बुधवार, जानेवारी 20, 2021
   
Text Size

गोड निबंध - २

धर्माच्या शिंपल्यांत प्रार्थनेचे मोती आहे. हें मोती हृदयाशी धर.  मुसलमानांच्या हातांत प्रार्थना हेच शस्त्र आहे.  प्रार्थना हें त्यांचे बळ आहे. प्रार्थनेंनें पाप मरतें, चुका गळून जातात, वेडेंवांकडें केलेलें सरळ होतें.  प्रार्थना करावी.  आणि उपवास? उपवास म्हणजे क्षुधा-तृषांवर हल्ला आहे.  कर्तव्याचा पंथ आक्रमीत असतां तहानेनें वा भुकेनें खचून जाऊ नयें म्हणून उपवासाची संवय करावयाची.  उपवास म्हणजे विषयभोगांच्या किल्ल्यावरचा जोरदार हल्ला आहे.  आणि यात्रा? आणि यात्रा त्यासाठी करावयाची कीं, त्यामुळें श्रध्दावंतांचे मन उत्पन्न होतें.  यात्रेला जातांना घरदार, प्रेमळ मुलें-बाळें, सर्वांचा वियोग सहन करावा लागतो.  यात्रा संसारातून थोडे अनासक्त रहावयास शिकविते.  घरादाराच्या बंधनांतून थोडा वेळ मोकळें करते.  यात्रेत लाखों लोक एके ठिकाणी येतात व आपण सारे एक ही भावना बळावते.  धर्म ग्रंथाची विस्कळीत पानें यात्रेंत बांधली जातात.  आणि दान कां करावें? दान केल्यानें पैशाचा मोह कमी होता, समानतेचा परिचय होतो ; हृदयाला पावित्र्य लाभतें.  दानानें संपत्तीची आसक्ति कमी होईल, संपत्ति नाही कमी होणार.  प्रार्थना, उपवास, यात्रा, दान हीं सारी आत्म्याला बलवान, करण्यासाठीं आहेत.  असा तुझा धर्म बलवान् असेल तर तूं अजिंक्य होशील.  स्वत:च्या मनाचा मालक हो आणि त्यासाठीं 'हे सर्व शक्तिमान प्रभो ' अशी हांक मार म्हणजे शक्ति मिळेल.

तूं देहावर स्वामित्व मिळवलेंस, म्हणजे दुनियेवर स्वामित्व मिळवशील.  जगांत अंतापर्यंत तुझी कीर्ती राहील.  या जगांत देवाचें राहणें फार गोड आहे. तो पंचमहाभूतांवर सत्ता चालवील.  तो दुनियेचा जणूं जीव होईल.  जो प्रभूच्या छायेप्रमाणें होतो, त्यास सारीं रहस्यें कळतात.  या जगांत जो जन्मतो व जगाचा इतिहास बदलू लागतो, त्याच्या जीवनांत चैतन्याचा सिंधु उसळतो व तो अनंत कर्मद्वारा प्रकट होतो.  तो नवसृष्टी जणू निर्माण करतो.  त्याच्या कल्पनेंतून गुलाबांच्या फुलाप्रमाणें अनंत विश्वें प्रकट होतात.  तो कच्चाला पक्के करतों, अपूर्णाला पूर्ण करतो.  तो बाह्य आकारांना नष्ट करून आत्म्याची भेट करवितो.  त्याचा स्पर्श होतांच प्रत्येक हृदयवीणा निनादूं लागते, गोड संगीत स्त्रवतें.  तो देवासाठीं जागृत असतो.  देवासाठींच झोप घेतो.  तो वृध्दांना नवजवान बनवतो, सर्वांना तारुण्याने व उत्साहानें फुलवतो.  मानव जातीला तो आनंदाचा महान् संदेश देतो, त्याबरोबर धोक्याची घंटाहि वाजवितो.  तो शिपाई असतो, सेनापति असतो, सम्राट असतो.  जो देवाचा   झाला, तो जन्मतांच काळाचा वारू झपाटयाने दौडूं लागतो, त्याच्या रागानें तांबडा समुद्र कोरडा होतो.  तो हाक मारतो, आणि मेलेले खडबडून जागे होतात.  सा-या जगासाठीं तो स्वत: प्रायश्चित्त घेतो.  त्याच्या दिव्यतेंनें दुनिया बचावते.  स्वत:च्या छत्राखाली घेऊन घुंगुरटयाला तो सूर्याची भेट घडवितो.  तो आपल्या संपन्न अस्तित्वानें सारा संसार सारमय करतो.  आश्चर्यकारक रीतींनी तो चैतन्य निर्मितो, कामाची नवीनच दिशा दाखवतो.  त्याच्या पायाच्या धुळींतून भव्य स्वप्नें निर्माण होतात.  जीवनाला तो नवीन अर्थ देतो.  अशांचे जीवन म्हणजे महान् जीवन, वेणूंचे संगीत आहे.  अशी महान् विभूति निर्मिण्यासाठी जीवनांत नव संगीत निर्माण करणा-या अशा थोर विभूतींच्या जीवनाचा मेळ जमविण्यासाठी सृष्टि शतकानुशतकें आटापीट करीत असते.  असा पुरुष या संसारवृक्षाचें गोड फळ आहे.  एक दिवस उजाडेल व असा महापुरुष जन्माला येईल.  आजच्या मातींत उद्यांची जग दिपविणारी ज्योति सुप्त राहिली आहे.  कळींतून गुलाब फुलेल.  ऊद्याच्या ऊष:कालाने आमची दृष्टि सतेज झाली आहे.

हे काळावर स्वार होणा-या दैवी पुरुषा, प्रकट हो.  बदलणा-या अंधारांतील प्रकाशा, ये.  या संसाराला प्रकाशित कर.  राष्ट्राचा गलबला बंद कर.  आमच्या बुबुळांत तूं येऊन रहा.  तुझ्या संगीतानें आमचे कान भर.  बंधुभावाची वीणा नीट लाव व वाजव.  प्रेमाचा पेला आम्हांला पुन्हा भरून दे.  जगाला पुन: शांतीचे दिवस दे.  युध्दपिपासू लोकांना शांतीचा संदेश दे.  मानवी समाज म्हणजे शेतें व त्या शेतांतील तू अमोल दाणा.  तूं मानवी समाजाच्या मुसाफरीचें ध्येय.  हिंवाळा येऊन सारीं पानें गळून गेलीं आहेत.  तूं वासंतिक वा-याप्रमाणे ये व जीवनाची बाग पुन: हसव, फुलव.  आमच्या माना आज खाली आहेंत.  अधोवदन दुनियेचा हा प्रणाम घे.  तूं समोर उभा राहिलास म्हणजे मग आमच्या माना वर करूं ; या जगांतील सारी आग मग आनंदानें सहन करूं.  तूं ये, ये.

-- वर्ष २, अंक २४.

 

१९ एक सुंदर कविता

[इक्बाल हा पंजाबमध्ये कवि होऊन गेला.  मागील वर्षी तो मरण पावला.  त्याच्या एका सुंदर कवितेचा गद्य अनुवाद इंग्रजीवरून देत आहें.]

उंट सेवा करतो, हालअपेष्टा भोगतो.  सहनशीलता आणि सतत परिश्रम हा त्याचा धर्म आहे.  वाळूंतून मुकाटयानें तो मार्ग काढीत जात असतो.  वाळवंटातून प्रवास करणा-यांची ती नौका आहे.  प्रत्येक काटेरी झुडपांना त्याची पावलें माहीत आहेत.  तो फार थोडें खातो, फार थोडी झोंप घेतो.  श्रमाची त्याला संवयच झाली आहे.  तो पाठीवर कितीतरी सामान सुखानें घेतो.  बसणारा, त्याचें ओझें सारें कांही पाठीवर घेतो.  मुक्काम येईपर्यंत न थांबता तो सारखा जातच असतो.  वरचा बसणारा कंटाळतो परन्तु उंट कंटाळत नाहीं.

त्या उंटाप्रमाणें कर्तव्याचा भार शिरावर घे; कुरकुर करूं नकों.  अशानेंच देवाजवळ जाशील.  हे निष्काळजी मनुष्या, नीट लक्ष दे.  आज्ञापालन शीक.  स्वातंत्र्य बंधनांतून जन्मतें.  संयमातून मोक्ष मिळतो.  आशाभंगाने माणसांतील तेजस्विता धुळींत जाते.  धर्माची आज्ञा मान.  आज्ञापालनानें नालायक लायक होत जातो.  सूर्यचंद्रावर ज्याला स्वामित्व मिळवायचें आहें त्यानें स्वत: धृत-वत् झालें पाहिजे.  वारा स्वत:ला फुलाच्या सुगंधानें बांधून घेतो.  कस्तुरी मृगाच्या नाभींत स्वत:ला कोंडून घेते, आकाशांतील तारे नम्रपणें बांधल्यासारखें वागत असतात.  उत्पत्तीच्या नियमानुसार गवत वाढतें.  गुलाबाचें लाल फूल स्वत:चा नियम मानतें आणि म्हणून सारें रक्त त्याच्या नसानसांतून नाचते.  पाण्याचे बिंदू ऐक्याच्या नियमांने एकत्र येतात व सागर होतो.  वाळूचे कण ऐक्याच्या नियमानें एकत्र येतात व सहारा वाळवंट होतें.  नियमपालन हें सामर्थ्याचे साधन.  या साधनाची तूं कां उपेक्षा करतोस?  धार्मिक बंधने न पाळून अनिर्बंन्ध होणा-या पुन्हां धार्मिक बंधने पाळ.  ते नियम कठीण आहेत म्हणून कुरकुर नको करूं.  पैगंबराचे आज्ञेंचे उल्लंघन नको करूं.

तू वासनांचा गुलाम नको होऊंस.  वासनांना लगाम घाल.  आपले मन आपल्या ताब्यांत घे.  तूं माती असलास, तरी संयमाग्नींत स्वत:ला घालशील तर मोती होशील.  जो स्वत:च्या वासनांवर सत्ता चालवूं शकत नाहीं, त्याच्यावर सारी दुनिया सत्ता चालवील.  जो स्वत:चा गुलाम, तो जगाचाहि गुलाम होतो.  भीति व आसक्ति जन्मत:च तुझ्यांत शिरली आहेत.  तुला मरणाची भीति वाटते पण 'एक ईश्वर सत्य आहे, बाकीं कांही नाहीं '  या मंत्राचा दंड हातात घे म्हणजे सारी भीति नाहींशी होईल.  प्रभु जणुं तुझाप्राण होऊं दे.  ज्याच्या जीवनांत देव रहावयास आला, त्याची मान मोहमायेसमोर वांकत नाही.  एका ईश्वराशिवाय तो कोणाला भीत नाही.  अब्राहामप्रमाणें प्रभूच्यासाठीं स्वत:चा प्रिय मुलगा मारावयास तो तयार होतो.  ज्याच्या हृदयांत प्रभु आहे, तो जरी एकटा असला तरी लाखो शत्रूंना तो भारी आहे.  तो एक नसून अनंत होतो.  तो जीवन क:पदार्थ मानतो व कर्तव्यासाठी  तें फेंकून देतो.

 

१८ एका फुलाची इच्छा  (हिंदी कवितेवरून)

तो एक हरिजन होता.  त्याची एकुलती मुलगी होती.  तिचें नांव सुखिया.  मोठीं खेळकर होती ती.  बाप काम करून आला म्हणजे सामोरी यायची.  त्या गांवाला तापाची सांथ आली.  बाप सुखियाला म्हणे ''बाहेर नको जाऊं.  घरीच खेळ.''  परन्तु पांखराला का पिंजरा आवडेल?  सुखिया इकडे जाई , तिकडे जाई .  एक दिवस बाप घरी आला तों सुखिया अंथरुणावर होती.  तिला ताप आला होता.  बाप म्हणाला, '' मृत्यो, तुला भूक असेल तर मला ने.  या कळीला नको नेऊं. ''  बाप उशाशीं बसे.  मुलीच्या केसावरून हात फिरवी.  एकदम मुलगी म्हणाली '' बाबा, देवीच्या देवळांतील प्रसादाचें मला एक फूल द्या ना आणून.  जा ना बाबा!''

तो हरिजन देवीच्या मंदिरात कसा जाणार?  त्याने इतर फुलें सुखियाजवळ आणलीं.  तिनें तीं कुसकरून फेकून दिलीं. '' बाबा, देवीच्या प्रसादाचें द्या ना फूल '' ती म्हणाली.  सुखियाचा ताप कमी होईना.  ती ना बोले, ना डोळे उघडी.  निपचित पडली होती.  सारी खोली, सारें वातावरण ''देवीच्या प्रसादाचें फूल द्या '' असे जणुं मुकेपणानें गर्जत होतें.  एके दिवशीं बाप पहांटे उठला.  आणि अंघोळ करून आला.  पूजासाहित्य हातांत घेतलें. सुखियेजवळ उभा राहिला.  तिच्या तोंडावरून हात फिरवावा, तिचा पापा घ्यावा त्याला वाटलें.  परन्तु ओवळा झाला असता.  तो मंदिराकडे निघाला.  टेकडीवर होतें मंदिर.  एक प्रवाह मंदिराला जणुं प्रदक्षिणा घालीत डोंगरातून वहात होता.  भक्तजनांची गर्दी होती.  ''पतित तारिणीं अंबे '' जयघोष होत होते.  तो हरिजन उभा राहिला.  जगन्मातेचें मुखकमल पाहून उचंबळला.  गर्दीबरोबर पुढें ढकलला गेला.  त्यानें पूजा दिली.  पुजा-यानें फुलांचा प्रसाद दिला.  तो प्रसाद घेऊन झटकन् निघून जाण्याचें तो विसरला.  आज कृतार्थ झालो असें त्याला वाटलें.  हळुहळू भावनांनी ओथंबलेला असा तो निघाला.  सिंहद्वाराजवळ गेला नाहीं तो त्याला कोणी ओळखलें.  'अरे अस्पृश्य, पकडा, ओढा, भ्रष्ट केले मंदिर, मारा धक्के' आवाज झाले.  त्याला धक्के बुक्के देत निघाले.  तो म्हणाला, '' मातेच्या पावित्र्यापेक्षां का माझें पाप मोठें आहे?  मातेच्या महिम्यापेक्षां का माझा महिमा मोठा? तुम्ही जगदंबेचा हा अपमान करता.''  परंतु भक्तांचे रक्त सळसळत होते.  त्यांनी ढकललें त्याला.  तो पडला.  पूजेची फुलें धुळीत गेलीं.  त्याला न्यायासनासमोर नेलें.  एकदम अटक व ७ दिवसांची कैद.  शिक्षा झाली.  तुरुंगाच्या कोठडींत तो रडे, रडे.  कोणी त्याला म्हणे, 'देवळांत जायचें काय अडलें होतें?  जवळ मशीद होती, जवळ चर्च होता.  तेथें का नाहीं गेलास? ' परंतु  मुलीची इच्छा त्यांना काय माहीत?  तो सुटला.  जड पावलें घराकडे वळत ना.  घराशीं येतों तों सामसूम.  हंसरी सुखिया दिसली नाहीं.  तो स्मशानांत गेला.  सुखियेची माती तेथें होती.  'या मातीवर मला ठेवूं दे फूल' द्या रे एक देवाचें फूल.  सुखियेच्या आत्म्याला तें मिळेल.'  तो अश्रुपूर्ण वाणींने म्हणाला.  परन्तु कोण ऐकणार?

--वर्ष २, अंक २४.

   

असे म्हणून त्यानें हॅनकडे तीक्ष्ण दृष्टीनें पाहिलें.  सर्व शेतक-यांकडे, मजुरांकडे पाहिलें.  त्यांनी त्यांच्या डोळ्यास डोळा भिडविला.  ते दिपले नाहींत.  इतक्यांत कोप-यांतून कोणी म्हटलें,  ' आमचें गमवावयास आमच्या जवळ आहे काय?  आमच्याजवळ फक्त कर्जे आहेत, तीं कोणी लुटून नेईल तर आम्ही कर्जमुक्त होऊं.  जमिनदारानें कोप-याकडें पाहिलें.  परन्तु त्याला कोण बोललें तें कळलें नाहीं.  परन्तु निर्भयमूर्ति हॅन समोर होता.  त्यानें जमिनदाराच्या मुलाकडे पाहिलें व सांगितलें.  ज्या वाघानें अनेकांचे रक्त चाखलें तोहि शेवटी मरेल.''

जमिनदाराच्या मुलाचे हात पिस्तुलाकडे गेले.  परन्तु तो पुन्हां थांबला.  एक आणा काढून त्यानें तेथें फेकला.  चहा न पितां तो रागानें थरथरत निघून गेला.

त्या दिवशीं रात्रीं हॅनला त्याच्या झोपडींत जमीनदाराच्या शिपायांनी पकडलें.  हॅन्ने धडपड केली.  परन्तु त्यांनी त्याला ओढीत नेलें.  त्या किल्ल्यांत, त्या गढींत त्याला नेण्यांत आले.  तेथून तो पुन्हा जिवंत बाहेर आला नाहीं.  जमिनदाराच्या घरांत जाऊन अदृश्य होणारा हा त्या गांवांतील सातवा किसान होता.

या गोष्टीला ३ दिवस झाले.  चौथ्या दिवशी रात्रीं दुस-या एका दूरच्या खेडयांतील जमीनदार त्या गांवी पळून आले.  लाल दरोडेखोर आले, पळा, पळा असें ते सांगू लागले.  जमिनदार व त्याची मुलेंबाळें या आलेल्या लोकांबरोबर पळून जाऊं लागली.  सरकारी पलटणी कापल्या गेल्या.  दोन जमिनदार व एक सावकार गोळी घालून ठार मारले गेलें.  अशा बातम्या होत्या. ' ती लाल सेना मरणास भीत नाहीं.  ते भयंकर लोक आहेत. '  पळून आलेले जमीनदार सांगत होते.

जमिनदारांचा तांडा निघाला.  गुलामांच्या पाठीवर मोलवान् मालाच्या पेटया दिल्या गेल्या.  शिपाई त्यांना हाकलूं लागले.  जमीनदारानें पोबारा केला आणि ती विजयी लाल सेना आली.  टेंकडीवर बिगुलें वाजलीं.  गांवांतील स्त्रीपुरुष सामोरे गेले.  लाल सेनेनें किल्ला ताब्यांत घेतला.  हॅनला शोधू लागले.   परन्तु हॅन्च्या शरीरांतील मांसाचा कोथळा तेथें पडला होता.  हॅन्चे डोळे फोडले होते, कान तोडले होते;  जीभ कापली होती.  तेथें बांबूचें तरवारीच्या धारेसारखें केलेलें फटके मारणारें आसूड पडलें होतें.  त्याच्याबरचें रक्त वाळून तें काळें पडलें होतें.  हुतात्म्याचें तें छिन्नभिन्न शरीर बाहेर नेण्यांत आलें.  प्रचंड सभा भरली.  लालबावटयांत त्या शूराचा तो देह गुंडाळून ठेवण्यांत आला.  त्याचा सत्कार करण्यांत आला.  त्या गांवाचें नांव हॅन ठेवण्यांत आलें.

किसान कामगार अशीं बलिदानें लाखोंनी जेथें देतात, तेथें आज उद्यां त्यांचे राज्य स्थापलें जाईल.  हिंदुस्थानांतील किसान कामगारांनी धडा घ्यावा.  आपसांतील भांडणें मिटवून किसान तेवढा एक, कामगार तेवढा एक, अशी घोषणा करावी.  बावळटपणा सोडून द्यावा.  खेडयांतील स्वार्थी पक्षोपपक्ष नाहींसे करावे.  खेडयातून किसानांची सत्ता स्थापन करावी.  त्यांच्या निश्चयाला कोण मारील  श्रमतो त्याचा हक्क, त्याचा पहिला हक्क, असा कायदा निर्माण झालाच पाहिजे.  ज्यांच्या घामांतून धनधान्य निर्माण होतें, त्याला आधीं हक्क,  त्याला पोटभर खायला,  अंगभर ल्यायला,  असे कायदे झालेच पाहिजेत.  असें होईल तेव्हांच खरा धर्म येईल.  तोंवर सारा अधर्म राहील.

--वर्ष २, अंक १९.

 

१७ चीनमधील क्रान्ति; हुतात्मा हॅन

दहा वर्षापूर्वीची ती गोष्ट.  तें एक लहानसें गांव होते.  जमीनदारांचे तेथें प्रस्थ होते.  लालसेना या गांवी येणार असें कळतांच कित्येक किसानांचा जमिनदाराने शिरच्छेद केला.  जमिनदारांचे किल्लेवजा प्रचंड घर होते.  गांवाला जमिनदाराच्या वंशाचें नांव होतें, शेतक-यांचा छळ करावा, त्यांना गुलामाप्रमाणे वागवावें ; संशय येईल त्यांचे हालहाल करावें असें चाललें होतें.

लालसेना येणार असें वारें म्हणत.  जमिनदारानें पलटणींची मदत मागितली.  पिस्तुलें बरोबर घेतल्याशिवाय जमिनदारांची मंडळी बाहेर पडत नसें.  एके दिवशीं जमिनदाराचा मुलगा पिस्तुल घेऊन गांवात हिंडत होता.  एके ठिकाणी शेतकरी जमून हळुहळू बोलत होते.  परन्तु सैतानाला पाहतांच त्यांची तोंडें थांबली.  जमिनदाराच्या मुलानें टवकारून पाहिलें व तो पुढें गेला.  शेतकरी पुन्हां बोलू लागले.  तो राक्षस माघारा वळला.  त्यानें त्या लोकांकडे पुन्हां  पाहिले.  त्यांतील  एकाकडे  तो  दुष्ट  डोळयांनी  पहात  होता. त्या शेतक-याचे नांव होते हॅन.  हॅन नेहमी स्वाभिमानानें वागे.  जमिनदारापुढें तो गोंडा घोळीत नसे.  सहा शेतकरी हॅनप्रमाणें गोळी घालून ठार केले गेले.  तरीहि हॅन डरला नाहीं;  हॅनचा स्वाभिमान चिरडला गेला नाही.

वांकडया नजरेनें मारक्या हेल्याप्रमाणें पाहून, जमिनदाराचा मुलगा निघून गेला.  कांही वेळ हिंडून तो पुन्हां एके ठिकाणीं आला.  तो तेथे पुन्हा हॅन त्याला दिसला.  कांही मजूर व शेतकरी तेथें होते.  हॅनचें म्हणणें उत्कंठेने सारेजण ऐकत होते.  त्यांत जमिनदाराचीं कुळेंहि होती.  तो जमिनदाराचा मुलगा आंत शिरला आणि तेथें त्यांच्यात बसला.  सर्वांच्या मनांत काळें आलें.  सर्वांना भीति वाटली.

तें चहाचें दुकान होतें.  दुकानाचा मालक व मालकीण तेथें होती.  मालकिणींने चहा ओतून जमिनदाराच्या मुलासमोर ठेवला.  चहा ओततां ओततां ती म्हणाली, ' गरिबांचे फार हाल आहेत.  दिवस वाईट आहेत.  गरिबांपासून श्रीमंतांनी एवढें घेऊं नये.'  जमिनदाराचा मुलगा कर्कशपणें म्हणाला, ' दिवस कठीण येत आहेत, कारण हे लाल दरवडेखोर पिसाळलेले आहेत.  आणि शेतकरी आळशी झाले आहेत.  त्यांना कर्जे द्यायला नकोत. '  समोरच्या डोंगराकडे पहात एका मजुरानें विचारलें, 'लाल दरवडेखोर खरोखरच जवळ आले आहेत की काय?'  तो म्हणाला, 'होय.  तुम्हालाहि ते माहीत आहेत.  हे दरवडेखोर मालमत्ता लुटतात.  मोठमोठया घरांची अब्रू घेतात, खून करतात.'  चहा ओतणारी बाई दचकून म्हणाली, 'अय्या इतके का क्रूर आहेत ते लोक? '

क्षणभर कोणी बोललें नाहीं.  चहा न पितां तो जमिनदाराचा मुलगा म्हणाला, 'आपल्या गांवाकडे लाल दरवडेखोर येणार आहेत.  परन्तु त्यांतील आपण एकहि जिवंत जाऊं देणार नाहीं.  सरकारी पलटणी आमच्या मदतीस येत आहेत.  लाल दरवडेखोरांस जो मदत करील त्यानें सांभाळून राहावें.  गांवांतील सर्व सभ्य पुरुषांनी गांवाचें रक्षण करावें.  आमचा वाडा सांभाळावा.  आमची लूट होऊं देऊं नये.'

   

पुढे जाण्यासाठी .......