सोमवार, जानेवारी 18, 2021
   
Text Size

सती

'मैने, तू कोणाची पूजा करतेस?' पतीने विचारले.
'माझ्या देवाची.'
'तो सजीव आहे की निर्जीव आहे?'
'देव का कधी निर्जीव असतो? मढी निर्जीव असतात.'

'तुझा देव दगडाचा आहे की माणसाचा आहे?'
'माझा देव चैतन्यमय आहे, दयाळू आहे. प्रेमळ आहे, पवित्र आहे!'
'मैने प्रियकराची तू पूजा करतेस?'
'मग दुस-या कोणाची करू? ज्याच्यावर प्रेम आहे, त्याचीच मी पूजा करीन.'

'मैने. माझ्या कुळाची अब्रू, तिची काही किंमत आहे की नाही?'
'चार चार बायका करणा-यांना काही अब्रू आहे का? चार चार अनाथ स्त्रियांना जिवंतपणी मृतवत करणा-याला काही अब्रू आहे का देवापरी तुमच्या अब्रूचे कधीच दिवाळे निघाले आहे. बायकांना गाईप्रमाणे विकत घेणारे त्यांच्या अब्रूची मला नाही काळजी!'

'मैने!'
'काय?'
'जगात तुझी छी-थू होईल.'

'माझ्या छी-थूची तुम्हाला काळजी नको. मी कोणतेही पाप करीत नाही, लपूनछपून काही नाही. माझा सारा उघडा कारभार आहे. माझ्या प्रियकराची मी पूजा करते, परंतु तुम्ही विकत घेतलेल्या या देहाला-या सुंदर देहाला-माझा देव हात लावीत नाही. मी त्याला हात लावू देत नाही. आमची ही पुढील जन्मासाठी तपश्चर्या आहे, किंवा देहाच्या आतील आत्म्याची उपासना आम्ही चालविली आहे. एकमेकांचे देह एकमेकांकडे ओढ घेत असतात, परंतु आम्ही संयमी राहतो, मोहवस्तू जवळ असून अलिप्त राहतो. करू दे जगाला छी-थू! पावित्र्याला खोटया शिव्याशापांची, खोटया नालस्तीची पर्वा नाही.'

मैना निर्भयपणे प्रत्यही जात असे; व प्रियकराची पूजा करून येत असे तिच्या जाण्याच्या वेळेस रस्त्यात गर्दी जमे, लोक तिला नावे ठेवीत. मैना त्याची पर्वा करीत नसे.
'चालले पाखरू!' कोणी म्हणत.
'चालली रंभा!' दुसरे म्हणत.

'उदबत्ती चालली उदबत्ती. प्रियकराला वास देण्यासाठी उदबत्ती चालली.'
'उदबत्ती, खरेच उदबत्ती. चालली वास द्यायला. इतके दिवस दिवाणखान्यात उदबत्ती पडून होती. आता पेटली. वास द्यायला चालली.'
'तिला पेटवणारा आला.'

'जा, उदबत्ती, लौकर जा. ही गोरी गोरी उदबत्ती आहे.'
मैनेला सारा गाव-छचोर गाव-उदबत्ती म्हणू लागला. मैना स्थितप्रज्ञाप्रमाणे सारे सहन करी. सागराकडे जाणारी नदी, ती का वाटेतील अडथळे जुमानते? काटेकुटे, खाचखळगे, डोंगर-कुडे सारे उल्लंघून ती धावत असते. तशीच ही आमची मैना.

'मैनेच्या सवती तिला नसत का बोलत? त्या नाही का आग पाखडू लागल्या?
'ती आपल्यासारखी वेडी नाही. ती आपली उघड उघड जाते.' एक म्हणाली.
'आपण 'धर्म धर्म' करीत बसलो. देवधर्माने म्हणे दिलेला नवरा! हा कसला नवरा? खापरी ही, परंतु आपणास ही खापरी फोडण्याचे धैर्य  नाही. हिला धैर्य आहे.'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती