२२. रामदासला अटक
माया व रामदास यांचा सुखाचा नवसंसार सुरू झाला होता. रामपूर येथील स्वतःच्या वाडयाचा रामदासने सार्वजनिक दवाखाना केला. ती एक सुंदर संस्था झाली. संस्थेसाठी त्याने एक कायम निधी करून दिला. संस्थेमार्फत एक फिरता डॉक्टर ठेवण्यात आला होता. त्याला रविवारची सुट्टी. उरलेले सहा दिवस त्याने खेडयांवरून हिंडावे, मोफत औषधे द्यावीत. शेतकर्यांस मोठाच आधार झाला. दीनबंधू रामदासाला दुवा मिळू लागला. रामदास स्वतः खेडयापाडयांतून हिंडे. शेतकर्यांची सुख-दुःखे पाही. त्यांच्यात तो संघटना करीत होता. गावोगांवची अस्पृश्यता दूर करीत होता. गावातील पक्षोपपक्ष नाहीसे करीत होता. तो एखाद्या गावी जाई. प्रमुख मंडळींना एकत्र जमवी. त्यांच्यातील कुरबुरी ऐकून घेई. त्यांच्याजवळ मोकळेपणाने बोले, चर्चा करी. सूत कातायला सांगे. घरोघरी जाऊन आया-बहिणींशी बोले. शाळेत जाऊन मुलांना एखादी गोष्ट सांगे. कोठे विहीर दुरुस्त करून देई. कोठे गावातील मंडळींत स्वाभिमान व सहकार्य उत्पन्न करून रस्ता दुरुस्त करायला लावी व त्यांच्याबरोबर स्वतः श्रमे, खपे. कधी-कधी त्याच्याबरोबर मायाही येत असे. मायेच्या भोवती मुलं जमत. ती त्यांना एखादे चित्र पटकन काढून देई. एखादे गमतीचे चित्र काढून हसवी. एकदा एके ठिकाणी एक म्हातारी जात्यावर दळीत होती. रामदास चावडीवर पुढार्यांशी बोलत होता. माया गावात हिंडत होती. त्या म्हातारीला तिने दळताना पाहिले. एकटी दळीत होती. जाते जड येत होते. तेथे माया गेली. ''मी लावते तुम्हाला हात. तुम्ही ओव्या म्हणा.'' असे म्हणून खरोखरच दळू लागली. ''नको आई, तू कशाला?'' म्हातारी म्हणाली. ''माझी आई तू; माझी आई लांब आहे हजार मैलांवर. येथील आई तुम्हीच. आईला मदत करू दे.'' माया म्हणाली. म्हातारी ओव्या म्हणू लागली. राम-सीतेच्या ओव्या. मायेला आनंद होत होता. आसपासच्या बायका पाहायला आल्या. इतक्यात रामदास तेथे आला.
''तुला किती शोधायचं? म्हटलं बंगालमध्ये पळालीस की काय?'' रामदास हसून म्हणाला.
''चल बरं रस्ता खणायला !'' त्याने सांगितले.
''चला, दाखवते खणून.'' असे म्हणून माया उठली. म्हातारीही उठली. मायेच्या कपाळावर घाम आला होता. म्हातारीनं तो आपल्या पदरानं पुसला.
''देवमाणसं आहात तुम्ही.'' ती म्हणाली.
''खरी देवमाणसं तुम्ही. तुमची पूजा करून, सेवा करून, आम्हाला थोडं पवित्र होऊ दे.'' माया म्हणाली.
रामदास व माया निघाली. मायेच्या हातून गावचा रस्ता दुरुस्त करण्याचा समारंभ व्हावयाचा होता. गावातील तरुण तेथे जमले होते.
''ही घे कुदळ व मार चार घाव. रामदास म्हणाला.
मायेने पदर बांधला, ओचा खोचला, कुदळ घेऊन ती खणू लागली. कठीण होता रस्ता. तो का खणला जातो?
''पुरे आता. आम्ही करतो काम. टिकमनं खणलं पाहिजे.'' एक तरुण म्हणाला.
''हे काही स्वयंपाकघर नाही; पळीच्या दांडयानं सारवण्याआधी खरपुडया काढतेस तसं नाही येथे, चल आता.'' रामदास म्हणाला. अशा सुंदर रीतीने दोघांचा वेळ जात होता.
कधी माया चित्र काढीत बसे. सुंदर चित्रे बंगाली मासिकाकडे पाठवित असे. मराठीतील 'कला' या मासिकातही तिची दोन चित्रे प्रसिध्द झाली. ग्रामीण जीवनावर ती काही चित्रे तयार करणार होती. रामदास कधी-कधी आश्रमात सायंप्रार्थनेनंतर दिलरुबा वाजवी. स्त्री-पुरुष ऐकायला येत. त्यांना आनंद होई, दुःखाचा थोडा विसर पडे.
''हैद्राबाद सत्याग्रह का अन्याय्य होता?'' दुसर्याने विचारले.
''अरे, आधी कमी गुंतागुंतीच्या संस्थानात प्रयोग करू या. ज्या संस्थानातून आधीच शेकडो सत्याग्रहींनी प्रचार केलेला आहे, जी संस्थाने छोटी एकजिनसी आहेत, जेथे एक भाषा आहे, तेथे चळवळ करू या. त्या चळवळीचा परिणाम दुसर्या बडया संस्थानांवर होतो.''
''केसातील जटा मोडायच्या असल्या तर थोडे-थोडे केस हातात घेऊन खालून हळूहळू फणी मारीत बायका जातात. एकदम वर फणी घालीत नाहीत. तेलगू, तामीळ, कन्नड, उर्दू या पाच भाषांचा आतापर्यंत प्रचार नाही. खेडयापाडयास स्पर्श नाही. म्हणून महात्माजी म्हणाले, ''विधायक काम करा, खादी घ्या व खेडयातून हिंडा. स्वच्छता निर्मा, साक्षरता करा.' अशानं जनतेशी संबंध येतो, त्यातून विचारप्रसार होतो. चैतन्य येऊ लागतं. तुम्हाला हैद्राबाद सत्याग्रह पाहिजे होता, परंतु कोल्हापूर सत्याग्रह सुरू झाला तर तुमच्या निषेधाच्या तारा की, छत्रपतींच्या राज्यात सत्याग्रह नाही होता कामा. याचा अर्थ काय? तुम्ही केवळ अन्यायाच्या विरुध्द नाही. आम्ही अन्याय कोणीही करो, तो दूर करू इच्छितो. महात्माजींनी म्हणे राजकोटला प्राण पणाला लावले ! अरे, त्या महापुरुषाला का आसक्ती आहे? त्यांचं आतडं नाही रे कोठे अडकले? आंध्र प्रांतात दौर्यावर असताना एका चित्रकारानं त्यांना त्यांची स्वहस्ते काढलेली तसबीर दिली. महात्माजी म्हणाले, 'ही कोठे लावू ! माझ्या देहाची खोळही मला आता जड होऊ लागली आहे. ही तसबीर कोठे बाळगू? तुकाराम महाराज म्हणाले होते :
उद्योगाची धाव बैसली आसनी
पडले नारायणी मोटळे हे ॥
त्याप्रमाणे आता हा देह हरिचरणी पडो, दरिद्री नारायणाची सेवा करताना पडो, असं ज्याला वाटतं, त्याला आसक्ती? अरे, ज्यानं हिंदुस्थानची मान वर केली, हिंदुस्थानात माणसं राहतात असं जगाला कळविलं, लाखो बेकारांना काम दिलं, शिक्षणाची नवी दिशा दाखविली, राष्ट्रीय भाषेला चालना दिली, हरिजनांना जवळ घेतलं, स्त्रियांचा आत्मा जागा केला, खेडयापाडयांत चैतन्य ओतलं, अरे, त्याचे केवढे उपकार ! आपल्या कातडयाचे जोडे त्यांच्या पायी लेववू तरी ते ऋण फिटेल का? पूज्य विभूतींच्या पूजा न केल्यानं आपलं श्रेय दुरावतं. गडयांनो, मोठया मनाचे बना, क्षुद्रता जाळा. प्रांतीय भेद गाडा. भारतात कोठेही पुढारीपणा असो, ते आपलंच आहे; सारा भारतवर्ष माझा. किती मी सांगू?''
मुकुंदराव पुन्हा शांत राहिले. पुन्हा त्यांना उमाळा आला व म्हणाले,''भाषेचीही आमची भांडणं. हिंदी संस्कृतप्रचुर हवी की उर्दूदुर्बल हवी? अरे, समोरच्या लोकांना समजेल अशी हवी. सरहद्दप्रांतात गेले तर उर्दू शब्द अधिक वापरा; गंगातटाकी कमी वापरा.''
''बहुजनसमाजाला उर्दूप्रचुर व संस्कृतप्रचुर दोन्ही समजणार नाहीत. देवानं हास्याची व अश्रूंची विश्वव्यापक भाषा निर्माण केली. अश्रू उर्दू नाहीत, संस्कृत नाहीत. हास्य लॅटिन नाही, ग्रीक नाही. आपला देश मोठा चाळीस कोटींचा, दोन चारभाषा शिका. निरनिराळया भाषांतील शब्द शिका. दोन लिप्या असतात की नाही? असू देत. मोठा संसार आहे आपला. अहंकारानं मोठं कुटुंब चालत नाही. आपला एकत्र कुटुंब पध्दतीचा प्रयोग आहे. सारे प्रांत म्हणजे भाऊ, सारे एकत्र राहू. भावाभावांत मिळते घेईल तो मोठा, त्यात कमीपणा आहे. ती शरणागती नाही. इंग्लंडमध्ये शिष्टमंडळे पाठवणे हा मात्र कमीपणा आहे. त्याची लाज वाटली पाहिजे. माझ्या देशात राहिले त्यांच्याशी पुनःपुन्हा बोलणं-चालणं करणं, यात कसला कमीपणा?''
ते दोघे तरुण ऐकत होते. ढेकळाप्रमाणे ते विरघळले. मुकुंदराव पुन्हा म्हणाले, ''तुम्ही कवाईत करा. सरळ उभे राहा. शिस्तीचे महत्त्व पटवा. शरीर बळकट करा. परंतु बुध्दीला एखाद्या संबंध जातीच्या द्वेषाचं खाद्य देऊ नका. तुमच्यातील काही 'तू माणूस आहेस की मुसलमान आहेस?'' असा शब्दप्रयोग करू लागले आहेत. 'माणूस आहेस की जनावर आहेस?' असं म्हणण्याऐवजी हा प्रयोग ! अरे, सारे मुसलमान का जनावरे? केवढा द्वेष ! केवढा अधःपात ! तुम्ही तरुण निर्मळ मनाचे, निर्मळ दिलाचे. हे सारं बरबट फेकून नवभारताचं उज्ज्वल भविष्य डोळयांसमोर ठेवून उभे राहा.''
ते तरुण प्रणाम करून उठले. मुकुंदरावांनी त्यांच्या पाठीवरून हात फिरवला.
जाताना कोणी बोललं नाही. त्यांनी मुकुंदरावांकडे पाहिले. मुकुंदरावांनी त्यांच्याकडे पाहिलं. विचारानं मस्तक विनम्र करून जीवनानं भरलेल्या मेघाप्रमाणे ओथंबून ते गेले. मुकुंदराव बाहेर येऊन अनंत आकाशाखाली उच्च विचार व उदात्त भावनांनी सद्गदित होऊन उभे राहिले होते. आजचा अमर दिवस असे त्यांना वाटले.