मुकुंदराव, रामदास, दयाराम,आनंदमूर्ती, अहमद, नथू, गणपत सारे मोहनच्या झोपडीकडे वळले. मोहनच्या झोपडीत मंद दिवा होता. दार उघडेच होते. अनंत जीवनाचे स्वागत करण्यासाठी ते उघडे होते. सारी मंडळी हळूहळू शांतपणे तेथे आली. मुकुंदराव दारात उभे राहिले. तो आत अनंताच्या घरचे दृश्य. गीता गीताईचा तेजस्वी परंतु गोड मंजुळ पाठ डोळे मिटून म्हणत आहे. तिच्याकडे पाठ करून शांता मोहनच्या कुशीवर मान ठेवून कलंडली आहे. शांतेच्या मांडीवर चिमुकली क्रांती दिव्याकडे बघत हसत आहे, मुठी हलवीत आहे. नाचवीत आहे.
''मोहन'' मुकुंदरावांनी हाक मारली. सारे शांत.
''शांता'' सद्गदित होऊन हाक मारली. सारे शांत.
''ताई !'' रामदासाने दीनवाणी हाक मारली. सारे शांत.
मुकुंदराव मुके झाले. सारी मंडळी मुकी झाली. डोळे स्रवत होते. जीभ लुळी होती. सर्वांचे ओठ, हातांची बोटे भावनांनी थरथरत होती.
''गेली, दोघं गेली !'' मुकुंदराव उद्गारले.
''त्यांचं एकमेकांवर अपार प्रेम. मोहनचा शांता प्राण व शांतेचा मोहन प्राण.'' रामदास रडत म्हणाला.
''असं प्रेम दुर्मिळ.'' आनंदमूर्ती म्हणाले.
''क्रांती पोरकी झाली.'' दयाराम म्हणाला.
''लहान घरातून ती बाहेर पडली. एका आईच्या ऐवजी तिला कोटयवधी आया आता वाढवतील, कडे खांद्यावर घेतील. तिला कोटयवधी मायबाप सांभाळून मोठी करतील. क्रांती मोठी होईल. चिमुकली, चिमणी, लहानुली. सानुली माझी क्रांती मोठी होईल.'' मुकुंदराव म्हणाले.
ती वार्ता बाहेर ताबडतोब फैलावली. हजारो कामगार स्त्री-पुरुष झोपडीकडे आले. जणू त्यांचा राजा त्या झोपडीत होता. त्यांचा जीवनसम्राट त्या झोपडीत होता. झोपडीकडे रीघ लागली. मोहन व शांता यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी अलोट यात्रा लोटली. त्यांचे देह कामगार मैदानावर सर्वांना दिसतील अशा रीतीने ठेवावयाचे ठरले. गीतेने क्रांतीला घेरले. तिरंगी व लाल झेंडयात ते देह गुंडाळले गेले. बिहारमधील सती पार्वतीच्या त्या डबीतील कुंकू गीतेने शांतेच्या कपाळी लावले. मोहनच्याही कपाळी लावले. ते पुण्यमय देह कामगारांच्या मैदानावर आणण्यात आले. विशाल आकाशाच्या खाली देवाची ती दोन लेकरे श्रमून झोपली.
खेडयापाडयांतून वार्ता विजेसारखी गेली. सोनखेडी, शिवतर, मंगरूळ, साळवे, वाघोडा, मारवाड, खिरोंदे, आसोदे शेकडो गावांहून स्त्री-पुरुषांची मुंग्यांसारखी रांग लागली. धनगावला महान यात्रेचे स्वरूप आले. मोहन व शांतेचे महान निर्वाण होते. महाप्रस्थान होते. त्यांची महान यात्रा सुरू झाली होती.
आज परप्रांतीय मजुरांच्या लॉर्या येणार होत्या. आजचा सूर्य काय पाहणार देव जाणे. सूर्य उगवला म्हणजे फुले डोळे उघडतात. आज धनगावला किती फुले डोळे मिटणार होती. देवास माहीत. सारे शहर अस्वस्थ होते. प्रक्षुब्ध होते. थरथरत होते. भावनांच्या लाटांवर हेलावत होते. खालीवर होत होते.
लॉर्या येत नाहीत अशी बातमी आली. हजारो कंठांतून 'क्रांतीचा जय असो' अशी गर्जना बाहेर पडली. कदाचित प्रेतयात्रा संपेपर्यंत लॉर्या आणू नयेत असा सरकारी हुकूम गेला असेल. शक्यता होती. हजारो हार मृत देहास घालण्यात आले. फुलांचे खच पडले. हारांच्या राशी झाल्या. शांतेचे ते पवित्र पतिव्रतेसारखे इच्छामरण; यामुळे सर्वांना चटका लागला. सर्व जातीच्या, धर्माच्या बायका शांतेला वंदन करून गेल्या. मुलामुलींनी वंदन केले.
जे तुज मारतिल मरतील, निजपापे पडतील
रडतिल जरि, हट्ट धरितील, युगधर्म न भजतील ॥जो.॥
सफल जगामधले, श्रमणारे, करितील तव हांकारे
क्रांती क्रांती असा, जयनाद, उठतिल शत पडसाद ॥जो.॥
साम्राज्ये गाडी, तू मोडी, दुष्ट नष्ट त्या रूढी
बंधन बुध्दीचे, तू मोडी, ज्ञानविकासा जोडी ॥जो.॥
ने अन्नज्ञान, घरोघरी, सकल-जन-विकास करी
उद्योगी लाव, सर्व जन, कोणि नसो श्रमहीन ॥जो.॥
वाढव तू जगती, श्रम-महिमा, श्रमुनी चित्मुख निर्मा
सांग असे जगता, दे हाता, मजुर करो वर माथा ॥जो.॥
होशिल तू मोठी, हे क्रांती, दूर लुटारू लोटी
सकल श्रमि-दुनिया, धरि पोटी, घाली अमृत ओठी ॥जो.॥
घे मत्प्राण सखे, तू हांसे, त्रिभुवन भर निजवासे
श्रमिजन राज्य करी, अवनिवरी, सत्सुख सकला वितरी ॥ जो.॥
मोहन एकेक कडवे थांबून थांबून म्हणत होता. एकेका कडव्याबरोबर त्याची प्राणशक्ती कमी होत होती. आपल्या जीवनरसात बुडवून एकेक कडवे तो जगाला देत होता. आवाज खोल खोल जात होता. शेवटच्या कडव्यात मोहनने, आपले उरले-सुरले प्राण क्रांतीला अर्पण केले. त्याने शांतीकडे अनंत अर्थाने, अनंत भावनेने, अनंत प्रेमाने बघत शांतपणे डोळे मिटले. ''क्रां-ती, शां-ती'' हे त्याचे शेवटचे शब्द !
पाळण्यात चिमुकली क्रांती हसू खेळू लागली. पाय हालवू लागली. मोहनची सारी हालचाल थांबली होती. थकलाभागला मोहन अनंत निद्रेशी एकरूप झाला होता, अनंत चैतन्याशी एकरूप झाला होता?
''मोहन !'' एकच हाक शांतेने मोहनला मिठी मारून मारली. तिने डोळयांच्या घडयातील पाण्याने मोहनला शेवटचे स्नान घातले. क्रांतीला मांडीवर घेऊन शांता तेथे गंभीर व खिन्न स्थितीत डोळे मिटून बसली. गीता गीताईतील श्लोक म्हणत होती. शांता मोहनच्या अंगावर पडली. गीतेचा गीताईचा पाठ डोळे मिटून चाललाच होता. सारे काम डोळे मिटून शांतपणे चालले होते.
तिकडे रात्री प्रचंड सभा चालली होती. मालक लोक दूरच्या गावाहून मोटार लॉर्या भरून हजारो मजूर आणीत होते. त्या लॉर्या उद्या यावयाच्या होत्या. मुकुंदराव शांत रहा, उद्या कसोटी आहे, असे सांगत होते. ते म्हणाले, ''मोहनची शाश्वती नाही. उद्या उजाडण्याच्या आत प्रिय मोहनचे कदाचित प्राण देवाघरी उडून जातील. त्याचा शेवटचा संदेश शांत राहा असे आहे. उद्या परप्रांतीय मजुरांच्या लॉर्या आल्या तर त्यांच्यासमोर आधी मी उभा राहीन. माझ्या अंगावर जाऊ दे लॉरी. माझ्या रक्तानं ती लॉरी नाही थांबली तर आनंदमूर्ती तिच्यापुढे पडतील व आपल्या प्राणांनी अडवू बघतील. तरीही न थांबली तर? दयाराम पुढे येईल व बलिदान करील. तरीही न थांबली तर? अहमद पुढे येईल व आडवा पडेल. पाचवा बळी पार्थाचा. उद्याचे हे पाच बळी आम्ही निश्चित केले आहेत. हत्यारी पोलीस उद्या फिरत राहतील? बंदुका जिकडे तिकडे दिसतील. शांत राहा. मोहनचा संदेश म्हणजे आपणास आज्ञा. अनंताकडे जाणार्याची आज्ञा कोण मानणार नाही? सारे शांत राहणार ना?'' हजारो कामगार स्त्री-पुरुषांनी 'हो' म्हणून उंच हात केले. इन्किलाब होऊन सभा गंभीरपणे संपली.