गुरुवार, ऑक्टोबंर 22, 2020
   
Text Size

गोड निबंध - २

महात्माजींनीं सांगितले तें ऐकलेंत कां?  डॉक्टरने सांगितलेलें औषध घ्यावयाचें नाहीं व रोग हटत नाहीं म्हणावयाचें, याला चावटपणा म्हणतात.   स्वराज्याच्या तयारीच्या चार गोष्टी महात्माजींनीं सांगितल्या होत्या.  अस्पृश्यतानिवारण, हिंदु-मुस्लिम ऐक्य, दारूबंदी व खादी.  यांतील कोणती गोष्ट हिंदुमहासभावाल्यांनीं केली!  जर केली नसेल तर महात्माजींस दोषहि देतां येणार नाहीं.  हिंदुमहासभा हिंदूंचा तरी कैवार घेईल असें वाटत होतें.  परंतु अस्पृश्यांचे बाबतीत काय?  स्वातंत्र्यवीर सावरकर दूर ठेवा ; तुम्ही काय करीत आहांत?  हरिजनांना माणुसकी द्या.  अमळनेरच्या वाडींत त्यांना घेऊन जा.  त्यांना पाणी मिळेल अशी व्यवस्था करा.  त्यांच्यासाठीं छात्रालयें काढा.  मुडी येथें एका हरिजनावर तेथील मंडळींनी अत्याचार केला.  तेथे मुसलमान नव्हते, हिंदूच होते.  जळगांवचे, धुळयाचे, एरंडोलचे, अमळनेरचे सारे हिंदुमहासभावाले वकील तेथें धांवून गेले नाहींत.  जे हिंदुमहासभावाले अस्पृश्यांस माणुसकी मिळावीं म्हणून झटत नाहींत, त्यांना दुस-यांस नांवे ठेवण्याचा अधिकारच नाहीं.

हिंदुमुस्लिम ऐक्य करा महात्माजी म्हणतात.  महात्माजी मुसलमानांस कोरा चेकहि देण्यांस तयार आहेत ; जर ते स्वातंत्र्यासाठी लढतील तर.  लोकमान्यहि असें म्हणत.  मुसलमान येथें राजें झाले तरी चालतील परंतु हा इंग्रज नको असें ते म्हणत.  हिंदुमुस्लिम ऐक्याची जरूर सर्वांना वाटते.  त्यासाठीं वाटेल ती किंमत द्या असें सेनापति बापट म्हणतात.  बंगालमध्यें  १९२४ मध्यें प्रांतिक कायदे कौन्सिलांत सरकारचा पराजय करतां यावा म्हणून देशबंधु दास यांनी हिंदुमुस्लिम करार केला.  ज्याला ज्याला हिंदुस्थान स्वतंत्र व्हावा असें वाटतें त्याला या एकीची नितांत आवश्यकता पटते.  ९ कोटि मुसलमान व ६ कोटि अस्पृश्य असे १५ कोटि लोक जवळ न आले तर ब्रि. सरकार त्यांना जवळ करणार.  आपण दोन जागा देऊं म्हटलें तर इंग्रज ३ देतों म्हणणार.  हा हिशोब हास्यास्पद होणार.  म्हणून लो. टिळक, महात्मा गांधी कोरा चेकहि जरूर तर घ्या असें म्हणावयास सिध्द होतात.

अस्पृश्यतानिवारण व हिंदु-मुस्लिम ऐक्य या महात्माजींनी स्वराज्यासाठीं २ अटी सांगितल्या.  त्या जर पार पाडीत नसाल तर ते स्वराज्य कोठून देणार? हिंदुमहासभावाल्यांचे अस्पृश्यतेकडे लक्ष नाहीं, हिंदु मुस्लीम ऐक्याकडे लक्ष नाही, मग महात्माजींवर रागावून काय होणार!

दारुबंदी व खादी.  दारुबंदी आज काँग्रेसने हातीं घेतली आहे.  त्याला संपूर्ण पाठिंबा द्या.  आणि खादी? तिची तर टिंगल केली जाते.  कोणी म्हणतात कीं त्यामुळें मुसलमानांसहि धंदा मिळतो.  मिलमध्यें मुसलमान नाहींत का?  आतां केवळ सनातनी हिंदूंची गिरणी काढा म्हणावें.

 

३४ हिंदुमहासभावाले

जळगांवचे कांहीं हिंदुमहासभावाले वकील अंमळनेरला येऊन काँग्रेसला शिव्या देऊन कृतार्थ होऊन परत गेले.  या वकिलांनी या सभेत जीं भाषणे केलीं ती ऐकून त्यांच्या पोरकटपणाची कींव येत होती.  त्यांच्या भाषणांतील मुद्दे पुढीलप्रमाणें होते.

(१)  शिवाजी महाराजांनी २० वर्षांत स्वराज्य मिळविंले.  महात्मा गांधींना अद्याप २० वर्षांत मिळवितां आले नाहीं.
(२)  सोवळीं नेसून दुस-या बाजीरावानें स्वराज्य घालविलें, मिळविलें नाहीं.  त्याप्रमाणें लुंग्या नेसून स्वराज्य मिळत नसतें.  महात्माजींची लुंगी म्हणजे सोवळयांचाच प्रकार.
(३)  पं.जवाहरलाल नेहरू मारे शर्टवरून जाकीट घालतात.  ते शिवाजी महाराजांस नांवे ठेवतात.  जाकीट घालून अधिकार येत नाहीं.
(४)  सं. प्रांतात पहा मुसलमानांना किती सवलतीं.  हिंदूंकडे कोणी पाहील तर शपथ!
(५) नेहमींप्रमाणें  मुसलमानधार्जिणी काँग्रेस वगैरे.
(६)  मुसलमानांचे अत्याचार वगैरे.

अशा अर्था चीं ती भाषणें होतीं.  त्या पोरकट भाषणांस उत्तर देणें म्हणजेहि कमीपणा.  परंतु मुलांची व वरवर विचार करणा-यांची दिशाभूल होते म्हणून थोडें लिहितो.

(१)  शिवाजी महाराजांनी २० वर्षांत स्वराज्य स्थापिलें.  त्यांना ही शक्ति कोणी दिली? कशी मिळाली?  त्यांनी जनतेचा कार्यक्रम हातीं घेतला.  जुने सरदार जहागिरदार त्यांना विरोध करावयास उभे राहिले.  शिवाजी महाराजांनी त्यांना दूर केलें.  जनतेच्या गवताच्या काडीसहि हात लावूं नये;  जनतेनें पोटच्या पोराप्रमाणें वाढविलेलीं झाडें, त्यांची फळें कोणी नेऊं नये असे हुकूम सोडले.  खायला न मिळणा-या शेतक-यांची बाजू शिवाजींनें घेतली.  कोणास जहागिरी दिली नाहीं;  गढीवाले दूर केले.  जनतेचें शेतक-यांचे राज्य स्थापिलें.  जनतेतूनच नवीन शूर सेनानी त्यांना मिळाले.  क्रान्ति तेव्हा करता येते, जेव्हा लुबाडणा-यांस दूर करून जनंतेची बाजू घेतली जाते.

आजहिं क्रांति करतां येईल.  परन्तु जनतेची, श्रमणा-या जनतेची बाजू घेतली पाहिजें.  परन्तु काँग्रेसने साधा कुळकायदा आणला, साधें कर्जनिवारण बिल आणलें, तरी तुम्ही हिंदुमहासभावालें ओरडतां.  तुमचीं पत्रें ओरडतात.  महात्माजी स्वराज्यासाठीं जनता उठावीं म्हणून तिचे प्रश्न सौम्यपणे व मर्यादेने  घेतात तरीहि तुम्ही त्यांच्याविरुध्द ऊठतां.  मग शिवाजी महाराजांप्रमाणें गरिबांच्या आड येणा-या सर्वांस सफा करावयाचें कोणीं ठरवलें तर काय म्हणाल?

 

ताठच रहावें, वाकूं नये, कारण ताठ रहाणें हेंच पौरुष आहे.  भलत्या ठिकाणी मोंडलें तरी हरकत नाहीं परंतु या जगात वाकूं नये असा अत्युत्तम ध्येयवाद ज्या कादंबरींत आहे, त्या कादंबरीनें संपत्ति, साम्राज्य, वैर, युध्द यांच्या पाठीमागें लागलेल्या युरोपचे लक्ष खेंचून घेतलें यांत नवल काय आहे?  आपल्याला निद्रेंतून जागें करण्याकरितां दिव्य संदेश घेऊन हा कोणी तरी अवतारी पुरुष आला आहे.  असें आधिभौतिक संस्कृतीच्या भाराखालीं दडपून गेलेल्या युरोपला वाटलें आणि त्यांनी या नवीन द्रष्ट्याचें मोठ्या आनंदाने स्वागत केलें! रोमन रोलंड यांचे इतर अनेक ग्रंथ आहेत.  परंतु वरील गंथाची सर दुस-याला येणार नाहीं.  याच ग्रंथाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालें आहे.  आणि 'विसाव्या शतकांतील पहिल्या नंबरचा ग्रंथ ' असें शिफारसपत्र अनेक ज्ञात्या लोकांनी त्या ग्रंथाला दिलें आहे.

रोमन रोलंड हे उत्कृष्ट लेखक आहेत तसेच द्रष्टेहि आहेत.  जगांत बंधुभाव नांदावा आणि राष्ट्राराष्ट्रांमधील वैर लयाला जावें हा दिव्य संदेश त्यांनी जगाला दिला आहे. भिन्न संस्कृतीच्या लोकांनी एकत्र येऊन विचारविनिमय करून विचारैक्य घडवून आणावें असा उपदेश त्यांनी आपल्या ग्रंथातून केला आहे.  ते उच्चध्येयवादी आहेत.  हे सांगावयास नकोच,  परंतु आपलीं ध्येयें आणि कृति यांचा मेळ घातला पाहिजे असें त्यांचे निक्षून सांगणें आहे.  एके ठिकाणीं ते म्हणतात, 'अन्याय होत असतांना जो उघडया डोळयांनी तो पहातो आणि त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करीत नाहीं, त्याला माणूस ही पदवीसुध्दा धड शोभणार नाहीं. 'आपल्या आयुष्यांत त्यांनी अन्यायांशी अनेकदां झुंजी केल्या आहेत आणि प्रत्येक वेळेला त्यांच्या कोमल मनावर भयंकर आघात झाले आहेत.  तरी मानव जातीच्या भवितव्याविषयीं त्यांच्या मनांत केव्हाहिं संशय उत्पन्न झाला नाहीं.  जगांतील युध्दें नाहींशी झाली पाहिजेत आणि निरनिराळ्या राष्ट्रांत सलोखा आणि प्रेम हीं राहिली पाहिजेत.  याकरितां त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत.  १९२१ सालीं महात्मा गांधींनी सत्य अहिंसा यांच्या भरभक्कम पायावर उभारलेली असहकारितेची चळवळ पाहून त्यांचे लक्ष महात्मा गांधींकडे गेलें.  त्यांनी महात्मा गांधींच्या मतांचा अभ्यास करून १९२४ सालीं एक पुस्तक लिहिलें आणि गांधी हे खरोखरच महात्मा कसे आहेत, त्यांचा आत्मा विश्वव्यापी कसा आहे हें जगाच्या निदर्शनास आणून दिलें.  तेव्हांपासून दोघांनाहि एकमेकांस भेटण्याची इच्छा होती.  तो योग इतक्या वर्षांनी घडून आला हें मोठें सुचिन्हच म्हटलें पाहिजे.  या योगाने युध्दाचा आणि मनुष्यहानीचा संभव थोडासा कमी झाला तरी तें मोठेंच कार्य होणार आहे.  महात्मा गांधी, रोमन रोलंड, इन्स्टेन यांच्यासारख्या महापुरुषांनी एकी करून युध्दें अशक्य करून टाकलीं पाहिजेत.  युध्दें अशक्य होतील ; मात्र आपण या महात्म्यांचा संदेश ऐकून त्याप्रमाणें वागावयास तयार झाले पाहिजे.

   

परंतु रोमन रोलंड यांच्याकडे सगळया जगाचें लक्ष वेधलें गेलें तें वरील गोष्टींनी नव्हें.  आपण एक नवलकथा लिहावी आणि तींत एकाच ध्येयाच्या पाठीमागें लागलेल्या कलावंताला प्रत्यक्ष जगांत किती खडतर अनुभव येतात हें दाखवावें असें विचार त्यांच्या मनांत घोळत होते.  रोममध्ये विद्याभ्यासाकरितां असतांना त्यांनी मनांतल्या मनांत एक कथानकहि ठरवून ठेवलें होतें.  परंतु १९०४ पर्यंत या कल्पनेला मूर्त स्वरूप आलें नाहीं.  त्या सुमारास त्यांनी राजकारणांतून अंग काढून घेऊन एकांतवासाचा स्वीकार केला.  त्यामुळें त्यांना सवड सांपडली आणि त्यांनी जीन-क्रिस्टोफीया नांवाची कादंबरी एका मासिकांतून लिहावयास सुरुवात केली.  ही कादंबरी या मासिकांतून प्रसिध्द व्हावयास ८ वर्षे लागलीं.  ही कादंबरी लहानसहान नाहीं.  तिची पृष्ठसंख्या १५०० च्या वर आहे.  या मासिकाचा खप बेताचा आणि तोहि विद्वान लोकांतच असल्यामुळें या अद्भुत कादंबरीचा बाहेर फारसा बोलबाला झाला नाहीं  तरीपण या ग्रंथ-राजाची खरी योग्यता हळुहळू लोकांच्या लक्षांत आल्याशिवाय राहिली नाहीं.  प्रथम जर्मन वर्तमान पत्रकारांचे या थोर ग्रंथाकडे लक्ष वेधले गेलें आणि मग या ग्रंथाचें स्तुतिस्तोत्र त्यांनी गायलें. लवकरच त्यांचे इंग्रजीत भाषांतर झालें आणि त्यानें इंग्लिश लोकांनाहि मोहनी घातली.  मग हां हां म्हणतां या ग्रंथाचा कीर्तिपरिमल सर्व दिशांकडे पसरला.  भराभर अनेक भाषांतून त्याचीं भाषांतरें झालीं.  आणि जो ग्रंथकार फ्रान्समध्येंहि कोप-यांत पडून राहिला होता तो जगांत अद्वितीय ठरला.  आपद्ग्रस्त जगाला दिव्य संदेश सांगणारा हा कोणी तरी महापुरुष अवतीर्ण झाला आहे असें सर्वांस वाटू लागलें.  १९१५ सालचें नोबेल पारितोषिक उत्कृष्ठ वाङ्मयलेखकाला द्यावयाचें होतें.  १९१६ सालीं जाहीर झालें कीं जीन रोमन रोलंड यांना हें पारितोषिक देण्यांत आलें आहे.  ५० वर्षांपर्यंत जो लेखक सांदी कोप-यांत पडून राहिला होता तो एकाएकीं जगाच्या पुढें आला, आणि त्याची कीर्ति दिगंत पसरली.

जीन-क्रिस्टोफीया कादंबरीत एक गवई आणि त्याचे सहकारी यांचा जीवन वृत्तांत आहे.  ध्येयवादी माणसाला जीवितयात्रा सुलभ जात नाहीं.  जगाच्या रामरगाडयांत त्याचीं उदात्त ध्येयें आणि कोमल भावना यांचा चुराडा होतो.  या कांदंबरींतील नायकहि मोठा ध्येयवादी आहे.  आपल्या ध्येय सिध्दीकरितां तो फ्रान्स व जर्मनी या देशांत प्रवासाला निघतो.  ठिकठिकाणीं त्याला निरनिराळया वृत्तीचे आणि स्वभावाचे लोक भेटतात.  हर्षामर्ष, लाभालाभ, जयापजय, प्रेमविद्वेष, मैत्री-वैर यांच्या अनेक प्रसंगांतून त्याला जावे लागतें.  कमी धीराचा माणूस असता तर तो या कसोटीला टिकता ना.  या खडतर अनुभवानंतर त्याचें मन गांगरून गेलें असतें.  आपली उच्च ध्येयें आणि उदात्त भावना यांना रामराम ठोकून तो निराशवादी बनला असता आणि जगाला शिव्याशाप देत हळहळत त्यांनें आपला अंत करून घेतला असता.  प्रस्तुत नायकाचा अंत दु:खात झाला आहे ; तरी त्यांतच त्याचा विजय आहे.  ' सुखदु:खें समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ' याप्रमाणें या धीरोदात्त पुरुषाने आपल्या ध्येयापासून यत्किंचितहि माघार घेतली नाहीं ; शेवटी ध्येयाकरितां आपल्या प्राणाचीहि आहुति दिली.  यांतच खरें पौरुष आहे.

'उद्यच्छेदेव न मेदुद्यमो ह्यैव पौरुषम्
अप्यपर्वणि भजेत न नमेदिह कर्हिचित्'


 

