मंगळवार, ऑक्टोबंर 20, 2020
   
Text Size

गोड निबंध - २

हिंदुस्थानांत शेंकडो जातिधर्म आहेत. पण एकच विशेष परंपरा दिसून येईल, शेंकडों प्रकारच्या जातींना त्यांच्या संस्कृति, धर्मांना एकत्र आणण्यांचें, एकरूप करण्याचें परम कर्तव्य या देशानें आज शतकानुशतकें चालविलें आहे.  पूर्वी येथे अनार्य , द्रविड होते त्या नंतर आर्य आले.  कांही दिवस भांडणे चाललीं, पण अखेर उभय संस्कृति एकरूप झाल्या.  मंथनानंतर अमृत निष्पन्न झालें ना?  तसेंच जातीजातींतील या आजच्या भांडणानंतर ऐक्याचें अमृत, एक नवीन समान संस्कृति निर्माण होईल.  हिंदुस्थानचा इतिहास हा अनेक संस्कृतींच्या मिलाफाचा इतिहास आहे.  आम्हीं भांडलों भांडलों पण अखेर एक झालों.  हिंदुमुसलमानांच्या मोठमोठया लढाया ब-याच झाल्या असतील, पण इतिहासांत हैदरअल्ली हिंदु देवतांना मोठमोठया देणग्या पाठवीत असे त्याचा ऊल्लेख कुठें आहे?  हिंदुराजे मुसलमानांचे सण साजरे करीत तें कुठें लिहिलें आहे का? अकबरानें सर्वधर्मीय संस्कृति एकरूप करण्याचा प्रयत्न केलाच होता ना?  जुन्याच गोष्टी कशाला, आमच्या अमळनेरला सखाराम महाराजांच्या रथाला पहिली मोगरी मुसलमान अजूनहि देतात!  कां रे बाबा?  हिंदूंचा रथ आणि त्याला मुसलमान मोगरी देणार?  पण ही भावना त्यांच्यांत नाहीं.  जळगांवच्या मशिदीपुढें हिंदूंना भजन करण्याची विनंती तेथील मुसलमान बांधवांनी केली! का?  दोन्ही समाज एकाच देवाचीं लेंकरें ना!  चला, करा आमच्याहिं देवापुढें प्रार्थना! केवढी ही सहिष्णुता?  काय हा मनाचा मोठेपणा?  शिवाजी महाराज गोब्राह्मणांचे प्रतिपालक होते असें सांगण्यांत येतें पण शिवाजी महाराज गोरगरिबांचे प्रतिपालक होते असें आपणास इतिहास सांगेल.  त्या काळीं प्रत्येक गांवी एक गढिवाल असे.  गढिवाल म्हणजे प्रत्येक खेडयांतील सुलतान!  लोकांनी मेहनत करायची आणि त्या मेहनतींचे सर्व फल या गढिवालानें लुबाडायचें.  असलें जुलमी गढिवाल दूर करण्यासाठीं शिवाजी महाराजांचा अवतार होता.  अफजुलखान म्हणजे तरी कोण?  अनेक गांवाचा गढिवाल.  अनेक गढिवालांचा एक गढिवाल.  चंद्रराव मोरेहि तसाच.  शिवाजींने क्रांति केली पण कां केली व कशी केली हें पाहिलें पाहिजे.  बहुजनसमाजाच्या सुख-दु:खनिवारणासाठीं बहुजन समाजाच्या मदतीनें शिवाजी लढला - शिवाजींने क्रांति केली.  शिवाजींचें राजकारण धार्मिक नव्हतें, आर्थिक  होतें.  स्पेन दोन वर्षे असाच लढला.  नादिरशहास हांकलून लावण्यासाठीं बाजीराव दिल्लीच्या बादशहाच्या मदतीस धांवला!  का?  आपल्याच देशांत माळव्यांत तो बादशहाविरुध्द झगडत नव्हता का?  पण नादीरशहा परका-ति-हाईत दरोडेखोर! त्याच्या विरुध्द बादशहास मदत करण्यास तो दिल्लीस धांवला.  त्यास नसतें का, दोन्ही मुसलमान आहेत.  झगडूं दे आपआपसांत, असें म्हणता आलें? पण नाहीं.  परके लुटारूच  आपले पहिले शत्रु!  बादशहांचे उद्या बघून घेऊं ही बाजीरावाची वृत्ति समंजसपणाची नव्हती काय?  आज व्हाइसरॉय आपल्या जातीय मतभेदांकडे अंगुलीनिर्देश करतो आहे.  ही  संधि त्याला कां मिळावी ?  धर्माच्या प्रश्नापुढें बहुजन एक होतो.  हिंदु आणि मुसलमान किंवा स्वजन आणि परजन अशी फाळणीं करूं नका.  भांडवलवाले आणि गरीब ; सुजन आणि दुर्जन हेंच वर्गीकरण बरोबर आहे.  लुटतो कोण?  भांडवल वाले,  पैसेवाले - लुटल्याखेरीज का कोणी श्रीमंत होते? तेव्हां सुजन एक होऊं या! हे सारे प्रश्न तुम्ही पडताळून पहा.  कोणत्या तत्त्वावर कोण कसे एक होतात तें पहा.  धर्मावर एक होत नाहींत.  भाकरीच्या प्रश्नावर एक होतात.

आजच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीकडे पाहूं या! आज रशियाखेरीज एकहि देश खरा लोकशाहीवादी नाहीं.  इंग्लंड, फ्रान्स, अमेरिकेंत लोकशाही आहे म्हणे  पण कसली लोकशाही?  बॉम्ब टाकणारी, नाहीं तर दुसरी कसली ? आज पोलंडच्या स्वातंत्र्यासाठीं, लोकशाहीसाठीं इंग्लंड झगडा खेळतें पण हिंदुस्थानांत काय करते?  फ्रान्सनें आपला प्रजापक्ष हाणून पाडलाच ना? अमेरिका जपानला चीनविरुध्द - एका स्वातंत्र्यरक्षणासाठीं झगडणा-या राष्ट्राविरुध्द लढाऊ विमानांची मदत करतेच कीं नाहीं?  जगामध्यें आज लोकसत्ता नाहीं.  श्रीमंत आणि गरीब यांचेमधील झगडयावर आजवर मग चाललें आहे.  समाजाचे हेच शास्त्रीय विभाग आहेत.  बाकी विभाग  कृत्रिम आहेत.  जगांत विभागणी केव्हा व कुठें होते?  चीन व जपान यांचे धर्म एकच आहेत, पण चीनविरुध्द जपान उठलाच ना!  अमेरिकाहि मिळाली त्याला! त्यांचा धर्म का एक होता?  होय, आर्थिक धर्म मात्र एकच होता लुच्च्यांचा! लुटण्याचा! लुटणारे आज एक होत आहेत.  संयुक्त प्रांतात सारे जमीनदार मग ते हिंदु असोत, मुसलमान असोत, नाहीं तर दुसरे कोणी असोत एक होत आहेत.  लुटणारे एक होत आहेत, तर आपण लुटले जाणारे एक होऊं या.  रेडिओनें सारें जग एकत्र जवळ आले आहे.  तर आपणांस एक होण्याला काय अडचण आहे? आपणाला आघाडीवर राहायला हवें आहे.  आपण आपसांत फाटाफुटीला वाव देतां कामा नये.  खानदेशांत गिरणी कामगारांचा संप झाला तेव्हां मालकानें फाटाफुटीचा प्रयत्न कसा केला माहीत आहे?  खानदेश व सोलापूर अशा दोन ठिकाणच्या कामगारांत तो तसला भेद माजविण्याचे त्यांचे प्रयत्न चालू झाले.  पण कामगार कुठला कां असेना, काय फरक असतो त्याच्या राहणींत, त्याच्या दारिद्रयांत, त्याच्या पिळवणुकींत?  झगडया-झगडयांतून नव संस्कृतीची निर्मिति ही हिंदुस्थानची परंपरा आहे.  नदी पवित्र मानली जाते.  का?  तर तिच्यांत निरनिराळया ठिकाणचे प्रवाह एकत्र वहात असतात.  सर्व प्रवाहांचे एकरूप एकजीव झालेला असतो नदींत.  समुद्र नदीहून पवित्र मानला जातो. कां? तर त्यांत अनेक नद्यांचा सांठा एकत्र येतो, एकत्र मिसळून जातो.  मानव नदी, मानव समुद्रहि असाच पवित्र नाहीं का?  निरनिराळया धर्माचे, निरनिराळया जातींचे प्रवाह अखेर एक.  एका मानव-जातींत समावलें जातात - तो मानव समुद्र महत्त्वाचा नाहीं का? पवित्र नाहीं का? या मानव समुद्रांत विद्यार्थांनी आलें पाहिजे.

 

वर्गांत तुम्हीं इतिहास शिकत असाल, त्याचबरोबर जीवनाचें पुस्तक वाचायला, त्यांतले जगाचे व समाजाचे प्रश्न हाताळायला तुम्ही शिकलें पाहिजे व तुमच्या शिक्षकांनी तुम्हांला शिकविलें पाहिजे!  माझ्या एका शिक्षक मित्रानें आपल्या पेशासंबंधी कुरकुर केली तेव्हां मी त्याला विचारलें कीं, तूं आपल्या विद्यार्थ्यांजवळ कधीं चौकशी केली आहे का कीं, प्रत्येकाला कपडे किती आहेत, त्याच्या पालकाचें उत्पन्न किती आहे म्हणून?  त्यानंतर त्यानें मला तशी चौकशी करून सांगितलें कीं, एका मुलापाशी २ डझन कपडे आहेत तर एकापाशीं अवघा एक शर्ट आहे.  एकाच्या मालकीचे ३ बंगली आहेत तर एक ३ रु. च्या भाडयाच्या खोलींत आहे.  या विषमतेचा विचार तुमच्या डोक्यांत कधीं येतो का? बीजगणिताचे प्रश्न तुम्हीं वर्गांत नेहमीं सोडवतां पण असल्या विषमतेचें, दारिद्रयाच्या प्रश्नांचा विचार कधीं करता का? हा प्रश्न कोण सोडवील? अशी ही सामाजिक विषमता का असावी याचा विचार करा?  वर्गावर्गांतले हे प्रश्न समजूं लागले तर समाजासंबंधींचे गहन प्रश्न सहज समजूं लागतील.

कोणी म्हणतील हें सारें लहानपणीं कां? हें सारें भयाण आहे.  मुलांच्या कोंवळया बुध्दीवर त्याचा ताण पडेल.  पण माझ्या एका भाच्याची गोष्ट सांगतों ती ऐका.  त्याला समुद्राची फार भीति वाटायची.  मी त्याला अलिबागला आल्यावर मुद्दाम समुद्रावर घेऊन गेलों. त्याला समुद्राचें सौम्य स्वरूप समजावून सांगितलें.  लाटांमुळें व वाहत्या वाळूंमुळें पाण्याला कशा गुदगुल्या होतात हें समुद्रांत पाय टाकल्याखेरीज समजणार नाहीं हें पटविलें.  समुद्रात नांव ढकलायची असेल तर आधीं ढोपरभर पाण्यांत शिरलं पाहिजे.  कधीं गळाभर पाण्यांत डुंबलं पाहिजे. जीवन-सागराचें असेंच आहे!  विद्यार्थ्यांना पुढें समुद्रांत यावयाचं आहे ना, मग त्यांना समुद्रापासून दूर ठेवूं नका.  विद्यार्थ्यांनों, शाळेच्या परिक्षेत ३३ टक्के गुण मिळविण्यापुरताच अभ्यास करा आणि बाकी वेळ इतर कामांत घालवा.

शाळेच्या चालकांच्या हरकती येतील पण त्याकरितां का आपण अडून बसायचं?  विद्यार्थ्यांना नित्य राजकारण नसेल पण नैमित्तिक राजकारण अवश्य आहे!  काँग्रेस प्रचार, किसान संघटना, कामगार संघटना, हीं कामें विद्यार्थ्यांनी अवश्य हातीं घेतलीं पाहिजेत.  विद्यार्थी जग व बाहेरील जग यांची फारकत करूं नका.  समाजाचे प्रश्न हे सामाजिक स्वास्थ्याप्रमाणें आहेत.  समजा, एखाद्या शहरांत कॉलरा झाला तर हेडमास्तर 'बस इथं भूमिति सोडवीत' असं नाहीं ना सांगणार?  आग लागली तर स्वस्थ बसून शिस्त पाळायला नाहीं ना लावणार?  मग सामाजिक,राष्ट्रीय प्रश्न जर असे नैमित्तिक स्वरूपांत आले तर त्यांचे स्वागत विद्यार्थांनी अट्टाहासानें केलें पाहिजे.  आमच्या खानदेशांत कामगारांची सभा झाली, किसानांचा मोर्चा निघाला कीं, विद्यार्थी पुस्तकें टाकून आपल्या देशबांधवांकडे येतो.

अनेक मोठमोठाले प्रश्न समाजापुढें उभे ठाकले आहेत ; त्यांना घाबरूं नका.  तोंड द्या!  जगाचे प्रश्न धाडसानें हाताळले पाहिजेत.  शाळेंत तुमची शारीरिक तपासणी करतांना लाँग साईट किंवा शॉर्ट साईट कशी काय आहे तें सांगतात.  पण इनसाईट कशी काय आहे ह्याची परीक्षा होते का कधीं? ... आज राष्ट्राला एकच रोग झाला आहे .  हार्ट डिसीज ...  तुमच्या परीक्षा शाळा कॉलेजांतच नाहीं होत, बाहेरहि होत आहेत.  भावना व विचार, डोकं व अंत:करण ही दोन्ही आवश्यक असतात.  झाडाची मुळें उत्तरच दिशेला पसरलेलीं का कोणी पाहिलीं आहेत!  घराच्या खिडक्या अमुक एका दिशेलाच असाव्या असें कां कोणी म्हणतो?  तसेंच विद्यार्थ्यांचे ज्ञान सर्व बाजूंनी परिपूर्ण, निदान प्रयत्नपूर्ण असावें याला काय हरकत असावी ?

 

२७ विद्यार्थी परिषद

वरील विद्यार्थी  परिषद्  ठाणें येथें  ता. ३ व ४ नोव्हेंबर रोजीं  काँ. मीनाक्षी क-हाडकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली.  सभेचें उद्धाटन श्री साने गुरुजी यांनी केलें.  उद्धाटन प्रसंगी साने गुरुजी यांनी केलेलें भाषण खाली दिलें आहे :

विद्यार्थ्यांनों, तुमच्या या परिषदेचें उद्धाटन करण्यासाठीं तुम्ही मला बोलावलें आहे.  शाळा व विद्यार्थी यांचा संबंध सोडून मला बरेच दिवस झाले.  मी अलिकडे खानदेशांत शेतक-यांमध्यें  व कामगारांमध्यें काम करीत असतों.

शेतक-यांत हिंडणा-या माणसाला तुम्ही आज विद्यार्थ्यांच्या या मेळाव्यांत बोलावून आणलें याचा अर्थ काय?  याचा अर्थ हाच कीं, विद्यार्थी व किसान हे राष्ट्राचे महत्त्वाचे दोन घटक कांही तरी तसाच महत्त्वाचा संबंध असल्यामुळे एकत्र जोडले आहेत.  दोघांच्या ऐक्याचा, एकजुटीचा सांधा आज दाबला जात आहे.

आजची वेळ मोठी आणिबाणीची आहे.  आज महत्त्वाचे प्रश्न आपल्या समोर उभे राहिले आहेत.  विद्यार्थी चळवळ व विद्यार्थी संघ अजून बाल्यावस्थेत आहेत.  १९३३ नंतर हिंदुस्थानांत ही चळवळ सुरू झाली व आतां जिल्ह्यांत ऑ.इं.स्टू.फे. च्या शाखा पसरल्या आहेत व याचेंच प्रत्यंतर म्हणजे आजची ठाणें व कुलाबा जिल्ह्यांतील विद्यार्थांची ही संयुक्त परिषद होय.

विद्यार्थी परिषदांवर नेहमी आक्षेप घेण्यांत येतो कीं, या परिषदा म्हणजे विद्यार्थ्यांच्या मौल्यवान काळाचा व श्रमाचा अपव्यय होय.  समाजाच्या प्रश्नांशी आपला संबंध जोडणें हेंच खरें शिक्षण होय.  शाळेतींल शिक्षण हें अपुरें शिक्षण आहे. जगांतील अत्यंत पुढारलेले विचार आज विद्यार्थ्यांपुढे येत नाहींत ते येणे अवश्य आहे.  विद्यार्थी परिषदेचें महत्त्व या दृष्टीने अतिशय आहे.  खरें शिक्षण कोणतें या बाबतींत एका वंदनीय समाजसेवकानें दिलेलें उत्तर मी जन्मांत विसरणार नाहीं.  त्रिखण्ड जगाचा प्रवास करून हिंदुस्थानांत आल्यावर गु. अण्णासाहेब कर्वे यांनीं मिठाच्या सत्याग्रहाचें एक दृश्य पाहिलें.  ते म्हणाले, ''आज माझ्या डोळयांचे पारणें फिटलें.  शिक्षणाचें उद्दिष्ट म्हणजे आत्म्याची जागृति करणें.  तें ह्या सामुदायिक सत्याग्रहानें सफळ झालें आहे!'' शिक्षण तेंच कीं जें आपणाला जनतेच्या सुखदु:खात एकरूप करील.  शाळेंतील शिक्षणांतून जेवढें घेता येईल तेवढें घ्या आणि बाकीच्या शिक्षणासाठीं, आत्म्याच्या भुकेच्या समाधानासाठीं समाजाकडे पहा दुस-याचीं सुखदु:खें जाणून घ्या.  स्वत:च्या सुखदु:खाबरोबर दुस-याच्या सुखदु:खाची कल्पना असणें हें विद्यार्थ्यांना आवश्यक आहे.  आणि बाकीच्या गोष्टी दूर ठेवा, समाजांत जास्तीत जास्त मिसळा.  तुम्हाला नवे नवे अनुभव येतील.  चोर देखील समाजाचा उपकारकर्ता आहे.  तो श्रीमंताच्या घरची घाण चव्हाटयावर आणतो.  श्रम न करतां सांठविलेलें धन ही घाणच नाहीं तर दुसरें काय?

   

तुकाराम महाराजांनी म्हटलें आहे :
'अवगुणां हातीं ।  आहे अवघीची फजीती. '


गुणीं राष्ट्रे सुखी होतात.  अडाणीं राष्ट्रे दु:खी होतात.

