शुक्रवार, ऑक्टोबंर 30, 2020
   
Text Size

सती

मैनेने रोग्याभोवतीचे सारे स्वच्छ केले. गोपाळाकडे जावे, असे तिच्या मनात आले, ती खाली गेली. तिने फुले गोळा केली. आता बागेला पाणी नसे मिळत. पृथ्वीच्या पोटातील काय ओलावा मिळेल तेवढाच. उन्ह पडले होते. थंडीने गोठलेली फुले नीट फुलली होती.

मैनेने हार गुंफला. तिने पूजासाहित्य तयार केले, तिने स्नान केले. शुभ्र वस्त्र ती नेसली.
'मी येते हो देवाची पूजा करून.'
'ये.'

मैना निघाली. किती तरी दिवसांत ती बाहेर पडली नव्हती. लोकांना आश्चर्य वाटले! वासुदेवराव मेला की काय? की तो बरा आहे. आज मैना का निघाली? तिची कोणी थट्टा केली नाही, कोणी खडे मारले नाहीत. फुले फेकली नाहीत. काहींनी हात जोडले.

गोपाळ त्या मंदिरात होता. पडून होता. मैना जाऊन उभी राहिली.
'गोपाळा!' तिने गोड हाक मारली.

गोपाळ उठून बसला. तो अशक्त झाला होता. मैनेला बघताच त्याला शक्ती आली.
'किती दिवसांनी आलीस! बरे आहेत का वासुदेवराव?'
'एक देन दिवसांत बरे होतील. पुन्हा मग रोग नाही, भोग नाही.'

'म्हणजे काय?'
'लौकरच सारा पसारा संपेल.'
'तू किती वाळलीस?'

'आणि तू सुध्दा. मी तुझ्याकडे आले नाही. तुला दूध दिले नाही. तू कसा जगलास?'
'तुझ्या प्रेमावर.'
'केवळ प्रेमाने मनुष्य जगू शकत नाही. भरीला काही तरी लागते.'

'गुराखी भाकर देत.'
'गोपाळ!'
'काय?'

'आज आपण शेवटचे भेटून घेऊ. एकमेकांस पोटभर पाहू. ये.'
दोघांनी एकमेकांस प्रेमाने पाहिले. त्या पाहण्यात किती भाव असतील. मैना व गोपाळ यांनाच माहीत. गोपाळाने मैनेला घट्ट हृदयाशी धरले. दोघांचे डोळे मिटलेले होते. ती जिवंत होती का मेली? हालचाल नाही, काही नाही. दोघे अलग झाली.

'मैने!'
'काय?'
'शेवटी आपण अपूर्णच. वैराग्य कठीण वस्तू आहे.'

'मानवी जीवन सदोषच आहे.'
'कधी जाणार हे दोष?'
'जातील लौकरच. जळून जातील. उरलेसुरले जळून जाईल, खाक होईल.'

 

पुढे जाण्यासाठी .......

सती