शनिवार, डिसेंबर 05, 2020
   
Text Size

गोड निबंध - २

व्हाइसराय, सेक्रेटरी यांची निराशाजनक उत्तरें ऐकल्यावर महात्माजींनी हिंमत खचूं न देता सा-या जगाचें हंसे होणा-या हिंदुस्थानला एकदम कायदेभंगाचा आदेश दिला नाही.  आपलीं छिद्रे शत्रुपेक्षां आपणांस माहित असायला हवीं. एकटया हिंदूंनी अगर एकटया मुसलमानांनी आपल्या प्रतिपक्षाशी लढून फायदा नाहीं.  पं. जवाहरलाल यांनी परवां सं.प्रा.कां. कमिटीपुढे जमलेल्या शेतक-यांपुढें बोलतांना सांगितले, ब्रिटिश सरकार आणि हिंदुस्थान यांच्यातील मतभेद आतां आकाश आणि पृथ्वी यांच्यातील अंतराप्रमाणेंच चिरंतन झाले आहेत.  काँग्रेसने सतत तडजोडीचें धोरण ठेवलें. ब्रिटिशांनी साम्राज्यशाही वृत्ति सोडली नाहीं. सरकार काँग्रेसविरुध्द दडपशाहीचा लोखंडी पंजा लवकरच उभारील असा संभव वाटतो.  विलंब लावल्यानें नुकसान नाहीं.  अहिंसात्मक संघटणा करा.  सरकार जातीय दंगे चळवळींच्या वेळी चेतवील, अशा गुंडापासून सावध रहा.  मला आशा आहे कीं मुस्लीमलीग मुसलमानांमध्ये एक नवी वृत्ति, नवा दृष्टिकोन निर्माण करील.  व आजच्या पेक्षाहि मुसलमानांत, आपसांत जातीजातींत परस्पर समजूत आणि विश्वास निर्माण होऊं शकेल.

गेल्या ८/१० दिवसांत पंडितजींच्या मेहनतीनें अनुकूल वातावरण निर्माण होत असल्याचें सुचिन्ह दिसत आहे.  जिना-जवाहरलाल यांची बोलणी पुन्हा डिसेंबरमध्यें सुरू व्हावयाचीं आहेतच.  परंतु जिनांनी आतांपर्यंत झालेल्या कामावरुन व पं.जवाहरलाल यांचे वागणुकीबद्दल चांगले शब्द काढले आहेत.  व त्यानंतर रमजान ईदला त्यांचे मुंबईला झालेलें भाषणहि थोडें उत्साहजनक आहे;  जनाब जीना म्हणतात,  आज रमजान ईदच्या दिवशीं उपासाच्या शेंवटीं आपण मनावर ताबा ठेवायला शिकलों नाहीं तर आजची प्रार्थना फुकट आहे.  खाजगी अगर सार्वजनिक जीवनांत स्वार्थ सोडून, देशाचें अंतिम हित डोळयापुढें ठेवूं या.  दुस-या जातींना व धर्मांना न दुखवता वागूं या.  माझ्या तरुण मुसलमान बंधूंनो, तुमचे विचार जिवंत, बदलणारे आहेत.  आपणांस राजकीय हक्क जास्तीत जास्त मिळवायचे आहेत खरे, परंतु आपले देशबांधवांना न दुखवितांना.  बंधुप्रेम व परमतसहिष्णुता हीं आचरणांत आणा.  तोच खरा इस्लाम धर्म!  दुस-यांच्या हक्कावर अतिक्रमण न करतां जेवढे मिळेल त्यांतच समाधान माना.

अशा रीतीनें यंदाचे दिपावळीच्या मुहूर्तावर हिंदूंनी व रमजान ईदच्या मुहूर्तांने मुसलमान बांधवांनी परस्परांविषयीं आदर बुध्दि ठेवून आपला स्वातंत्र्यमार्ग गळयात गळा घालून, हातांत हात घालून आक्रमूं या.  आपसांतील मतभेद नाहींसे करून घटना परिषद बोलावण्यासाठी ब्रि. सरकारला भाग पाडण्याची ताकद येऊं दे.  कारण तिसरी परकीय सत्ता आहे तोंपर्यंत जातीय शक्यता निर्माण झाली कीं कोणत्या तरी पक्षाशीं सौदा करून कोणाला तरी कांही तरी जास्त देऊन हिंदुस्थानचें स्वातंत्र्य दूर ढकललें जातें हे आपण ओळखून जनतेच्या प्रतिनिधींची घटना परिषद भरवून कायमची तडजोड केली पाहिजे.  तरच राजाजी म्हणतात, ''आपण विश्वस्त असल्याच्या व संस्कृतिप्रसारच्या वायफळ गप्पा मारूं नका.  हिंदुस्थानांतील हितसंबंधाची कमींत कमी किती पौंड शिलिंग पेन्स किंमत होते ती घेऊन पहिल्या बोटीने इंग्लंण्डात जा, जातीजातींत शांतता राखण्याचें ढोंग नका करूं.'' याप्रमाणे उत्तर देता येईल.  देव करो व जिना-जवाहरलाल तडजोडीची पूर्णता होवो.

-- वर्ष २, अंक ३२

 

२४ हिन्दुमुसलमान एकी

गेल्या पंधरवडयांत काँग्रेसचे पुढारी, जनाब जिना व व्हाईसरॉय यांची पुन: भेट होऊन त्यांतून कांही निष्पन्न होऊं शकलें नाही.  महात्माजी व राजेंद्रबाबू यांनी काँग्रेसची नेहमींचीच भूमिका पुन: ठासून सांगितली कीं तुम्हांला आमच्या हिंदु-मुसलमानांच्या भांडणाची चांभार चौकशी करावयची जरूर नाहीं, जें काहीं द्यायचें असेल तें ताबडतोब द्या.  दिल्यानंतर आम्हीं हवें तसें वांटून घेऊं.

हिंदुस्थानचें स्वातंत्र्य शत्रूच्या कमजोरीवर मिळायचें नसून आपल्या सामर्थ्यावर कमवायचें आहे.  आपण कमजोर असूं तर स्वातंत्र्य मिळाल्यावरहिं तें टिकवूं शकणार नाहीं.  महात्माजींच्या कल्पनेप्रमाणें स्वातंत्र मिळाल्यानंतर परचक्रापासून अहिंसेने संरक्षण कसें करतां येईल हा प्रश्न जरी सोडून दिला तरी हिंदुस्थानांतील सर्व पक्षांची आतां खात्री झाली आहे कीं अहिंसेशिवाय  स्वातंत्र्याचें दुसरें अनुकूल साधन नाहीं.  व आपसांतील दुही नाहींशी झाल्याशिवाय अहिंसेचा मार्ग यशस्वी होणार नाहीं.

हिंदुमुसलमान हे भेद ही आपल्या स्वातंत्र्यामध्ये मोठी धोंड आहे.  हे काल्पनिक भेद ब्रिटिशांचे राज्य हिंदुस्थानात आल्यावरच आपल्यामध्यें दिसू लागले व ब्रिटिशांचे अस्तित्व या दुहीवरच अवलंबून आहे. हे भेद धार्मिक असून त्यांचा हिंदी स्वातंत्र्याशी कांही संबंध नाहीं.  हिंदी स्वातंत्र्य हा राजकीय, आर्थिक प्रश्न आहे.  जकात-इन्कमटॅक्स व कुळकायदे, मजुरांचे संबंधीचे कायदे, विम्यासंबंधी कायदें, दारुबंदी, सडका, विहिरी, कालवें बांधणें वगैरे नागरिकांच्या हक्कामध्यें हिंदू-मुसलमान हा भेद येतों कुठें?  मुसलमानांसाठी किंवा फक्त हिंदूंसाठी दारुबंदीचा का फायदा मिळणार आहे किंवा कालव्याचें पाणी अमुक धर्माचे लोकांनाच का देण्यांत येणार आहे?  हिंदूंकरता अमुक सडक राखून ठेवण्यांत का येणार आहे?  हा का स्वातंत्र्याचा अर्थ?  हरिजनमध्यें आलेल्या एका अलिगडच्या एम.ए. च्या पत्रांत तो म्हणतो, 'हिंदुस्थानांत दोन राष्ट्रें आहेत ; हिंदु व मुसलमान.'  धर्म व राष्ट्र एक असेल तर जगांत फारच थोडी राष्ट्रें दिसायला हवीं.  तुर्कस्थान, अंगोरा, अफगाणिस्थान, इराण हीं मुसलमान राष्ट्रे वेगवेगळी कशाला हवीत? युरोपांतील व पश्चिम गोलार्धातील इतक्या ख्रिश्चन राष्ट्रांचा बुजबुजाट कां?  आणि मग रशिया, जर्मनी  व इतर दोस्त राष्ट्रें भांडतात तरी का?  ज्या लोकसमूहाचे आर्थिक व राजकीय हितसंबंध एकत्र निगडीत केले आहेत तें राष्ट्र.  मुसलमानांनाहि स्वातंत्र्य हवें आहे.  हिंदी मुसलमान हें जर एक राष्ट्र तर बाबांनो, तुम्ही एकटे तरी स्वतंत्र्य होण्याचें पुण्य घ्या ना.  म्हणून हिंदुस्थान हें एक राष्ट्र आहे व आपल्या स्वातंत्र्याआड धर्म येऊ शकत नाही.

 

अधिकांत अधिक किसान व कामगार काँग्रेसमध्ये कसें येतील याची आम्हांस तहान हवी.  लब्धप्रतिष्ठित लोक काँग्रेसमधून कसे जातील हें आम्हीं पाहिलें पाहिजे.  खादी वापरण्याचे अटीऐवजी तुझ्या उत्पन्नाचा शतांश काँग्रेस-कामास दरसाल देत जा अशी म्हणावें अट घाला. व्याज शें. ३ टक्केच घेईन, कुळांना आधीं खायला ठेवीन, कामगारांना नीट वागवीन अशा अटी घाला परंतु या प्राणमय अटी कोण घालतो?

खादीची शुध्दि बहुजन समाजांत कमी असेल.  परंतु श्रम करून करून ते पवित्र झालेले आहेत.  जे संपत्ति श्रमून निर्माण करतात त्यांच्याइतकें पवित्र कोण?  अंगावर खादी घालणारे परंतु कधी संपत्ति निर्माण करण्यासाठीं न श्रमणारे अशानीं अंगावर खादी नसलेल्याहिं किसान कामगारांच्या पायां पडावें. आपण खादीधारी-पांढरपेशे, शेट सावकार, कारखानदार अशुध्द आहांत, बेशुध्द आहोंत, मेलेले आहोंत.  आपण दुस-यांस कोणत्या तोंडाने अशुध्द म्हणावें?

महात्माजी पुरुषसिंह बॅ. अभ्यंकरांस नागपूरच्या सभेंत म्हणाले होते, ''अभ्यंकर, तुम्हांला अजून जेवावयाला मिळत आहे.  ज्या दिंवशीं तुम्हांला खाण्याची ददात पडेल त्या दिवशीं मी आनंदाने नाचेन.''  खाण्याची ददात किसान कामगारांस नेहमींच आहे.  परंतु त्यांची ही ददात मिटावी म्हणून सेवा करावयास  निघालेले  धनिक  किती  उपाशी  राहूं लागले? शेतक-यांच्या झोंपडया पाहून यांना इतकें दु:ख होतें कीं, यांचे रंगीत बंगले नवीन उठू लागतात!  किती जीवनांतील शुध्दि !

महात्माजींच्या मुखीं सत्य अहिंसा शोभते.  परंतु ज्यांच्या जीवनांत सत्य अहिंसेचा पत्ता नाहीं, अधिकार व सत्ता हातीं असण्यासाठी कारस्थाने करण्यांत ज्यांच्या बुध्दीची कृतार्थता, दुस-याला पैशानें मिंधे करून त्यांचे मत-स्वातंत्र्य नष्ट करणें असे ज्यांचे खेळ त्यांनी आम्हांस सत्य अहिंसेचे डोस पाजावे हें कसेंतरी वाटतें.

सारांश, सामर्थ्याचा झरा जनता-जनार्दनाजवळ आहे.  जनता-जनार्दनास काँग्रेस दूर लोटील तर ना ऊरेल तिच्याजवळ सत्य, ना उरेल अहिंसा.  श्रीमंताच्या डुरकावणीस भीक न घालता आम दु:खी जनतेच्या सुखासाठीं काँग्रेस निश्चयानें उभी राहील तेव्हांच ती विशुध्द स्वरूपांत अतुल तेजांने व अपार सामर्थ्यानें शोभेल ; खरे स्वातंत्र्य जवळ येईल.

-- वर्ष २, अंक ८

   

किसान व कामगारांना वगळाल तर बळ वाढणार कसें?  किसानांच्या व कामगारांच्या संघटना आम्हांस बघवत नाहींत.  ते मोर्चें काढूं लागले, प्रचंड मिरवणुकी काढूं लागले तर आम्हांस आनंद होण्याऐवजीं दु:ख वाटूं लागतें. 

किसान व कामगार कार्यकर्तें काँग्रेस संस्थेंत येऊं नयेत म्हणून कोण आटाआटी!  म्हणे ते हिंसक आहेत.  म्हणे ते खादीचें व्रत नीट पाळीत नाहींत.  मुंबई शहर कां.कमिटीनें ऑफिसांत येऊन सभासद व्हावें असा ठराव केला आहे.  कामागारांनी ९/९ तास काम करून तुमच्या ऑफिसात केव्हा यावें? भुलाभार्इंनी उत्तर द्यावें.  ज्यांच्या हातांत ऑफिस आहे ते सभासद ऑफिसांतच नोंदवतील याला प्रमाण काय? आपल्या ओळखीच्यांत द्यावीं पुस्तकें, म्हणावे ऑफिसांत झाले.  कामगारांचें मात्र मरण.

खरा गांधीवादी तरी कोण?  त्यांतल्या त्यांत अधिक अहिंसक कोण?  गांधीवाद म्हणजे दरिद्री माणसाला सुखी करण्यासाठीं स्वत: फकीर होणें.  गांधीवाद म्हणजे अपार त्याग.  खादी पेहरून अहिंसेची व्याख्यानें देणारे ठायींठायींचे सावकार, कारखानदार व त्यांचे हस्तक पाहिले म्हणजे त्या खादीची कींव येते.  हे खादी वापरून भरमसाट व्याजें घेणारे, खादीचा साधेपणा मिरवून शेतक-यांच्या इष्टेटी जप्त करणारे, खादीचीं वस्त्रें नेसून कामगारांस भिकेस लावणारे, हे का गांधीवादी?  हे का अहिंसक?  खादी घालून व्याजासाठीं तहानलेल्या बगळयांस मी दूर फेंकीन व खादी नसलेल्या परंतु किसान कामगारांसाठी तळहातीं शिर घेणा-याच्या मस्तकाची धूळ मी मस्तकी लावींन.

काँग्रेसमध्ये शुध्दि हवी आहे.  परन्तु ती खादीची नसून हृदयाची हवी आहे.   काँग्रेसमध्ये बगळे नकोत, राजहंस असूं देत.  स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून खादीची अट ठेवा.  परन्तु तेवढयाने काँग्रेसची शुध्दि झाली असें समजूं नका.  काँग्रेस मंत्रिमंडळांना भराभर किसान कामगार कार्यक्रम कां उचलता येत नाहीं?  कोण बरें आड येतें?

आपल्या इस्टेटींना जपणारे परन्तु खादी घालणारे लोक आज काँग्रेसचे बळ कमी करीत आहेत.  काँग्रेसचे उपासक म्हणून दावा करणारे, सत्य व अहिंसा यांचे स्वत:ला पूजक समजणारे, स्वत:च्या जीवनांत खादी वापरण्यापलीकडे कांही करतात का?  वर्षानुवर्ष हे खादी वापरीत आहेत.  परंतु सालदाराजवळ नीट वागणार नाहींत, घरांतील गडयाला दूध देणार नाहींत.  कुळाला आजारांत औषध देणार नाहींत.  काय करायची ती खादी?  जी खादी तुम्हांला प्रेमळ, उदार, त्यागी बनवीत नाहीं ती काय कामाची?  अशा लोकांना पाहून काँग्रेसबद्दलचे प्रेम का वाढेल?  किसान कामगार काँग्रेसमध्ये आतां घुसणार असें दिसतांच या सर्वांचे धाबे दणाणलें.  इंग्रज सेनापति वेलिग्टन इंग्लंडमध्यें सुधारणा कायदा होतांना म्हणाला, 'आता पार्लमेंटची प्रतिष्ठा जाईल.  न्हावी, धोबी, किसान कामगार तेंथे येऊन बसतील. घरंदाज, संस्कृतिपूजक अमीर उमराव दिसणार नाहींत.'  आमच्यांतील कांही लोकांना हीच अडचण पडली आहे.  काँग्रेस श्रमजीवींच्या हाती गेल्यावर कसें होणार याची त्यांना भीति वाटूं लागली आहे.

 

२३ सामर्थ्य व शुध्दी

राजबंदी दिन हिंदुस्थानभर साजरा झाला.  ठायीं ठायीं भाषणें झालीं.  कांही ठिकाणीं भाषणांतून असा सूर निघाला कीं, आज काँग्रेसचे सामर्थ्य कमी झाले आहे.  यामुळें पंजाब व बंगाल सरकार या बाबतींत कांही करूं इच्छित नाहींत.  आज आपणांत ऐक्य नाहीं.  वर्ष दोन वर्षापूर्वी काँग्रेसची जी शक्ति होती ती आज उरली नाहीं.

काँग्रेसचें बळ का कमी झालें?  बळ जनतेच्या पाठिंब्यातून येतें.  बहुजन- समाजाचा पाठिंबा म्हणजे पक्का खडक.  या खडकावर काँग्रेस उभी राहील तरच तिचें बळ टिकेल.  त्रिपुरी काँग्रेसच्या मंडपांत शेतक-यांच्या पुतळयाच्या आधारावर काँग्रेस व्यासपीठ उभारलें होतें.

परंतु बहुजनसमाजाचे प्रश्न अत्यंत उत्कटतेनें घेतले जात नाहीत.  महत्त्वाचे प्रश्न आधीं घ्यावयाचे सोडून दुसरेंच घेतले जातात.  किसान व कामगार म्हणजेच राष्ट्र.  राष्ट्राचा वांकलेला कणा आधीं सरळ करणें म्हणजेच काँग्रेसचें बळ वाढविणें.

पंजाब व बंगालमधील राजबंदी कां सुटावेत? राजबंदी सुटले म्हणजे ते बहुधा किसान कामगारांचे चळवळींत पडतात.  दहशतवादाची चूक त्यांना कळली.  एक साहेब मारून स्वराज्य मिळणार नाहीं, हे त्यांस उमजलें.  परंतु दुसरा मार्ग कोणता?  शास्त्रीय क्रांतीचा पंथ कोणता?  किसान व कामगार यांची संघटना हा तो मार्ग. बंगालमधील राजबंदी सोडण्यांत आले, व जर ते किसानांत व कामगारांत काम करूं लागले तर? 

काँग्रेसप्रांतातहि किसान व कामगार कार्यकर्ते साशंकतेने पाहिले जातात.  आज पेशावर प्रांतात मुख्य प्रधानांनी आपल्या पुत्रास अटक केली. अपराध काय?  तर तो सच्चा सेवक कुळांची बाजू घेऊन लढत होता.  पेशावर प्रांतात जमीनदार आहेत.  कुळांचे हाल अपार आहेत.  मुंबई इलाख्यांत कामगार कार्यकर्त्यांस  शाश्वति वाटत नाहीं.  बंगालमधील हक्क व पंजाबांतील सर शिकंदर म्हणतील, ' राजबंदी मुक्त केल्यावर त्यांना पुन्हा तुरुंगात घालावें लागेल.  काँग्रेस प्रांतातहि किसान कामगारांच्या कार्यकर्त्यांच्या नशिबाचा तुरुंग कोठें पूर्णपणें सुटला आहे? '

   

पुढे जाण्यासाठी .......