सती
'तू का त्याच्याकडे जातेस?'
'हो.'
'केव्हा?'
मंगल प्रात:काळी.'
'दररोज जातेस?'
'हो.'
'काय करतेस जाऊन?'
'ते डोळयांनी येऊन पाहा.'
मैना पूजेला निघाली, पिता आधीच पुढे गेला होता. मैनेचा बाप आला आहे. ही वार्ता गावात पसरली होती. बाप पोरीला मारतो-झोडतो की काय हे पाहण्यासाठी लोकांची गर्दी देवळाकडे चालली. मैना स्थिर चित्ताने जात होती.
पिता वटवृक्षाखाली उभा होता. मैना मंदिरात शिरली. गोपाळ दर्भासनावर बसला. पूजा सुरू झाली. गळयात हार घालण्यात आला. नीरांजन ओवाळण्यात आले, प्रदक्षिणा घालून प्रणाम करून मैना ध्यानस्थ बसली, दोघे डोळे मिटून बसली होती. पिता पहात होता. सारे प्रेक्षक पहात होते. ती महान पूजा पाहून सारे स्तब्ध होते.
मैना उठली.
'गोपाळा, हे दूध घे.'
गोपाळ दूध प्याला. मैना परत निघाली. तिने कोणाकडे पाहिले नाही. सारी मंडळी परतली. पिता झाडाखाली खिळल्यासारखा उभा होता, काही वेळाने तो परतला.
मैना महालात होती.
'मैने!'
'काय बाबा?'
'काही असो, परंतु तू अशी आत जाऊ नकोस.'
'मग कशी जाऊ?'
'तू घरातून बाहेर पडू नकोस. परपुरुषाची पूजा करतेस हे शोभत नाही.'
'तो मला परपुरुष नाही, माझा पती हाच मला परपुरुष आहे. तुम्ही पाप केलेत. परपुरुषाशी व्यवहार करायला मला पाठवलेत. गोपाळ हा माझा पुरुष, माझा देव, माझे सर्वस्व.'
'मैने, म्हातारपणी आमची अब्रू राख.'
'कोणती तुमची अब्रू गेली? मैनेने आपल्या देहाला देह विकत घेणा-याच्या हाताशिवाय कोणाचा हात लागू दिला नाही. गोपाळ दूर बसतो, मी दूर बसते. तुम्ही पाहिले नाही?'
'होय पाहिले.'
'मग का असे म्हणता?'
'लोक मान वर करू देत नाहीत.'
'लोकांना खरे ते सांगा. सांगा की, माझी मैना पवित्र आहे. मुक्त आहे, ब्रह्मवादिनी आहे.'
'ब्रह्मवादिनी?'
पुढे जाण्यासाठी .......