रविवार, एप्रिल 18, 2021
   
Text Size

गोड निबंध - २

प्रश्न :--  मुसलमान हिंदूंवर जुलूम करतात.
उत्तर :-- असलीं भाषणें करण्यांत अर्थ नाही.  सारे मुसलमान वाईट असें कधीं म्हणूं नये.  ती चूक आहे.  वाईट लोक सर्वत्र आहेत.  हिंदुमुसलमान गुंडांचा बंदोबस्त केलाच पाहिजे.  खरी गोष्ट अशी आहे कीं ते व आपण एकमेकांचे जवळ कधीं जात नाही.  ते दूर आपण दूर.  जवळ जाऊं, मैत्री जोडूं, एकत्र अधिक येऊं, तर वातावरण अधिक निर्मळ होईल.  तुम्हीं दूर दूर चाललेत.  ते दूर दूर चालले.   दोघांना जवळ आणण्यासाठी एक माझी थोर काँग्रेस माता जवळ उभी आहे.  परन्तु तुम्हीं दोघे तिला लाथ मारीत आहांत.  मारा लाथ.  मुलाने वातांत लाथ मारली तरी माता रागावत नाहीं.  ती अधिकच सेवा करते. महान् ध्येय ठेवून, थोर भारतीय पूर्वजांचे थोर ध्येय डोळयांपुढे ठेवून काँग्रेस वागत आहे.  नादीरशहा दिल्लीचे बाद-शहावर चालून येत असतां बाजीराव दिल्लीचे बादशहाचे मदतीस गेला.  ५७ सालीं हिंदुमुस्लीम एक होऊन लढले.  १९१९/२० त एकत्र त्यांनी रक्त सांडलें.  इतिहासांतील ही आशा घेऊन आम्हीं पुढें जाऊं.  सोन्याच्या कणावर दृष्टि खिळवावी.  काळयाकुट्ट ढगांकडे न पहातां सोनेरी किनार बघावी.  सोन्याच्या लगडी सहज मिळत नाहींत.  हजारों मातीच्या कणांतून एक कण सोन्याचा मिळतों.  तो आपण गोळा करतों.  त्याप्रमाणे गत इतिहासांतील किंवा आज सभोवती घडणा-या इतिहासांतील ऐक्याचे, उदारतेचे सोन्याचे कण गोळा करून त्यांच्यावर जनतेचें लक्ष वेधावें.  अशानेंच मानवी समाज पुढें जाईल.

प्रश्न :--  मुसलमान कधीं सुधारतील असें मला वाटत नाहीं.  जगांत कधीं प्रेमराज्य सुरू होईल असें मला वाटत नाही.  जगांत बळी तो कानपिळी असेंच चालणार, अंधार व प्रकाश यांचे मिश्रण राहणार, मारामा-या जगांत व्हावयाच्याच.
उत्तर :-- असें बोलणे म्हणजे नास्तिकपणा आहे.  मानवी समाज यापुढें जात आहे यांत शंका नाहीं.  प्रगति थोडी का होईना होत आहे.  अंधार व प्रकाश राहील. परंतु अंधारात कोटयवधि मंगल तारे चमचम करीत असतात. ज्याला मानवी समाज शेवटीं सुंदर होईल असें वाटत नाही, त्याच्या प्रयत्नांस अर्थ तरी? काय नदी शेवटीं समुद्रास मिळेल. मानवी समाजहि प्रेमाकडे जाईल. आज जग जवळ येत आहे. कदाचित् मारण्यासाठीं जवळ  येत असेल.  परंतु त्यांतूनच उद्या तारणें निर्माण होईल.  कच्ची कैरी पिकत पिकत गोड होईल.  तिचा आंबटपणा जाईल.  मानव जातीच्या उज्वल भवितव्यावर तुझी श्रध्दा नसेल तर बोलणेंच संपलें.

प्रश्न :--  अशी श्रध्दा टिकणें म्हणजे कठीण काम.
उत्तर :--  त्यांतच पुरुषार्थ आहे.  समर्थ्यांनी सांगितले, 'उत्कट भव्य तें घ्यावें! मिळमिळीत अवघेंचि टाकावें --' जे थोर दिव्य आहे तें घ्यावें.  मारुति जन्मतांच लाल सूर्याला मिठी मारण्यासाठीं उडाला.  आपणहि नव भारताच्या नवीन मुलांनी तें सर्वांचे ऐक्य, हें महान् ध्येय, तें घेण्यासाठीं पुढें जाऊं या.  विविधतेंत एकता पहा.  अरे बगीच्यांत एकाच रंगाचीं, गंधाची फुलें असण्यांत काय मौज?  जेथें शेकडों रंगांची व गंधाची फुलें फुलतात तो बगीचा गोड दिसतों.  हिंदुस्थानांत नाना संस्कृति परस्परांस शोभवतील.  हा देवाचा महान् बगीचा होईल.  केवढे थोर ध्येय! आपलें हे भाग्य आहे.  अविरोधानें सारे फुलूं या.  गुलाब मोगरा एकत्र फुलूं देत.  ताजमहाल व अजिंठा एकत्र नांदूं देत.  त्यांच्या सणाला आपण जाऊं.  आपल्या संक्रांतीच्या सणाला त्यांना बोलावूं.  ईदच्या दिवशीं हिंदी मुसलमान जी प्रार्थना म्हणतात, तींत 'देवा, हिंदु-मुसलमानांचा सांभाळ कर' असे म्हणतात.  पूर्वजांनी हा मंत्र दिला.  हिंदूंच्या व मुसलमानांच्या थोर पूर्वजांनी हा मंत्र दिला.  हिंदूंच्या व मुसलमानांच्या थोर पूर्वजांनी चिखलांतून कमळें फुलवण्याचे प्रयत्न केले.  तेच प्रयत्न श्रध्देने आपण पुढें नेऊं या.  मित्रा कवाईत करा, शिस्त शिका, चपलपणा आणा; परंतु हिंदुस्थानांतील एकमेकांबद्दल विष मनांत बाळगूं नका.  भारतमातेच्या आंगावर तिच्या मुलांचे रक्त न सांडलें जावो.  इंग्रज वगैरे परकीयांचाहि आम्ही तिरस्कार करीत नाही.  त्यांनी लुटारू न होतां येथे रहावें. आमच्यांतील चतकोर भाकर त्यांनींहि घ्यावी.  परंतु जाचक मालक म्हणून न राहतां मित्र म्हणून रहावें, भारतीयांची भावंडें म्हणून रहावे.

 

पुढे जाण्यासाठी .......

गोड निबंध - भाग २