सोमवार, जानेवारी 18, 2021
   
Text Size

सती

'परंतु म्हणे खरोखर पूजा करून येते. तिचे त्याच्यावर प्रेम होते. या म्हातारडयाने तिच्या आयुष्याची नासाडी केली. निखारे ओता मेल्याच्या तोंडात. आमच्या सुखावर निखारे ओतलेत राक्षसाने.' तिसरी म्हणाली.
'ती पवित्र आहे.'
'ती सती आहे.'

'जग तिला आज नावे ठेवील; परंतु पुढे वंदील.'
'ती सुखासाठी हपापलेली असती, तर त्याच्याबरोबर राहती, पळून जाती. परंतु ती विरक्त आहे, ती खरोखर देवता आहे. तिला दागिन्यांचा सोस नाही, खाण्यापिण्याची हौस नाही, नटणे-मुरडणे माहीत नाही.'

'चिखलातील हे कमळ आहे.'
'भांगेतील ही तुळस आहे.'
'मातीतील माणिक आहे.'

'असे त्या सवती बोलत. त्यांना स्वत:ची दु:खे होती. त्यांच्या जीवनाच्या होळया पेटलेल्याच होत्या.
हळूहळू मैनेच्या वडिलांच्या कानावर गोष्टी गेल्या. सारंगगावात कुजबूज सुरू झाली. बायका देवळात येवोत वा नदीवर धुवायला जावोत, या गोष्टीची चर्चा सुरू असे. सावित्रीबाई घरातून बाहेर पडतनाशा झाल्या.

'आई, मैनाताई का कोणाबरोबर पळून गेली?' जयंताने विचारले.
'कोण म्हणते बाळ?'
'सारा गाव म्हणतो.'

'खोटे आहे. तुझी ताई असे कधीही करणार नाही.'
'माझ्या ताईला उगीच नावे ठेवतात. कोणी आता माझ्याजवळ असे म्हणेल, तर मी त्याचे थोबाड फोडीन, त्याला दगड मारीन.'
'तू घरातून बाहेर जाऊ नकोस.'

'या घरातून बाहेर पडावे, मैनाताईकडे जावे, असेच मला वाटते. नको हे घर, मोठमोठया खांबांचे घर.'
जयंता रात्री निजला होता. सावित्रीबाई व धोंडोपंत बोलत होती.
'तुमचे पाप तुम्ही भोगा. पोरीला का बोल लावता?' सावित्रीबाई म्हणाल्या.

'आमची चूक झाली समजा; परंतु मैनेने का असे वागावे? आई-बापांच्या तोंडाला का म्हातारपणी काळे फासावे? आम्ही मेल्यावर करायचे होते तिने सारे ढंग, मारायच्या होत्या दुस-याला मिठया. आम्ही म्हातारी जिवंत का राहिलो, हेच समजत नाही!' धोंडोपंत म्हणाले.

'केलेल्या पापाची फळे चाखायला!'

'कोणते केले पाप?'
'पोर विकलीत हे पाप. तो पुरुष नाही, असे माहीत असून, तेथे पोर लोटलीत. म्हाता-या माकडाला माझ रत्न दिलेत. पण करून-सवरून ते छपवता का?'
'परंतु या बाळासाठी ना सारे केले? तू का नाही मोडता घातलास?'

'आमचे कोण ऐकतो? मोडता घातला असता, तर मारली असतीत कमरेत लाथ. आम्हाला का मन आहे? तुम्ही सांगाल ते ऐकायचे. मी का सांगितले नव्हते तुम्हाला? तिचा त्या गोपाळावर जीव असेल, तर त्याच्याशी लावा तिचे लग्न. सांगितले नव्हते? डोळयांत पाणी आणून सांगितले होते; परंतु तुम्हाला अश्रूंची आहे कोठे कदर!'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती