बुधवार, जानेवारी 20, 2021
   
Text Size

सती

'गीता मला पाठ आहे. मी लहानपणी शिकल्ये आहे. बाबा मला ब्रह्मवादिनी करणार होते. किती तरी मी पाठ केले होते.'
'ते सारे यांना ऐकवा. तुम्ही खरेच ब्रह्मवादिनी आहात. ब्रह्माचा वाद करणा-या नसून, ते ब्रह्म मिळवणा-या आहात. जातो मी.'

गणेशपंत निघाले. मैना पतीजवळ बसली. गीता म्हणत बसली. विष्णुसहस्त्रनाम म्हणत बसली. सुंदर स्तोत्रे म्हणत बसली. आज तिला सारे भराभर आठवत होते. लहानपणी पाठ केलेले सारे जिभेवर येत होते.
'मैने!'
'काय हवे?'
'काही नको. मला क्षमा कर. आता पुढचा जन्मच नको. आला तर तो चांगला येवो. हातून पाप न घडो. तू गीता ऐकवीत आहेस. आता मला भीती नाही; परंतु तू मला क्षमा कर.'

'कसली क्षमा?'
'माझ्या पापांची.'
'क्षमा करणारी मी कोण? माझ्यातही का दोष नाहीत? आपण सारी चुकणारी माणसे. क्षमा करणारा तो परमेश्वर. त्याला आठवा, त्याला स्मरा.'

'मैने, माझा देव तू. माझा परमेश्वर तू. वैद्यही माझ्याजवळ यायला भितात. दुर्गंधी सुटलेली. तू जवळ बसतेस. प्रेमाने संबोधितेस. तू देव नाही तर कोण? तो वरचा देव कोणी पाहिला आहे? मेल्यावर त्याला बघेन; परंतु जिवंतपणीच मला परमेश्वर भेटला. मी मुक्त झालो. कृतार्थ झालो. तुझे पाय पुढे कर. त्यावर डोके ठेवू दे. ते डोळयांतील पाण्यांनी भिजवू दे. कर पुढे.'

'शांत रहा. माझी गीता ऐका.'
'मैने खरेच मी शांत आहे. सा-या जीवनात शांती नव्हती अशी या वेळेस आहे. तू कोण आहेस? तू माझी आई आहेस. तू माझी देवता आहेस. किती गं सेवा करशील? आईसुध्दा कंटाळली असती. म्हाता-याची नाही हो कोणी मनापासून सेवाचाकरी करीत. म्हणतात आता मरायचाय आहे; परंतु तू? तुला तर कसली आशा, ना इच्छा. निरिच्छपणे सेवा करीत आहेस. धन्य तुझी! तुला जग नावे ठेवते. मी तुला धर्म शिकवायला लागलो होतो. तुझा पिता तुला धर्म शिकवायला आला होता; परंतु सर्व आचार्यांनी तुझ्याजवळ धर्म शिकावा, मैने!'

'तुम्ही आता बोलू नका.'
'बोलेन तरच मुक्त होईन.'

'मनात ठेवूनही मुक्त व्हाल; तुम्हाला पश्चात्ताप झाला. चांगले झाले. चुकणारी सारीच, परंतु चूक डोळयांसमोर आणून ज्याने चार टिपे काढली तो खरा. जगात चुकीचे, अपराधाचे समर्थन करीत राहणारेच फार, तुम्ही तसे नाही. चांगले आहे. 'शेवटचा दीस गोड व्हावा.' शेवटचा दिवस गोड झाला म्हणजे झाले. पडून रहा.'

'मैने, मी मेल्यावर तू कोठे जाशील?'
'तुम्हाला सोडून मी कोठे जाणार?'
'अगं, मी मेल्यावर?'
'देवाला माहीत.'

'माहेरी जाशील?'
'नाही.'
'येथे राहशील?'
'नाही.'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती