रविवार, नोव्हेंबर 29, 2020
   
Text Size

गोड निबंध - २

१६ राष्ट्राची मुंज होऊं दे

ऊपनयन म्हणजे गुरूजवळ नेणें.  ज्ञानाजवळ नेणें.  वास्तविक मूल जन्माला येतें तेव्हांपासून त्याचें ज्ञानग्रहण  सुरू होतें.  तरीपण आपण हा एक संस्कार करतों. हा संस्कार झाल्यावर द्विज म्हणतात.  द्विज म्हणजे पुन्हां जन्मलेल्या पक्षालाहि द्विज म्हणतात.  पक्ष्याला अंडयाची कवची फोडून अनंत आकाशांत उडण्याची प्रबळ इच्छा असते.  ती कवची फोडून तो पक्षी ऊडतो.  मुंज म्हणजे काय?  गुलामगिरीची कवची फोडून ज्ञानसूर्याला मिठी मारायला जाणें. गुलामगिरींत ज्ञान नाहीं.  ना विज्ञान ना अध्यात्मिक ज्ञान.  आपणांजवळ कोणतेंच ज्ञान नाही.  भांडत बसलों आहोंत.  हिंदुस्थानांतील सारें एक हें आध्यात्मज्ञान अंगी नाहीं व नेटका प्रपंच करण्याचें शास्त्रीय ज्ञान नाहीं.  दोन्ही डोळे फुटले आहेत.

ज्ञान ही कोणास मिरास असतां कामा नये.  ज्ञान सर्वांना हवें,  ज्याप्रमाणें भाकर सर्वांना हवी.  परन्तु आपण सर्वांस ज्ञान दिलें नाहीं,  तें सांचवून कोंडून ठेवलें,  म्हणून तें मेलें.  अंत:पर इच्छा करूं या कीं सर्वांना ज्ञान मिळेल.

पारतंत्र्यांत सर्वांना ज्ञान मिळत नाहीं.  ज्ञान आज फार महाग आहे.  शाळेत श्रीमंत व गरीब दोघांना सारखीच फी.  श्रीमंताला गरीबांइतकीच फी देण्यांत कमीपणा वाटला पाहिजे. पूर्वी आश्रमांतून जो तो आपापल्या ऐपतीप्रमाणे मदत देई.  मोठमोठे आश्रम असत.  तेथें राजे लोक, श्रीमंत लोक देणग्या देत.  परन्तु पैसे देत म्हणून आपलें मत लादीत नसत.  कण्वऋषींच्या आश्रमांत शिरतांना दुष्यन्त म्हणतो,

'आश्रमांत नम्रपणें मी प्रवेश केला पाहिजे.'

विक्रमोर्वशीय  नाटकांत  राजाचा मुलगा नीट वागत  नाहीं  म्हणून कुलपति त्याला हांकून देतो.  असें  स्वातंत्र्य शिक्षण संस्थांत हवें.  आज तें कोठें आहे?

शिक्षणसंस्थांतील गुरूजवळ भेदाभेद नकोत; हिंदु-मुसलमान, ब्राह्मण ब्राह्मणेतर भेद नकोत; गुरू व शिष्य भेदातीत हवेत.  गुरूंने शिष्याला सर्व प्रश्न समजावून दिले पाहिजेत.  त्याला तयार करून जगाच्या समुद्रांत निर्भयपणे लोटले पाहिजे.

मुंज एकाद्या मोठया दिवाणखान्यांत व्हावी तेथें जगांतील सर्व शास्त्रांतील महर्षींच्या तसबिरी असाव्यांत.  तेथें त्या बाळाला नेऊन म्हणावे,  ' बाळ , या ज्ञानाचा तूं वारसदार.  हें घे, यांत भर घाल व या थोराच्या खांद्यावर उभा राहून तूं आणखीं दूरचें पहा.'

आज शेकडा ९० लोक अडाणी आहेत.  ज्याला जो गुणधर्म देवानें दिला, त्याचा आज विकास होत नाहीं.  याला पारतंत्र्य कारण आहे.  राष्ट्राची मुंज व्हावयास हवी असेल तर लोकमान्यांप्रमाणें हें पारतंत्र्य दूर करण्यांस सर्वांनी उठलें पाहिजे.

नम्रतेंशिवाय ज्ञान मिळत नाहीं.  हातीं दंड घेऊन ब्रह्मचारी ज्ञानार्थ निघतो.  हा दंड दुस-याच्या डोक्यांत घालण्यासाठीं नसून स्वत:च्या कामक्रोधांचे दंडण करण्यासाठीं आहे.  हातांतील दंड अंतर्दृष्ट करा.  हृदयांतील घाण दूर करा.  भारताला मुक्त करणारें, थोर करणारें ज्ञान मिळवा.  द्वेषाचे ज्ञान नको आहे ; द्वेष भरपूर आहे.  जा बटो, निर्मळ होऊन, तेजस्वी होऊन देशाला सुखी करणारे विचार आपलेसे करून घे व ते कृतींत आण.  या बटूला सूर्याचे, अग्नीचे स्वाधीन करायचें असें मंत्रांत म्हटलें आहे.  अग्नि व सूर्य यांचेजवळ मालिन्य नाहीं, प्रखर तेज आहे.  भूमीवरील अग्नि व सूर्य कोणते?  ''तं धीरास: कवय: उन्नयंति.'' त्या बटूला धीरवान् थोर माणसें उन्नतीप्रत नेतील.  अधीर व उल्लू अशा गुरूजवळ कोठला विकास?  हाणा, मारा, ठोका सांगणा-या गुरूजवळ कोठलें खरें माणुसकीचें संसाराला सुंदर करणारें ज्ञान?

--वर्ष २, अंक ४६.

 

लाखों आई-बापांना आपल्या मुलांची काळजी घेतां येत नाही.  त्यांच्या जवळ ज्ञानाचा अभाव असतो व द्रव्याचा अभाव असतों लाखों आई-बापांना मुलांची काळजी कशी घ्यावी हें माहीत नसतें.  मुलांना मारहाण होते.  त्यांची आबाळ होते.  आई-बाप अडाणी.  मुलांना कोठून ज्ञान मिळणार?  मी येथील मिलमधील कामगार बंधूच्या मुलाच्या बारशास गेलों.  त्या घरांत अंधार.  लहानसें घर?  त्या बाळाला कोठून मिळणार चांगलें घर?  त्याच्या गरीब आई-बापांनी काय करावे? प्रेमाचा प्रकाश फार तर देतील.  देतील कोठलीं पुस्तकें, कोठली खेळणीं, कोठला आराम? लहान मुलांची समाजांत काळजी घेतली जावी असें वाटत असेल तर समाजरचना बदलली पाहिजे.

ज्या समाजांत सारे आईबाप सुशिक्षित असतील, त्या समाजांत सर्वांना पोटभर खायला, अंगभर ल्यायला, रहावयाला स्वच्छ लहानसें का होईना पण सोयीस्कर घर असेल, असा समाज आपण निर्मिला पाहिजे.  आसन्नप्रसवा मातांस श्रम करावे लागणार नाहींत, त्यांना कारखान्यांत रजा मिळेल, बाहेर भत्ता मिळेल असें केलें पाहिजे.  शास्त्रीय प्रसूतिमोचनाचें ज्ञान असणा-या प्रेमळ दाया ठायीं ठायीं सेवेस वाहिलेल्या पाहिजेत.  आईबाप कामावर गेल्यावर जेथें सर्व मुलांची काळजी घेतली जाईल अशी बालसंगोपनगृहें सर्वत्र पाहिजेत.  तेथें खेळ, फुलें, बुध्दीचा, शरीराचा व हृदयाचा विकास करणा-या नाना वस्तू असतील, तेथें मुलांत मिसळतील, खेळतील असे सहृदय शिक्षक हवेत.  हे सारें कधी होणार?  समाजरचना बदलेल तेव्हा.

मुलांच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे, मनाची घेतली पाहिजे.  सारे समान, सारे सुखी होऊं दे.  सारी देवाची लेंकरे, अमुक एक जात, अमुक एक धर्म, वाईटच असें नका त्याला शिकवूं.  गारुडी मुलाच्या शरीराला नाना वळणें लावून त्याच्या घडया घालतो त्याप्रमाणें आपणहि मुलांच्या मनांस संकुचित विचारांत अडकवतां.  ही हत्या आहे.  मी कोकणांत नुकताच गेलों होतों.   लहानपणच्या एका मित्राच्याघरी गेलों.  त्या मित्राच्या लहान मुलाला ड्राईंगचा नाद.  बाप कौतुकानें मुलांस म्हणाला, ' यांना दाखव रे कांही काढून.' त्या लहान निष्पाप बाळानें सूर्य काढला, चंद्र काढला.  बाप पाहून म्हणाला, 'हा मुसलमानाचा चंद्र कशाला रे गाढवा? '  त्या मुलाला काय माहींत कीं चंद्र मुसलमानांचा असतो.  ' चांदोबा चांदोबा भागलांस का ' असें म्हणत तो नाचतो.  मी दु:खी झालों व त्या मित्राला म्हणालों, ' अरे, आपल्या बायका सडा घातल्यावर रांगोळीनें चंद्रसूर्य काढतात.  चंद्रसूर्य स्वर्गात नसून माझ्या अंगणांत आहेत.  स्वर्ग माझ्या घरी आणीन, आनन्द मिळवीन.' मित्र हंसला.  आई - बापांनो, लहान मुलांचे महत्त्व वाटत असेल तर त्यांना प्रेम शिकवा.  या हिंदुस्थानांतील सर्व धर्माच्या व सर्व जातींच्या मायबापांनी आपल्या मुलास माणुसकी शिकवावी.  मुलांची मनें द्वेष, मत्सरानें भरूं नयेत, असें हांत जोडून सांगणे आहे.  ती सर्वात मोठी बालसेवा होईल.

आपल्या देशांत स्वावलंबन कमी.  मुलांना निर्भयता व स्वावलंबन यांचे धडे दिले पाहिजेत. त्रिचनापल्ली जेलमध्यें असतांना तेथील आयरिश सुपरिटेंडेंट एक दिवस म्हणाला, ' युरोपांत मुलांना निर्भयतेचे शिक्षण मिळतें. लहान मुलें एकटीं बाहेर जातील.' परन्तु आपल्याकडे म्हणतील, '' एकटा जाऊं नकोस; चुकशील;  अंधार आहे गाडी घोडे येतील.  मुलांना असें पंगू नका बनवूं.  तसेच त्यांच्या गोष्टी त्याला स्वत: करूं दे.  त्याला श्रमाची महतीहि पटवा.  जो श्रमतो, राबतो तो माणूस.  बाकी शेणगोळे.  हा सिध्दांत त्याच्या मनावर बिंबवा.  बालदिन साजरा करणें म्हणजे सर्व मुलांची जेथें काळजी घेणे शक्य होईल असा समाज निर्मिण्याची जबाबदारी अंगावर घेणें.  त्यांची मनें प्रेमळ, स्वाभिमानी  व  निर्भय बनविणें.  त्यांच्यामध्यें ज्ञानाची जिज्ञासा वाढविणें व शरीरश्रमाची आवड उत्पन्न करणें.  शरीरानें, बुध्दीने व हृदयाने त्यांना वाढविणें,  शिक्षक व आईबाप यांचेवर ही जबाबदारी आहे.  सुंदर क्रीडांगणे, सुंदर फुलबागा ठायी ठायीं असाव्यांत.  मुलांना फुलाशेजारी वाढवावें, म्हणजे फुलाप्रमाणे रसमय, पवित्र, निर्मळ, सुगंधी त्यांची जीवनें होतील.''

--वर्ष २, अंक ४०.

 

१५ बालदिन

'मूल म्हणजे जिवंत काव्य '      -- अमेरिकन कवि लाँगफेलो.

आज हजारों ठिकाणीं बालदिन साजरा होईल.  संक्रातीच्या दुस-या दिवशीं बालदिन पाळण्याची पध्दत सुरू आहे.  तिळगूळ घ्या, गोड बोला, असे सांगितल्यावर दुस-या दिवशीं सर्व संसाराला गोडी देणारीं जीं मुलें त्यांची पूजा करावयाची.  जगांत जर खरोखरीच सुख यावयास हवें असेल तर उद्यांची जी पिढी, ती पिढी तनानें व मनानें सुंदर व निर्मळ होईल, याची काळजी घेतली पाहिजे.

हसणारें खेळणारें मूल म्हणजे केवढा आनंद.  आईला मूल म्हणजे कल्पवृक्षाचे फूल वाटतें.  बायकांच्या ओव्यांत मुलाचे वर्णन करतां करतां बायकांची प्रतिभा किती उंच जाते तें पहावें.  मातींत खेळून मूल आलें तर आईला ती माती पवित्र वाटते.  ती म्हणते :-

माती का लागली माती ना तो रे बुक्का ।
चुंबीन तुझ्या मुखा तान्हेबाळा ॥
माती का लागली माती ना ती कस्तुरी ।
सोन्याच्या शरीरीं तान्हेबाळाच्या ॥

असें हें मूल, आईबापांचे सर्वस्व.  कामधाम करावें, दमून भांगून जावें;  परन्तु मुलांची हंसरी मुखें पाहून सारें विसरावें.   तें मूल कांही करीत नाहीं, नुसते हंसतें.  परन्तु हंसण्यानें श्रमपरिहार होतो.  अकिंचिदपि कुर्वाणो सुखं दु:खान्यपोहति.  प्रिय वस्तू कांही न करतांहि सहज दु:ख दूर करते.  लहान मूल म्हणजे संसारातील मधुरता व कोमलता.  अजून मानवजातीस मी विटलों नाहीं, असा देवाचा संदेश घेऊन ती संसारांत येतात.  फुलांप्रमाणे ताजीं, सुगंधी, घवघवीत व गोड.  परन्तु या मुलांची काय दशा होत असते?

आज आपण मुलांच्या मिरवणुका काढून चांगल्या बाळसेदार मुलांना, घाटदार मुलांना बक्षिसें देऊं.  मुलांचे महत्त्व वर्णू. आई-बापांनी, मुलांची काळजी घ्यावी म्हणून सांगूं.  मुलांना एक दिवस खाऊ वाटूं.  मुलांचे महत्त्व वर्णिणारी ब्रीदवाक्यं मिरवूं.  सारें करूं.  परंतु एवढयाने, खरोखर एवढयानें हा प्रश्न सुटेल काय?

   

हिंदुस्तान स्वत:च्या लेकरास धान्य देण्यास समर्थ आहे.  लागणारा कपडा मात्र आज हिंदुस्थान सर्व निर्माण करूं शकत नाहीं.  हे कापड आज इंग्लंडमधून येत आहे.  परंतु ही जरूरी आपण मनांत आणलें तर सहज भागवूं शकूं.  हिंदुस्थानांतील गिरण्या व हातमाग यांनी सहकार्य केलें तर हें काम होण्यासारखें आहे ; परंतु सहकार्याशिवाय हे शक्य नाहीं.  आपल्या देशांतील हातमाग सुरू झाले पाहिजेत ; व या कारागिरांना उत्तेजन देणें हें श्रीमंतांचे व सुशिक्षितांचे आद्य कर्तव्य आहे.  इंग्लंड, अमेरिका वगैरे देशांतहि खेडयांतून सूत विणण्याचे व कापड करण्याचे हातमाग अजून आहेत.  हे कापड महाग पडतें.  परंतु इंग्लंडमधील गिरणीवालें, कारखानदार हें हातमागावरचे महाग कापड विकत घेऊन खेडयातील बायाबापड्यांचा हा मारूं देत नाहींत.  याची आमच्या सुशिक्षितांस व श्रीमंतांस लाज वाटली पाहिजे.  जो जो कांही हस्तकौशल्यानें जगण्याचा प्रयत्न करतो त्या त्या माणसास आपण आधीं सहाय्य करण्यास, त्याचा माल विकत घेण्यास तयार राहिलें पाहिजे.  आपल्या शेजा-याचें कल्याण आधी चिंतिलें पाहिजे.  आपल्या जवळील कारागिरांना, मजुरांना व उत्पादकांना सहाय्य करणें म्हणजें पर्यायेंकरून देशाचीच सेवा करणें होय.  या प्रकारें देशाची आर्थिक  परिस्थिति आपण हरप्रयत्नानें सुधारू शकूं आणि परावलंबनाला परागंदा करूं.  परंतु खरी तळमळ व इच्छा असेल तर ना!

दुसरी गोष्ट तरुणांनी लक्षांत ठेवावी.  आपण गरीब असूं, आपण शरीरानें दुर्बळ असूं ; तरी आपण आपलें राष्ट्रशील उत्कृष्ठ राहील अशी खबरदारी घेतली पाहिजे.  आपलें चारित्र्य निष्कलंक ठेवणें हे आपणा सर्वांस शक्य आहे.  स्वाभिमानी व उदार होण्यास आपणांस कोण अडवूं शकेल?  जर आपण स्वत:स किंमत दिली तर जगहि आपणांस किंमत देई ल, तुम्ही स्वाभिमानी व्हा.  म्हणजे जगहिं तुम्हांस मान देईल.  आपली इभ्रत, आपला स्वाभिमान राखण्यांस शिकणें हीच स्वराज्याची पहिली पायरी आहे.  खरा विजय, खरा मोठेपणा हा चारित्र्यावर आहे.  तेंच राष्ट्र खरोखर मोठे आहे, ज्या देशांत नेकीचे, उदार, मानधन लोक पुष्कळ आहेत. हिंदुस्थानावर तुमचें खरे प्रेम असेल तर हिंदुस्थानास शोभेल असे वर्तन ठेवा.  आपल्या वर्तनानें हिंदुस्थानची सर्वत्र नाचक्की होऊं देऊं नका.  तुमचे शील उदात्त असेल तर देशविघातक कोणतीहि गोष्ट करण्यास मोहानें तुम्ही तयार होणार नाही.  कपटपटु लोक तुमच्या समोर पैशाच्या राशी ओततील, सन्मानदर्शक  पदव्या देतील, पण तुम्ही खरें नाणें असाल, चारित्र्यवान असाल तर ते पैसे व पदव्या यांवर लाथ माराल.  तुम्ही कसे वागतां व कसे आहांत, तुम्ही काय करतां, यावरच खरी देशभक्ति अवलंबून आहे, तुमच्या अधिकारावर व श्रीमंतीवर नाहीं तर आपलें चारित्र्य निर्दोष असेल तरच आपल्या आयुष्याचा नीट हिशेब आपणांस देतां येईल, कांही केलें असें दाखवता येईल.  उत्कृष्ट शील संपादन करा म्हणजेच देशाची तुम्ही खरी सेवा केली असें होईल, मगच तुम्ही भारताचे सत्पुत्र शोभाल व सत्पुत्राची जननी भरतभूमि जगांत मिरवाल राहील.

 

सध्यांचे शिक्षणांत मुलांस त्याच्या भावनांस पोषक असें शिक्षण मिळत नाहीं.  ज्या ज्या वेळीं राष्ट्रीय चळवळी निघतात, त्या त्या वेळेस तरुणांची मनें संस्फूर्त होतात व त्या चळवळींत ते जातात.  शाळांमधून जें शिक्षण देण्यांत येते त्या शिक्षणांतच राष्ट्रोद्वीपक भाग असेल, राष्ट्रप्रेमाला पोषक परिस्थिति निर्माण करण्यांत येईल तरच अलीकडे निरनिराळया शाळा-कॉलेजांतून चालक-विद्यार्थी यांमध्ये होणारे तंटे-बखेडे शमतील, तरुणांच्या तरुण वृत्ति मारून त्यांस कोंडून ठेवूं पाहणें याहून घोरतर पातक कोणतें आहे?  परंतु ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाहीं तें राष्ट्र आपल्या शिक्षणांत मुलांच्या देशभक्तीस वाव देऊं शकणार नाही ; कारण सरकार तो अंकुर मारावयासच पाहणार!

अशी सर्व बाजूंनी हलाखीची व निराशेची जरी स्थिति आहे; तरीहि आपल्या देशासाठी थोडें फार आपणांस करिता येईल.  इच्छा असेल तर मार्ग हा सांपडतोच.  जर हिंदुस्थानासाठीं, आपल्या प्रिय भारतभूमीबद्दल तुमच्या मनांत खरें जिव्हाळयाचें प्रेम असेल तर तुम्हांस खरोखर कांही तरी करता येईल.  आपणांस मोठमोठया गोष्टी करता येणार नाहींत.  आणि आपण सवर्च मोठे होण्यासाठी जन्मलेलों नाही.   तरी लहान गोष्टीचेहि मोठे परिणाम होतात.  प्रत्येकानें थोडथोडें केलें तरी काम उठेल.  जें राष्ट्र आर्थिक बाबतीत स्वावलंबी आहे ; जें दुस-याच्या तोंडाकडें हरघडी लागणा-या वस्तूंसाठी पहात नाहीं, तें राष्ट्र सुखी व संतुष्ट असतें.  याचा अर्थ हा कीं आपल्या जीवनाच्या रोजच्या आवश्यक गरजा त्या आपणच सर्व भागवल्या पाहिजेत.  आपणांस लागणा-या वस्तू आपण उत्पन्न केल्या पाहिजेत.  ज्या वस्तू आपणांस उत्पन्न करता येत नाहींत, त्यांची जरूरच आपण निर्माण करूं नये.  आपल्या देशांतील निरनिराळे पदार्थ उत्पन्न करणारे कारागीर, मजूर यांस आपण आधीं आश्रय दिला पाहिजे.  मोडकें तोडकें असले तरी तें माझें आहे, तें मला प्रिय आहे.  मँचेस्टरचा मलमलीचा सदरा व तनु दर्शविणारे धोतर जर माझ्या देशांत होत नाहीं तर मी घेणार नाही;  माझ्या देशातील जाडी पासोडी  हीच मला प्राणांहून प्रिय आहे.  कैलासांत राहणारे भगवान् शंकर यांनी विष्णूचा पीतांबर परिधान केला नाहीं, तर त्याच देशांत हिमालयांत होणारे कपडे परिधान केले.  कोणते हे कपडे?  व्याघ्रचर्म.  श्री शंकरांनी कोणतीं भूषणे परिधान केलीं तर सर्प.  कैलासाहून तो भगवान् पशुपति सर्व हिंदुस्थानास सांगत आहे : 'माझ्याजवळ असणारे सापहि मला प्रिय आहेत, परंतु परकीयांचे माणिक मोत्यांचे हार नकोत.  सर्पाच्या विळख्यापेक्षां परकीयांच्या दास्याचा, परावलंबनाचा विळखा नको. '  पण भगवान् शंकराचा हा कृतिमय उपदेश कोण ऐकतो? आपल्याच देशांत झालेलें आपण प्रथम घेतलें पाहिजे.  आपणां सर्वांनाच शेतांत, कारखान्यांत कामें करणें शक्य नाहीं.  परंतु जे काम करतात त्यांना उत्तेजन देणें, ते जें निर्माण करतात तें खपविणें हे आपलें काम नाही का?  सरकारी नोकरी, वकिली, डॉक्टरी, शिक्षकी हे कांही उत्पादक धंदे नाहींत.  म्हणून नोकरी हे ध्येय ठेवणें फारसें स्तुत्य व स्पृहणीय नाहीं.  वरील सर्व लोक मजुरांच्या, शेतक-यांच्या श्रमावर जगतात.  जे शारीरिक श्रम व कष्ट करून प्रामाणिकपणें जगण्याचा प्रयत्न करतात, त्यांना उत्तेजन देंणें, मदत करणें हें आपलें कर्तव्य आहे.

   

पुढे जाण्यासाठी .......