गुरुवार, सप्टेंबर 23, 2021
   
Text Size

गोड निबंध-भाग १

निर्भयपणें व शांतपणें उत्तर दिलें पाहिजे कीं 'साहेब, कांग्रेसचा झेंडा आम्हीं मिरवणार, हरिपुर्‍याला जाणार. ते दरडावण्याचे दिवस आतां गेले. आतां आम्हीं मेंढरें राहिलों नसून माणसें होत आहोंत.' परंतु असें उत्तर न देतां मारवड गांवासारख्या भरण्याच्या गांवच्या लोकांनीं उगीच चरफडत बसणें हें योग्य नाहीं. सह्यांचें पत्रक काढून जर असें कोणी अधिकारी बोलला असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे. आज निर्भयता पाहिजे. मंत्री मुरारजीभाई खान्देशांत दीड महिन्यापूर्वी आले होते. त्यांनीं सर्व सभांतून हेंच सांगितलें. 'निर्भय व्हा. अन्याय होत असतील ते निर्भयपणें बोला. पुरावे द्या. भिऊं नका. असें न कराल तर आम्हांस कांहींही करतां येणार नाहीं.' हा संदेश मंत्री मुरारजीभाई ह्यांनीं दिला. जळगांव तालुक्यांतील भादली गांवचे पाटील त्रास देतात. त्याची चौकशी करावयास फौजदार जातात, तर लोक गप्प बसतात. पारोळें तालुक्यांतील जंगल्यांच्या कांही तक्रारी काँग्रेसकडे येतात. तर पोलिसांना उलट साह्यहि तेच लोक देतात. अशा भित्रेपणानें काम कसें होणार ? आपण भीति सोडणार नाहीं तर गुलाम राहण्यासच आपण लायक ठरूं. लायकीप्रमाणें सरकार मिळत असतें. आपण भ्याडाप्रमाणें वागूं तर इंग्रजांच्या जोखडाखालीं राहावयांसंच आपण लायक ठरूं.

निर्भय बना. स्वराज्य मिळवावयाचें आहे. आज काँग्रेसमंत्रिमंडळाचें छत्र डोक्यावर आहे. आज भय कां धरावें ? दीडशें वर्षात भय रोमरोमांत भिनलें आहे. भीतीची संवय आपणांस सोडावयाची आहे. एवढ्यासाठीं मंत्रिमंडळ आहे. मंत्रिमंडळ सांगतें 'भय सोडा' तुम्ही जर तें सोडणार नाहीं तर मग काय मिळालें ? निर्भयपणा ही मंत्रिमंडळाची सर्वांत थोर देणगी तुम्हांला मिळत आहे. मान वर करा. अन्याय प्रकट करा. काँग्रेसची संघटना वाढवा. झेंडा नाचवा. असें करीत गेलेत तरच गुढीपाडवा साजरा होणार ? नाहीं तर त्या गुढ्यांत राम काय ? गुढघ्यांत भित्रेपणानें मान घालून बसणार्‍यांसाठीं गुढीपाडवा नाहीं.
६ एप्रिल, १९३८

 

पुढे जाण्यासाठी .......

गोड निबंध-भाग १