चित्र :-- ही ज्ञानाची ज्योत आहे.  हे सारे हात जोडून उभे आहेत.  याचा अर्थ कळला का? तुम्ही दिवा देखून नमस्कार करतां.  परन्तु खरा दिवा कोणता?  रॉकेलचा नाहीं, गोडे तेलाचा नाहीं, बॅटरीचा नाहीं, खरा दिवा       ज्ञानाचा.  समजा, तुम्ही हातांत बॅटरी घेऊन चाललेत, रस्त्यावर पाटी आली, खांब आला.  हा धुळयाचा रस्ता असें त्यावर लिहिलें आहे.  परन्तु तुम्हाला वाचता येत नाहीं.  तुम्ही दुस-या रस्त्याला गेलांत, तिकडून कोणी येऊन विचारलें ' कोठें चाललेत? ' सांगितलें धुळयाला चाललों.  तर तो हंसेल व म्हणेल 'हा रस्ता पारोळयास चालला.'  हातांतील बॅटरी काय कामाची? ती विंचू काटा फार तर दाखवील.  परन्तु मुक्कामास नेणार नाहीं.  म्हणून ज्ञानाचा दिवा हवा.  तरच मुक्कामावर पोंचाल.  नाहीं तर स्वातंत्र्याकडे जाण्यांस निघून पारतंत्र्याकडे जाल.  ध्यानांत धरा कीं ज्ञान म्हणजे परमेश्वर.  त्याची पूजा करा.  हा ज्ञानाचा दिवा घरोघर आणा व म्हणा, ' हे ज्ञानदेवा, आजपर्यंत आम्ही हयगय केली.  आतां तसे करणार नाहीं.  मुलें-मुली, बाया-माणसें, तरुण, वृध्द, सारें शिकूं.  देशाची मान खालीं होऊं देणार नाहीं.'

अशी अनेंक प्रकारें चित्रें व त्यांतील अर्थ आम्ही समजून देत असूं.  यावरून कल्पना येईल.  शेतकरी, कामकरी, स्त्री-पुरुष यांना बरोबर पटे.  आम्ही शिकूं म्हणत.  शिकून नोक-या-चाक-या नाहीं मिळवावयाच्या, मामलेदारी नाहीं मिळवायची.  माणुसकीसाठीं शिकायचें.  पोटाला धान्याची भाकर, तशी बुध्दीला ज्ञानाची भाकर.  जर डोकें खोकें राहिलें तर आपल्या संसाराला शेंकडों भोकें पडतात.  हातीं रहात नाहीं कांहीं.  सर्वत्र फजीति व अपमान हें सारें त्यांना पटे.

गांवोगांवच्या बंन्धुभगिनींनो, घरोघर लिहिणेंवाचणें शिका.  शाळेंत जाणा-या मुलांपासून शिकून घ्या.   दीडशें वर्षें इंग्रजानें राज्य करून शेंकडा १० लोक साक्षर! आपण काँग्रेस मंत्र्यांच्या कारकीर्दीत ९० साक्षर व १० निरक्षर अशी उलटापालट करूं या.  १९४० सालीं म्हणजे पुढील वर्षी खानेसुमारी होईल.  त्यावेळेस हिंदुस्थानांत सारे साक्षर असें लिहिलें जाऊं दे .  म्हणजे इंग्रज येथें राज्य करण्यास नालायक आहे हें सिध्द होईल.  हिंदुस्थानचे तोंड येत्या खानेसुमारींत साक्षरतेच्या बाबतीत तरी उजळ करूं या.  लागा या कामास गल्लीगल्लींतून, घराघरांतून, रात्रीं-पहाटें तास अर्धातास सारे शिका.  प्रचंड मोहीम सुरूं करा.  येत्या विजयादशमीस प्रत्येक घर सुशिक्षित आहे, साक्षर आहे, असें आपण दाखवूं या.  ज्ञानाचा झेंडा प्रत्येक घरावर फडकवूं या.

-- वर्ष २, अंक १९

 

चित्र :-- या एका चित्रांत दोन भाग आहेत.  या इकडे बाजारांत माळणी भाजी विकण्यास बसल्या आहेत.  एक पोलिस येऊन त्यांची भाजी खुशाल उचलीत आहे.  परन्तु या दुस-या चित्रांत बघा.  एक माळीदादा हातांत कागद-पेन्सिल घेऊन उभा आहे.  तो पोलिसांस नांव विचारीत आहे.  पोलिस हात जोडीत आहे.  ही खरी गोष्ट आहे.  पोलिस पुन्हां माळणीस त्रास द्यायला आला नाहीं.  त्या माळणी माळयाला म्हणाल्या, 'तूं काय मंत्र म्हटलास? तें भूत आतां येत नाही.'  माळी म्हणाला, 'ज्ञानाचा मंत्र, नांव टिपतो म्हणतांच पळाला.'  तुम्हीहि लिहायला शिका.  ज्ञान म्हणजे देव.  तो जवळ असला म्हणजे भीति नाहीं.  शिकलेला मनुष्य सर्वत्र जाईल.  आपणाला सर्वत्र भीति.  शिका म्हणजे निर्भय व्हाल.

चित्र :-- या चित्रांत ही बाई आहे.  ती घरचें पत्र दुस-याकडून वाचून घेत आहे.  मग ओशाळली आहे.  आपल्या घरांतील भानगडीं दुस-यास कळल्या म्हणून तिला लाज वाटत आहे.  परन्तु तिला स्वत:ला लिहितां वाचतां येत असतें तर घरची अब्रू घरांत राहती.  अडाण्याची अब्रू जगांत रहात नाहीं.  अब्रूसाठीं तरी शिका. 

चित्र :--  ही बाई दु:खी आहे.  तिचें मूल डोळे चोळून ओरडत आहे.  का बरें?

या पहा दोन बाटल्या.  एकींत जखमेवर लावावयाचे औषध आहे.  त्याला ऑयोडिन म्हणतात.  दुस-या बाटलींत डोळयांचे औषध आहे.  बाटल्यांवर चिठया आहेत.  परन्तु बाईला वाचता येंत नाहीं.  तिनें ऑयोडिन डोळयांत घातलें.  डोळयांची आग होऊन मुलगा रडत आहे.  मुलाचा डोळा फुटला तर कोण जबाबदार? पदोपदीं लिहिण्यावाचण्याविना अडतें.

चित्र :-- एका खेडयांतील शेतक-याकडें हा पोष्टमन् मनिऑर्डर घेऊन आला आहे.  तो त्याला विचारतो, 'सही येते का? ' शेतकरी म्हणतो, 'नाही ' 'मग साक्षीदार आण.'  पोष्टमन् म्हणतो, साक्षीदार त्या वेळेस मिळत नाहीं.  पोष्टमन् त्यावेळेस मनिऑर्डर देत नाहीं.  पुन्हां आठ दिशीं येईन म्हणतो.  घरांत बायको आजारी असते.  मुलगा पोष्टमन्ला हात जोडतो, म्हणतो.   'आईसाठीं दे.'  परन्तु पोष्टमन् जातो.  पहा हा परिणाम.  पैसे येऊनहि मिळत नाहींत.  अज्ञान दूर करा.

चित्र :--रेल्वे स्टेशनचा देखावा.  हे पंढरपूरला जाणारे एका खेडयांतील शेतकरी.  एक शेतकरी एका सुशिक्षितास हे तिकिट पंढरपूरचें का विचारतो आहे, तो होय म्हणतो.  शेतकरी विचारतो, 'किंमत काय? '  तो म्हणतो, '४॥  रुपये. 'शेतकरी म्हणतो, 'आमच्याजवळून ४ रुपये ११ आणे घेतले.  आम्हीं मास्तरला विचारलें, तिकीट का वाढलें? तो म्हणाला तिकीटाचे पैसे आषाढी एकादशीस वाढतात.'  तो सुशिक्षित म्हणाला, 'एकादशीला रताळीं, शेंगा, खजूर, यांचा भाव वाढतो.  रेल्वे तिकिटाचा कसा वाढेल?' शेतकरी म्हणतो, 'आम्हाला काय कळे? ' अशी अज्ञानानें फजीति होते.  स्टेशन कोणतें आलें कळत नाहीं.  तिकिट कोठलें आहे, त्याची किंमत काय आहे, तें समजत नाहीं.  गाडी कोठे जाणारी हें वाचतां येत नाहीं.  अज्ञानामुळें मनुष्य परावलंबी होतो.  फजित होतो.

   

पुढे जाण्यासाठी .......