सती
'ब्रह्मवादिनी. ज्याच्यावर माझे प्रेम तो समोर असताही मी सुखभोगापासून अलिप्त राहते. मनाला रोखते, देहाची माती दूर भिरकावून मातीतील आत्म्याचे माणिक त्याकडे मी लक्ष देत्ये. हसू नका, उपहास करू नका. मैना ब्रह्मवादिनी आहे. मैनेने देह जिंकला आहे.'
'मैने, तुझी आई रडत आहे.'
'माझे लग्न ठरवीत असतानाही आई रडत होती. त्या वेळेस तिच्या अश्रूंचा तुम्ही उपहास केलात. झाले काय तुम्हाला रडायला?' असे म्हटलेत.'
'मैने!'
'काय?'
'अधर्म करू नको. आम्ही केला, निदान तू तरी करू नकोस.'
'मी धर्माप्रमाणे वागत आहे. माझे मन मला ग्वाही आहे.'
'नाही ना ऐकत?'
'मी सत्यधर्माला अनुसरून वागत आहे.'
'जाऊ मी?'
'जा. आईला सांगा की मैना निष्पाप आहे. कावळयांच्या कलकलाटाकडे लक्ष देऊन मला निंदू नका. मी निर्मळ आहे. जयंताला सांगा की, तुझी ताई पवित्र आहे.'
धोंडोपंत परत गेले. वासुदेवरावही आता वाडयाबाहेर पडत नसत, एक तर ते दिवसेंदिवस खंगत चालले होते. दुसरे म्हणजे त्यांना लाज वाटत होती. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांना खूप कर्जही होत चालले होते.
त्या दिवशी गोपाळ दुपारी हिंडतहिंडत बराच दूर गेला, नदीतीराने गेला. एके ठिकाणी तो थांबला. जवळच एक मोठा जुनाट वृक्ष होता. त्या वृक्षाखाली तो बसला. त्याचा तेथे डोळा लागला, तो मुळांवर पडला. झोपी गेला.
तिकडून कोणी तरी येत होता.
'अहो, येथे झोपू नका.' तो मनुष्य गोपाळाला म्हणाला.
'का बरे?' गोपाळ उठून म्हणाला.
'या झाडाची एक गोष्ट आहे.'
'कोणती गोष्ट?'
'पुष्कळ वर्षांपूर्वी येथे एका संन्याशाची समाधी होती. त्या समाधीजवळ उत्सव होत असे. उत्सवात तीन दिवस कीर्तन होत असे. त्या कीर्तनाला लोक तर येतच असत; परंतु आसपासचे पशुपक्षीही येत आणि सापसुध्दा येत. या झाडावर साप येऊन बसत. कीर्तन ऐकत. पुढे एकदा फार मोठा पूर आला. समाधी वाहून गेली, परंतु हे झाड जिवंत राहिले. या झाडावर साप राहतात. एक फारच म्हातारा सर्प या झाडावर आहे. त्याच्या अंगावर बोट बोट केस आहेत. हे झाड म्हणजे पवित्र जागा. समाधीची जागा. येथे निजू नका. येथे पापी मनुष्य यायला भितो.' 'आपण पुण्यवान आहोत,' असे कोणाला सांगता येईल? निर्दोष व निष्पाप कोण आहे? म्हणून येणारे-जाणारे दुरूनच जातात, झाडाला प्रणाम करून जातात.'
'मला सापांचे भय वाटत नाही. ते मला चावत नाहीत. मी त्या पडक्या देवळात राहतो. माझ्या उशाला साप येऊन बसतात. सकाळी निघून जातात.' गोपाळ म्हणाला.
पुढे जाण्यासाठी .......