रविवार, ऑक्टोबंर 25, 2020
   
Text Size

सती

आता कधी येशील?'
'आता नाही. ही शेवटची भेट. आता जेव्हा भेटू, तेव्हा मग ताटातूट राहणार नाही. गोपाळ, जाते मी. जाऊ ना? जाते हां.'
'मी पोचवायला येतो.'

'गोपाळ, तुला शक्ती नाही. तू कसा येशील?'
'तू बरोबर असलीस म्हणजे मला शक्ती येते. तू बरोबर असलीस म्हणजे मी पुरात उडी घेईन, आगीत उडी घेईन. तू माझी सामर्थ्यदेवता, स्फूर्तिदेवता.'
'तुझा मी हात धरते. चल.'
गोपाळाचा हात धरून मैना निघाली.

'अशीच दोघे जाऊ चल. ने मला. जगाच्या बाहेर ने.'
'नेईन. जगाच्या बाहेर नेईन.'
दोघे जात होती. नदी आली.
'गोपाळ, आता माघारा जा.'

'आता परत नाही येणार?'
'नाही.'
'मी येऊ तुझ्याकडे?'
'ये.'
'कधी येऊ?'

'मी खूण करीन तेव्हा ये.'
'मला कशी दिसेल ती खूण?'
'दिसेल, सा-या जगाला दिसेल.'
'केव्हा करशील खूण?'

'वेळ येईल तेव्हा.'
'कोणती खूण करशील?'
'मी दिवा दाखवीन. प्रकाश दिसला की ये. लाल लाल प्रकाश.'

'दाखव. लाल लाल दिवा दाखव. त्याची मी वाट बघेन.'
'जाते हां गोपाळ, जाते, हृदयदेवा.'

मैना गेली. गोपाळाला तेथे उभे राहवेना. नदीतीरी तो बसला. उन्ह कडक पडले, तरी तो उठेना.

'दादा, उन्हात नका बसू, उठा.' एक गुराखी म्हणाला,
'मी आगीतसुध्दा हसत बसेन. मला उन्ह ना थंडी. मला काही नाही सारे सारखे. मला आग भाजणार नाही, पाऊस भिजणार नाही.'
'उठा. मी हात धरून तुम्हाला नेतो.'

गुराख्याने हात धरून गोपाळाला देवळात नेले. गुराखी निघून गेला. गोपाळ तेथे शांतपणे पडून राहिला.
मैनेचा पती आजारी आहे, ही गोष्ट धोंडोपंतांच्या कानावर गेली; परंतु त्यांनी ती सावित्रीबाईस सांगितली नाही. एके दिवशी सावित्रीबाई देवळात गेल्या होत्या. तेथे त्यांना ती गोष्ट कळली.

 

पुढे जाण्यासाठी .......

सती