शनिवार, डिसेंबर 05, 2020
   
Text Size

गोड निबंध - २

आघाडीवर काम करणा-या स्त्रीयांचे पहिले पथक कुमारी टिंग्लिंग् या उत्कृष्ट लेखिकेंने काढलें.  १९३८ च्या मे महिन्यांत या पथकाचे फक्त आठ हजार स्त्री-सभासद होते.  हे सभासद वाढतच गेले.  पांच हजार भगिनी शिपायांचे कपडे धुण्याचें काम करीत, सहा हजार कपडे शिवण्यांचे काम करीत.  साडे आठहजार स्त्रियां नर्सिस होऊन शुश्रुषेचें काम करीत.  २५०० भगिनी अठरा वर्षांखालील मुलींना नवीन राष्ट्रसेवेचें शिक्षण देण्यांत गुंतल्या.  ३६ हजार भगिनी पडित जमिनी लागवडीस आणण्यांचे काम करूं लागल्या.  प्रत्येक खेडयांतील अशिक्षितांचे वर्ग घेणें, त्यांना वाचून दाखवणें, वगैरे कामी शेकडों स्त्रिया लागल्या.  कम्युनिस्ट भगिनी तर पुरुषांबरोबर प्रत्यक्ष रणांगणांत आगीच्या वर्षावांत ऊभ्या रहात.

अफाट पसरलेल्या चीन देशांत अद्याप हा आरंभच आहे.  परंतु स्त्रियांचा आत्मा झपाटयानें जागा होत आहे.  स्त्रिया प्रत्यक्ष रणभूमीवर लढत आहेत, एवढेंच नव्हे तर गनिमी पध्दतीचे हल्ले करून जपानी शिपायांना सळो की पळो करून सोडण्याचे कामींहि त्या पुढाकार घेत आहेत.  चिनी स्त्रिया मागें आहेत असें आतां कोण म्हणेल?  स्पेनमधील शूर स्त्रियांप्रमाणे चीनमधील स्त्रियाहि स्वातंत्र्याचे व संस्कृतीचे रक्षणासाठीं जीवनें देत आहेत, अहोरात्र झटत आहेत, शिस्तीनें अखंड काम करीत आहेत.

जसजसा जपानचा राक्षसीपणा वाढत आहे, क्रूरपणा वाढत आहे, तसतसा स्त्रियांचा राष्ट्रीय निश्चय अधिकच गंभीर होत आहे.  एका युनान प्रांतांतून ७ हजार स्त्रिया रणांगणांत मरण्यासाठीं निघाल्या.  त्या ७ हजारांतून निवडक स्त्रिया घेतल्या गेल्या.  आईबापांचा विरोध त्यांनी जुमानला नाही.  शेंकडों मैल त्या पायीं चालत गेल्या.  त्यांचे एकच ब्रीदवाक्य होतें, '' भगिनींनो, लढाईच्या वेळी कुटुंबाचा विचार करावयाचा नसतो.  पलटणींत नांवे नोंदवा आणि देशासाठी मरा.''

स्त्रिया ठिकठिकाणी सेनापति होत आहेत. पलटणींना हुकूम देत आहेत ; अभिनव असा हा देखावा आहे.  मुलांना जन्म देणा-या माता आज नवचीनला जन्म देत आहेत.  आणि या नवचीनचा भव्य दिव्य प्रभावी जन्म व्हावा म्हणून आज आगींतून जाण्याच्या वेदना सहन करीत आहेत.

या चिनी स्त्रियांच्या त्यागमय जीवनापासून भारतीय स्त्रियांना शिकण्या-सारखें कांहीच नाहीं का? भारतासहि स्वातंत्र्य मिळवावयाचें आहे.  स्वातंत्र्याचा लढा चालला आहे.  या लढायांतील आपलें स्थान भारतीय स्त्रिया कधीं घेतील.

-- वर्ष २, अंक ७

 

२२ चीनमधील क्रांतिकारक स्त्रिया

जपान व चीन यांचा झगडा बरेच दिवस चालला आहे याचा शेवट काय होईल ते सांगतां येत नाहीं. शेवटीं चीन जपानला चीत करील अशी आशा वाटते.  परंतु तें कांही असो.  चीन आज खडबडून जागा झाला आहे.  सारें राष्ट्र आज आत्मरक्षणासाठीं झटत आहे.  लहान असो, वृध्द असो, स्त्री असो पुरुष असो, सारे कामांत आहेत.  या लढयांत चिनी स्त्रिया फार महत्त्वाचें कार्य करीत आहेत.

आजच्या नव चीनमधील स्त्रियांचे कार्य आश्चर्यकारक आहे.  जपानचा हल्ला आला आणि चिनी स्त्रियांनी रूढींचे किल्ले पाडून राष्ट्रीय सेवेस वाहून घेतलें.  आई-बाप, नातलग, अधिकारी यांची पर्वा न करतां राष्ट्रधर्माची त्यांनी दीक्षा घेतली.  १९३७ च्या ऑगस्टच्या १ तारखेस 'राष्ट्रीय संरक्षण नारीमण्डळ' स्थापण्यांत आलें.  चीनभर या मण्डळाच्या शाखा निघाल्या.  शाखांच्या स्त्री सभासदांनी पैसे, कपडे, औषधें गोळा केली.  अनाथ मुलांची काळजी घेतली.  गरजू कुटुंबांनां मदत केली.  निराश्रितांना आधार दिला. १९३८ च्या मे महिन्यांत चीनमधील सर्व प्रमुख स्त्रियांची एक सभा भरली.  घरगुती धंद्यांना उत्तेजन देण्याचें ठरले.  घरोघर खादी, हातमाग सुरू करून भरपूर कपडा निर्माण करण्यांचे ठरलें.

बहुतेक मोठया शहरांतून सुविद्य घराण्यांतील तरुणींनी प्रथमोपचार पथकांतून नांवे दिली.  या सेविका वैमानिक हल्ल्यांत जखमी झालेल्यांस मदत करितात.  त्यांना करमणुकींसाठी वाचून दाखवतात.  त्यांची पत्रें लिहितात.  परन्तु चिनी तरुणी इतकेंच करून थांबल्या नाहींत.  त्या आघाडीवर लढण्यासाठींहि निघाल्या.  क्वांग्सी प्रांतांतील ५०० स्त्रियांचे पथक रणांगणावर लढण्यासाठीं गेलें.  कांही स्त्रिया आघाडींवर जाऊन रणगीतें गात शिपायांस स्फूर्ति देत तर हजारों स्त्रिया आपापल्या घरांतून फाटके कपडे शिवणें, नवीन कपडें तयार करणें अशा कामांत असत.

 

२१ चीनमधील जागृत विद्यार्थी

चीनमधील विद्यार्थी सारा देश जागवीत आहेत.  प्रचाराचे प्रचंड काम ते करीत आहेत.  कोठेंहि.  तेथें तुम्हांला असें दिसेल कीं शेकडों शेतकरी जमले आहेत.  लहानसें तात्पुरते स्टेज उभारलें आहे.  साधे पडदे सोडले आहेत.  चिनी विद्यार्थी नाटकें करीत आहेत.  साधीं अर्धा पाऊण तास टिकणारी नाटकें. एक चिनी मुलगी येते.  तिच्या कपाळावर माचुरिया असें लिहिलेंलें असतें.  नंतर एक क्रूर जपानी येतो.  दांत ओठ खात येतो.  त्या माचुरियाचें सोंग घेतलेल्या मुलीला तो मगराप्रमाणें झडप घालून पकडतो व पडद्याआड घेऊन जातो!  नंतर दुसरी मुलगी येते.  दुस-या एका चिनी प्रदेशाचें नांव तिच्या कपाळावर असतें.  पुन्हा पहिलें भक्ष्य पचवून लठ्ठ झालेला जपानी राक्षस येतो व नवीन भक्ष्य गट्टं करतो.  असे चालतें.  शेवटच्या प्रसंगी जपान हल्ला करत आहे.  अशा वेळेस एक नवतेजाचा चिनी नवयुवक येतो.  तो जपानला लाथ मारतो.  टाळयांचा कडकडाट होतो.  संपतें नाटक.  तरुण मंडळी सामान आटोपून दुस-या गांवी जातात!  २० वर्षाच्या आंतील ही सारी तरुण मंडळी असते. 

नाटकें, मेळें, संवाद यांच्याद्वारा चीन जागृत केला जात आहे.  त्याच प्रमाणें चित्रांच्या द्वारा चीनमधील सारे चित्रकार आज राष्ट्रजागृतीचें काम करीत आहेत.  राष्ट्राची जपानविरुध्द अढी वाढेल, स्वातंत्र्यप्रीति बळावेल अशीं चित्रें सर्वत्र काढण्यांत येत आहेत.  भिंतीवरून सार्सापरिल्याची जाहिरात नसून जपानी मालावर बहिष्कार घातल्याचें चित्र आहे.

बोलपट तेंच काम करीत आहेत.  सचित्र मुके चित्रपटहि तेंच काम करीत आहेत. नाटकें, चित्रें, सिनेमा यांद्वारे डोळयांना राष्ट्रीय प्रेम शिकवलें जात आहे.  आणि कानांना?  आज चीनभर राष्ट्रगीतें गायली जातात.  रणसंचार व रणावेश उत्पन्न करणारीं नवीन नवीन गाणीं गात पथकें हिंडत असतात.  लहान लहान मुलें-मुलीं गल्ली गल्लींतून हीं नवीन गीतें आवेशानें गात असतात.

आणि हस्तपत्रकें, वार्ताफलक, व्याख्याने यांच्या द्वाराहि अपरंपार प्रचार केंला जात आहे.  या सर्व प्रचार-कामांत तरुण विद्यार्थी मोठा भाग उचलीत आहेत.  २० वर्षाचे तरुण लढाईत गेले.  २० वर्षाखालचे अशी भूमिका तयार करीत आहेत.

आपल्याकडील विद्यार्थ्यांसहि सुटीच्या दिवशी मेळे घेऊन खेडयांत जाता येईल.  लहान लहान नाटकें करून दाखवता येतील. तद्द्वारा कां. प्रेम, स्वातंत्र्यप्रेम, खादीप्रेम, हिंदुमुस्लीम ऐक्य, ब्रिटिशांचे स्वरूप, संघटना, किसान कामगारांची स्थिति, अस्पृश्योध्दार, सारें दाखवतां येईल; शिकविता येईल.  परंतु विद्यार्थी तयार झाले तरी शिक्षक तयार हवेत.  आमचे साहित्यिक असें छोटें परंतु परिणामकारक साहित्य लिहून देण्यास तयार झाले पाहिजेत.  चीनपासून आम्हांस पुष्कळ शिकतां येईल.  परंतु इच्छा व तळमळ हवी.

-- वर्ष २, अंक ८

   

काँग्रेसचे हेंच धोरण आहे.  संस्थानें जागी होऊं देत.  संस्थानी सेवक विधायक कामें करीत फिरूं लागूं देत.  हालचाल किसानांत सुरू होऊं दे.  संस्थानी तमाम जनता उठाव करूं दे.  मग काँगेस आपलें बळ त्यांत ओतील.  स्टेट काँग्रेसला हा सल्ला महात्माजींनीं दिला.  त्यांनी सांगितलें, '' खादी खपवितांना अटक झाली तर खटला लढवा. विधायक काम फुकट जाणार नाहीं.  पुढें सत्याग्रह करावा लागला तर तो शतपटींने जोमदार होईल.  आमची जनता त्यांत भाग घेईल.  खेडोपाडीं जागृत होऊन त्यांत उडया घेतील. ''

काँग्रेसची ही अशी दृष्टि खोल आहे.  त्यांत खोलपणा आहे, मूलग्राहीपणा आहे.  क्षणभर दिपवणारा विजेचा लखलखाट तिला नको.  विजेचा चकचकाट आकाशांत होतो.  परन्तु पाऊल टाकावयास प्रकाश मिळत नाहीं.  असला झकपक प्रकाश काय कामाचा.

भारतीय जनता काँग्रेसचा आत्मा ओळखते.  काँग्रेस तात्पुरत्या स्वार्था-साठीं कांहीं करीत नाहीं.  उद्यां निवडणुकींत आपलें काम होईल अशा क्षुद्र काळजींने ती बुध्दीस न पटणारी गोष्ट करणार नाहीं.  पुढें निवडणुका आल्या तर महाराष्ट्रांत काँग्रेस टिकणार नाहीं, असे कोणी म्हणतात.  परन्तु महाराष्ट्र म्हणजे पुणें, नाशिक, नगर नव्हे;  महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रांतील हजारों खेडीं.  ही खेडीं ह्या गोष्टींपासून अलिप्त आहेत.  खेडयांत काँग्रेसनिष्ठा वाढतच आहे.  जनतेला स्वातंत्र्य मिळवून देणारी काँग्रेस कोणास भीत नसते.  ती योग्य वेळीं योग्य तें करीलच करील.  जनतेची ही खात्री आहे कीं, '' कोणी कांही अधिकांत अधिक आपलें हित करील तर ती काँग्रेसच करील. ''

हिन्दुमहासभेला पुढील निवडणुकींची का स्वप्नें पडत आहेत?  परन्तु त्याच्या आधीं भारतांत सत्याग्रहाचा प्रचंड झगडा सुरू होण्याचा संभव आहे.  असेंब्लीच्या ऐवजीं लाठीमार, गोळीबार, लष्करी कायदा, फांस यांतून जावें लागेल.  त्या वेळेस महान् काँग्रेस संस्था ऊभी राहील.  तिचें लक्ष खुर्चीवर, मतावर नाहीं.   तिचे लक्ष फांसावर आहे.  राष्ट्र नेहमीं मला मत देईल ही तिची श्रध्दाच आहें;  कारण राष्ट्रसभेनं अनंत बलिदान केलें आहे व पुढे करावयास ती उत्सुकतेंने तयारच आहे!

-- वर्ष २, अंक ५

 

२० मननीय विचार

' विधायक सेवा म्हणजे सत्याग्रहाचें सामर्थ्य '

-- महात्मा गांधी
काँग्रेस व हैद्राबाद लढा


हैदराबाद संस्थानांत स्टेट काँग्रेस लढा लढवीत होती.  शेकडों काँग्रेस सेवक कारागृहांत गेले होते.  परंतु पुढें तो लढा स्टेट काँग्रेसने थांबविला.  निजामसरकार सुधारणांचा विचार करीत होते. त्या सुधारणा एकदा का बाहेर पडल्या म्हणजे मग पुढचें धोरण काय तें स्टेट काँग्रेस पुन्हा ठरविणार होती.  स्टेट काँग्रेसने सत्याग्रह थांबविला; आर्य समाज व हिन्दुमहासभा यांनी थांबविला नाही.  स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह व हा दुस-या संस्थांचा सत्याग्रह यांत फरक आहे.  स्टेट काँग्रेसचा सत्याग्रह व्यापक ध्येयासाठी होता.  नागरिक स्वातंत्र्य व इतर राजकीय सुधारणा यांसाठी तो होता.  आर्य समाज व हिंन्दुमहासभा यांचा सत्याग्रह धार्मिक पूजाविधी वगैरेंच्या स्वातंत्र्यासाठी होता. दे. भ. श्री. अण्णासाहेब भोपटकर यांनी आपल्या पत्रकांत ही गोष्ट मांडली आहे.  नागरिक स्वातंत्र्यांत धार्मिक स्वातंत्र्य ही गोष्ट येऊनच जाते.  स्टेट काँग्रेसच्या व्यापक लढयात ती गोष्ट येतच होती.  ही एकच गोष्ट घेऊन स्टेट काँग्रेस लढत नव्हती ; जीवनाचे व्यापक स्वरूप घेऊन ती लढत होती. हिन्दु-महासभेचे एक चहाते मला म्हणाले, ''तुम्ही असें म्हणता ; परन्तु सर्व हिंदु-महासभावादी असें म्हणत नाहींत.  डॉ. कुर्तकोटी हेंच सांगत होते.  हिंदुमहासभा धार्मिक संघटनेपुरती राखा असें ते सांगत.  परन्तु कुर्तकोटींची चेष्टा झाली.  हिंन्दूच्या राजकीय स्वातंत्र्यासाठी झगडणारी हिंदुमहासभाच असें घोषित होऊं लागलें.  त्या मित्रांस माझें म्हणणें पटलें नाही.  ते कांही असो.  हिंदुमहासभा व आर्यसमाज यांचा सत्याग्रह मर्यादित आहे ही गोष्ट खरी.  स्टेट काँग्रेसचा व्यापक होता.  तिच्या ध्येयांत धार्मिक स्वातंत्र येऊनच जात होते. ''

संस्थानचा शेवटचा सुधारणांचा खर्डा बाहेर पडेपर्यंत स्टेट काँग्रेस थांबली आहे.  सत्याग्रहाची ही नीति आहे.  प्रतिपक्षी आपलें म्हणणें स्पष्ट करूं इच्छित आहे ; त्याला अवसर दिला पाहिजे.  निर्मळ वातावरण व विश्वास ऊत्पन्न केंली पाहिजेत.  चांगल्या हवेंत चांगल्या गोष्टी निर्माण होतात.  विषारी हवेंत रोगजंतूच फैलावयाचे.  म्हणून स्टेट काँग्रेसला सत्याग्रह थांबवावा असा सल्ला महात्माजींनी दिला.  यांत ना भीति, ना मनधरणी.  सत्याग्रह बंद करून विधायक काम करा असें महात्माजींनी सांगितले ; घरांत बसावयास त्यांनी सांगितले नाहीं.  गांवोगांव जाऊन खादी खपवा, स्वच्छता निर्माण करा असें त्यांनी सांगितले.

हैद्राबादमधला सत्याग्रह जनतेपर्यंत गेला नाहीं, आर्यसमाज व हिंदुमहासभा यांचे जथे शहरांत जातात व पकडले जातात.  संस्थानांतील हजारों खेडयांना ना दाद ना फिर्याद.  स्टेट काँग्रेसच्या कांही कार्यकर्त्यांनी सांगितले,  ' आमच्या सत्याग्रहाचा खेडयांत प्रचार कसा करावा हें समजेना. '  विधायक कार्याने हा प्रचार होईल.  ३० सालीं हिन्दुस्थानांत कायदेभंग सुरू झाला.  त्याचा प्रचार विधायक कार्यकर्त्यांच्या झाडूंतून व खांद्यावरील खादींतून आधीं झाला होता.  खादी आपल्या बरोबर राजकारण घेऊन जाते.  खादी हें मृत वस्त्र नाहीं;  ते मृतांस जिवंत करणारें जिवंत वस्त्र आहे.   

नि:शस्त्र सत्याग्रहांत आमची जनता सामील झाली तरच त्यांत अर्थ असतो.  बाहेरच्या जथ्यांनी खरें कार्य होणार नाहीं.  ज्याप्रमाणें स्टॅलिन म्हणतो,  ''इतर देशांत आम्ही जाऊन क्रांति करणार नाहीं.  परन्तु तेथील जनता जर उठली, संघटित झाली, त्यागाला तयार दिसली, तर मग त्यांना आम्ही सहाय्य करूं.  तोपर्यंत आम्ही वाट पाहूं, स्वत:चे बळ वाढवीत राहूं. '' रशिया पदोपदीं दुस-या देशांत लुडबूड करील, असंघटित, स्वत:च्या पायावर उभें न राहणा-या पंगू राष्ट्रास सावरूं पाहील तर रशिया दोहोंकडे फसेल.

   

पुढे जाण्यासाठी .......