सोमवार, जानेवारी 18, 2021
   
Text Size

सती

'तेथे सुगंधी स्वर्ग आहे. नयनमनोहर मूर्ती आहे. जाऊ द्या मला. उशीर झाला तर देवाला वाईट वाटेल. तो वाट पहात असेल.'
'इतके दिवस देवाची पूजा का केली नाहीस?'
'इतके दिवस देव तेथे आला नव्हता.'

'आता वाटते आला?'
'होय.'
'कशासाठी पूजा?'
'जन्मोजन्मी देव मला मिळावा म्हणून. माझ्या जीवनात भरून रहावा म्हणून.'

'तू एकटी का जाणार? नदी आहे. बरोबर कोणी ने.'
'मला भय ना भीती. देवाच्या पूजेत दुसरे कोणी बरोबर येईल, तर व्यत्यय यायचा. मला एकटीला पूजा करू दे. तो या एकटया मैनेचा देव आहे. तो दुनियेचा देव नाही. जाऊ दे मला.'

मैना गेली. हातात पूजापात्र घेऊन गेली. गावात कुतूहल उत्पन्न झाले. तिच्या पाठोपाठ कोणी कोणी निघाले. काही संशयी मंडळी, कोणी जिज्ञासू मंडळी, कोणी वात्रट मंडळी निघाली. मैनेचे लक्ष नव्हते. ती देवाच्या चिंतनात दंग होती.

नदी ओलांडून मैना पलीकडे गेली. पावले भराभर उठत होती. ती त्या मंदिरात आली. सर्वत्र स्वच्छता होती.
'गोपाळा, हृदयदेवा, मी आल्ये. या आसनावर बैस.'

गोपाळा आसनावर बसला. मैनेने त्याची पूजा केली. त्याच्या गळ्यात तिने तो सुंदर हार घातला. तिने त्याला ओवाळले. किती प्रेमपूर्वक ओवाळले! नंतर प्रदक्षिणा घालून ती त्याच्यासमोर ध्यान करीत बसली. त्यानेही डोळे मिटले होते. तिनेही डोळे मिटले होते. बाहेर टवाळ लोक जमले होते. ते टाळया पिटीत होते. कोणी खडे मारले. कोणी काही केले. दोघांची समाधी भंगली नाही.

मैनेने डोळे उघडले. गोपाळाचे डोळे मिटलेले होते, त्याच्याकडे पाहले. तिने त्याला प्रणाम केला.
'गोपाळ!' तिने हाक मारली.
'काय?' डोळे उघडून त्याने विचारले.

'हे दूध पी. हा नैवेद्य घे.' ती म्हणाली.
गोपाळ ते दूध प्याला. दोघे पुन्हा स्तब्ध होती.
'एवढया दुधावर तू जगशील?'
'पाने आहेतच भरीला.'
'जाऊ मी?'
'जा. उद्या ये.'

मैना निघाली. काही जण तिच्या पाठोपाठ येत होते. कोणी त्या मंदिराजवळच राहिले ते गोपाळाची टर उडवीत होते. गोपाळ अगदी शांत होता. तो मंदिरातून बाहेर आला. वेदातील मंत्र म्हणत. उपनिषदे म्हणत, गीता म्हणत तो झाडाखालून हिंडू लागला. जणू त्याने वेदशाळाच उघडिली, जणू आश्रमच त्याने थाटला. पशुपक्ष्यांना का तो वेद शिकवीत होता?

तो गुरांख्याबरोबर खेळे, त्यांना गोष्टी सांगे. कधी कधी त्यांच्या भाकरीतील भाकरीही खाई. मैना रोज सकाळी येत असे. सकाळची ती महान पूजा करून मैना जात असे. मग गोपाळ गाईगुरांसंगे, इतर गोपाळांच्या संगे, वृक्षवेलींसंगे वेळ नेत असे.

 

पुढे जाण्यासाठी .......

सती