युरोप-अमेरिकेंतील लोकांना रोमन रोलंड हे दिव्य संदेश सांगणा-या देवदूतासारखे वाटतात,  त्यांचे वय ६५ वर्षांचे आहे.  या त्यांच्या आयुष्यांत त्यांनी अनेक युध्दप्रसंग पाहिले आहेत.  अगदीं लहानपणापासून युध्द म्हटलें कीं त्यांच्या अंगावर कांटा उभा राहत असे.  एक भयंकर युध्द होणार आणि त्यांत लक्षावधि लोक मृत्युमुखीं पडणार अशीं त्यांना पूर्वीपासून स्वप्नें पडत असत.  त्यामुळें त्यांचे बाळपणाचे दिवस देखील या चिंतेतच गेले.  आपल्या ग्रंथातून त्यांनी भावी युध्दाची आगाऊच सूचना दिली होती ; या युध्दापासून अलिप्त रहा असा इषाराहि दिला होता;  परंतु संपत्तीच्या मदानें आणि ऐश्वर्यानें धुंद झालेल्या युरोपनें त्यांचा संदेश नीट ऐकला नाहीं;  आणि म्हणूनच १९१४ सालीं जर्मनी आणि फ्रान्स यांचेमध्यें गेलें महायुध्द सुरू झालें आणि या युध्दाचा वणवा युरोपांत किंबहुना सर्व जगांत पेटणार हें पाहून त्यांचा विश्वावर प्रेम करणारा मृदु आत्मा करपून गेला.  जर्मन, फ्रेंच, इंग्लिश इत्यादि एकाच संस्कृतीच्या लोकांनी परस्परांचे प्राण घ्यावयास उद्युक्त व्हावें हें आश्चर्य नव्हे काय?  मग जगाचा ऊध्दार कसा होईल?  जगांत विश्वबंधुत्व नांदावें हें आपलें ध्येय -- ज्याच्या प्रसाराकरतां आपण आजपर्यंत प्रयत्न केला--तें सर्व थोतांड म्हणून टांकून द्यावें काय असा क्षणभर त्यांच्या मनांत व्यामोह ऊत्पन्न झाला.  परन्तु ते मोठें आशावादी आहेत.  त्यांच्या ध्येयवादित्वाला एवढा अकल्पित धक्का बसला तरी मनुष्याच्या सत्प्रवृत्तीविषयीं त्यांची श्रध्दा अढळच राहिली.  विश्वबंधुत्व हें जगांतून पार मेलें नाहीं;  फार तर त्याला तात्पुरतें ग्रहण लागलें असें म्हणता येईल.  परन्तु लवकरच हें ग्रहण सुटेल आणि सर्व लोक बंधुभावानें पुन्हां नांदूं लागतील असा त्यांचा दांडगा विश्वास होता.  आपल्या मातृभूमीबद्दल-फ्रान्सबद्दल- त्यांच्या ठिकाणीं अकृत्रिम प्रेम असलें तरी तिच्याकरितां जर्मनीचा द्वेष करणें आणि त्याच्याविरुध्द सुध्दां युध्दाकरितां सज्ज होणें पाप आहे असें त्यांस वाटत होंते म्हणून शेवटपर्यंत ते शंतिवादीच आहेत.  आणि त्याकरिता लोकनिंदाहि त्यांनीं सहन केली.  युध्द समाप्तीनंतर जिज आणि जेते असा भेदभाव न करितां तह करा आणि बंधुत्वाचा प्रसार करा असा जाहीरनामा त्यांनी काढला.  दोस्त राष्ट्रांनी त्यांच्या जाहीरनाम्याला मान दिला असता तर जेते व जित अशीं सर्वच राष्ट्रें आजच्यासारखीं डबघाईला आलीं नसती.

सन १९१४ सालापूर्वी रोमन रोलंड यांची फ्रान्समध्येंहि फारशी प्रसिध्दी नव्हती.  पॅरिसमधील नॉर्मल स्कूलमध्यें लेक्चररचें काम करावें आणि फावल्या वेळांत ग्रंथलेखन करावें हा त्यांचा व्यवसाय होता.  त्यांना पैशाची किंवा कीर्तीची हांव नव्हती.  लोकांत फारसें न मिसळतां एका बाजूला राहून आपला ग्रंथलेखनाचा उद्योग चालवावा एवढाच त्यांचा हेतु होता.  लहानपणापासून त्यांना संगीताची आवड होती.  प्रत्यक्ष त्यांच्या मातेंनें त्यांना संगीताचे धडे दिले होते.  संगीत आणि ललित कला यांविषयींचे सामान्य लोकांचे औदासिन्य पाहून त्यांना अत्यंत हळहळ वाटत असे.  लोकांमध्यें संगीत आणि ललित कला यांविषयीं अभिरुचि वाढविण्यांकरितां त्यांचे अहर्निश प्रयत्न चालू होते.  त्याकरीतां त्यांनी बरेचसें ग्रंथहि लिहिले आहेत.  राजकारणांतहि त्यांनी थोडासा भाग घेण्याचा प्रयत्न केला.  परंतु राजकारण कुटिल नीतीनें भरलें आहे, असे आढळून आल्याबरोबर त्यांनी त्यांतून आपलें अंग काढून घेतले.

   

पुढे जाण्यासाठी .......