गुरुवार, जुलै 18, 2019
   
Text Size

साधना

आर्य हिंदुस्थानात आले तसेच युरोपियन अमेरिकेत गेले. तेथे जंगलांशी व रेड इंडियनांशी त्यांना झगडावे लागले. त्यांना निसर्गाशी व रेड इंडियनांशी स्नेहसंबंध कधी जोडता आला नाही आला; शेवटपर्यंत युध्दच करावे लागले. परंतु हिंदुस्थानात असे कृत्य लोकांची वसतिस्थाने आर्यांची तपोवने झाली. अमेरिकेत गेलेल्या युरोपियनांवर तेथील निसर्गाची ती हिरवी मंदिरे, तेथील विशाल नद्या गंभीर परिणाम करू शकली नाहीत. त्या जंगलांपासून नि नद्यांपासून त्यांना धन मिळाले, सत्ता मिळाली. कदाचित सौंदर्यवृत्तीचेही पोषण झाले असेल. एखाद्या कवीला स्फूर्ती मिळाली असेल. परंतु विश्व व मानव यांच्यांतील संगमतीर्थ होण्याचे महनीय पद तिकडील वनराजींना प्राप्त झाले नाही. ती भव्य कल्पना त्या लोकांच्या मनास शिवली नाही.

अमेरिकेत जे परिणाम झाले त्याहून निराळे परिणाम झाले पाहिजे होते, असे नाही माझे म्हणणे. एकाच प्रकारचा इतिहास सर्वत्र घडेल तर मानवाने प्राप्त संधीचा दुरुपयोग केला असे म्हणावे लागेल. जगातील नाना लोकांनी नाना भिन्न भिन्न संस्कृतींचे संवर्धन मानवजातीच्या सेवेसाठी व वैभवासाठी करत राहिले पाहिजे. बाजारात विविध उपयोगी पदार्थ असतात, त्याप्रमाणे मानवी बाजारात विविध संस्कृती मांडण्यात यायला हव्यात. भिन्न भिन्न परिस्थितीतील लोकांना भिन्न भिन्न गरजा असतात. त्या महत्त्वाच्याही असतात. एकमेकांनी एकमेकांची न्यूनता आपल्याजवळचे देऊन दूर करायची. माझ्या म्हणण्याचा हेतू एवढाच की, आर्य लोक हिंदुस्थानात ज्या परिस्थितीत होते तिचा विशिष्ट उपयोग त्यांनी करून घेतला. त्या परिस्थितीतून त्यांनी महान् विचार मिळवले; ते आचरणात यावेत म्हणून थोर राष्ट्रीय प्रयत्नही केले. आपण आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी कमालीचा त्याग केला. अनंत कष्टांना कवटाळले. जीवनाच्या अथांग समुद्रात बुडी मारून आपण सत्यशोधन केले. ज्यांचा इतिहास आपल्यापेक्षा निराळा आहे त्यांनाही आपले आध्यात्मिक शोध उपयोगी पडतील. जीवन सर्वांगसुंदर करण्यासठी विविध जीवनतत्त्वांचे पोषण करणार्‍या विचारांची नेहमीच जरुरी असणार आणि म्हणूनच मानवी मनाचे खाद्य दशदिशांतून गोळा करून आणावे लागते.

संस्कृती म्हणजे त्या त्या राष्ट्राने आपल्या जनतेला विशिष्ट रीतीने वाढवण्यासाठी निर्माण केलेला साचा. प्रत्येक राष्ट्र त्याला जे उत्तमोत्तम वाटले तदनुसार सर्व स्त्री-पुरुषांचा विकास व्हावा म्हणून नीतिनियम करते. आचाराची, विचाराची एक विशिष्ट पध्दती निर्मिते. हे नीतिनियम, हे जीवनशास्त्र, हा साचा म्हणजेच संस्कृती. त्या त्या राष्ट्रातील सर्व संस्था, सत् व असत् याविषयीच्या तेथील कल्पना, तेथील स्मृती-सर्वांचा उपयोग त्या त्या संस्कृतीचा विशिष्ट छाप उठावा म्हणून होत असतो. आजची पाश्चिमात्य संस्कृती व्यक्तीची शारीरिक, बौध्दिक व नैतिक वाढ नीट व्हावी म्हणून व्यवस्थित संघटित प्रयत्न करत आहे. निसर्गावर मनुष्याची सत्ता अधिकाधिक प्रस्थापित व्हावी म्हणून राष्ट्रे आपापल्या सर्व शक्तींचा उपयोग करत आहेत. सृष्टीपासून जे जे मिळेल त्याचा नीट उपयोग करून घेण्यासाठी पाश्चिमात्य जिवापाड मेहनत करत आहेत. स्वतःच्या सिध्दीच्या आड येणार्‍या सर्व अडचणींचा धुव्वा उडवण्यासाठी संघटित प्रयत्न करत आहेत. सृष्टीशी वा अन्य राष्ट्रांशी नीट झगडे करता यावेत म्हणून स्वतःला शिस्त लावून घेत आहेत; प्रचंड सैन्य उभारीत आहेत; शस्त्रास्त्रे वाढत आहेत; यंत्रे, युक्त्या, शोध यांची सारखी वाढ होत आहे. त्यांच्या प्रचंड संघटना वेगाने पुढे जात आहेत. पाश्चिमात्यांचे हे कर्तृत्व आश्चर्यकारक आहे यात शंका नाही. मानवाच्या अमोघ अपार ऐश्वर्याचे हे अभूतपूर्व दर्शन आहे. सर्वत्र मानवाचे साम्राज्य पसरवण्याचे ध्येय त्यांना स्फूर्ती देत आहे.

 

पुढे जाण्यासाठी .......

साधना