बुधवार, जानेवारी 20, 2021
   
Text Size

गोड निबंध - २

चित्र :-- सुखाचा व स्वातंत्र्याचा सूर्य वर आहे. परन्तु अज्ञानाचे ढग घराभोवती असल्यामुळें त्याचा प्रकाश मिळत नाहीं.  मशिदी, मंदिरे, चर्च, त्या चित्रांत आहेत, ढगांत गुरफटलेले गांव आहे.

हें चित्र नीट समजून घ्या.  देवाची अशी का इच्छा असेल कीं तुम्हीं दु:खात असावें ? आईला कधीं वाटतें का, आपली लेकरें दु:खी असावी?  परमेश्वर जगन्माऊली आहे.  त्यानें आपल्या सुखाचा सूर्य सर्वांसाठी तळपत ठेवला आहे.  परन्तु ढग आड आले तर?  हें आपलें अज्ञान आड येतें, व सुखाचा किरण घरांत येत नाहीं.  येथें हीं मंदिरें, मशिदी, चर्च दाखवले आहेत.  याचा अर्थ हा कीं हिंदुस्थानांत नाना धर्म आहेत.  मशिदींत, मंदिरांत, चर्चमध्ये जाणारे आहेत.  सा-यांनी शिकलें पाहिजे.  हे सारे हिंदुस्थानचेच लोक.  ते आतां कोठें जाणार?  मलबार किना-यावरचे ख्रिश्चन येथेंच राहणार.  या सर्वांनी शिकावें.  या मंदिरांतून, मशिदींतून सुंदर ज्ञान देणा-या शाळा निघाव्यात.  तेथें ज्ञानाचा प्रकाश मिळावा असा हेतु आहे.  कांही लोकांनी शिकून भागणार नाहीं.  सारें शिका.

चित्र :-- म्यु.टीचा मनुष्य शिडी घेऊन कंदील लावीत आहे.

तुम्ही म्हणाल या चित्रांत काय आहे मोठेंसे?  परन्तु त्यांत फार अर्थ आहे.  म्यु.टीस सांगाल का कीं,  एका गल्लींत दिवा लावला म्हणजे सर्व शहराला पुरें?  नाहीं.  असें म्हणणार नाहीं.  दिवा प्रत्येक गल्लींत हवा.  गल्लींत दहा दहा दिवे हवेत.  ज्ञानाचें असेंच आहे.   आपण म्हणतों, ''बामणांनीं शिकावें, कुणब्यांनी कशाला? ''  परंन्तु तुम्ही म्हणाल का, ''बामणांच्या गल्लींत म्यु.टीनें दिवा लावावा.  किसान कामगारांच्या गल्लींत नको? ''  तुम्हीं म्हणणार नाहीं.  त्याप्रमाणें ज्ञानाचा दिवा सर्व जातींत गेला पाहिजे.  जो जो माणूस म्हणून आहे, त्याला ज्ञान हवें;  लिहिता वाचतां आलें पाहिजे.  खरें ना? 

चित्र :--शेताच्या बांधावर एक सुखी शेतकरी बसला आहे.  दुसरा एक दु:खी शेतकरी त्याच्या समोर उभा आहे.

हें चित्र शेतक-यांनी नीट बघावें.  हा शेतकरी आनंदी आहे.  हा दुसरा रडत आहे.  कां बरें असें?   तो दु:खी शेतकरी त्या सुखीं शेतक-याला विचारतो, ''तूं कां सुखीं, मी का दु:खीं?  तूं काय पुण्य केलेंस, मी काय पाप केले?''  त्या सुखी शेतक-याच्या हातांत ती पहा वहीं आहे.  ती जमाखर्चाची वही आहे.  तो सांगतो.  ''मी जमाखर्च नीट ठेवतों.  हिशोब ठेवतों.  सावकार, सरकार ह्यांचे जवळून पावती घेतों.  यंदा पीक आलें नव्हतें.  मामलेदाराला हिशोब दाखविला.  त्यानें सारा  सूट दिली. ''  तूंहि गेला होतास सारा माफी मागायला.  मामलेदार म्हणाले, '' जमाखर्च दाखव.''  तुला दाखवतां आला नाहीं.  ज्ञान हवें, लिहिणें, वाचणे आलें पाहिजे.  माझ्याप्रमाणें शीक.  रात्रीच्या काँग्रेसने काढलेल्या वर्गांमध्यें जात जा. 

चित्र
:-- तुरुंगात कैदी शिकत आहेत.  त्यांना काँग्रेसचे मंत्री शाबासकी देत आहेत.

हा तुरुंगाचा देखावा आहे.  पूर्वी कैद्यांचे फार हाल होत.  त्यांना तेथें माणुसकी नसे.  परन्तु चोर तरी चोरी कां करतो?  त्याला खायला नसतें, धंदा मिळत नाहीं.  काँग्रेसच्या लक्षांत हे सारें आहे.  तुरुंगात हाल न करतां या पहा शाळा काढल्या आहेत.  सारे कैदी शिकत आहेत.  हे काँग्रेस मंत्री या कैद्याला शाबासकी देत आहेत.  तुरुंगातहि शाळा निघाल्या, मग तुमच्या घरीं नाहीं का शाळा सुरू करणार! मुलाबाळांजवळ शिका.  तुरुंगाहून घरें नीच करूं नका.

 

चित्र :-- तीन फणांचा एक सर्प.  मधली फणा साम्राज्य सरकारची.  एका बाजूची भांडवलवाल्यांची, दुसरी बाजूची धर्माच्या गप्पा मारणारांची. 

हे पाहा भयंकर चित्र.   हा विषारी साप फुस्फुस करीत आहे.  कोणावर फूत्कार करतो?  गरिबांवर, श्रमणा-या जनतेवर.  हा मधला साप म्हणजे कलेक्टर, गव्हर्नर वगैरे.  हा सरकारी साप.  परन्तु या सापाला दुसरे साथ देतात.  ही भांडवलवाल्यांची फणा.  हे सरकारच्या पाठीशीं असतात.  कलेक्टर, प्रांत यांना ते पानसुपा-या करतील.  कोणा सावकारानें शेतक-याला केली का पानसुपारी?   कामक-यांनी संप केला कीं, मालकाचे संरक्षण करायला सा-या फौजा उभ्या राहतील.  मालकहि सरकारला कर्ज देतो, मदत करतो.  आणि ही तिसरी फणा धर्माच्या नांवाने भुलवणा-यांची.  हे सांगतात, 'श्रीमंतानें पूर्वजन्मी पुण्य केलें म्हणून तो गादीवर, तूं पाप केलंस म्हणून दु:खांत. '  असला चावटपणा हे चालवितात.  रात्रंदिवस उन्हातान्हांत कष्ट करणारा तो का पांपी?  त्याच्या घामाचा एक थेंब या सर्व शेठजींना उध्दरील.  परन्तु ही पवित्र धर्मगंगा त्यांना पापाची वाटते.  गादीवर लोळणारा ऐतोबा पुण्यवान आणि श्रमानें जगणारा म्हणे पापी!  असा हा तीन फणी साप आहे.  या सापाला पकडावयाचें असेल तर शहाणे व्हा.  जगाचा इतिहास शिका.  लिहा, वाचा.  तुमच्या हातांत ज्ञान आलें म्हणजे हा साप पकडतां येईल.  मग त्याचे विषारी दांत काढून घेऊं.  गारुडी सापाला निर्विष करून त्याचा खेळ करतो.  आपणांस साप मारावयाचे नाहींत.  त्यांना निर्विष करावयाचें आहे.  समजलें ना ?

चित्र :-- एक उसाच्या गु-हाळासारखें चित्र.  चरकांतून माणसें चिपाडाप्रमाणे होऊन बाहेर पडत आहेत.

हें चित्र पहा व रडा.  हें गोड गु-हाळ नव्हें.  हें जीवन-मरणाचे गु-हाळ आहे.   यांत माणसें पिळली जातात.  शेतक-यांत, कामक-यांत त्राण राहिलें नाहीं.  आपल्यामधील एक चांभार कामगार रक्त ओकला.  पुन्हां दोन दिवस गेल्यावर कामावर गेला.  पुन्हां रक्ताची गुळणी.  कोठें जाणार तो?  कामावर न जाईल तर खाईल काय?  कामगारांनी युनियनमार्फत २५ रु. देऊन त्यास नाशिकला जा सांगितलें.  परन्तु गरीब कामगार किती देणार?  हें मालकाचे काम आहे.  कामगारांचे मायबाप त्यांनी झालें पाहिजे.  ती कृतज्ञता आहे.  परन्तु आज कोण लक्ष देतो!  हिंदुस्थानांत अशी ही भेसूर हिंसा चालली आहे.  ही केव्हा थांबणार?

चित्र
:-- एक मुलगा पतंग उडवूं बघत आहे  परन्तु त्याला एक भलें मोठें वजन त्यानें बांधलें असल्यामुळे पतंग उडत नाहीं.

या चित्राचा समजला का अर्थ?  मुलग्याचा पतंग उडेल का?  पतंगाला रंगीत कागद, नीट मांजा, सारें आहे.  परन्तु हें अदमणाचें वजन जर त्याच्या शेंपटीला बांधले तर पतंग कसा उडेल?  त्याप्रमाणें आपल्या देशाची मान उंच व्हावी, देश वर जावा, म्हणून कितीहि खटपटी केल्या तरी अज्ञानाचें दडपण जोंपर्यंत प्रत्येकाच्या मानेवर आहे, तोपर्यंत देश कसा वर जाईल?

 

२६ 'साक्षरता प्रदर्शन'

अमळनेरच्या साक्षरता  प्रदर्शनांत  जळगांवच्या  साक्षरता  समितींचे  चित्र व अमळनेरच्या श्री. टिल्लू व श्री. सोनार या शिक्षकांनी काढलेलीं एकूण ५०/६० चित्रें होतीं.  ही चित्रें समजावून सांगतांना जवळ जवळ व्याख्यानेंच द्यावी लागत.  लोक किती  शिकतात तें  पाहूं.  परंतु हजार बायामाणसांच्या कानांवर प्रदर्शनाच्या निमित्तानें निर्भय व निर्मळ विचार गेले, हेंहि एक मोठेंच काम झालें.  चित्रें काय होतीं, आम्हीं कसें सांगत असूं याची कल्पना खालील वर्णनावरून थोडी होईल.

चित्र :-- एक शेतकरी कर्जाच्या बोज्याखालीं वांकला आहे, त्याच्या हातापायाच्या काड्या झाल्या आहेत.  कोप-यांत एक कामगार क्षयरोगानें पडला आहे.  एक बाजूस भटजी शनिमाहात्म्य वाचिताहेत.

असें हे चित्र होतें.  आम्ही सांगत असूं :

हा पहा शेतकरी.  हा दुनियेला पोसतो.  खंडोगणती धान्य निर्माण करतो.  परन्तु त्याच्या पोटाला भाकर नाहीं.  त्याचीं मुलेंबाळें उपाशी.  त्याच्या बायकोला नीट वस्त्र नाहीं.  कां  हें  असें?  हा अन्याय नाहीं का?  त्याला असो नसो,  सावकार जप्ती आणतो.  त्याला असो नसो तहशील चुकत नाहीं.  त्याच्या धान्यावर दुनियेचा हक्क;  परन्तु तो उपाशी आहे.  त्याचें धान्य विकून व्यापारी हवेल्या बांधतात ; परन्तु त्याचें घर पावसांत गळतें.  जगाला हा सुखाच्या स्वर्गांत ठेवतो, परन्तु स्वत: उपासमारीच्या, गुलामगिरीच्या, अपमानाच्या, नरकांत राहतो.  असे कां?  आणि हा पहा कामगार.  त्याच्या अंगावर कपडा नाहीं.  त्याचे गाल बसले आहेत.  क्षयी आहे तो.  त्याच्या भोंवती डांस गुणगुणत आहेत.  हा कामगार हजारों वार कपडा तयार करतो;  परन्तु त्याच्या अंगावर चिंधी नाहीं.  त्याला पगारी रजा नाहीं.  कोठला दवा, कोठली चांगली हवा ?  असें कां? शेतकरी, कामकरी दैवाला बोल देतात.  भटजींकडे जाऊन म्हणतात, 'कुंडली पहा.  ग्रहमान बघा.  साडेसाती आहे का बघा.'  हे कुडबुड्ये जोशी म्हणतात ; 'शनि वाकडा आहे.  दान करा, अभिषेक करा. 'शनि हा सूर्यचंद्रासारखा एक ग्रह आहे.  भिंगातून पाहूं तर त्याचें रूप दिसेल.  तो वांकडें पहात नाहीं.  तो कंदिलासारखा जळत आहे.  वांकडें जर बघत असेल कोणी तर तो मालक बघतो.  गिरणीचा मालक पगारी रजा देईल, हवेशीर चाळी बांधील, तर कामगार जगेल.  सावकार छळणार नाहीं.  सरकार तहशील कमी करील, तर शेतकरी जगेल. शनि नाहीं, मंगळ नाहीं.  साडेसाती नाहीं, कांही नाहीं.  आपण विचार केला पाहिजे.  जगांत काय चाललें आहे, ही अशी स्थिति कां हें समजून घेतलें पाहिजे, संघटना केली पाहिजे.  यासाठी शिकले पाहिजे.

चित्र :-- गाडींत एक  ढब्बू गृहस्थ आहे.  त्याची गाडी मरतुकडा मजूर ओढीत आहे.  ढब्बू त्याला जोरानें ओढ असें हात लांब करून सांगत आहे.

हें पहा चित्र.  श्रीमंताचे संसार तुम्ही चालवले आहेत.  त्यांचे गाडे तुम्ही ओढीत आहांत ; परन्तु तुम्ही मेलेत तरी त्यांना पर्वा नाहीं.  त्या मजुराचें पोट पाताळांत गेलें आहे.  या ढब्बूचें पोट बघा.  तरीहि गाडी जोरानें ओढ म्हणून म्हणतच आहे.  तेलाच्या गिरण्यांतून १२/१२, १४/१४ तास काम करून घेतात.  मेलेत तर दुसरे मिळतील म्हणतात.  तुम्हीं हें ओळखून घेतलें पाहिजे कीं, सारी दुनिया आपल्यावर जगते.  आपण नांगरलें नाहीं तर हे का माती खातील ?  गाडा खाली ठेवूं या.  संप पुकारूं या.  मग हे मरूं लागले म्हणजे ताळयावर येतील.  परन्तु आपली एकी हवी.  इतर देशांत किसान, कामगार, कसे पुढें आले तें वाचलें पाहिजे.

   

बंधूंनो, तो म्हशीचा हेला नका आतां मारूं ; हृदयांतील व समाजांतील हेले दूर करा.  ज्यानें मनांतील लोभ दूर केला तोच निर्लोभ व निर्भय वीर बाहेरचा हेलाहि दूर करूं शकतो.  महात्माजींनींहि मनांतील हेले मारीत मारीत बाहेरचे सामाजिक व राजकीय पध्दतीचे हेले दूर करण्याचें बळ मिळविलें.

जगांतील साम्राज्यशाह्या म्हणजे बाहेरचा हेला.  गरिबांवर या साम्राज्यशाह्या डोळे वटारतात, शिंगे उगारतात;  गरिबांचे संसार धुळींत मिळवितात.  तसेच भांडवलशाही, अमुक वर्ण श्रेष्ठ तमुक श्रेष्ठ असली भांडवलशाही, याहि हेले पध्दतीच.  या नष्ट करण्यासाठीं जो उठेल त्याला हेला मारण्यांतील अर्थ समजला.  हिंदी जनतेला हे आसुरी पध्दतीचे राजकीय व सामाजिक हेले दूर करावयाचे असतील तर मनांत निर्भय व नि:स्वार्थ होऊन उठावें.  आपसांतील भांडणे दूर करून उठावें.  नि:स्वार्थ वीरांचाच संघ विजयी होऊं शकतो.

जहागिरदार संस्थानिक हे हेले मारतात.  परंतु स्वत:च्या प्रजेला ते छळतील तर त्यांची राजवट, म्हणजेच हेल्यासारखी होते.  या संस्थानिकांनी, श्रीमंतांनी म्हशीचे हेले न मारतां, आपली जुलमी सत्ता नष्ट करावी, किसान कामगारांचे कल्याण करावें, स्वत:चे कामक्रोध, लोभ, मत्सर कमी करावे.  असें ते करतील तरच खरी विजयादशमी, तरच खरें सीमोल्लंघन.  सीमोल्लंघन  केल्याशिवाय विजय नाहीं.  प्रांतांनी प्रांताबाहेर, देशांनी देशाबाहेर पाहिल्याशिवाय जगांतील परिस्थिति, विचार-वारे समजल्याशिवाय कसा विजय मिळेल?   दुसरें पहावयास शिकलें पाहिजे.  मनुष्य आपलें घर, आपला देह, आपला संसार, स्वत:ची सुख-दु:खें यांच्या पलीकडे न पाहील तर कोठला विजय?

मी माझ्या लहानग्या संसाराची सीमा ओलांडून पलीकडे असणारें लाखें बंधू-भगिनींचे संसार पाहिले पाहिजेत.  माझ्या डबक्यांतून मी मधून मधून नदींत व मधून मधून सागरांत गेलें पाहिजे;  विशाल दृष्टीचें झाले पाहिजे.  हिंदूंनी हिंदुत्वाची सीमा ओलांडून मुसलमान बंधूंशी जावें स्पृश्यांनी अस्पृश्यांजवळ जावें, जरा सीमा ओलांडा.  दुस-याला हृदयाशीं धरा.  माझे दोन भाऊ आहेत.  मरतांना या दोहोंचे २०० तरी मी केले असतील, माझे बंधुत्वाचें नातें अनेकांशी जोडलें असेल तर मी सीमा ओलांडली.  आपल्या जातीबाहेरचे, या आपल्या धर्माबाहेरचे किती नवीन मित्र जोडले, किती सीमा ओलांडली, तें दर वर्षी माणसानें पहावें.  ज्याच्या ज्याच्याबद्दल दुजाभाव वाटतो, त्याचेजवळ जाऊन म्हणावें '' सहनाववतु सहनौ भुनक्तु '' ये एकत्र राहूं, एकत्र खाऊं, एकत्र शिकूं, जगांत खरी शांति आणूं.  जीवनाची संकुचित सीमा ओलांडून जो असा दरसाल, दरदिन, दरघडी पुढें जातों, तो विजयी होतो.  त्याला शत्रूच शेवटीं रहात नाहीं.  त्याला व्यक्ति शत्रु नाहींत.  सामाजिक, राजकीय जुलमी पध्दति एवढाच मग त्यास शत्रू उरतो व त्यावरहि तो विजय मिळवितो.  हें खरें सीमोल्लंघन करूं या, विजय मिळवूं या.  विजया-दशमीसच काँग्रेसनें लढा पुकारण्याचे ठरविलें आहे.  काँग्रेसमंत्री राजीनामे देणार.  पुढें लढा पेटला तर सारे तयार रहा.  भांडणें मिटवून, स्पृश्यास्पृश्य भेद दूर करून, हृदयांतील स्वार्थ-मत्सर कमी करून या जगांतील साम्राज्यशाहीरूप हेले दूर करण्यासाठी तिरंगी झेंडयाखालीं एक आवाजानें उभे राहूं या.

-- वर्ष २, अंक ३०

 

२५ हेला मारणे

विजया दशमी दिवशीं नगरदेवळें येथें श्री अण्णासाहेब दास्ताने यांचे व्याख्यान झालें.  मी समारोपाला गेलों होतों.  परन्तु त्या दिवशी तेथें हेला मारला जावयाचा होता.  दरवाजामध्यें एक खळगा खणलेला होता.  त्यांत त्या हेल्याचें मुंडके पुरावयाचें होतें.  मी खिन्न होऊन बसलों.  मंडळी मला म्हणाली,  'शिलांगणाला येतां? ' मी ' नाही ' म्हटलें.  माझ्या डोळयांसमोर कारुण्यसिंधू भगवान बुध्द आले.  यज्ञांत बकरे, बोकड बळी दिले जाऊं नये, म्हणून बुध्द त्या राजाच्या यज्ञांगणांत उभे राहिले व म्हणाले , 'मला मार.  त्या बोकडाला नको मारूं.'  माझ्याजवळ कोठून येणार तें धैर्य, ती अपार भूतदया!  मी म्हटलें, ' आपली शक्ति आपण ओळखावी.   माझ्या सांगण्यानें काय होणार?  हंसतील झालें.'

ही हेला मारण्याची पध्दत का निघाली?  काय हेतु?  नवरात्रांत नऊ दिवस महिषासुराजवळ देवींने युध्द केलें व दहाव्या दिवशीं महिषासुरास तिनें ठार मारिलें.  देवीला विजय मिळाला.  त्याची आठवण म्हणून महिष मारतात.  महिषासुर दिसत नाहींत, किंवा दिसत असून ते दूर करण्याची ताकद नाहीं, म्हणून हेला पकडतात व त्याला ठार मारतात.

पूर्वी एकदां महिषासुर झाला कीं नाहीं मला माहीत नाहीं.  परन्तु महिषासुर हा दोन प्रकारचा आहे.  एक मनातील व एक बाहेरील.  या दोघांना दूर करून माणसानें विजय मिळवावयाचा असतो.  हृदयांतील महिषासुर म्हणजे काम, क्रोध, लोभ, मत्सर यांचा संघ.  ज्याच्या हृदयांत कामक्रोधांची ठाणीं बसलीं, त्याच्या हृदयांतून आत्मारामाची सुखदायी सत्ता नष्ट होते, कामक्रोधांची साम्राज्यशाही सुरू होते.  सर्व इंद्रियांना एक दिवस मनुष्य मारतो.  व आत्म्याचें राज्य स्थापतो.  भगवान् बुध्दांचा विजयादशमीलाच जन्म झाला.  कामक्रोधांवर विजय मिळविणारे बुध्द या दिवशीं जन्मले.  त्यांनी हा एडका मदन, हा हेलामदन ठार केला.  आत्म्याची सत्ता स्थापिली.  तुकाराम महाराजांनी म्हटलें आहे :

रात्रंदिन आम्हां युध्दाचा प्रसंग
अंतर्बाह्य जन आणि मन ॥ १ ॥


रात्रंदिवस युध्द आहे.  गरिबाला पिळणारी बाहेरची दुष्ट राजकीय सत्ता हा हेला, हृदयांतील कामक्रोध हा दुसरा हेला.  या दोन्ही हेल्यांशी संत झगडतात.  समाजांतील अस्पृश्यतेसारख्या गुलामीच्या चाली.  त्यांच्या विरुध्द संतांनी बंड केलें.  मिरासदारांची मिरासी, वरिष्ठ वर्णियांची खोटी घमेंड व आसुरी वृत्ति असा हा रूढीचा दुष्ट हेला संत मारायला उठले.  त्याचबरोबर हृदयांतील हेलाहि मारावयास ते झटत.

   

पुढे जाण्यासाठी .......