शनिवार, डिसेंबर 05, 2020
   
Text Size

गोड निबंध - २

अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ॥


ही तिची थोर प्रतिज्ञा आहे.  अशी ही महान् निर्मळ काँग्रेसमाता २६ जानेवारीचा स्वातंत्र्यदिन पाळावयास सांगत आहे.

उद्यांचे स्वातंत्र्य सर्वांचे आहे.  म्हणून गरीब श्रीमंत, हिंदुमुसलमान, स्पृश्यास्पृश्य सारें या; वृध्द या, तरुण या; स्त्रिया या, पुरुष या ; विद्यार्थी या, शिक्षक या, तिरंगी झेंडयाखालीं येऊन महान् भारत मातेस प्रणाम करून तिला स्वतंत्र करण्याची आणभाक घेऊं या.

२६ जानेवारी म्हणजे येता शुक्रवार.  त्या दिवशींच्या उगवत्या सूर्यांचे घरोघर लाखों तिरंगी झेंडे उभारून स्वागत करा.  हजारों इन्द्रधनुष्यांची भूतलावर प्रभा पसरून स्वर्गीचे देव सोहळा पहावयास खाली येवोत.  आधीं ४ दिवस गल्लीगल्लींतून घरोघर जाऊन २६ तारखेस राष्ट्रीय झेंडा लावा अशी हात जोडून प्रार्थना करा.  २६ जानेवारीस सकाळी प्रभातफे-या काढा.  हरिजनांस प्रेम द्या.  स्नेहसंम्मेलनें भरवा.  खादी खपवा.  एकत्र येऊन सूत कांता.  विद्यार्थी व कामगार यांनी दहा दहाच्या तुकडया करून तालुक्यांतील ५० तरी गांवी स्वातंत्र्यदिन साजरा करून यावें.  तालुक्याच्या मुख्य ठिकाणीं सभा ठेवावीं.  पोवाडे, संवाद ठेवावे  स्वातंत्र्याच्या निनादानें हिंदुस्थान दुमदुमवा.  महात्मा गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयांत व्हाइसरायांकडे गेले तर २६ तारखेच्या या विराट सामर्थ्यांने जाऊं देत.  ही २६ तारीख म्हणजे आपली शिस्त, संघटना व सामर्थ्यं यांचे गंभीर दर्शन.  ही गोष्ट लक्षांत ठेवून उठूं या सारे.

वन्दे मातरम् ।

-- वर्ष २, अंक ४१

 

काँग्रेसने मंत्रिमंडळें फेंकली आहेत.  हिंदी राष्ट्राचा स्वयंनिर्णयाचा हक्क मान्य करा असें साम्राज्यसरकारला स्पष्टपणे बजावलें आहे.  साम्राज्यसरकार काय करतें बघावें.  मोघम वचनें आता नकोत, आम्हांला निर्विवाद गोष्टी पाहिजे आहेत.  काँग्रेसनें ब्रि. सरकारला बजावून, जनतेसहि स्वातंत्र्यार्थ सिध्द राहण्याचा आदेश दिला आहे.  आपण तयारी करूं या.  हरिजनांना जवळ करून त्यांना माणुसकी देऊं या.  जातीय भावनांची तीव्रता कमी करून अल्पसंख्य समाजांचा विश्वास संपादण्याची पराकाष्ठा करूं या.  सांगूं कीं, उद्यांचे स्वातंत्र्य सर्वांचे.  भाषा, लिपी, संस्कृति यांचा उच्छेद होणार नाहीं.  कोणी कोणांवर कुरघोडा करणार नाहीं.  किसान कामगारांस सांगूं या तुम्हाला भले दिवस येतील.  श्रमजीवींच्या ख-या स्वातंत्र्यास आधीं लक्ष दिलें जाईल. परन्तु आपण सर्वांना नांदवूं.  सारें थोडेंथोडें मिळतें घेऊन कोणी कमी, कोणी अधिक झीज सोसून, स्वातंत्र्याचें अमर मंदिर उभारूं या.

आपला लढा अहिंसेचा.  किसान कामगार संघटित झाले आहेत.  तरुणांच्या संघटनेंत तेज चढत आहे.  परंतु महात्माजी म्हणतात, 'हातीं टकली घ्या म्हणजे अहिंसा मनीं राहील. लढा पुकारावयास मला धीर येईल.'  टकली म्हणजे अनत्याचाराचें जिवंत प्रतीक.  तिरंगी झेंडयावर चरका आहे.  मग तो चरका आपल्या हृदयाशी धरावयास काय हरकत?  उद्यां स्वराज्य मिळाल्यावर खेंडी व शहरें यांचा आपण समन्वय करूं.  आज हातीं टकली घेणें म्हणजे उद्यां स्वराज्यांत यांत्रिक उद्योगधंदे वाढविण्याची कबुली देणें नव्हें.  स्वराज्य म्हणजे जें करतां येत नाहीं तें करण्याची शक्ति.  उद्या स्वराज्य मिळाल्यावर बहुमतांनें गिरण्या वाढविण्याचें ठरलें तर तसें करूं.  परन्तु आधीं तसें करण्याची सत्ता मिळवूं.  आधीं परसत्ता दूर करूं.  त्यासाठीं हा लढा आहे.  तो लढा अहिंसक आहे.  त्याची खूण म्हणजे टकली.  खादी आपल्या स्वातंत्र्याच्या लढयाशी एकरूप झालेली आहे.  त्या निर्मळ सुताच्या धाग्यांत स्वातंत्र्याचा अतूट धागा मिसळलेला आहे.

स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेंत चरका व सूत आहे.  परंतु तें बंधनकारक नाहीं.  ज्यांना त्याचा प्रामाणिकपणानें उच्चार करावयाचा नसेल ते तेवढा भाग वगळूं शकतात.  कम्युनिस्टांनी शिस्त म्हणून प्रतिज्ञा घेण्याचें ठरविलें आहे.  पुरोगामी गट ३० सालची प्रतिज्ञा वाचील असें कळतें.  परंतु निरनिराळया प्रतिज्ञांसाठी पृथक्  स्वातंत्र्यसभा घेणें बरें नाहीं.  मुख्य सभांत सामील होऊन जो नवीन भाग नको तो म्हटला नाहीं म्हणजे झालें.

जग बदलत आहे व स्वातंत्र्य मिळविण्याचे निश्चयानें हिंदुस्थान उभा आहे.  केवळ सत्तेची आम्हांस आसक्ति नाहीं, हें खर्च्या क्षणांत फेकून काँग्रेसनें सिध्द केले आहे.  बॅ. जिना व इतरेजन यांचे आरोप निराधार आहेत.  असें प्रांतिक गव्हर्नरांच्या सांगण्यावरून व्हाइसरायांनी सांगितलें आहे.  अधिकच प्रशांत व पवित्र तेजानें काँग्रेसचा यशश्चंद्रमा आज मिरवत आहे.  काँग्रेस कोणाचेंहि अहित करणार नाही.

 

२६ जानेवारी स्वातंत्र्यदिन    ३०

आपली तुरुंगाची भीति गेली आतां मरणाची दवडूं या.

-- देशबंधु दास

ज्या एका शब्दानें कोटयवधि लोकांची हृदयें उचंबळतील असा कोणता बरें शब्द?  ज्या शब्दांसाठीं आजपर्यंत अनंत लोकांनी अमोल अशी स्वत:ची जीवनें हंसत हंसत अर्पण केलीं, तो कोणता बरें शब्द?  कोणत्या शब्दासाठी अशी कुर्बानी झाली, असें बलिदान झालें? कोणत्या शब्दासाठीं भविष्यकाळींहि असेच लाखों संसारांचे होम होतील?  तो शब्द म्हणजे स्वातंत्र्य.

स्वातंत्र्य कोणाला नको?  पशुपक्ष्यांनाहि स्वातंत्र्य आवडतें.  झाडें-माडेंहि स्वातंत्र्य इच्छितात.  दुस-याच्या छायेंत शेतें-भातें पिकत नाहींत, झाडेंमाडें फुलत फळत नाहींत.   स्वातंत्र्याशिवाय सुख नाहीं, विकास नाहीं, आत्म्याची भेट नाहीं.  स्वातंत्र्य, स्वातंत्र्य!  कोठें आहेतें स्वातंत्र्य? जगांत अद्याप खरें स्वातंत्र्य नाहीं.  ज्या वेळेस एक राष्ट्र दुस-याची, एक जात दुस-या जातीची, एक समाज दुस-या समाजाची,  एक वर्ग दुस-या वर्गाची जेव्हां पिळणूक करणार नाहीं, तेव्हां स्वातंत्र्याची प्रभात येईल. जेव्हां एक राष्ट्र दुस-या पिळवणूक करणा-या राष्ट्रांस कसलेंहि सहकार्य देणार नाहीं तेव्हां खरें स्वातंत्र्य येईल.  आज इंग्लंड स्वातंत्र्याचे अभिमानी नाहीं, कारण त्यानें ३५ कोटींना गुलाम ठेवलें आहे.  आज फ्रान्स स्वातंत्र्यप्रिय नाहीं.  कारण हिंदी राष्ट्राला गुलाम करणा-या इंग्लंडचें तें दोस्त आहे.  आज अमेरिका स्वातंत्र्यभक्त नाहीं;

चीनवर हल्ले करण्यासाठीं जपानला अमेरिका युध्दसामुग्री विकते.  इटली, जर्मनी यांनाहि दुस-याच्या वसाहती पाहिजे आहेत;  म्हणजे स्वत:साठीं दुस-याची पिळवणूक करावयाची आहें.  खरें स्वातंत्र्य अद्याप जन्मावयाचें आहे.

त्या स्वातंत्र्याचा जन्म कदाचित् पुरातन भारतवर्षांत होईल.  त्यासाठीं महान् भारत अद्याप उभा आहे.  जगाचे स्वातंत्र्याचे प्रयोग पाहून त्यांतून सार घेऊन, त्यांतून धडे घेऊन, भारत एक अभिनव प्रयोग करीत आहे.  हिंदुस्थान स्वतंत्र होऊ पहात आहे.  परंतु दुस-याला गुलाम करण्यासाठीं नाहीं.  जगांतील सारीं राष्ट्रें सुखाने नांदावींत, जगांत सर्वत्र सर्वांना विकासास अवकाश असावा असें भारत मानतो.  हा स्वातंत्र्याचा लढाहि अनत्याचारी मार्गांने हिंदी जनता लढत आहे. भारताची मान नम्र अभिमानानें आज उंच आहे.  हिमालयाप्रमाणें तो धैर्यानें उभा आहे, सागराप्रमाणें नव आशेनें उचंबळत आहे.

महात्मा गांधींसारखा युगपुरुष मिळाला आहे. भगवान् आद्य शंकराचार्यांनी तीन वस्तू दुर्लभ म्हणून सांगितल्या आहेत.  मनुष्यत्व, मुमुक्षुत्व व महापुरुषसंश्रय.  मनुष्य जन्म मिळणें कठीण, मुक्त होण्याची उत्कंठा लागणे दुर्मिळ व मुक्त होण्याचा मार्ग दाखविणारा महापुरुष भेटणें त्याहून कठीण.  परन्तु आज या तीन गोष्टी आपणांजवळ आहेत.  आपण निर्भय व स्वाभिमानी होऊन माणसें बनत आहोंत.  स्वातंत्र्य होण्याची तळमळ आपणां सर्वांस लागली आहे.  आणि स्वातंत्र्याचा पंथ दाखविण्यासाठीं सत्यावर, प्रेमावर, संयमावर, श्रध्देवर उभा राहणारा महात्मा लाभला आहे.  त्या महात्म्याच्या मार्गदर्शकत्वाखालीं आपण २० वर्षे अंधारांतून प्रकाशाकडे जात आहोत.  अद्याप प्रकाश दूर आहे.   परन्तु तांबडे फुटूं लागलें आहे.  आतां शेवटचे प्रयाण करूं या.

   

काँग्रेस-प्रीति म्हणजे शेवटीं दरिद्रनारायणाची प्रीति.  ती ज्याचा जीवनांत उत्कटत्वनें प्रकट होईल तोच काँग्रेसचा सच्चा सेवक. कां. बद्दल जनतेंत तेव्हांच आदर व भक्ति वाढेल जेव्हां गरिबांची दु:खें दूर करण्याची शक्ति असलेले काँग्रेसमधील वरिष्ठ वर्ग गरिबांशी यथार्थाने एकरूप होऊं लागतील.  काँग्रेसमधील वरिष्ठ वर्ग जेव्हा श्रमजीवी जनतेची दु:खें स्वत:ची समजूं लागतील, त्यांच्या उपासमारीची, त्यांच्या मुलांबाळांची कल्पना मनांत येऊन या वरिष्ठ वर्गीयांना जेव्हां विंचू डसल्याप्रमाणें वेदना होऊं लागतील, व्याजाचा दर ३ च काय, २ हि चालेल असें आनंदानें म्हणूं लागतील, तेव्हां काँग्रेसमध्यें शुध्दि येईल.  कोटयवधि कष्ट करणा-या बंधुभगिनींच्या सुखासमाधानांत आमचें समाधान, त्यांना तोषवा ; त्यांचा दुवा घ्या, असें काँग्रेसमधील सारें लोक जेव्हां म्हणूं लागतील, सत्ताधारी, सूत्रधारी याप्रमाणें वर्तूं लागतील, तेव्हां काँग्रेसचें बळ हां हां म्हणतां वाढेल असें करणें, असें वागणें म्हणजेच सत्याचा साक्षात्कार आहे.  असें करणें, असें वागणें म्हणजे अहिंसा जीवनांत आणणें होय.  'हें तर कठीण काम आहे ' असें जर वरिष्ठ वर्ग म्हणतील तर त्यांना नम्रपणें सांगावेंसे वाटतें कीं 'सत्य अहिंसा स्वस्त नाहींत.  संत काय सांगतात ऐका :--

म्हणे व्हावीं प्राणांसवें ताटी
नाहीं तरीं गोष्टी बोलूं नयें ॥'

-- वर्ष २, अंक १४

 

बरें, ज्या गरिबाला हें सारें महाग पडतें, तो निरुद्योगी असतो का?  नाहीं.  तो रात्रंदिवस श्रमतो, कष्ट करतो.  त्याच्यामुळें जगांतील सर्वांची पत असते.  आज ब्रिटिश साम्राज्याची पत आहे, व्यापा-यांची पत आहे, ही पत कोण टिकवतो?  शेतकरी शेती करणार नाहीं व कामगार काम करणार नाहीं तर ही पत टिकेल का?  घराचा पाया गेला, तो खचला तर घर टिकेल का?  ज्या श्रमणा-या किसान कामगारांच्या घामानें दुनियेंतील सर्वांची पत टिकते त्या श्रमजीवी लोकांची मात्र आजच्या समाजांत पत नाहीं.  त्याला महाग धान्य, त्याला घाणेरडा माल, त्याला भरमसाठ व्याजाचा दर! केवढा अन्याय, केवढें असत्य!

ज्या धनिकांनी शेतक-यांस कर्जें दिलीं ते पैसे धनिकांनीं कोठून आणले? सारी संपत्ति श्रमांतून निर्माण होते.  जे १०० रुपये आज मी माझे म्हणून शेतक-यांस कर्ज देतों ते १०० रुपयेहि त्या शेतक-याच्या श्रमांतूनच जन्मले होते.  ते त्याचेंच पैसें आहेत.  ते पैसे तुझ्याकडे ठेव होती.  ती ठेव नम्रपणें त्या शेतक-यांस परत कर.  परंतु तसें करण्याऐवजीं त्या शेतक-याचा अपमान.  ते त्याला दारांत उभे करीत नाहींत.  त्याला शिव्या देतात.  शंभर देऊन दोनशें लिहून घेतात.  व्याजाचें भरमसाठ दर.  आणि या प्रकारास न्याय व सत्य अशी पुन्हां संज्ञा दिली जाते.  शिव शिव!

सर्व संपत्ति श्रमजीवींनीं निर्मिली आहे असें कबूल केलें तर कर्ज हा शब्दच शिल्लक राहाणार नाहीं.  परंतु आज ही गोष्ट शक्य नाहीं.  सारें कर्ज रद्द करा असें जर कोणीं म्हटलें तर त्यांत केवळ सत्यच आहे असें मला वाटतें.  आज तसें करणें शक्य नाहीं.  परंतु दुस-या कांही गोष्टीं मनांत आणूं तर करूं शकूं.  त्यासाठीं प्रयत्न तरी व्हावा.  मग गव्हर्नर आड आला तर बघतां येईल.

शेतक-याच्या कर्जाचा विचार करतांना शें. ३ पेक्षा अधिक व्याजाचा दर धरणें पाप होईल.  ज्याला तहशील भरतां भरतां मरण बरें वाटे, खंड भरतां भरतां डोळयांत पाणी आणावें लागे ; ज्यास मुलाबाळाच्या तोंडचा घास काढून ठेवावा लागे, बायकोच्या अंगावरची लक्तरें बघावीं लागत, त्याचे जवळून कसलीं मागतां व्याजें, कसलें धरतां दर! परन्तु तेवढी उदारता, तेवढी न्यायप्रीति  आज नसेल तर घ्या व्याज.  परन्तु तें अत्यंत कमी घ्या. शेकडा ३ दर पुरे.  सावकारांनी, कारखानदारांनी आपण कोणावर जगतों हें ध्यानीं घ्यावें.  कृतज्ञता दाखवावी.  नाशिक जिल्ह्यातील सावकारी व्यापारी परिषदेंत शेंकडा १२ दर सुचविण्याऐवजीं बिलांतील ६ व ९ हें दर कमीं करून ३ च दर धरावा, मोठमोठया साम्राज्यांपेक्षां शेतकरी अधिक संपन्नमान नाहीं, असें जर ठरलें असतें तर त्या परिषदेंत माणुसकी व कृतज्ञता असलेंली माणसें जमलेलीं होतीं असें देवाने म्हटलें असतें.  परंतु त्यांनी बाराचा ठराव केला!  गरिबांच्या संसाराचे बारा वाजण्याचीं बाबांनो वेळ आली.  आतां बारा एके बारा, न बोलता, बे एके बे किंवा तीन एके तीन बोला.  परंतु जगांत माणुसकी मोठया वर्गांत उरली नाहीं.  जे स्वत:ला काँग्रेसचे सेवक म्हणवतात, महात्माजींचे प्रामाणिक अनुयायी म्हणवितात, गरिबांशी हृदये जोडणारी खादी अंगावर घालतात, त्या श्रीमंतांनी,  त्या व्यापा-यांनी,  त्या कारखानदारांनी, तरी काँग्रेस सरकारला सांगितलें पाहिजे ' तीनच व्याजाचा दर धरा व हिशेब करा.  ४ म्हणजे डोक्यावरून पाणी '  महात्माजींचे होणें म्हणजे मरणाचें होणें, त्यागाचें होणें.  ती गंमत नाहीं.  सत्य व अहिंसा शब्द आज स्वस्त झाले आहेत.  कांहीं व्यापा-यांनी व सावकारांनीं सत्य अहिंसेच्या पूजेसाठी माझें हें काँग्रेस पत्र खेडयांतून जात असे तेथील शेतक-यांना ते बंद करावयास लाविलें.  ज्या सावकारांना सत्याची येवढी चाड ते कुळांना त्यांच्या जमिनी परत देतील का, हरिजनांना प्रेमानें घरांत घेतील का, व्याजाचे दर कमी व्हावे म्हणून मरतील का?  काँग्रेसपत्र असत्य व हिंसा यांचे कांटे पेरीत असेल तर जगाच्या कल्याणासाठीं ते बंद करणें सेवाच ठरेल.  परंतु तुम्ही तरी सेवेचे, सहानुभतीचे, प्रेमाचे, माणुसकीचे जीवनदायी मेघ बना व संसार सुंदर करा.

   

पुढे जाण्यासाठी .......