रविवार, एप्रिल 18, 2021
   
Text Size

गोड निबंध - २

प्रश्न :--   तुम्हांला असेंच वाटतें का कीं, राष्ट्राची तयारी नाहीं?
उत्तर :--  किसानांत खूप जागृति झाली आहे.  कामगार तर प्रचंड रीतीनें संघटित होत आहेत.  विद्यार्थ्यांत नवचैतन्य आहे.  ३० सालच्या मानाने राष्ट्रांत अपूर्व जागृति आहे असें वाटतें.  परन्तु ही जागृति, हा उत्साह, आम्ही अहिंसक व संघटित केला पाहिजे.  असें करूं तर आपला विजय होईल.  महात्माजींनीं लिहिले होतें, 'पुन्हां सत्याग्रहाची लढाई द्यावी असें मला वाटतें.  मी थकलों नाही.'

प्रश्न :-- त्यांनीं असेंहि म्हटलें होतें की 'पार्लमेंटरी पध्दत ही कायमची राहावयास आली आहे ' म्हणजे असेंब्लीतून सनदशीर कारभारच चालवावयाचा असा नाहीं का अर्थ?
उत्तर :--  राष्ट्रांत शक्ति येईपर्यंत चालवावयाचा.  आपली मंत्रिमंडळें असतील तर पुढील लढयासाठी अधिक संघटना व सामर्थ्य वाढवता येईल. प्रचारास अडथळा राहणार नाहीं.  आत्मविश्वास वाढेल, भय कमी होईल.  ते मंत्रिमंडळें घेतांना म्हणाले होते 'पुढील लढयासाठी अधिक शक्ति यावी म्हणून मंत्रिमंडळें घेण्यास मी संमति देतों.' त्यांच्या डोळयांसमोर लढा आहे.

प्रश्न :--  परंतु मंत्रिमंडळे घेतल्यावर महात्माजींनी असेंहि लिहिलें होतें कीं 'सत्याग्रह न करतांहि आहे त्याच घटनेंतून मी स्वराज्य मिळवूं शकेन.'
उत्तर :-- सत्याग्रही आशावंत असतो.   सरकार लोकप्रतिनिधींच्या मंत्रिमंडळाच्या कामाला जर अडथळा न करील, राष्ट्राच्या आकांक्षास जर विरोध न करील तर स्वराज्य यांतूनहि येईल असें त्यांचें म्हणणें.  त्याच लेखांत ते म्हणाले होते 'सरकार असें न करील तर पुढें तीव्र प्रक्षोभ होईल.' ब्रिटिशांच्या सदिच्छेवर ते अवलंबून आहेत.  परंतु मंत्रिमंडळांस जर पुढें महत्त्वाच्या प्रश्नांत अडथळा होऊं लागेल, संस्थानी प्रश्नांच्या बाबतीत तर कांहींच झालें नाही, लढाईच्या वेळेस प्रांतिक कारभारावर जर गदा आली तर महात्माजी रणशिंग फुंकतील.

प्रश्न :--  महात्माजींच्या परस्परविरोधी वचनांची संगति कशी लावावयाची?
उत्तर :--  त्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणें त्या त्या वेळचीं वाक्यें असतात.  त्या त्या वेळेपुरतीं तीं सत्य असतात.  महात्माजींना राष्ट्रीय स्वातंत्र्याची तहान आहे, त्यासाठीं त्यांचा आत्मा तडफडत आहे, ही गोष्ट ज्याला पटते, त्याला या विसंगतींतहि संगति दिसते.  स्वातंत्र्यप्राप्तीच्या निदिध्यासाच्या प्रकाशांत हीं वाक्यें तपासली पाहिजेत.  म्हणजे मेळ घालता येईल.

- वर्ष २, अंक ७.

 

पुढे जाण्यासाठी .......

गोड निबंध - भाग २