सोमवार, जानेवारी 18, 2021
   
Text Size

सती

'तुम्ही पुण्यवान् असाल. त्या जहागिरदाराची बायको तुमचीच ना पूजा करते?'
'हो.'

'तुम्ही पुण्यवान् आहात. तुम्हाला नमस्कार.'
तो मनुष्य नमस्कार करून निघून गेला. गोपाळही हळूहळू हिंडत हिंडत आपल्या मंदिरात आला. गोपाळाने पुढे आजूबाजूस फुले लाविली. तोही  फुलांचा हार गुंफून ठेवी. तोही मैनेची पूजा करी. ती त्याची पूजा करी. 'देवो भूत्या देवं यजेत्' दोघे एकमेकांस प्रेम देत होती, पावित्र्य देत होती, एक प्रकारची मोह जिंकण्याची शक्ती देत होती.

असे दिवस जात होते. परंतु एके दिवशी एक अशुभ वार्ता कानी आली.
नवीन सरकारने पूर्वीच्या काही जहागि-या जप्त केल्या. काहींची इनामे, वतने बंद केली. वासुदेवरावांची जहागीरही जप्त झाली. त्यांचा राहता वाडा फक्त राहिला. वृध्द वासुदेवरावांना हा मोठाच आघात होता. तो मोठा धक्का होता. ते रडत बसले होते.

'रडू नका. रहायला हे घर आहे. तुमचेही आता वय झाले, पोटी मूल ना बाळ.' मैना म्हणाली.
'परंतु तुझे कसे होईल?'
'माझे सारे चांगले होईल.'

'वृध्द नव-याशी तुझे लग्न लावले, परंतु पोटाला तरी कमी पडू नये. उद्या म्हातारी झालीस तर दुस-याच्या तोंडाकडे पाहाण्याची पाळी येऊ नये, असे सारखे मनात येते.'
'तुम्ही खरेच माझी काळजी करू नका.'

'दिवाणजी सोडून गेले. गडीमाणसे जातील. हा वाडा शून्य होईल, जणू खायला येईल.'
'परंतु मी नाही सोडून जाणार. मी तुमच्याजवळ राहीन. सारी सोडून जातील, त्या वेळेसच माझी खरी जरूरी.'

'तुला एकटीला काम पडेल, या म्हाता-याचे करावे लागेल.'
'मी सारे करीन. म्हातारपणी तुमची हयगय होऊ देणार नाही. तुमची सेवा करीन.'

खरोखरच वासुदेवरावांची स्थिती चमत्कारिक झाली. तीन बायका माहेरी निघून गेल्या. बरोबर जेवढे नेता येईल, तेवढे त्यांनी नेले. जाताना त्यांनी वृध्द नव-याला विचारलेदेखील नाही. मैनेला विचारले नाही. वाळलेल्या झाडावर पक्षी का राहतात? ज्या शेतात पीक नाही त्याच्याकडे का पाखरे वळतात?

मैना घरात सारे करी. ती आता झाडलोट करी. पाणीउदक भरी. भांडी घाशी. स्वयंपाक करी. वृध्द वासुदेवरावांच्या अंगाला तेल लावी. त्यांना कढत पाण्याने स्नान घाली. त्यांचे अंग पुशी. त्यांचा हात धरून चालवी. त्यांचे ताट वाढी. ती त्यांची जणू आई बनली, दाई बनली, मोलकरीण बनली.

वासुदेवराव खंगत चालले, ते अंथरूणाला खिळले. मैना त्यांच्याजवळ सारखी बसलेली असे; परंतु एवढयाने भागायचे नव्हते. वासुदेवरावांस कर्ज होते. वाडयावर जप्ती आली. सावकारांनी वाडयाचा कब्जा घेतला. मैनेने आपले सारे दागिने सावकारापुढे ओतले.

'आम्हाला या घरातून काढू नका. यांना घेऊन मी कोठे जाऊ? या वाडयातील चार खोल्या आम्हाला ठेवा. फार दिवस काही लागणार नाहीत. तुम्ही सारे न्या. दोन भांडी राहू देत. थोडी जागा असू दे. हे माझे दागिने तुमच्यापुढे ठेवते. या दागिन्यांना मी कधी हात लावला नाही. घ्या हे सारे, आता पुन्हा येऊ नका. देवाने यांना बोलावले, म्हणजे तुम्ही हा वाडा घ्या. या मुलीचे एवढे ऐका!'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती