारले.
''आनंदमोहनबाबू घरी आहेत का?''
''नाही ते नऊनंतर येतील. काही निरोप आहे का?''
''ते येईपर्यंत आम्ही येथेच थांबतो. मी त्यांचा जुना स्नेही आहे.'' अक्षयकुमारांनी सांगितले.
''मी आत विचारून येतो.'' असे म्हणून नोकर गेला व पुन्हा परत आला.
''बाईसाहेबांनी दिवाणखान्यात बसायला सांगितलं आहे.'' तो म्हणाला. दोघे मित्र आत येऊन बसले. तेथे मोठे टेबल होते. त्यावर कागदच कागद होते. वर्तमानपत्रे होती. रमेशबाबूंनी एक उचलले. रामदासच्या अटकेची त्यात हकीगत होती. ताबंडया पेन्सिलीच्या खुणा होत्या. इतक्यात बाईसाहेब बाहेर आल्या. आनंदमोहनांनी लग्न बरेच उशिरा केले होते. ''घरी यायला उशीर होईल. मुलं जेवत आहेत. जेवण व्हायचं असेल तर चला.'' त्यांनी सांगितले. अक्षयबाबूंनी जेवण वगैरे नको म्हणून सांगितले. ''तुम्ही यांचे जुने मित्र, कदाचित बरोबर जेवाल.'' असे जरा हसून त्या म्हणाल्या. परंतु हसण्याची त्यांना सवय नव्हती किंवा त्यांचे हसणे मारले गेले असावे.
इतक्यात मुलांचे भांडण आता सुरू झाले व माता ते सोडविण्यासाठी निघून गेली. मुले जेवून बाहेर आली. पाहुण्यांकडे निरखून पाहू लागली. नरेंद्र जरा धीट होता. तो रमेशबाबूंजवळ गेला.
''काय वाचता तुम्ही?'' त्याने विचारले.
''धरपकड वाचतो आहे.'' रमेशबाबू म्हणाले.
''महाराष्ट्रातील कोणी पकडला गेला आहे व त्याचं लग्न बंगाली मुलीजवळ लागलं होतं. का हो, बंगाली मुलगी तिकडे कशी गेली? ती का कट करायला गेली?'' त्याने विचारले.
२४. तू माझा भाऊ हो
मायेला काय करावे समजेना. घरी वडिलांना तार करावी असे तिच्या मनात आले. परंतु उगीच घाबरतील असे पुन्हा मनात येऊन तिने तार केली नाही. सर्व हकीगतीचे पत्र तिने लिहिले. येथे धीर देण्यास मुकुंदराव, मोहन, दयाराम, आनंदमूर्ती किती तरी माणसे आहेत, घाबरू नको; परंतु तिकडे काही चौकशी करा. धागादोरा काही सापडतो का पाहा, वगैरे तिने लिहिले होते.
रामदासचा भयंकर अपराध म्हणून त्याला जामिनावर सोडण्यास सरकार तयार होईना. धनगावच्या लॉकअपमध्ये रामदास होता. माया आता धनगावला राहावयास आली. मुकुंदरावांच्या खोलीशेजारीच तिने दोन खोल्या घेतल्या होत्या. ती रोज पतीला जेवण घेऊन जाई. तिला वाईट वाटे. पती तिला धीर देई. आनंदमूर्तीही मायेची करमणूक करीत तिला हसवीत.
घरी पत्र मिळाल्यावर रमेशबाबू सचिंत झाले. बंगालमध्ये असताना रामदास क्रान्तिकारकांत सामील झाला होता की काय?
परंतु दहशतवादी क्रान्तिकारक आता उरले नव्हते. पूर्वीचे दहशतवादी आता साम्यवादी होऊन किसानकामगारांत कामे करीत होते. परंतु असतील कोणी अद्याप त्या विचाराचे, कोणास ठाऊक. मायेची माता तर रडू लागली.
''कोठली पोरीला दुर्बुध्दी सुचली महाराष्ट्रीय तरुणाशी लग्न करायची; चांगला प्रद्योत होता; गावातील होता; दिवसातून चारदा माहेरी येती-जाती. परंतु दैवी नाही.'' वगैरे विलाप ती करू लागली.
मायेचा विवाह झाल्याचे कळले. त्या दिवसापासून प्रद्योत घरातून निघून गेला. त्याचा पत्ता नव्हता. वृध्द पित्याने किती तरी शोध केला. परंतु मागमूस कळेना. धागादोरा सापडेना. शेवटी ईश्वरी इच्छा म्हणून ते शांत राहिले. त्यांच्या खोलीत प्रद्योतचा मोठा फोटो होता. त्या फोटोवरच त्यांचे समाधान. शरीर म्हणजे तरी काय? मातीचा बोलका फोटो. शरीराचा हा फोटो धुळीत जातो व शेवटी कागदी फोटोच आपल्याजवळ उरतो.
रमेशबाबू अक्षयकुमारांकडे आले. अक्षयकुमार चैतन्यचरित्रामृत वाचीत होते. त्यांनी मित्राचे स्वागत केले. परंतु मित्राचा आज हसरा चेहरा नव्हता. रमेशबाबू म्हणजे जरा रंगेल माणूस. तोंडात सदा पान असायचे. आनंदी दिसायचे. एखादे गाणे गुणगुणत यावयाचे. परंतु आज तोंडात तांबूल नव्हता, ओठावर गाणे नव्हते. चेहर्यावर आनंदाची सहज छटा नव्हती.
''आज असे का बरं दिसता? आणि आता अवेळी का बरं आलात? मायेकडे खुशाल आहे ना? प्रद्योतचा पत्ता नाही. तुमची माया तरी सुखी असू दे.'' अक्षयबाबू म्हणाले.
रमेशबाबूंनी मायेचे पत्र मित्राच्या हाती दिले. मित्राने वाचले. दोघे स्तब्ध व सचिंत बसले.
''काय आता उपाय? मी जाऊ का मायेकडे? तिला धीर दिला पाहिजे. परप्रान्तात एकटी रडत असेल बिचारी.'' रमेशबाबू जवळजवळ रडतच बोलले.
''तुम्ही इतक्यात नका जाऊ. तेथे मयाला धीर देणारी माणसे आहेत. ते मुकुंदराव आहेत आणि माया धीराची मुलगी आहे. रडकी असती तर इतकी लांब जातीच ना.'' अक्षयबाबूंनी सांगितले.
''मग का स्वस्थ राहावयाचं? जे जे होईल ते ते नशिबावर सोपवून बसायचं? तुम्हीच काय ते सांगा. तुम्हीही दुःखी व मीही दुःखी.'' रमेशबाबू म्हणाले.