रविवार, ऑक्टोबंर 25, 2020
   
Text Size

सती

'गोपाळाबरोबर जाशील?'
'नाही.'
'मग?'
'देवाला माहीत.'

रात्री फारच थंडी पडली होती. मैना पांघरूण न घेता तशीच बसून होती. वृध्द पती पडून होता. पहाटे पहाटे मैना झोपली. खाली जमिनीवरच झोपली होती. उजाडले होते. वासुदेवराव मैनेकडे बघत होता. त्याचे डोळे पाण्याने भरून आले होते. पवित्र मैना जमिनीवर पडली होती. त्याने कापरे हात जोडून प्रणाम केला. उठून तिचे पाय धरावे, असे त्याच्या मनात आले. तो धडपड करू लागला; परंतु खोकला आला. मैना जागी झाली.

ती एकदम त्याच्याजवळ बसली.
'कशी झोप लागली मला कोणास कळे?' ती म्हणाली.

'माझ्या खोकल्याने तुझी झोप मोडली. मैने जरा नीज. विश्रांती घे. मी तर आता मरणार, हे निश्चित. तू स्वत:ची काळजी घे. तू आजारी पडलीस तर कोण घेईल तुझी काळजी? तू स्वत:च्या प्रकृतीला जप. झोप जरा.'

'आता का झोपू? काही तरीच.'
थंडीमुळे आज फुले नीट फुटली नव्हती. खिडकीतून मैनेने पाहिले. गार वारा येत होता. मैनेच्या अंगाला झोंबत होता. तरी ती तेथे तशीच उभी  होती. तिला का कसली आठवण येत होती?

'मैने!' म्हाता-याने हाक मारली.
मैनेला हाक ऐकू गेली नाही.
'मैने!' पुन्हा हाक.

'मला हाक मारलीत?' मैनेने वळून विचारले.
'हो.'
'काय हवे?'
'तू थंडीत उभी का? गार वारा येत आहे. काही अंगावर घे.'

'मी का थंडीत उभी होत्ये? मला भानच नव्हते. काही गोड स्मृती मला आल्या. त्यांची ऊब होती माझ्याजवळ.'
'कसल्या स्मृती?'

'एकदा लग्नापूर्वी आमच्या सारंग गावी अशीच थंडीतून गोपाळाकडे फुलांसाठी गेले होते. मी गारठून गेले होते. गोपाळाने स्वत:ची शाल माझ्या अंगावर घातली. प्रेमाची शाल, उबदार शाल, मी हसले. 'प्रेमाची ऊब मिळाली म्हणजे माणसे हसतात; असे गोपाळ म्हणाला. आज तशीच थंडी  पडली आहे. गोपाळाची शाल अंगाभोवती आहे. असेच मला वाटत होते. मी सारे विसरून गेले होते.'

'किती तरी दिवसांत तू गोपाळाकडे गेली नाहीस. आज जाऊन ये. फार वेळ बसू नकोस. धावत जा व पळत ये. त्याला पाहून ये. तुझे हृदय गोठून गेले असेल. गोपाळाच्या दर्शनाची ऊब घेऊन ये.'

'आता स्मरणानेही ऊब मिळते दर्शनाची जरूर नाही.'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती