सोमवार, जानेवारी 18, 2021
   
Text Size

सती

'मैने!'
'म्हणू नका मला मैना. मैना म्हणण्याचा ज्याला अधिकार, तो पळून गेला. काल रात्रीपासून मला सारखा येथे दिसत होता. रात्री म्हणाला, 'उद्या पुष्पशेज रच. फुलांचा हार करून ठेव!' मी सारी तयारी केली. माझ्या हातांनी हा महाल धुतला. तुमच्या पापी पावलांनी भ्रष्ट झालेला हा महाल, तुमच्या श्वासोच्छवासांनी अपवित्र झालेला हा महाल, मी माझ्या हातांनी तो धुतला. तुमच्या स्पर्शाने गलिच्छ झालेला हा पलंग माझ्या पदराने पुसला, हातांनी लख्ख केला. उदबत्ती लावून ठेवली, दिवे जाळून ठेवले. हार गुंफून ठेवला. तांबूल करून ठेवला, परंतु दिसला व अदृश्य झाला. तुम्ही आलेत म्हणून तो गेला. किती वर्षांनी येत होता. तुम्ही दवडलात. का हो असे तुम्ही आमच्या सुखाच्या आड येता? या जन्मी नाही  भोगू देणार तुम्ही सुख. दुष्ट आहात तुम्ही. लोंबी तोडणारी कीड, पडवळे तोडणारी बोलाडी, तसे तुम्ही.'

वासुदेवराव खोकू लागला. त्याचा खोकला राहीना. मैनेने त्याला धरले. प्राण जातात, असे त्या वेळेस वाटले; परंतु थांबला खोकला.

'मैने, त्या पलंगावर पडू मी?'
'पडा.'

'तू बसशील जवळ'

'हो. बसेन.'

'मैनेने त्याला पलंगावर निजविले. त्या म्हाता-याचे अंग चेपीत ती बसली. वृध्दाच्या डोळयांतून पाणी पडत होते. सारंग गावासारखेच शेगाव होते. तशीच नदी होती. नदीपलीकडे एक देऊळ होते. जुनाट पडके देऊळ. सकाळी मैना उठली. ती कोणाशी बोलली नाही. एकटी बाहेर पडली. ती नदीकडे गेली. नदीतून पलीकडे गेली. आज इतक्या वर्षांत प्रथमच ती नदी ओलांडून मैना जात होती.

ते पडके देऊळ जवळ येत होते. मैना थांबली. ती पुन्हा मागे वळली, परंतु पुन्हा थांबली. देवळाकडे पुन्हा तिची पावले वळली. ती पळत सुटली. देवळासमोर आली. तिने पाहिले. तेथे कोण होते?

कोणी तरी एकदम धावत आले. तो गोपाळ होता. त्याने मैनेला हृदयाशी धरले. कोणी बोले, मुकी, संपूर्ण ऐक्याची भेट!

'गोपाळ, पुरे आता.'
'मैने!'

'गोपाळ, ही पहिली व शेवटची भेट. पुन्हा नाही हो असे करायचे. सोड मला. दूर हो. तुझा संयम आठव. या जन्मी हा माझा देह तुझा नाही. दुस-याने हा विकत घेतला आहे. त्याने हाताळला आहे. माझा देह म्हणजे हुंगलेले फूल. ते का देवा, मी तुला देऊ? माझे हृदयकमळ तुला दिले आहे. गोपाळ दूर हो गडया. हं, शहाणा आहे माझा गोपाळ.'

गोपाळ दूर झाला, मैना दूर झाली.

ते ओसाड देऊळ. तेथे वटवाघळांनी घाण केली होती. त्याची दुर्गंधी सुटली होती. तेथे कोणी क्षणभर बसू शकता ना. नाकाला कोणीही पदर लावता, परंतु ती दोघे तेथे बसली होती. त्यांच्या मुखावर प्रसन्नता होती. त्या प्रसन्नतेत करुणेचीही छटा होती.

'गोपाळ; येथे केव्हा आलास?'
'काल रात्री.'
'येथेच का निजलास?'
'हो.'

'या घाणीत?'
'तुझ्या स्मृतीचा सुगंध माझ्याजवळ आहे. त्यामुळे मला सारे सुगंधी वाटते. मला काल वाटे की, कोणी येथे फुलेच पसरली आहेत. पुष्पशय्येवर पडल्याप्रमाणे मला वाटत होते. उदबत्त्यांचा घमघमाट येथे सुटला होता. मी नागाप्रमाणे डोलत होतो.'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती