सोमवार, जानेवारी 18, 2021
   
Text Size

सती

'परंतु आता काय करायचे? हा पोरगा अजून लहान आहे; नाही तर मी जीव दिला असता.'
'जा, मैनेकडे व तिला दोन शब्द सांगून या. म्हणावे आम्हा म्हाता-यासाठी एवढे ऐक. सोड त्या गोपाळाचा नाद. नको जाऊस त्याच्याकडे.'

'आणि उघडपणे म्हणे जाते, दिवसाढवळया जाते. तिला अगदीच कशी लाज नाही? 'काय तिला सांगू? ती का ऐकेल? ऐकण्याच्या मर्यादेत ती आता नाही. काय करावे?'
'जाऊन या. करायचे काय?'

इतक्यात 'मैनाताई, रडू नको, मी आहे तुला. कोणी नावे ठेवली, तर मी त्याला दगड मारीन.' असे जयंता झोपेत बोलत होता. मायबापे स्तब्ध   होती. पुन्हा 'रडू नको मैनाताई!' जयंत झोपेत म्हणाला.
'मेली तुझी मैनाताई.' धोंडोपंत चिडून ओरडले.

'मेली? मैनाताई मेली?' असे करीत जयंत उठला. जयंत रडू लागला.
'खरेच का मेली मैनाताई? कोणी तिला मारले?' तो दीनपणे विचारू लागला.

'अरे, मैनाताई आहे हो. तू स्वप्नात आहेस. नीज. मी जाणार आहे मैनाताईकडे उद्या. नीज. आहे हो मैनाताई.' धोंडोपंत म्हणाले.
'माझी ताई मेली तर मी जगणार नाही.' जयंत म्हणाला.

'पण ताई आहे तुझी.' आई म्हणाली.
जयंता पुन्हा झोपला. ती दोन वृध्द माणसे तेथे बसली होती. हळूहळू त्यांनाही झोपेने कुशीत घेतले.

सायंकाळ झाली होती. शेगावातील गाईगुरे परत येत होती. घरोघर दिवे लागले. मैना महालात बसली होती. खिडकीजवळ बसली होती. अशोकाची फुले वा-यावर नाचत होती.
'मैने!' कोणी तरी हाक मारली.

मैनेचे लक्ष नव्हते. तिचा देह महालात होता, परंतु मन कोठे तरी दूर गेले होते.
'मैने!' पुन्हा हाक.
मैनेने मागे पाहिले, तो वडील आलेले. पित्याच्या व पुत्रीच्या डोळयांची भेट झाली.
'मैने!'
'काय बाबा? बसा.'

'मैने, आम्ही अनेक गोष्टी ऐकल्या. त्या ख-या का?'
'बाबा, थकून आला असाल. जेवा. रात्रभर विश्रांती घ्या, सकाळी बोलू.'
'मी येथे कसा जेवू? माझी मुलगी माझ्या तोंडाला जर काळोखी फाशीत असेल तर मी कशाला जेवू? कशी लागेल मला झोप? कसे लागेल गोड अन्न?
'बाबा, एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवते की, तुम्ही जो हा देह मला दिला आहे. त्या देहाने कोणतेही पाप केलेले नाही. ज्याला हा देह विकलात तोच त्याचा संपूर्ण धनी आहे. तुम्ही जेवा, विश्रांती घ्या.'

धोंडोपंत रात्री झोपले. ते सकाळी उठले. मैना केव्हाच उठली होती. आज जरा ढग आले होते. थोडाथोडा झिमझिम पाऊस पडत होता. मैनेने फुले गोळा केली. आज फुले जरा पाणरली होती. तिने ती फुले पदराने टिपली. त्या फुलांचा ती हार करीत बसली.

'मैने कोणाला हार?' पित्याने विचारले.
'मुरलीधराला. मैनेच्या जीवनातील वेणू वाजवणा-या गोपाळाला.'

'गोपाळ का येथे राहतो?'
'येथे म्हणजे?
'या गावात?'

'हो, या गावात.'
'कोठेसा राहतो?'
'नदीपलीकडील देवळात.'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती