सोमवार, जानेवारी 18, 2021
   
Text Size

सती

'हे तुझे नवीन मंदिर. माझ्या देवाचे मंदिर. ये. हे देऊळ आपण झाडू.' दोघांनी देऊळ स्वच्छ केले. नदीतून हातपाय धुऊन दोघे आली.
'गोपाळ, येथे फुले फुलव.'
'फुलवीन.'
'त्या फुलांनी मी तुझी पूजा करीन.'

'तू येथे येशील!'
'हो, रोज येत जाईन.'
'खरेच?'
'परंतु एका अटीवर. मला स्पर्श नाही करायचा. गोपाळा तू समोर बसत जा. मी तुझी पूजा करीत जाईन. तुझ्या गळयात हार घालीन. तुला धूपदीप ओवाळीन, तुला नैवेद्य दाखवीन. तुला प्रदक्षिणा घालीन. तुझ्या समोर डोळे मिटून पोट भरेपर्यंत ध्यान करीन. मग मी जाईन.'

'येत जा. मी तुला हात लावणार नाही.'
'रागावलास?'
'नाही.'
'गोपाळा, तू कशावर जगशील?'
'आजपर्यंत कशावर बरे जगलो?'
'माझ्या प्रेमावर.'

'त्याचवर पुढे जगेन.'
'जाऊ आता मी?'
'जा.'
'पोचवायला येतोस?'

'नाही. मला संयमी होऊ दे.'
'हो, संयमी हो. मलाही संयमी होऊ दे.'

मैना निघाली. गोपाळ तेथे उभा होता. तेथील वटवृक्षाखाली उभा होता. मैना क्षणक्षणा मुरडून बघत होती. गोपाळ शीळ घालीत होता. गेली, मैना नदीतून पलीकडे गेली.

गुरे घेऊन गुराखी येत होते. मैनेला पाहून त्यांना आश्चर्य वाटले. जहागिरदाराची बायको! आवडती बायको! दहा हजार रुपये देऊन आणलेली बायको! ती एकटी कोठे गेली होती? अनवाणी, पायी कोठे गेली होती? मैना गावात शिरली. लोक तिच्याकडे टकमका पहात होते. मैनेचे कोठेही लक्ष नव्हते. ती वाडयात आली. ती आपल्या महालात आली. तिचे डोळे रडू लागले.

दुस-या दिवशी मोठया पहाटे मैना उठली. तिने सुंदर सुंदर फुले गोळा केली. तिने मनोहर माळ गुंफिली. तिने पूजासाहित्य घेतले. हातात दूध घेतले. ती निघाली. स्नान करून पवित्र होऊन निघाली.

'मैने, कोठे जातेस?' पतीने विचारले,
'देवाची पूजा करायला.'
'कोठे आहे देव?'
'नदीपलीकडे.'

'हे सारंग गाव नव्हे. तू भ्रमात का आहेस?'
'शेगावातही देव आहे. नदीपलीकडे देव आहे.'
'त्या देवळात वटवाघळे घाण करतात; तेथे दुर्गंधी आहे, नरक आहे.'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती